Homeफिचर्ससारांशशब्दांचे जादूगार.....गुलजार

शब्दांचे जादूगार…..गुलजार

Subscribe

प्रसिद्ध उर्दू कवी, शायर, गीतकार गुलजार यांना अत्यंत प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. गुलजार यांना परिचयाची गरज नाही. हिंदी चित्रपटसृष्टीसह हॉलिवूडमध्येही त्यांनी छाप सोडली आहे. रवींद्रनाथ टागोरांच्या पुस्तकाच्या उर्दू अनुवादाने गुलजार यांचे संपूर्ण जगच बदलून टाकले आणि ते वाचल्यानंतरच त्यांनी लेखक बनण्याचा निर्णय घेतला. आजच्या पिढीलाही कनेक्ट करणारे शब्द ही गुलजारसाहेबांची ताकद. ‘मोरा गोरा अंग लै ले’, हे गाणे लिहिल्यानंतर त्यांनी ते चित्रपटाचे संगीतकार एसडी बर्मन यांच्याकडे सोपवले. एसडींनी हे शब्द बिमल रॉय यांना अशा प्रकारे गाण्यात ऐकवले की त्यांनी पटकन गाण्यास होकार दिला आणि अशा प्रकारे कारकिर्दीतील पहिले गाणे गुलजार यांच्या पदरात पडले. त्यांच्या संपूर्ण जीवनावर टाकलेला हा दृष्टिक्षेप.

– आशिष निनगुरकर

गुलजार म्हणजे साहित्यविश्वाला पडलेलं एक सुरेख स्वप्न…शब्दांत खेळणार्‍या या अवलियाबद्दल बोलताना शब्दही अपुरे पडावेत. ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ सारखं काव्य काळजाला हात घालतं, तर माचिस चित्रपटातलं ‘पानी पानी रे’ ऐकताना डोळ्यांत पाणी येतं. एकीकडे हृदय पिळवटून टाकणारी गाणी लिहिणारे गुलजार आजच्या काळाशी सुसंगत गाणीही ज्या वकुबाने लिहितात ते पाहून रसिक मंत्रमुग्ध होतो. ‘आँखे भी कमाल करती है, पर्सनल से सवाल करती है’ ही ‘कजरा रे…’ मधली ओळ असो, वा ‘ओमकारा’मधलं ‘बिडी जलायले’ आजच्या पिढीला कनेक्ट करणारे शब्द ही गुलजारसाहेबांची ताकद. अशा शब्दांच्या जादूगाराला अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्याबद्दल त्यांचे जेवढे अभिनंदन करावे तेवढे कमीच आहे.

ब्रिटिश भारतातील झेलम जिल्ह्यातील दिना गावात (सध्या पाकिस्तानात) माखन सिंग कालरा आणि सुजन कौर यांना मुलगा झाला. त्यांचे नाव संपूर्ण सिंह कालरा होते, ते नंतर गुलजार म्हणून ओळखले जाऊ लागले. माखन सिंग यांनी तीन विवाह केले होते. गुलजार त्यांच्या दुसर्‍या पत्नीचा मुलगा होता. त्यांच्या जन्मानंतर लगेचच त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर माखन सिंग यांच्या तिसर्‍या पत्नीने त्याचे पालनपोषण केले. या कुटुंबाचे दीना येथे कपड्यांचे दुकान होते. काही काळाने वडिलांनी दिल्लीतील सदर बाजार या ठिकाणी बॅग आणि टोपीचे दुकान उघडले.

गुलजारही वडिलांसोबत दिल्लीला आले. दिल्लीतील दिवसांची आठवण करून देताना ते म्हणाले होते की, दुकान सांभाळण्यासाठी गोडाऊनमध्ये झोपायचे. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून घरी जायचे आणि तिथून शाळेत जायचे. जेवण आटोपून ते रात्री आठच्या सुमारास परत गोडाऊनमध्ये जायचे. लवकर झोपायचीही सवय नव्हती. लाईटची सोय नव्हती आणि टाईमपास करण्याचे साधन नव्हते. ही आपत्ती त्यांच्यासाठी संधी देणारी ठरली. गोडाऊनसमोर पुस्तकांचा स्टॉल होता. तिथे भाड्याने पुस्तके मिळत होती. वेळ घालवण्यासाठी गुलजार यांनी पुस्तके वाचायला सुरुवात केली.

त्यांना क्राईम थ्रिलर पुस्तकांची इतकी ओढ लागली होती की ते रात्रभर जागून संपूर्ण पुस्तक वाचत असत. गुलजार रोज नवीन पुस्तक घ्यायला जायचे. त्यांच्या या सवयीमुळे स्टॉल मालकही नाराज झाले. स्टॉलवर सव्वा आणे देऊन आठवडाभर पुस्तके वाचण्याची परवानगी होती. लोक सहसा एक किंवा दोनच पुस्तके वाचत असत, पण गुलजार रोज एक नवीन पुस्तक घ्यायचे. एके दिवशी याला कंटाळून स्टॉलच्या मालकाने त्यांना रवींद्रनाथ टागोरांच्या पुस्तकाचा उर्दू अनुवाद दिला. या पुस्तकाने गुलजार यांचे संपूर्ण जगच बदलून टाकले आणि ते वाचल्यानंतरच त्यांनी लेखक बनण्याचा निर्णय घेतला. पुस्तके वाचण्याबरोबरच त्यांनी लेखनही सुरू केले.

गुलजार पुस्तकांच्या दुनियेत वाढत होते. तेव्हाच देशाची फाळणी झाली. फाळणीच्या भयानक परिस्थितीने त्यांच्यापासून बरेच काही हिसकावून घेतले. त्याची वेदना त्यांच्या गाण्यांमध्ये आणि कवितांमध्ये स्पष्टपणे दिसून येते. नंतर ते मुंबईत आले आणि तिथेच स्थायिक झाले. तिथे ते मोठ्या भावासोबत राहत होते. फाळणीचा परिणाम कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवरही झाला. त्यामुळे त्यांनी अभ्यास सोडून मुंबईतील भायखळा येथील गॅरेजमध्ये काम करण्यास सुरुवात केली.

येथे त्यांचे काम अपघातात नुकसान झालेल्या वाहनांना रंगवण्यासाठी रंगाचे नमुने तयार करण्याचे होते. उपजीविकेसाठी त्यांना हे काम करावे लागत होते, पण पुस्तके वाचणे सुरूच होते. उरलेल्या वेळेत ते पुस्तके वाचायचे आणि मनात आलेले विचार कागदावर उतरवायचे. त्याखाली लिहायचे-गुलजार दीनवी. गुलजार यांना लेखनाची आवड आहे आणि त्यात त्यांना भविष्य घडवायचे आहे ही बाब वडिलांच्या लक्षात आल्यावर त्यांना राग आला. त्यांनी गुलजार यांना खूप समजावले आणि सांगितले की त्यांचे भविष्य उद्ध्वस्त होईल, लंगर खाऊन दिवस काढावे लागतील.

तरीही गुलजार यांनी मार्ग बदलला नाही आणि ते कवितेच्या दुनियेत तल्लीन राहिले. गुलजार यांचे रूममेट देबू सेन हे बिमल रॉय यांचे सहाय्यक होते. त्यांनीच बिमल रॉय आणि गुलजार यांची भेट घडवून आणली. ‘बंदिनी’ चित्रपटाची सर्व गाणी शैलेंद्र यांनी लिहिली होती. एकच गाणे लिहायचे शिल्लक होते, पण तेव्हाच शैलेंद्रचे बिमल रॉय यांच्याशी मतभेद झाले आणि त्यांनी एकत्र काम करण्यास नकार दिला, मग शैलेंद्र यांनी देबू सेन यांना सुचवले की, गुलजार यांना बिमल रॉय यांच्याकडे घेऊन जा आणि त्यांच्या जागी गाणे लिहायला सांगा. देबू सेनने गुलजार यांना बिमल रॉय यांच्याकडे नेले.

भेटीनंतर गुलजार यांनी ‘मोरा गोरा अंग लै ले’, लिहिले. हे गाणे लिहिल्यानंतर त्यांनी हे गाणे चित्रपटाचे संगीतकार एसडी बर्मन यांच्याकडे सोपवले. एसडी बर्मन यांनी हे शब्द बिमल रॉय यांना अशा प्रकारे गाण्यात ऐकवले की त्यांनी पटकन गाण्यास होकार दिला आणि अशा प्रकारे त्यांच्या कारकिर्दीतील पहिले गाणे गुलजार यांच्या पदरात पडले. या गाण्यानंतर बिमल रॉय गुलजार यांना म्हणाले की, तुम्हाला आता गॅरेजमध्ये काम करण्याची गरज नाही. तिथे काम करून प्रतिभा वाया घालवू नका. माझ्यासोबत या, मी चित्रपट दिग्दर्शित करीन आणि तुम्ही गाणी आणि संवाद लिहा. बिमल रॉय यांचे शब्द ऐकून गुलजार यांना रडू आले.

गुलजार त्यांच्यासोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करू लागले. १९७१ मध्ये आलेला ‘मेरे अपने’ हा गुलजार यांचा दिग्दर्शनातील पदार्पणाचा चित्रपट होता. त्यांनी १७ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. हूतूतू (१९९९) या चित्रपटानंतर त्यांनी दिग्दर्शन करणे बंद केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला होता. चित्रपटाचे अपयश गुलजार यांना सहन झाले नाही आणि ते डिप्रेशनमध्ये गेले. या काळात त्यांची मुलगी मेघनाने त्यांना सर्वात जास्त साथ दिली आणि या परिस्थितीतून बाहेर काढले. १९७३ मध्ये प्रदर्शित झालेला ‘कोशिश’ हा चित्रपट एका मूकबधिर जोडप्याची कथा होती. या चित्रपटासाठी गुलजार यांनी सांकेतिक भाषा शिकून घेतली होती, जेणेकरून ते त्या लोकांच्या भावना समजून घेऊ शकतील. तेव्हापासून ते मूकबधिर मुलांसाठीही काम करीत आहेत.

बंगाली लोकांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर खोलवर परिणाम झाल्याचे गुलजार नेहमी सांगतात. म्हणूनच त्यांनी बंगाली असलेल्या राखी गुलजार यांच्याशी लग्न केले. लग्नापूर्वी गुलजार यांच्या सांगण्यावरून राखीने त्यांना वचन दिले होते की, त्या लग्नानंतर फिल्म इंडस्ट्रीत काम करणार नाहीत. लग्नाच्या एका वर्षानंतर राखीने मुलगी मेघनाला जन्म दिला. काही काळ त्या मुलीची काळजी घेण्यात व्यग्र होत्या, पण पुन्हा त्यांचे मन चित्रपटांकडे वळू लागले. दरम्यान, यश चोप्रा ‘कभी कभी’ चित्रपटाची ऑफर घेऊन राखी यांच्याकडे आले. राखी यांनाही चित्रपटाची कथा आवडली.

गुलजार आंधी चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरला गेले होते. राखी यांना त्यांना विचारल्याशिवाय चित्रपट साईन करायचा नव्हता, म्हणून त्या काश्मीरला गेल्या. चित्रपटाची नायिका सुचित्रा सेन आणि गुलजार यांची चांगली मैत्री होती. एक दिवस संध्याकाळी चित्रपटाची संपूर्ण टीम एकत्र बसली होती. संजीव कुमार यांनी खूप दारू प्यायली होती. पार्टी संपल्यावर सुचित्रा रूमवर जायला उठल्या, पण संजीवने त्यांचा हात धरला. प्रकरण चिघळू नये म्हणून गुलजार सुचित्राला खोलीत सोडायला गेले. हे राखीला आवडले नाही. दोघांमध्ये आणखी काहीतरी संबंध असल्याचा संशय त्यांना होता. त्यांनी गुलजार यांना विचारले.

राखीच्या आरोपामुळे ते खूप दुखावले गेले आणि त्यांनी राखी यांना थापड मारली. यामुळे दु:खी झालेल्या राखी यांनी गुलजार यांना न विचारता यश चोप्रा यांचा चित्रपट साईन केला. या घटनेनंतर राखी गुलजारपासून वेगळ्या होऊन फार्म हाऊसमध्ये राहू लागल्या, मात्र त्यांनी घटस्फोट घेतला नाही. सर्व कार्यक्रम ते एकत्र साजरे करतात. गुलजार यांनी एका मुलाखतीत सांगितले की, पत्नीपासून इतकी वर्षे विभक्त राहूनही ते कधीच वेगळे होऊ शकले नाहीत. गुलजार म्हणाले होते, आताही दर २-३ तासांनी आमच्यात वाद होतात. मला वाटते तेही ठीक आहे. एकमेकांशी भांडण नसले तर ते प्रेम कसे. राखी तिला वाटेल ते करते. मला पाहिजे ते मी करतो. चांगले मित्र असेच जगतात, असे सत्य परखडपणे सांगणारे गुलजार हाडाचे कवी आहेत.

गुलजार यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या दमदार लिखाणासाठी ओळखले जाते, तर उर्दूतील उत्कृष्ट कवींमध्ये गुलजार यांचे नाव आवर्जून घेतले जाते. यापूर्वी गुलजार यांना उर्दू साहित्य आणि हिंदी चित्रपटांमधील योगदानासाठी २००२ मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार, २०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, २००४ मध्ये पद्मभूषण आणि इतर पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते संपूर्ण सिंह कालरा ‘गुलजार’ या नावाने प्रसिद्ध आहेत.

गुलजार हे हिंदी चित्रपटांचे गीतकार, कवी, पटकथा लेखक, चित्रपट दिग्दर्शक, नाटककार आणि कवी आहेत. त्यांनी प्रामुख्याने हिंदी, उर्दू आणि पंजाबी भाषेत भरपूर साहित्य निर्मिती केली आहे. २००९ मध्ये डॅनी बॉयल दिग्दर्शित ‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटातील गुलजार लिखित ‘जय हो’ या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. या गाण्यासाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. अशा दिग्गज व्यक्तिमत्त्वाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त होतोय हे विशेष. त्यांना मानाचा मुजरा!

-(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)