घरफिचर्ससारांशगावातल्या बायकांच्या संवादाला लॉकडाऊनचं कुलूप!

गावातल्या बायकांच्या संवादाला लॉकडाऊनचं कुलूप!

Subscribe

गावागावातल्या बायका ज्यांना घराबाहेर पडण्यासाठी काहीतरी ठोस निमित्त लागतं आणि त्या निमित्ताला घरातल्या सगळ्यांची परवानगी लागते, स्वीकृती लागते अशा बायकांना या लॉकडाऊन काळात घरातच बंद व्हावं लागतंय. शेतीची कामं बंद असल्याने कामानिमित्त घराबाहेर जाता येतच नाही. मोबाईल किंवा इंटरनेट असं काही साधन नसल्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी सगळाच संपर्क तुटतो.

राज्यात पुन्हा लॉकडाऊन सुरू झालंय. गावं, शहरं ठप्प झाली. बाहेर येण्याजाण्यावर असणार्‍या बंधनांमुळे आपापल्या घरात प्रत्येकजण कोंडला गेला. गावाकडे माणसं आपापल्या शेतात काम करून रात्री घरी परतत आहेत. पण उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतीची कामंही तशी फारशी नाहीत. मग पुरुष मंडळी मित्रांना हाक देत पारावर, मंदिराजवळ जमतात, सगळे व्यवहार बंद असले तरी बिडीकाडीचे व्यवहार घडत आहेतच. बिडीकाडीच्या निमित्ताने का असेना माणसं बघायला मिळणं घडतंय. आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत, पण तरी गावागावांमध्ये जुगाराचा डाव रंगतो आहेच. हातात मोबाईल आहे घरातल्या प्रत्येक पुरुषाकडे.

प्रत्यक्ष नसला तरी अप्रत्यक्ष जगाशी संपर्क आहेच त्यांचा! मित्रांचे फोन, एखादा व्हिडीओ किंवा सिनेमा साथीला आहे पुरुषांच्या. पण या सगळ्यात बायका, ज्यांच्या आयुष्यात बारमाही लॉकडाऊन असतो, कमी जास्त प्रमाणात फिरण्यावर, बाहेर येण्या जाण्यावर नेहमीच बंधनं असतात त्या बायकांच्या नजरेतून लॉकडाऊन कसं दिसतं. आधीच घराबाहेर पडण्यावर अनेक बंधनं असलेली आणि घराबाहेर पडण्यासाठी निमित्तं हवी असणारी बाई आता निमित्ताअभावी घरातच कोंडली गेली. मैत्रिणी नाही, माणसं नाही, मोबाईल तर नाहीच नाही. या वातावरणात दमट, अंधार्‍या घरात तिची अभिव्यक्तिच लॉक झाली. आणि खरा लॉकडाऊन अनुभवत आहेत त्या बायकाच!

- Advertisement -

अभिव्यक्ति मीडिया फॉर डेव्हलपमेंट या संस्थेच्या माध्यमातून मी ग्रामीण भागातील तरुण मुली आणि बायकांसोबत संशोधनाचे काम करते. बायकांच्या नजरेतून लॉकडाऊन समजून घ्यायला त्यांच्याशी बोलायची गरज होती. लॉकडाऊनमध्ये बाहेर येण्याजाण्यावर बंधनं असली तरी बायकांशी फोनवर बोलायलासुद्धा त्यांचे नवरे किंवा मुलगा घरी येईपर्यंत वाट बघावी लागली, कारण मोबाईल फोनचे मालक तेच होते. तरीही कसरत करून मी नाशिक जिल्ह्यातल्या काही गावांतल्या बायकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांचं लॉकडाऊन कसं चाललंय? दिवसभर काय काय करता असं विचारल्यावर दिंडोरी तालुक्यातील साधारण 237 घरांची वस्ती असलेल्या दहेगावच्या सुनीता गायकवाड (वय 32 वर्षे) म्हणतात की, सध्या फार कामं नाही. मजुरीची कामं तर बंदच आहेत.

आपापल्या शेतातली थोडीफार कामं असतात काही लोकांची, पण आमच्या शेतात काही काम नाही. सकाळचा स्वयंपाक-जेवण-धुणं पाणी आटोपल्यानंतर दुपारी दळण करत बसायचं. मग दुपारची झोप आणि पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. अशा चक्रातच दिवस संपतो, हे त्या खूप सहज सांगतात. कंटाळा येत नाही का हे विचारल्यावर म्हणतात की, येतो की, पण काय करणार, सांगणार कुणाला? आपण कुठे बापे माणसं आहोत. की धरणावर जाऊ मजा करायला! आमच्या गावातली माणसं (इथे त्यांना पुरुष म्हणायचं असतं) धरणावर जाऊन मासे-खेकडे पकडतात, तिकडे जाऊन दारू पितात. जरा म्हातारी माणसं इथंच गावात पारावर, मंदिराजवळ बसतात. पण तरणी पोरं काही ऐकत नाही. आमच्याही घरातले माणसं जातात असेच रोज बाहेर, आम्ही बाया घरीच बसतो कामं करत.

- Advertisement -

त्र्यंबक तालुक्यातील 1317 लोकसंख्या असलेल्या हिरडी गावातील ललिता खोटरे यांच्याशी मी बोलले. त्या म्हणतात की, आमच्याही गावात असंच आहे. आता सगळे घरी आहेत. बायांना कामं खूप वाढली आहेत. सासू सासरे नवरा सगळेच घरात असतात तेव्हा दडपण जाणवतं बायांना. त्यांना बोलायचं असतं कुणाशीतरी पण तशी सोयच नाही. मी अंगणवाडी सेविका आहे. मागच्या लॉकडाऊनमध्ये मी सर्व्हे करायला लोकांच्या घरी जायचे, तेव्हा त्या बायकांना वाटायचं मी त्यांच्याशी जाऊन बोलावं. अंगणवाडीत जेव्हा शिधा येतो आणि घ्यायला आम्ही पालकांना बोलावतो तेव्हा बाया पण येतात. आणि रेंगाळत गप्पा मारत बसतात. पण एवढे लोक येत असतात तर काय बोलणार त्यांच्याशी? आमच्या गावात उन्हाळ्यात पाणी नसतं. तसं यावर्षीपण नाही.

मग बायांना विहिरीवर जावं लागतं. 3-4 किमी लांब. तिकडं सगळ्या भेटल्या की, मग पाणी भरून झालं तरी बसतात एकमेकींजवळ. बाहेरची काही कामं असतील तर कोण जातं मग बाहेर? हे विचारल्यावर त्या म्हणाल्या की, पुरुषच जातात. त्यांच्याकडे मोटारसायकल असते. मग एका चक्करमध्ये दोन तीन कामं करून येतात. मोबाईल-वाहन-पैसे या सगळ्यांमुळे पुरुषांना जी मोकळीक मिळते ती बायकांकडे नसते. बायका कमावत्या असल्या तरी! या सगळ्यांचा संबंध थेट त्यांच्या चारित्र्याशी असतो. मोबाईल वापरणारी बाई, स्वतःचे पैसे कमावून ते खर्च करण्याचा अधिकार स्वतःकडे ठेवणारी बाई ग्रामीण भागात बायकांसाठी ठरवलेल्या साच्यात बसत नाही.

या लॉकडाऊनमध्ये बाहेर येण्याजाण्यावर अशी काही खूप थेट बंधनं नसली तरी गरजेशिवाय बाहेर पडण्यावर बंदी आहे. पण गावातले पुरुष ते फारसं पाळत नाही. ह्याचं कारण सगळ्या बायकांनी ‘पुरुषांना कधी घरात बसायची सवयच नाही’ असं सांगितलं. मग आता लॉकडाऊन मध्येही त्यांना बाहेर जायला निमित्त असतं. नसलं तरी फक्त मित्रांना भेटायला, गावाबाहेर जाता येत नसलं तरी गावात फेरफटका मारायला, ह्याची त्याची चौकशी करायला ते घराबाहेर पडतात. काहीच नसलं तरी हातात मोबाईल असतो-त्यावर इंटरनेट असतं. त्यामुळे करमणुकीचे पर्याय त्यांना सहज उपलब्ध होतात. पण गावागावातल्या या बायका ज्यांना घराबाहेर पडण्यासाठी काहीतरी ठोस निमित्त लागतं आणि त्या निमित्ताला घरातल्या सगळ्यांची परवानगी लागते, स्वीकृती लागते अशा बायकांना या लॉकडाऊन काळात घरातच बंद व्हावं लागतंय. शेतीची कामं बंद असल्याने कामानिमित्त घराबाहेर जाता येतच नाही. मोबाईल किंवा इंटरनेट असं काही साधन नसल्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी सगळाच संपर्क तुटतो.

या सगळ्या बायकांना मनातली सुखदु:खं एकमेकींना सांगण्याची एक जागा होती ती म्हणजे दुपारची कामं आटोपल्यानंतर गल्लीतल्या सगळ्या बायका एकत्र बसायच्या. गप्पा मारायच्या. घरात झालेली भांडणं असतील, एखादी अडचण असेल किंवा अगदीच आपले अनुभव, मनात येणार्‍या वेगेवगळ्या भावना एकमेकींना सांगायच्या. आणि संध्याकाळी घरातली सगळी माणसं परत यायच्या वेळेत आपापल्या कामांमध्ये पुन्हा स्वतःला जुंपून घ्यायच्या. पण ती दुपारची वेळ आणि इतर बायकांची कंपनी त्यांच्या संवादाची आणि मैत्रीची गरज पूर्ण करत होती. आता कोरोनाच्या भीतीने माणसांच्या एकमेकांना भेटण्यावरच बंधनं आहेत. त्यामुळे दुपारचे हे बायकांचे कट्टे आता ओस पडलेत. कुणी एकमेकींजवळ फिरकतही नाही. ऑनलाईन संवाद साधण्याची साधनं त्यांच्याकडे नाहीत.

आणि पुरुषांनी एकत्र भेटण्याच्या आणि त्यांच्या मैत्रीच्या संकल्पनेला जी सामाजिक मान्यता आहे ती मान्यता बायकांच्या या नात्यांना नाही. त्याकडे नेहमी विनोदाचा भाग किंवा वेळेचा अपव्यय म्हणूनच पहिले जाते. पण उपलब्ध असणार्‍या संवादाच्या मोजक्या जागासुद्धा संपल्यामुळे या बायका शब्दश: लॉक्डडाऊन झाल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना एकटेपण जाणवते आहे. आता आजूबाजूच्या जगात सध्या कोरोनामुळे घडणार्‍या गोष्टींमुळे एक विचित्र प्रकारची अनिश्चितता तयार झालीय. आणि बाहेरच्या जगाशी असा थेट संपर्क नसल्याने आणि आपल्या मनात चाललेल्या उलाढाली व्यक्त करण्याची जागा नसल्याने या बायकांना मानसिक कोंडलेपण अनुभवावे लागते. यातूनच मग भीती, सततचा तणाव, निराशा आणि औदासिन्य अशा भावना आता त्यांच्या साथीला आल्या आहेत हे त्यांच्याशी बोलताना जाणवत होतं.

व्यक्त होण्याची, आपल्या आयुष्यात काय घडतंय हे इतरांना सांगण्याची उर्मी सगळ्याच सजीवांमध्ये सामायिक असते, पण बायकांसाठी तशा जागा आधीच कमी असतात आणि लॉकडाऊनमुळे असलेल्या जागासुद्धा आता कमी होत आहेत, माणसांचा संपर्क संपत आहे. बायकांसाठी अशा जागा तयार करण्याची आणि त्या जपण्याची गरज आता आपल्याला पूर्ण करायला हवीय.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -