‘हर’ लॉकडाऊन

मागच्या लेखात लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील बायकांच्या संवादाला, मैत्रीला आणि एकमेकींसोबत मनातल्या गोष्टी बोलण्याच्या सवयीला कसं कुलूप लागतंय हे आपण पाहिलं, पण हे फक्त ग्रामीण भागात राहणार्‍या, शेतीची कामं करणार्‍या बायकांसाठीच नाही तर गावातून शहरात येऊन नोकरी करणार्‍या, स्वतःचं नवं आयुष्य थाटू पाहणार्‍या बायकांसाठीसुद्धा हे लॉकडाऊन म्हणजे शब्दश: घरवापसीच आहे. या सगळ्या बायकांशी बोलत असताना मला नुकताच पाहिलेला Spike Jonze ह्यांनी दिग्दर्शित केलेला ‘Her’ हा सिनेमा आठवत होता.

नाशिक शहरात काम करणार्‍या पण लॉकडाऊनमध्ये आपल्या गावी (सासरी) अडकलेल्या भावना सूर्यवंशीची (वय 28 वर्षे) गोष्ट ऐकून तर मला थक्क व्हायला झालं. जळगाव जिल्ह्यातल्या भडगाव तालुक्यातील सावदे हे साधारण 1500 लोकसंख्येचं गाव. या गावात भावनाचं सासर आहे. ती म्हणते, लॉकडाऊनमध्ये मी गावी अडकले, माझ्याकडे मोबाईल-लॅपटॉप-इंटरनेट सगळं असूनसुद्धा मला इथे गुदमरायला झालं. मोठं कुटुंब असल्याने सगळे पूर्णवेळ घरातच होते. नाशिकला जीन्स आणि टी शर्टमध्ये वावरणार्‍या मला दिवसभर डोक्यावरचा पदर सांभाळून राहावं लागायचं. माझं वर्क फ्रोम होम सुरु असलं तरी घरात इतरांना ते महत्वाचं वाटायचं नाही. झूम मिटींग्जमध्ये ऑफिसच्या पुरुष सहकार्‍यांचे चेहरे स्क्रीनवर पाहून सासू माझ्याकडे संशयाने पहायची. मी अनेकदा समजावूनसुद्धा त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मी कधी एकदा परत नाशिकला येतेय असं झालं होतं. आपल्या आजूबाजूच्या बायकांविषयी बोलताना भावना म्हणाली की, इथल्या स्त्रियांना आधीच खूप सासूरवास आहे. हे करायचं नाही, ह्याच्याशी बोलायचं नाही, हसायचं नाही वगैरे. त्यामुळे घरातले सगळे बाहेर कामासाठी गेल्यावर बायकांना जो वेळ मिळायचा तो त्यांचा स्वतःचा वेळ असायचा.

पण आता सगळे दिवसभर घरी असल्यामुळे तो वेळ त्यांना अजिबात मिळत नाही. माहेरी फोन करता येत नाही, सगळे घरात असल्यामुळे फोन केला तरी मनमोकळं बोलता येत नाही. ‘घरातच राहा, सुरक्षित राहा’ असं सरकारने सांगितलंय. यामुळे कोरोनापासून वाचता येईल कदाचित पण घरातच राहिल्यामुळे बायकांच्या मनावर ह्याचा खूप परिणाम होतोय, त्यांना एकटेपणा जाणवतोय. मग त्यावरचा उपाय काही बायकांनी शोधलाय. घरात शौचालय असलं तरी बायका संध्याकाळी सगळ्या उघड्यावर शौचाला एकत्र जातात. तिथे भेटतात, गप्पा मारतात. भावनाशी हे सगळं बोलताना एक नवी गोष्ट कळली की काही बायकांकडे त्यांच्या भावाने/वडिलांनी घेऊन दिलेला एक छोटा फोन असतो, ज्यावर भाऊ/वडील रिचार्ज करतात. शेतात जाताना बायका तो ब्लाउजमध्ये घालून किंवा डोक्यावरच्या पाटीत लपवून घेऊन जातात आणि माहेरी फोन करून मनमोकळं बोलतात. हा फोन म्हणजे गुपित असतो, घरातल्या इतर कुणाला त्याविषयी कल्पनासुद्धा नसते. आणि मग या अशा बायकांना आता बाहेर जाणंच बंद असल्याने माहेरी फोन करण्याची मोठीच अडचण झाली आहे.

खूप प्रयत्न करून भावनाच्या मदतीने मी अशा एका बाईशी बोलू शकले जिच्याकडे तिच्या भावाने दिलेला एक फोन आहे. काहीतरी निमित्त सांगून शेताकडे येऊन त्याच छोट्या फोनवरून ती माझ्याशी बोलत होती. जळगावातल्या चाळीसगाव तालुक्यातील देवळी हे 4302 लोकसंख्येचं मग तुलनेने मोठं गाव आहे. या गावात राहणारी साधारण 29 वर्षे वय असणारी गौतमा (पूर्ण नाव देण्यास तिची परवानगी नाही) म्हणते, माझं शिक्षण एफवायबीए- झालंय, मी आधी एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होते. पण या लॉकडाऊनने लईच वाईट अवस्था केलीय आमची. नोकरी तर गेलीच आणि नोकरीसोबत घराबाहेर पडण्याची संधी पण गेली. सासूसासरे, नवरा सगळे घरातच असतात. आता कुठेच जात नाही. म्हणजे कुठे जायची परवानगीच नाही. मला दिवसभर डोक्यावर पदर घेऊन फक्त काम करावं लागतं. बाहेरची हवासुद्धा लागत नाही. इथे सासरी त्रास होतो तो कुणालाच सांगायची सोय राहिली नाही आता. किती दिवस झाले मी माहेरी कुणाशीच बोलले नाही, फोनवर रिचार्जच नाही. घरात मोबाईल डब्यात लपवून ठेवावा लागतो.

सुनांना परवानगीच नाही कसली. शेजारच्या बाईला सांगायची मी सगळं आधी. जेव्हा सगळे घराबाहेर जायचे. पण आता सगळे घरातच असतात त्यामुळे ते पण करता येत नाही. आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्याशी बोलते मग. कोरोनामुळे लोकं म्हणताय घरी थांबा, घरी थांबा पण आम्ही आधीपासूनच घराबाहेर जात नाही. परवानगीच नाही तशी. त्यामुळे मला यात काहीच वेगळं वाटत नाही. मला काहीतरी काम पाहिजे आता. त्या निमित्ताने थोडंसं घराबाहेर तरी पडता येईल. चार पैसे जपून ठेवावे बाईने-स्वतःसाठी तेवढ्यात कुणीतरी आल्याची चाहूल लागली आणि तिला फोन ठेवावा लागला. तिचा आवाज ऐकताना माझ्या अंगावर सरसरून काटाच आला. इथे मित्र मैत्रिणींना भेटायला मिळत नाही, ट्रिप्सना जाता येत नाही म्हणून रडणारी मी एका वेगळ्याच ग्रहावरच्या जगाशी बोलतेय असं वाटलं. तंत्रज्ञानाने प्रगती कितीही केली तरी अजून ते आपल्या सामाजिक कक्षा ओलांडू शकलं नाही.

अशा आणीबाणीच्या प्रसंगात तर सर्वात जास्त परिणाम वेगवेगळ्या अर्थांनी vulnerable असलेल्या गटांवर होत असतो आणि ह्या गावागावांमध्ये बंद असलेल्या बायका अनेक अर्थांनी vulnerable आहेत. त्यांच्या मूलभूत संवादाच्या गरजासुद्धा या काळात पूर्ण होत नाहीत. माणूस असून, बोलण्याचं, व्यक्त होण्याचं विशेष कौशल्य मिळालेलं असतानाही या बायकांची अभिव्यक्ती कोंडली जातेय. बायकांच्या आवाजाला बळ देण्याचे प्रयत्न अनेक वर्षांपासून स्त्रीवादी चळवळी करत आहेत. पूर्णपणे यश मिळालं नसलं तरी त्या चळवळीत जास्तीत जास्त बायकांना सामावून घेत प्रत्येकीच्या पायाला ताकद देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घरगुती हिंसाचाराच्या वाढलेल्या घटना, त्यात बायकांना मदत मिळण्यासाठी आलेल्या अनेक मर्यादा अशा प्रकारच्या बातम्यांमधून आपल्याला या आपत्तीकाळात घडणार्‍या गोष्टींचा बायकांवर किती परिणाम होतोय हे दिसतंय. अशा प्रकारच्या थेट हिंसेचा सामना त्यांना करावा लागतो आहेच, पण बोलायला कुणी नसणं, संवादाच्या गरजा न भागणं अशा प्रकारच्या अप्रत्यक्ष हिंसेचा परिणामसुद्धा त्यांच्यावर होतो आहे.

या सगळ्या बायकांशी बोलत असताना मला नुकताच पाहिलेला Spike Jonze ह्यांनी दिग्दर्शित केलेला ‘Her’ हा सिनेमा आठवत होता. एकटं राहणारा, जास्त मित्र मैत्रिणी नसणारा या सिनेमातील नायक, थिओडॉर, सिमँथा नावाच्या ऑपरेटिंग सिस्टीमसोबत बोलायला लागतो. औपचारिक गोष्टींच्या पुढे जात मग आपल्या भावना आणि मनाची दोलनं त्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने असलेल्या एका abstract घटकाशी बोलून तो त्याची व्यक्त होण्याची गरज भागवतो. पुढे त्यांच्यात मैत्री होऊन, प्रेम होतं आणि कथा पुढे जाते तो भाग वेगळा पण माणसाच्या बोलण्याची, व्यक्त होण्याची, संवादाची गरज पूर्ण झाली पाहिजे. मला माहितीये या सिनेमाचा context आणि ज्या गावातल्या बायकांबद्दल मी बोलतेय त्यांचा भवताल खूप वेगळा आहे आणि त्यांची एकमेकांशी तुलना होऊ शकत नाही. पण तरीसुद्धा शेतात जाऊन गुपचूप फोनवर आईवडिलांशी बोलणारी गौतमा आणि आपल्या ऑपरेटिंग सिस्टीम या मैत्रिणीशी बोलायला निवांत वेळ शोधणारा थिओडॉर या दोघांमध्ये मला व्यक्त होण्याची उर्मी जाणवते, आपल्या आयुष्यात काय घडतंय हे इतरांना सांगण्याची आणि संवादाची गरज सामायिक जाणवते. अर्थातच या गरजेचा उपाय म्हणून एखादी ऑपरेटिंग सिस्टीम फक्त सिनेमातच असू शकते. खर्‍या आयुष्यात ते घडत नाही. पण खर्‍या आयुष्यात बायकांसाठी अशा संवादाच्या जागा आपल्याला तयार करायला हव्यात, नाही का?