Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर फिचर्स सारांश ‘नाही रे’ चा सच्चा आवाज लोपला!

‘नाही रे’ चा सच्चा आवाज लोपला!

Subscribe

‘अधांतर’, हे नाटक आल्यानंतर नाट्यसृष्टी विचारात पडली. तेंडुलकरांनंतर वास्तवाला विविध अंगांनी इतकं प्रामाणिकपणे दाखवायची सवय मधल्या काळात रंगभूमीला नव्हती. सामान्यांच्या जगण्याचा संदर्भ घेऊन लिहिल्या गेलेल्या त्यांच्या नाटकांनी रंगभूमीवर वास्तवावर आधारित नाटकांचा वेगळा प्रवाह निर्माण केला. ‘नाही रे’ समाजाच्या जाणिवा या आधीसुद्धा अत्यंत टोकदारपणे मांडल्या गेल्या होत्या, पण जयंत पवार यांच्या मांडणीत भावना आणि विचार यांचे अत्यंत योग्य (balance) मिश्रण असायचे. मुळात हे योग्य मिश्रणच त्यांच्या स्थायी स्वभावाचा भाग होते. लेखनात इतका उद्रेक आणि तेव्हढ्याच ठाम विचारांच्या या माणसाचा स्वभाव मात्र अतिशय शांत, विनम्र. त्यांचा तोल ढळताना सहसा कोणी पाहिले नाही.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत अधिकारांसाठी पवार यांनी कायम आवाज उठवला. हे करताना व्यवस्थेबद्दल असलेला राग फक्त व्यक्त केला नाही तर त्याला स्वतःच्या सर्जनशीलतेची जोड देत योग्य विचार आणि दिशा सुस्पष्ट केल्या. आपल्यापैकी खूप जणांना सद्यस्थितीतील प्रश्न समजतात, पण आपण खूपसा वेळ त्या प्रश्नांना अधिकाधिक मोठं करण्यातच घालवतो. पवार मात्र प्रश्नांबरोबर उत्तरांचीही मुद्देसुद मांडणी करत असत.

- Advertisement -

नाटक, कथा लेखन, पत्रकारिता करत त्यांनी साहित्यात चौफेर मुशाफिरी केली. त्यांनी लिहिलेल्या कथा आणि एकांकिकेत एव्हढी विविधता पाहता मनात येते की फक्त पवारांनी लिहिलेल्या सहिंतेवरही संपूर्ण एकांकिका स्पर्धा होऊ शकते. जयंत पवार आणि समीक्षा हा एक स्वतंत्र लेखाचा विषय होऊ शकतो. समीक्षा लिहिताना त्यांची लेखणी सोपे शब्द गुंफायची. पहिलंच नाटक पाहणार्‍या, शेवटच्या रांगेतल्या प्रेक्षकालाही समीक्षेचा आर्क समजला पाहिजे ह्यासाठी ते आग्रही असायचे. एखाद्या नाटकाचा सर्वांगानी इतका समृद्ध विचार करण्याचं सहसा दुर्मिळ असणारं कसब त्यांच्या ठायी होते. त्यामुळेच मराठी नाट्यसृष्टीत त्यांचा आदरयुक्त धाक होता. सहसा नाटकाचे 10/15 प्रयोग पार पडल्यानंतरच निर्माते किंवा नाटकाशी संबधित त्यांना अवतान द्यायचे. खूपदा कोणालाही न सांगताही ते प्रयोगाला बसायचे. त्यांनी नाटकाबद्दल चांगला लिहिलेला अभिप्राय हीच त्या नाटकाची मोठी प्रसिध्दी ठरायची.

हा माणूस नखशिखांत प्रामाणिक होता. जे विचार डोक्यात तेच कागदावर आणि जे कागदावर तेच आचरणात. त्यामुळेच संघर्ष त्यांनी फक्त कागदावरच रंगवला नाही तर त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग होता. जवळ जवळ आठ वर्षे त्यांनी कॅन्सरसारख्या आजाराशी प्रखर झुंज दिली. मुख्य म्हणजे या काळातही स्वतःचा मेंदू तल्लख ठेवत जाणिवा घडविणारं लिखाणही केलं.

- Advertisement -

आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी कितीतरी माध्यमं आहेत. पण या अती प्रगत तंत्रज्ञानाद्वारे सांस्कृतिक वर्चस्ववाद शिरजोर होत आहे. 75 वर्षांची प्रौढ लोकशाही असूनसुद्धा विचारांशी प्रामाणिक राहून ठाम भूमिका घेत स्वत्व जपणारे खूप कमी होत आहेत. अशा काळात जयंत पवारांसारखा स्पष्ट वैचारिक भूमिका आणि सामाजिक बांधिलकी मानणारा विद्रोही सांस्कृतिक चळवळीचा बिनीचा लढवय्या गमावणे ह्या हानीचे मोजमाप करणेही शक्य नाही.

कष्टकरी वर्गाशी आणि बहुजन संस्कृतीशी सच्चे इमान ठेवत त्यांनी आपल्या नाटकांमधून कथांमधून कष्टकरी-बहुजनांच्या शोषणपीडनाचे अनेकपदरी वास्तव समोर आणले आणि शोषकाचा चेहराही लख्खपणे दाखवला. गोष्ट सांगणे ही शोषितांच्या अस्तित्वाच्या लढाईची गरज असल्याचे आणि सत्याचा निरंतर शोध हे लेखकाचे कर्तव्य असल्याचे भान बाळगणार्‍या या लेखकाला अभिवादन!

सरते शेवटी, जयंत पवार हा समृद्ध विचार आपल्या सर्वांबरोबर चिरंतन राहील ह्यात शंका नाही. वसंत बापट यांच्या खालील पंक्ती ह्या लढवय्यासाठी समर्पक बसतात…

अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात… बाभुळझाड उभेच आहे!

–जयप्रकाश जातेगांवकर

- Advertisment -