घरफिचर्ससारांशवेबसीरिजचे वर्ष

वेबसीरिजचे वर्ष

Subscribe

सायन्स फिक्शनपासून म्युजिकपर्यंत विविध जॉनरवर आधारित या वेबसिरीजना भारतात प्रेक्षक मिळणं हेच मोठं अवघड काम होतं पण तरीही आपल्या कंटेंटच्या जोरावर या वेबसिरीजने प्रेक्षकांना आकर्षित केलं. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या अशाच काही लोकप्रिय वेबसिरीजच्या हिट होण्यामागे कारण काय? बॉलीवुड आणि साउथच्या तुलनेत मराठी वेबसिरीज का दिसत नाहीत? ओटीटी माध्यमांना मराठी वेबसिरीज नकोशा का वाटतात? अँथोलॉजी फिल्म्सच्या ट्रेंडला सुरुवात झालीय का आणि येणार्‍या वर्षात वेब सिरिजला मिळणार्‍या प्रतिसादात काय बदल होतील? या आणि अशाच काही प्रश्नांचा घेतलेला हा आढावा.

2020 मध्ये प्रत्येक क्षेत्रात बदल झालाय, काही क्षेत्रात तर असेही बदल झालेत जे किमान 5 वर्षांनी होणे अपेक्षित होते. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी म्हणा किंवा स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी म्हणा, प्रत्येकाने आपल्यात गरजेचे ते बदल केलेत आणि स्वतःला काळासोबत अपडेट केलंय. जिथे पाणीपुरीवाल्याने ग्लोव्हज घालणं आणि गाडीवर गुगल पे लावणं सुरू केलंय, तिथं हजारो कोटींची उलाढाल असलेलं मनोरंजन क्षेत्र मागे कसं राहील? कोरोनामुळे बंद झालेल्या थिएटरला पर्याय म्हणून ओटीटीचा मार्ग अवलंबला गेला. आता या ओटीटी माध्यमांना आणि त्यावर येणार्‍या कंटेंटला मिळणार्‍या प्रतिसादावर मी याआधीही लिहिलंय, पण 2020 मध्ये मनोरंजन क्षेत्रात वेबसिरीजचा ज्याप्रकारे शिरकाव झाला आणि त्याला जितका प्रचंड प्रतिसाद मिळाला, याबद्दल कुठेही जास्त लिहिलेलं आढळलं नाही.

हिंदी वेबसिरीजमध्ये चर्चिल्या गेलेल्या वेबसिरीजचा जॉनर हा क्राईम, थ्रिलरच होता, मात्र यावर्षात हा जॉनर वगळतादेखील अनेक अशा वेबसिरीज आहेत ज्यांना प्रेक्षकांनी प्रतिसाद दिलाय. मिर्झापूर 2, असुर, ब्रीद 2, पाताल लोक, आश्रम यांसारख्या क्राईम थ्रिलर वेबसिरीजबद्दल आणि त्यांना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण यासोबतच स्कॅम 1992, बंदिश बँडिट्स, पंचायत, जेएल 50, बेताल यांसारख्या विविध जॉनरवर आधारित वेबसिरीजदेखील आहेत ज्या प्रदर्शित झाल्या आणि त्याला लोकांनी प्रतिसाद दिलाय. सायन्स फिक्शनपासून म्युजिकपर्यंत विविध जॉनरवर आधारित या वेबसिरीजना भारतात प्रेक्षक मिळणं हेच मोठं अवघड काम होतं पण तरीही आपल्या कंटेंटच्या जोरावर या वेबसिरीजने प्रेक्षकांना आकर्षित केलं. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या अशाच काही लोकप्रिय वेबसिरीजच्या हिट होण्यामागे कारण काय? बॉलीवुड आणि साउथच्या तुलनेत मराठी वेब सिरीज का दिसत नाहीत? ओटीटी माध्यमांना मराठी वेब सिरीज नकोशा का वाटतात? अँथोलॉजी फिल्म्सच्या ट्रेंडला सुरुवात झालीय का आणि येणार्‍या वर्षात वेब सिरिजला मिळणार्‍या प्रतिसादात काय बदल होतील? हे आपण पहुया.

- Advertisement -

2020 हे पूर्णपणे हिंदी वेबसिरीजचे वर्ष राहिले आहे, या वर्षात अनेक हिंदी सिनेमे ऑनलाईन प्रदर्शित झाले, पण कुठल्याही सिनेमापेक्षा वेब सिरीजना मिळणारा प्रतिसाद हा जास्त होता. त्यातल्या त्यात क्राईम जोनरच्या सिरीज तर प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. यावर्षीच्या टॉप हिंदी वेब सिरीजची यादी केली तर त्यात पाताल लोकचे नाव नक्की येईल, पाताळलोक सोबतच असुर, मिर्झापूर 2, आश्रम यांसारख्या काही वेबसिरीज आहेत ज्यांना चांगला प्रतिसाद मिळाला, पण त्यांना मिळणारा प्रतिसाद हा त्या जोनरचा प्रतिसाद होता. जसं सिनेमात एक हिट फॉर्म्युला मिळाला की त्याचीच कॉपी करून सिनेमे बनतात आणि हिट ठरतात तसंच यापैकी काही वेब सिरिजच्या बाबतीत घडलं, मात्र या जोनरपासून हटत काही नवीन प्रयोग आपल्याकडे झाले ज्याला लोकांनी प्रचंड प्रेम दिलं आहे. सर्वात आधी बोलुया त्या वेबसिरिजबद्दल जिचे थीम साँग आज लोकांची कॉलर ट्यून बनले आहे, अशी वेबसिरिज जी पाहिल्यावर प्रत्येक दुसर्‍या व्यक्तीला शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करून पैसा कमवायचा आहे.

हंसल मेहता दिग्दर्शित स्कॅम 1992, नामचीन स्टॉक ब्रोकर आणि गुन्हेगार हर्षद मेहताच्या जीवनावर आधारित या वेबसिरीजचा जॉनर जरी क्राईम ड्रामा असला तरी यात फार रक्तपात नव्हता, ना यात प्रत्येक दुसर्‍या डायलॉगमध्ये शिव्या होत्या, देशाला चुना लावणार्‍या एका शेयर मार्केट ब्रोकरची ही कथा होती, जी हंसल मेहताने अतिशय उत्तमरित्या सादर केली, बजेटची कमतरता आणि काही वेळा केलेलं पात्राचं उदात्तीकरण सोडलं तर ही एक उत्तम वेब सिरीज आहे. सिरीजची खास गोष्ट म्हणजे यात एकही मोठा बॉलिवुडचा कलाकार नाही, गुजराती कलाकारांना घेऊन बनवलेली ही सिरीज प्रचंड लोकप्रिय झाली. ऑक्टोबर महिन्यात सोनी लिव्हवर आलेल्या या सिरीजला लोकांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे, बॅकग्राऊंड स्कोरच्या जोरावर क्रिकेटच्या व्हिडिओपासून ते व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हिडिओपर्यंत या सिरीजचं थीम साँग वापरण्यात येतंय.

- Advertisement -

संगीत क्षेत्रावर आधारित हिंदी सिनेमांची संख्या आपल्याकडे कमी आहे, त्यातल्या त्यात शास्त्रीय संगीतावर आधारित हिंदी सिनेमे तर बोटावर मोजण्याइतपत पण नाहीत. गेल्या 20 वर्षात शास्त्रीय संगितावर आलेला एकही मोठा हिंदी सिनेमा मला तरी आठवत नाही, पण यावर्षी मात्र एका वेबसिरिजने या विषयाला स्पर्श केला. बंदिश बँडीटस या अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झालेल्या वेबसीरिजच्या माध्यमातून आनंद तिवारी या दिग्दर्शकाने तरुणाईला भारतीय शास्त्रीय संगीताची नव्याने ओळख करून दिली. नसीरुद्दीन शाह, अतुल कुलकर्णी, राजेश तेलंग, शिबा चढ्ढासारख्या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने लोकांना भुरळ पाडली आणि शंकर एहसान लॉयच्या संगीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. या वेबसिरिजची खासियत ही की यात पंडित अजोय चक्रवर्ती यांनीसुद्धा एक गाणं गायलं आहे, सीरिजमध्ये असलेली सर्वच गाणी, ठुमरी, बंदिश या श्रवणीय आहेत.

बहुधा याच गाण्यांमुळे ही सिरीज इतकी लोकप्रिय झाली असावी, लब पर आए गीत सुहाने या जावेद अलीच्या गाण्याला तर लोकांनी भरभरून प्रेम दिलंय. दोन संगीत घराण्यातील आपसातील स्पर्धा या विषयावर आधारित ही वेब सिरीज आहे. यावर्षी हिंदी वेब सिरीजमध्ये हॉरर जोनर हाताळण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला, पण परदेशी दिग्दर्शक देखील बेतालच्या निमित्ताने त्यात यश मिळवू शकला नाही. बॉलीवूडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला पण सध्या हरवत चाललेला कॉमेडी जोनरदेखील वेब सिरीजमध्ये हाताळला आहे. टिव्हीएफने बनवलेली पंचायत नावाची सिरीज अमेझॉन प्राईमवर प्रचंड गाजली. हलके फुलके विनोद, उत्तम कथा आणि दमदार सादरीकरणाच्या जोरावर या वेबसिरीजलादेखील लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विनोदाच्या निर्मितीसाठी कुठलेही थुकरट चाळे करण्याची, माणसाला बाई बनविण्याची, सेक्सवर जोक करण्याची गरज निर्मात्यांना पडली नाही आणि तरीही एक उत्तम मनोरंजक सिरीज ते बनवू शकले, हेच पंचायत सिरीजचे यश. काही दिवसांपूर्वी हॉटस्टारवरसुद्धा याच जोनरची परिवार नावाची सिरीज प्रदर्शित करण्यात आली होती. ज्यात गजराज राव, विजय राज, रणवीर शोरी सारखे कलाकार होते, पंचायत इतकी उत्तम नसली तरी ती एक मनोरंजक सिरीज होती.

सायन्स फिक्शन हा एक असा जोनर आहे ज्यापासून भारतीय निर्माते-दिग्दर्शक नेहमीच दूर पळत असतात, पण 2020 मध्ये या क्षेत्रातही भारतीय प्रेक्षकांचे नशीब चांगले आहे की या जोनरची एक सिरीज बनली आणि काही प्रमाणात का होईना यशस्वी ठरली. शैलेंद्र व्यास दिग्दर्शित जे एल 50 ही सोनी लिव्हवर प्रदर्शित झालेली सायफाय वेबसिरीजसुद्धा भारतीय मनोरंजन क्षेत्रातील नवा प्रयोग मानली गेली. भारतीय प्रेक्षकांना सायफाय फिल्म्स आवडतात, पण आपल्याकडे तितक्या प्रमाणात या फिल्म्स बनत नाहीत. मागच्या वर्षी आरती कढाव नावाच्या एका महिला दिग्दर्शकाने कार्गो नावाची फिल्म बनवली होती जिला समीक्षकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या, पण त्याशिवाय कुठलाही मोठा हिंदी सायफाय सिनेमा पाहण्यात आला नाही. अभय देओलची ही जे एल 50 वेब सिरीज फार ब्रीलियंट वैगरे नाही, पण ज्याप्रकारे हा विषय हाताळला आहे त्यासाठी या वेब सीरिजला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

हे सर्व जोनर वगळता द रायकर केस, नुकतीच आलेली क्रिमिनल जस्टिस यांसारख्या कोर्टरूम ड्रामावर आधारित वेब सिरीजदेखील लोकांना आवडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून वेबसिरिज सोबतच अँथोलॉजी फिल्म्सच्या प्रमाणातसुद्धा बरीच वाढ झाली आहे. यावर्षीच्या सुरुवातीलाच नेटफ्लिक्सवर घोस्ट स्टोरिज नावाची अँथोलोजी फिल्म प्रदर्शित झाली, तर नुकतीच अमेझॉन प्राईमवर अनपॉज नावाची फिल्म रिलीज करण्यात आली आहे. या दोन्ही फिल्म उत्तम आहेत, हिंदी सोबतच तामिळ आणि तेलुगू भाषेतदेखील आता अशा फिल्म्स बनतात, पावा कधायगल, पुथम पुधु कलाई, मेट्रो कथालूसारख्या साऊथ इंडियन अँथॉलोजी फिल्म्स यादेखील बर्‍याच चर्चिल्या गेल्या आहेत. यातील सर्वच सिनेमे हे ओटीटी माध्यमांवर प्रदर्शित झालेत हे विशेष, अँथोलॉजी सिनेमाद्वारे निर्मात्यांना कलाकृती सादर करण्याच्या नवीन प्रकार माहिती होतोय हे देखील कमी नाही. लस्ट स्टोरीज असो किंवा घोस्ट स्टोरीज अँथोलॉजी फिल्म्स हे एक असं माध्यम आहे, जिथं एकाच वेळी वेगवेगळ्या निर्मात्यांच्या कलाकृती पाहता येतात.

ओटीटीवर येणार्‍या हिंदी सिनेमा आणि वेबसिरीजची संख्या मोठी आहे, पण तुलनेने ओटीटीवर मराठी कंटेंट पाहायला मिळत नाही. संपूर्ण वर्षभरात ओटीटी माध्यमांवर बोटावर मोजण्याइतक्या मराठी वेबसिरीजसुद्धा प्रदर्शित झाल्या नाहीत. अमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्ससारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मने तर मराठी कंटेंट स्वीकारण्याससुद्धा मनाई केली आहे, याला कारण म्हणजे मराठी कंटेंटला मिळणारा प्रतिसाद. बॉलिवूड आणि साऊथकडून जितका उत्तम कंटेंट तयार होतो तितका मराठीत होत नसल्याने मराठी कंटेंट पाहायला मिळत नाही. समांतर, आणि काय हवं, वन्स या इयर यांसारखे काही चांगले प्रयोग झालेत पण त्यांची संख्या मोजकी होती. येणार्‍या 2021 सालातसुद्धा अनेक वेबसिरीज येणार आहेत ज्यांच्याकडून प्रेक्षकांना अपेक्षा आहेत. जानेवारी महिन्यातच तांडवसारखी मोठी वेबसीरीज प्रदर्शित होणार आहे, यासोबतच अनेक मोठ्या वेबसीरिजचे सिक्वलसुद्धा याच वर्षात प्रदर्शित होणार आहेत. थिएटर सुरू झाले असले तरी वेबसिरीजच्या संख्येत घट होईल असं वाटत नाही, कारण यावर्षात लोकांना माध्यमांनी वेबसिरीजची सवय लावली आहे. क्राईम थ्रिलर वेबसिरीज वगळून अनेक नवीन प्रयोग येणार्‍या काळात होतील आणि त्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा.

-अनिकेत म्हस्के 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -