– संदीप वाकचौरे
मुलाला जीवनात यशाच्या शिखरावर घेऊन जाण्यासाठी उत्तम दर्जाची शाळा हवी का..? त्याला शिकवणी लावायला हवी का..? त्याला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारे साधन साहित्य हवे का..? त्याला खेळण्यासाठी महागडे साहित्य हवे का? त्याला खूप छान छान कपडे हवे की महागडे अलंकार हवेत.. ? काय दिले म्हणजे त्याला यशाचे शिखर पादाक्रांत करता येईल..? आपण पालक म्हणून त्याला उंच भरारी घेता यावी याकरिता सर्व काही करत जातो, मात्र नेमके जे करायचे असते तेच होत नाही. मुलांना कधीच महागड्या वस्तूंची, महालवजा शाळांची गरज नसते. त्यांना गरज असते ती फक्त आई, बाबांच्या वेळेची. त्यांना भूक असते प्रेमाची..कुशीत घेऊन गप्पा मारणारे आई बाबा हवेत. झोपताना गोष्ट सांगणारी, अंगाई गीत गाणारी, शाळेत काय शिकला हे विचारणारी आणि ऐकणारी, मुक्त संवाद साधत बोलणारी, ऐकूण घेणारी, बोटाला धरून मनपसंद प्रवास करणारी प्रेमाची माणसं हवी.
हे सर्व राहून जाते आणि पैशाने जे मिळते ते सर्व दिले जाते. ते सारे पुरक असते. पुरक असलेल्या गोष्टीने केवळ पोट भरते, पण त्याने बाळसं येत नाही. बालकांच्या वाढ आणि विकासाकरिता पालकांचा ‘क्लॉलिटी टाईम’ अधिक गरजेचा असतो. मुलांचे शिक्षणासाठी साधनांची गर्दी नको, तर आई-बाबांचा वेळ हवा. मुलांसाठी पैसे खर्च करणे नव्हे, तर त्यांच्या सहवासात त्यांना जीवनाचा आनंद सापडणे, जीवनाचा अर्थ उलगडणे, जीवनाचा आनंद मिळेल अशा वाटांचे दर्शन घडविणे महत्वाचे. बालकांच्या सोबत खरंच असं कधी करतो का? आपण त्यांना वेळ देऊ शकत नसू आणि अशा वाटांचे दर्शन घडवत नसू, तर बालकांच्या वाटा चुकल्या आहेत, असे म्हणण्याचा अधिकार आपण गमावलेला असतो हे लक्षात घ्यायला हवे.
बालकाचा विकास आणि शिक्षण उत्तम होण्याकरिता भावनिक बुद्धिमत्तेचे विकसन महत्वाचे आहे. त्याकरिता जे जे म्हणून करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न पालकांनीच करायला हवा. आपण मुलांना भौतिक सुविधा पुरवू शकतो..त्याला हवे ते साधन बाजारातून आणून देऊ शकतो..पण त्याने त्याला खरच आनंद मिळतो का? याचा विचार करण्याची गरज आहे. मुळात आपण काळजीपोटी बालकाला जे देत जातो ती त्याची गरज नसते. त्याची गरज असते ती निखळ आई-बाबांच्या नितळ प्रेमाची आणि वेळेची. अलीकडे पैसा कमविण्याच्या विचारात इतके गुंतले आहोत त्यात आपलाही आनंद आपण गमावलेला आहे. मुलांच्या भविष्याची चिंता करीत सारखे धावाधाव करीत आहोत..उद्या त्याच्या शिक्षणासाठी पैसा लागणार आहे.. उत्तम दर्जाची शाळा हवी.. महागडी शिकवणी वर्ग हवेत.. आपल्या प्रतिष्ठेला शोभेल असे महागडे कपडे आणि उत्तम साधने हवी आहेत.
त्यासाठी पैसा कमवायलाच हवा ना! कमविण्याच्या नादात आपण इतके धावतो की, मुलांसाठी वेळ कोठे तो उरतच नाही. नोकरी करत असताना मिळणार्या वेतनाचा पैसा पुरत नाही म्हणून निर्धारित वेळेनंतरही अतिरिक्त वेळ देऊन काम करत पैसे मिळविण्याचा प्रयत्न असतो. मग शनिवार, रविवार सुट्टी असली तरी त्याही वेळेत काम करण्यात स्वत:ला गुंतवून ठेवणे ठिक वाटते. नोकरीतील पैसे पुरत नाहीत, म्हणून अतिरिक्त पैशासाठी दुसरी नोकरी करण्याचा प्रयत्न होतो. कामाच्या धावपळीत पालक सकाळी घरं सोडतात तेव्हा बालक झोपलेलेच असते. रात्री पालक उशिरा येतात तेव्हा बालक जेवण करून झोपी गेलेले असते. पालकांची भेट तरी कधी होणार? सुट्टीच्या दिवशी पालकांची भेट. ही सारी धावाधाव करण्यात आपण मुलांच्या जीवनातील आनंद गमावत असतो.
मुलांच्या भविष्यासाठी आपण धावाधाव करीत असलो तरी त्यांच्या भावनिक, मानसिक विकासाकरिता ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याबाबत दक्षता न घेतल्यांने मुलांच्या जीवन प्रवासात प्रश्न निर्माण होतात. त्यांच्या विकासाच्या प्रक्रियेत अडथळे येतात. मुलांना वेळ न दिल्याने मुलांच्या आयुष्यातील जडणघडणीची वेळ निघून जाते. मुळात कोणतेही नाते आपल्याला पुढे न्यायचे असेल तर त्याकरिता वेळ द्यावा लागतो. नात्याची वीन घट्ट करण्यासाठी एकमेकाला वेळ देत, एकमेकाला जाणून घेणे घडत गेले तरच नाते पक्के होते. वेळ देणे म्हणजे समग्रतेने जाणून घेणे असते. विचारांची देवाणघेवाण, अभिरूची, गरजा आणि विकासासाठी आत्मविश्वासाची पेरणी त्यातून होत असते. आई, बाबांचा स्पर्श मुलांना शिकण्यासाठी विश्वास देत असतो. स्पर्श हाही आधार असतो. त्यामुळे मुलांना जीवन प्रवास समृद्ध करण्यासाठी आईबाबांच्या वेळेची निंतात गरज असते. आईबाबांची सोबत मुलांच्या पंखात बळ भरत असते.
पालक स्वत:च्या विकासासाठी, आनंदासाठी विविध क्लबच्या वाटा तुडवत असतात. तेथे स्वत:चा आनंद शोधत असतात. त्यावेळी आपण मुलांच्या आणि इतरांच्या आनंदाचा विचार करतो का, हा खरा प्रश्न आहे. आपण धावपळीत थकला तर अशा आनंदाच्या वाटा शोधत राहतो. स्वत:साठी वेळ देत राहतो. हवा असलेल्या व्यक्तीचा सहवास आपला थकवा घालवतो. आपणच थकवा, कंटाळा जावा म्हणून प्रयत्न करतो..आपणाला आनंदाच्या वाटा शोधताना स्वातंत्र्य असते.. पण ते स्वातंत्र्य मुलांना असत नाही. त्यामुळे मुलांसाठी आई-बाबांनी वेळ देण्याची गरज आहे. बालकांच्या जगण्याचा सातत्याने विचार करणारे गिजूभाई बधेका पालकांच्या डोळ्यांत अंजन घालतात. ते म्हणतात, क्लबपेक्षा आपणच वाट बदलली तर …बरेच काही साध्य होईल. त्या वाटेत मुलांचा आनंद सामावलेला आहे.
ती वाट मुलांचे भावविश्व समृद्ध करणारी, शैक्षणिक प्रवासासाठी शक्ती देणारी आहे. गिजूभाई म्हणतात, क्लबची वाट बदलत आपणच बागेची वाट मुलांचे बोट धरून चालण्याची गरज आहे. त्यामुळे मुलेही आपल्यासोबत बागेत येतील. त्यांनाही बागेत झाडे, वेली, फुले, पाने, पक्षी, कारंजे अनुभवता येतील. खेळणी खेळता येतील. निसर्गातील रंग, आकार, चव जाणता येईल, प्राणी, पक्षी यांच्या आवाजातील विविधता अनुभवता येईल. वेली, झाडांची माहिती मिळेल. भवतालात असलेल्या पक्ष्यांचे गुंजन अनुभवता येईल. निसर्ग, माणसं, मुले वाचता येतील. सामाजिक जीवनाचा अनुभव घेता येईल. बागेची भेट म्हणजे बरेच काही शिकणे असेल. मोठ्यांसाठी ते कदाचित कंटाळवाणे असेल, पण लहानासाठी पालकांचा सहवास आणि निसर्गातील आनंद महत्वाचा आहे.
बागेत जाऊन गप्पा मारत बसण्यापेक्षाही त्यांना भवतालामधील प्राण्यांचे दर्शन घडवायला हवे. प्राणी आणि पक्षी हे बालकांचे भावविश्व असते. त्यांना त्याची ओढ असते. त्यामुळे मोठ्यांनी दुसरे काही ऐकविण्याऐवजी मुलांना शक्य होईल ते प्राणी, पक्षी दाखवायला हवेत. पालकांकडे जेव्हा वेळ असतो तेव्हा गरज म्हणून वर्तमानपत्रे वाचत असतो. त्यासाठी आपण वेळ देत असतो. आज त्यापेक्षा मुलांचे ऐकायला शिकण्याची गरज आहे. मुलांना घरात अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र्य नाही, त्यांना ऐकून घेण्याची व्यवस्था नाही. आपण मोठे आहोत म्हणून आपलेच ऐकले पाहिजे, अशी मोठ्यांची धारणा असते, मात्र मुलं आपल्याशी बोलू इच्छितात, सांगू पाहतात..त्यांनाही भावभावना आहेत. स्वत:चे काही मत, अनुभव, सांगू पाहत आहेत.
तेव्हा आपण लक्ष देऊन त्याला ऐकायला हवे. मुलांना ऐकण्यासाठी आपले कान आसूसायला हवेत. दुर्दैवाने मुलांचे ऐकणारे कान आणि त्यांची भाषा जाणून घेणारी व्यवस्था घराघरातून हरवत चालली आहे. घरात त्यांना ऐकणारे कान नाहीत त्याप्रमाणे शाळेतही ते कान नाहीत. समाजातही त्यांना ऐकून घेणार्या कानांची व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांच्यादृष्टीने मोठ्यांना कान असले तरी ते केवळ अवयव आहेत, मात्र त्यांच्यासाठी त्या अवयवाचा कोणताही उपयोग नाही. त्यामुळे त्यांना ऐकून घेणे म्हणजे भाषिकदृष्ठ्या अधिक समृद्ध करणे असते. त्याचबरोबर मुलांसाठी सर्वात आवडते काय असेल तर गोष्ट. गोष्टीसाठी त्यांचे नाते आजी-आजोबांशी अधिक पक्के असते. त्यांना एकमेकांची भाषा जाणता येते. गोष्ट म्हणजे मुलांचे मनोरंजन आहे. त्याद्वारे मुलांचे भावविश्व समृद्ध होत असते.
गोष्टीतून भाषा समृद्ध होते आणि बालकांची शब्दसंपत्ती वाढते. त्याचबरोबर सृजनशीलतेसाठीच्या वाटा निर्माण होतात. मुलांचे कल्पना विश्व व्यापक करण्यात गोष्टीचा महत्वाचा वाटा असतो. रोज गोष्ट, गाणी, बडबडगीते बालकाला ऐकवायला हवीत. त्यातून बालक आनंद घेईल. बालक कोणत्याही परिस्थितीतील असू द्या, त्याला या गोष्टींची मोहिनी असते. त्यामुळे आपण त्या गोष्टी नियमित ऐकविण्यासाठी तयारी दाखवायला हवी. मुलांना विकसित करण्यासाठी पैसा नाही, तर पैशाच्या किमतीचा वेळ द्यायला हवा. मुलांशी बोलायला हवे, गप्पा मारायला हव्यात.. त्याच्या सोबत लहान बनायला हवे.. आपणच त्याचे बोट पकडत चालू लागलो, तर आपल्यालाही आनंदाच्या वाटा सापडत जातील. आपण मुलांमध्ये रस घ्यायला हवा, त्याच्या गालावरून, डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवत फक्त लढ म्हणायला हवे. गिजूभाई लिहितात..
तुम्ही तुमच्या क्लबमध्ये जाण्यापेक्षा मुलाला बागेत घेऊन जा.
गप्पा मारत बसण्यापेक्षा मुलाला प्राणी दाखवा.
वर्तमानपत्रात घुसण्यापेक्षा मुलांचे बोलणे ऐका.
रात्री झोपायला जाताना मुलाला गोष्ट सांगून खूश करा,
मुलांमध्ये रस घ्या.
- Advertisement -
- Advertisement -