संस्थासंपन्न जीवनातून हरवतोय ‘सामाजिक पुरुषार्थ’!

महाराष्ट्रातील गिर्यारोहण संस्थांत उभा छेद गेलाय.‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ’ फुटून आज माऊंटेनीअरिंग असोसिएशन काऊन्सिल(मॅक) नावाने दुसरा प्लॅटफॉर्म उभा राहिलाय. मित्रही चांगले आणि हेतूही चांगला असेल तर एकवाक्यता का नाही, हा प्रश्न उरतोच. गिर्यारोहणात खरंतर एकांत आणि लोकांत आपसुख मिळवता येतो. निसर्गाच्या सहवासात एकांत लाभतो. चालता चालता वाट हरवते,पण पुन्हा वाटेवर येता येतं.आकाशातील पक्षांना वाट नसते. असते फक्त दिशा. थव्याथव्याने आपले आपले अस्तित्व न विसरता परस्परांचे सहचर होऊन अंतर कापले जाते. तेच माणसाला जमू शकत नाही का ?

ऐंशी-नव्वदीच्या दशकात मुंबई-पुण्याकडे गिर्यारोहणात अगदी बोटांवर मोजता येतील इतक्याच संस्था सक्रिय होत्या. कुठे-केव्हा-कुणाची-कोणती ऍक्टिव्हिटी हे कळायचे. गरज पडल्यास मार्गदर्शनाची आणि साहित्याचीही विनामूल्य देवाणघेवाणही व्हायची. संस्था संघटनांमध्ये निखळ मित्रत्वाचा संवाद व्हायचा. त्याच गिर्यारोहण संस्था आज दोन दिशेने विभक्त झाल्याचे पाहून वाईट वाटते. गिर्यारोहक आणि संस्थांमधील मतभेद चव्हाट्यावर आलेयत. तसे, एकीच्या बाबतीत सर्वच क्षेत्रांत महाराष्ट्राला जणू शाप असावा. त्यातून गिर्यारोहण संस्था तरी कशा सुटतील?

संस्थांतर्गत राजकारण, पदांचा हव्यास, इगो-अहंकार, गैरवर्तन-गैरव्यवहार, नेतृत्वाची लालसा, व्यावसायिक सुप्त हेतू अशा अनेक कारणांचं लहानसहान निमित्त होऊन संस्था संघटना अक्षरशः फुटून त्यांच्यातूनच अनेक संस्था उदयास आल्यात. त्यामुळे संस्था-मंडळं-संघटनांचे उदंड पीक आलेय, म्हणावयास हरकत नाहीय.

मी अशा काही गिर्यारोहण संस्था पाहतोय, जिथे पदाधिकार्‍यांचा गिर्यारोहणाशी संबंध पूर्वी केव्हा नव्हता आणि आत्ताही नाहीय. संस्थेची उभारणीच अशी सदोष असेल तर दुर्दैव होय. कुणालाही काहीही करण्याची अनुमती मिळणे हे स्वातंत्र्य नव्हे, तर स्वातंत्र्याच्या गैरवापरातून उद्भवणारी ही स्वैरता म्हणावी लागेल. आजकाल तर म्हणे, संस्था-संघटनांना काही निधी उभा करता यावा म्हणून सरकारी पातळीवर काही उपक्रम, काही टेंडर्स कामेसुद्धा उपलब्ध करण्याची सोय झालीय. त्यामुळे एकूणच संस्था-संघटना-मंडळं विविध उद्देशाने उभ्या करणं-ती चालवणं-ती टिकवणं म्हणजे एका संस्थेपेक्षा कंपनीचेच व्यवस्थापन म्हणावे लागेल. कारण, व्यवसायाशी निगडित व्यवस्थापन आले की तिथे संस्थेचे अस्तित्व संपते आणि सुरू होते कंपनी. आज गिर्यारोहणाचे पांघरूण घेऊन चक्क व्यवसाय करणार्‍या अशा अनेक कंपन्या सोशल मीडियावर सापडतील.

आत्ता, याच कारणावरून महाराष्ट्रातील गिर्यारोहण संस्थांत उभा छेद गेलाय.‘अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ’ फुटून आज माऊंटेनीअरिंग असोसिएशन काऊन्सिल(मॅक) नावाने दुसरा प्लॅटफॉर्म उभा राहिलाय. मित्रही चांगले आणि हेतूही चांगला असेल तर एकवाक्यता का नाही, हा प्रश्न उरतोच. गिर्यारोहणात खरंतर एकांत आणि लोकांत आपसुख मिळवता येतो. निसर्गाच्या सहवासात एकांत लाभतो. चालता चालता वाट हरवते,पण पुन्हा वाटेवर येता येतं.आकाशातील पक्षांना वाट नसते. असते फक्त दिशा. थव्याथव्याने आपले आपले अस्तित्व न विसरता परस्परांचे सहचर होऊन अंतर कापले जाते. तेच माणसाला जमू शकत नाही का ?

पूर्वी एकमेकांची मनं समान विचारावर जुळणं हेच संस्थेचे मुख्य भांडवल आणि गुणी माणसं हीच संपत्ती असायची. तिथे आता आपल्या गरजे पुरताच संस्था एक सोय म्हणून पाहिली जाते. संस्थेच्या उद्देशाशी एकरूप होणे होत नाही.

संघटनेसाठी प्रथम आवश्यक ते धेय्य. आणि धेय्य कितीही उदात्त असले तरी ते व्यवहारात उतरविण्यासाठी आवश्यकता असते ती मनमिळाऊ सदस्यांची. केवळ बुद्धी आणि तर्क याने संस्था-समाज उन्नतीचे कार्य सिद्धीस जात नाही. त्यासाठी ठरवलेल्या धेय्यावर अढळ श्रद्धा आणि सदस्यांच्या बळाचे भावसंपन्न हृदयच हवे. ती भावनाच माणसाला कार्यप्रवण करते. यामुळेच काही जुन्या संस्था तेच जीवाभावाचं नातं आजही टिकवून असाव्यात. मला आठवतं, आमच्या अल्पायनो समिटर्स संस्थेची एखादी मोहीम ठरली की, मोहीम प्रत्यक्ष होण्या अगोदर ते स्वप्नं आम्ही जगायचो. मोहिमेचे स्वरूप त्याप्रमाणे पूर्वतयारी व्हायची. ती समुदायाने करण्यात आनंद होता. तेही सुख होतं.

माझ्याच घरी बैठक व्हायची, इक्विपमेंट्सची आवराआवर-लिस्ट बनवून त्यानुसार सॅक भरून ठेवणं, रोप्स कॉईलींग, शिधा लिस्ट-त्याची खरेदी-त्याचे दिवसानुसार वेगवेगळे पॅकेट्स करणं, पाण्यासाठी प्लास्टिक कॅन्स जमा करणं एवढं सगळं सामान साहित्य मोहिमेच्या वेळी रेल्वे स्टेशनच्या प्लॅट फॉर्मवरून जिन्याने चढवायचं-उतरवायचं-ट्रेनमध्ये घुसायचं, प्रवाशांच्या ओरड-शिव्या खायच्या. नंतर प्लॅटफॉर्मवर उतरून येस.टी.स्टँडपर्यंत तीच कसरत करायची. जिथे येस.टी.चे तिकीट संपेल, तिथून तेवढे सामान म्हणजे अदमासे प्रत्येकाच्या पाठी-खांद्यावर किमान 15-20 किलोचे सामान घेऊन जिथे मोहीम किंवा शिबीर तो बेसकॅम्प गाठायचा. त्या कष्टातही अपरिमित सुख होते. ते कष्ट आणि सुख हे आत्ता कुणास सांगूनही कळणार नाही. कारण, आत्ता चारचाकी वाहनं थेट जवळपास तरी पोहोचतात किंवा चार पैसे खिशात खुळखुळू लागल्याने चार माणसं मजुरी देऊन मिळवता येतात.

मी, याबाबतीत स्वतःला तर सर्वात जास्त कमनशीब समजतोय. जिवाभावाचे तसे मित्र-सहकारी पुन्हा केव्हा लाभायचे नाहीत. मी, हे उणेपण-दुःख आज जास्त अनुभवतोय कारण, संघटनेतले सुख मी अधिक अनुभवले असेन. एकमेकांत इतकं विश्वासाचं प्रांजळ नातं की, प्रत्येकास एकमेकांचे अधिक वा उणेपण ठाऊक असायचे. मनं आणि मनगटं यांत एकवाक्यता, निष्ठा असायची. आता निष्ठा म्हणजे काय रे भाऊ? हे मी आता स्वतःलाच विचारू पाहतोय. कारण, त्यापासून पारखा झालोय.

संघटनेच्या बळावरच भारतीय नौदलास सलग 9 वर्षे प्रशिक्षण द्यावयाचे मी नेतृत्व करीत होतो. अस्थमा-ब्राँकायटीस रुग्णांसाठी, न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकरिता ट्रेनिंग प्रोग्रॅम, वर्तमान पत्रांच्या संयुक्त विद्यमानेही अनेक शाळा महाविद्यालयात शिबिरे, अनेक प्रस्तरारोहण मोहिमा, सलग 12 वर्ष पन्हाळगड विशाळगड ट्रेक्स, अष्टशिवदुर्गारोहण सारखे नावीन्यपूर्ण उपक्रम. एक ना अनेक संकल्पनांना, उपक्रमांना यशस्वीपणे गवसणी घालता येत होती. हे फक्त फक्त आणि फक्त संघटनेच्याच बळावर आणि साथीदारांच्या संघटनेवरील निष्ठेवर. माझ्या लीड क्लाइंबिंगच्या वेळेस बिलेवर कोण, सेकंड मॅन कोण किंवा सपोर्ट टीम म्हणून कोण, हे न सांगताही शिखर पायथ्याशी हे समीकरण व्यवस्थित चालू असायचे. बिलेचा रोप सेंटीमीटरही इकडे तिकडे हलायचा नाही. कोकणकडा घ्या, वाघदरी घ्या किंवा ड्युक्स नोज घ्यापूर्व नियोजनात शेवटपर्यंत गडबड व्हायची नाही. हे मीच नव्हे तर सर्व जुने जाणते गिर्यारोहक अनुभवत होते.अनेक संस्थांचे वैविध्यपूर्ण उपक्रम संघटनेच्याच ताकदीवर यशस्वी होत होते.

व्यक्तिव्यक्तीच्या स्वतंत्र शक्तीचे संघटनेमध्ये एकत्रीकरण झाल्याशिवाय कोणतेही श्रेष्ठ कार्य होणे शक्य नाही.आपले व्यक्तिमत्त्व जपून-जोपासूनही हे कार्य पूर्णत्वाला नेता येते. सिंधुदुर्गात आल्यापासून गिर्यारोहण आणि संघटना वाढीसाठी मी शतप्रतिशत प्रयत्न करतोय, पुढेही करेन जोवर शरीर मन साथ देईल. पण, एक आश्चर्य वाटेल. आजमितीस हजारो युवक संस्थेच्या सावलीतून नक्कीच शिकवून अनुभवून गेलेयत.पण आजमितीस म्हणावं तर संस्थेपाशी अवघे 4 सदस्यही ‘सहकारी’ म्हणून स्थिर राहू शकले नाहीत, हे वास्तव सत्य होय. खरं सांगायचं तर मुळात कार्यकर्ते निर्माण करतात येत नाहीत, तो पिंडच असावा लागतो. विषयाची आवड-धेय्य-श्रद्धा -महत्वाकांक्षा असावी लागते. भव्य आणि चिरस्थायी कार्ये ‘उत्तम सहकार्‍यांच्या’ संघटनेशिवाय शक्य नाहीत.

चाळीस लक्ष ब्रिटिश तीस कोटी भारतीयांवर साम्राज्य गाजवत होते. हे असंघटित जीवन पाहून एकदा देशभक्त बीपीनचंद्र पाल म्हणाले होते, ‘सारे भारतीय एक होऊन एकावेळी जरी थुंकले तरी त्याखाली ब्रिटिश साम्राज्य बुडून जाईल, पण हे भारतात घडू शकत नाही ही शोकांतिका आहे.तो,असंघटितपणा आजही कित्येक क्षेत्रांत जाणवतो. आदर्श संस्थासंपन्न जीवन हा खरा ‘सामाजिक पुरूषार्थ’,पण हेच अलीकडे आपण सारेच विसरत चाललो आहोत हे, वास्तव सत्य माझ्यासारख्या भटक्यास जास्तच अस्वस्थ करतेय !