घरफिचर्ससारांशबेधुंद प्रेमाच्या घातक लहरी...

बेधुंद प्रेमाच्या घातक लहरी…

Subscribe

ज्या वयात मुलांच्या मनाची, बुद्धीची आणि शरीराचीसुद्धा पुरेशी वाढ झालेली नसते त्या वयात मुलांनी प्रेमात पडणे, स्वतःचा लग्नाचा जोडीदार निवडणे, त्यासाठी घरातून पळून जाणे अथवा घरच्यांना लपवून दोघांचे कायदेशीर लग्नाचे वय पूर्ण झाल्यावर ताबडतोब कोर्ट मॅरेज करून घेणे असे प्रकार वाढीस लागलेले दिसतात. समुपदेशनामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक केस हाताळताना लक्षात येते की घरातील जाचक वातावरणाला, आई वडिलांच्या कटकटीला वैतागून मुलंमुली घराबाहेर पडतात. आईवडिलांना थोडीही कल्पना न देता, कोणत्याही मोठ्या माणसाचे मत विचारात न घेता स्वतःच्या आयुष्यातील इतके मोठे निर्णय आजची तरुण पिढी बेधडक घेताना दिसते.

तरुण पिढी जेव्हा आडोशाला जाऊन प्रेमाच्या नावाखाली एकांतात चुकीचे उद्योग करते, प्रेमाच्या आणाभाका घेऊन बंद खोलीत भेटायला एकमेकांना भाग पाडले जाते, एकमेकांकडून शारीरिक अपेक्षा केली जाते, लग्नाची, आयुष्यभर साथ देण्याची वचने देऊन जेव्हा एकमेकांचा गैरफायदा घेते, परस्परांची फसवणूक केली जाते. मन भरले, प्रियकर अथवा प्रेयसीकडून जरा काही मनाविरुद्ध घडले, ते खटकले की परस्परांना सोडून देणे, नवीन गर्ल फ्रेंड्स बॉय फ्रेंड्स शोधणे अतिशय लीलया घडत असते. एकमेकांना इमोशनल ब्लॅकमेल करून जेव्हा मनाविरुद्ध इच्छेविरुद्व कोणतीही गोष्ट यांच्याकडून केली जाते किंवा करुन घेतली जाते तेव्हा त्याचे भयंकर परिणाम भविष्यात भोगावे लागतील याची जाणीव तरुण वयात नसते. समोरील व्यक्ती आपल्यासाठी कितपत योग्य, अनुरूप आहे, त्या व्यक्तीचा हेतू काय आहे याचा थोडाही अभ्यास केलेला नसतो. एखाद्यासाठी टाइम्स पासचे साधन, करमणुकीचे माध्यम बनायला अतिशय सहजासहजी अलीकडील पिढी तयार होते.

अनेकदा हेही पाहायला मिळते की आजकालच्या अतिशय कमी वयातील मुलंमुली त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीशी जवळीक करतात. यामध्ये त्या मोठ्या व्यक्तीकडून मिळणारे आर्थिक लाभ, विविध प्रलोभने, भौतिक सुख याला बळी पडून स्वतःच्या वयाला न शोभणारे कृत्य करायलादेखील मागेपुढे कोणी पाहत नाहीत. तात्पुरत्या, अत्यल्प सुखासाठी आपले चारित्र्य, प्रतिष्ठा पणाला लावण्यात काय अर्थ आहे याचा विचार होणे आवश्यक आहे. यामध्ये पालकांचा मुलांशी असलेला संवाद, मुलांवरील विश्वास आणि त्यांच्यातील नातेसंबंध खूप महत्वाचे आहेत. तरुण पिढीसाठी सर्वात महत्वाची असते ती संगत. आपला मुलगा अथवा मुलगी कोणासोबत राहतोय, बोलतोय, फिरतोय, त्या मित्रमैत्रिणीचं नाव, गाव, पत्ता, कौटुंबिक बॅकग्राऊंड काय कसं आहे, त्याचे पालक काय करतात, कुठे असतात, त्यांचे फोन नंबर पत्ते पालकांनी आवर्जून आपल्याजवळ ठेवावेत.

- Advertisement -

खरंच आपला पाल्य शाळा, कॉलेज, क्लासलाच जातोय की खोटे बोलून अन्य ठिकाणी जातोय, तो अथवा ती कोणत्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत का, आपल्या मुलांबरोबर कोणी जबरदस्ती गैरप्रकार करतो आहे का, त्यांना कसला दबाव, भीती वाटते आहे का किंवा त्यांना कोणी ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून चुकीची कामं करून घेतय का, आपला पाल्य कोणाच्या प्रेमात बुडाला आहे, त्याचा त्याच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो आहे का, त्याचे दैनंदिन रुटीन, शारीरिक मानसिक स्वास्थ्य, वागणूक बदलते आहे का, तो किंवा ती काही लपवते आहे का यावर पालकांनी, शिक्षकांनी खूप बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असते. मुलांची दप्तर, मोबाईल, वह्या पुस्तक, कपाटे अचानक तपासणे, काहीही चुकीचे लक्षात आल्यास मुलांशी त्याविषयी चर्चा करणे, त्यांना हातात वाहन देताना सर्व कागदपत्रे, नियम समजावून सांगणे पालकांचे कर्तव्य आहे.

एकतर्फी प्रेम, त्यातून होणारे टॉर्चर, त्यातून होणारे हल्ले, ब्लॅकमेलिंग, अपहरण आणि कायमस्वरूपी उध्वस्त होणारे आयुष्य सावरण्यासाठी युवा पिढीमध्ये जागृती आणि प्रबोधन होणे खूप आवश्यक आहे. कोणत्याही व्यक्तीपासून आपल्याला होणारा त्रास, घालमेल प्रत्यक्ष जबाबदार व्यक्तीला भेटून सांगणे, घरातल्यांशी मनमोकळे बोलणे, आवश्यक तिथे पोलीस प्रशासनाची मदत घेणे, हेल्पलाईन नंबरची मदत घेणे, न घाबरता परिस्थिती हाताळणे, वेळप्रसंगी स्वतःचे संरक्षण करता येणे हेदेखील युवा पिढीसाठी महत्वाचे आहे. गुड टच बॅड टच यावर तरुण, वयात येणार्‍या मुलामुलींना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. घरच्यांना घाबरून अनेकदा मुलं आपल्यावर होत असलेली जबरदस्ती, अन्याय घरी सांगत नाहीत. याठिकाणी पालकांनी मुलांना विश्वासात घेणे, त्यांना धीर देणे क्रमप्राप्त आहे.

- Advertisement -

ज्या वयात मुलांच्या मनाची, बुद्धीची आणि शरीराचीसुद्धा पुरेशी वाढ झालेली नसते त्या वयात मुलांनी प्रेमात पडणे, स्वतःचा लग्नाचा जोडीदार निवडणे, त्यासाठी घरातून पळून जाणे अथवा घरच्यांना लपवून दोघांचे कायदेशीर लग्नाचे वय पूर्ण झाल्यावर ताबडतोब कोर्ट मॅरेज करून घेणे असे प्रकार वाढीस लागलेले दिसतात. समुपदेशनामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक केस हाताळताना लक्षात येते की घरातील जाचक वातावरणाला, आई वडिलांच्या कटकटीला वैतागून मुलंमुली घराबाहेर पडतात. आईवडिलांना थोडीही कल्पना न देता, कोणत्याही मोठ्या माणसाचे मत विचारात न घेता स्वतःच्या आयुष्यातील इतके मोठे निर्णय आजची तरुण पिढी बेधडक घेताना दिसते.

यामुळे शिक्षण अर्धवट राहणे, शिक्षण सोडून द्यावे लागणे, लग्न केल्यावर अतिशय त्रासदायक परिस्थितीमधून जावे लागणे, कुटुंबातील सगळ्यांचीच सामाजिक बदनामी होणे, शिकण्याच्या वयात जे काही छान आयुष्य अनुभवायचे, मौजमजा करायची, हिंडायचे फिरायचे, मनसोक्त जगायचे, नवीन कला आत्मसात करायच्या हे सगळंच राहून जाते. घाईघाईत परस्पर केलेल्या अशा लग्नाचं, घर सोडून पळून गेल्यानंतरचं भविष्य अतिशय दुर्दैवी, अल्प आणि दुःखद असते हे कालांतराने लक्षात येतेच, पण तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि आयुष्य खूप भरकटलेलं असतं.

समुपदेशनासाठी अशा प्रकारे जेव्हा अतिशय कमी वयात लग्न करु इच्छिणारी अथवा घरच्यांना लपवून परस्पर लग्न करुन घेऊन नंतर बिकट अवस्थेत आलेली, अथवा पळून जाऊन सर्व अनुभव घेऊन परत माघारी आलेली टीन एजर्स मुलामुलींशी भेटण्याचा, बोलण्याचा आणि त्यांना चुकीच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रसंग येतो तेव्हा त्यांचे विचार, त्यांची मानसिकता आणि त्यांची निर्णय क्षमता पाहून आपण हतबल होतो. अशी कमी वयातील प्रेमप्रकरणं आणि त्यांचे समुपदेशन यासारखी प्रकरण हाताळली जातात, तेव्हा लक्षात येते की आपल्या आयुष्याबाबतीत या पिढीला अजिबात गांभीर्य नाहीये. अतिशय चांगल्या सुसंस्कृत घरातील मुली, स्वतःचे शिक्षण, स्वतःचे हक्काचे घर, आईवडील सोडून अशा काही मुलांसोबत चोरून लपून लग्न करताना दिसतात ज्याचे बॅकग्राऊंड गुन्हेगारीचे आहे, अथवा जो स्वतःचे पोट भरण्याइतपत पण सक्षम नाहीये. दोघांच्या आर्थिक, शैक्षणिक, संस्कारिक परिस्थितीमध्ये प्रचंड तफावत असतानादेखील केवळ प्रेम या एका कारणामुळे स्वतःच सर्व आयुष्य पणाला लावलं जातं.

जन्मजात कोणीही गुन्हेगार नसतो किंवा बिघडलेला नसतो. त्याला तसं बनवतं त्याच्या आजूबाजूची परिस्थिती, त्याची विचारशैली आणि त्याची वर्तवणूक. अलीकडे मैत्रिणींवर, मित्रांवर पैसा खर्च करण्यासाठी, उच्च जीवनशैली जगण्यासाठी, तरुणपिढी कोणत्याही चुकीच्या मार्गाने भरकटताना दिसते. तरुणपिढीला गुन्हेगारीकडे वळवणे सहज सोपे आहे. कोणतेही अनैतिक, बेकायदेशीर काम अथवा कृत्य करताना कोणताच विचार न करता वेळप्रसंगी स्वतःचे, स्वतःच्या कुटुंबातील लोकांचे आयुष्य पणाला लावायला पण मागेपुढे युवक पाहत नाहीत. त्यामुळे जर आपला पाल्य पैसे कमवत असेल, उच्च जीवनशैली जगत असेल तर हा पैसा नेमका कुठून येतोय, तो किंवा ती कुठे कोणत्या स्वरूपाचे काम करते याबद्दल पालकांनी सजग राहावे.

आपले शिक्षण उत्तमरित्या पूर्ण करणे, सेटल होणे, कुटुंबाला हातभार लावणे, स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणे हा आणि हाच हेतू युवा पिढीसमोर असणे आवश्यक आहे. आपले पालक आपल्यासाठी योग्य वय झाल्यावर चांगला अनुरूप जोडीदार शोधतीलच, आपल्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेतीलच हा विश्वास तरुण पिढीमध्ये रुजविणे आवश्यक आहे. तरुण वयात मुलंमुली भरकटतात ते फक्त प्रेम प्रकरणांमुळेच अथवा प्रेमभंग यामुळेच नाही तर करियरबद्दल त्यांनी किंवा पालकांनी घेतलेले चुकीचे निर्णय, मनाविरुद्ध स्वीकारावे लागलेले करियरचे ऑप्शन, लवकरात लवकर सेटल होण्यासाठी पालकांनी लावलेला तगादा, करियरबाबतीत पालकांनी, नातेवाईकांनी टाकलेल्या अवास्तव अपेक्षा आणि शैक्षणिक व्यावसायिक जगात वाढणारी स्पर्धा. या बरोबरच परीक्षेत अपेक्षित यश न मिळणे, अपेक्षित ठिकाणी प्रवेश न मिळणे, योग्य वयात नोकरी न मिळणे, घरातल्यांची लग्न जमवण्याची, ठराविक ठिकाणीच जमवण्यासाठी केलेली घाई, घरातील कुटुंबातील बिघडलेले वातावरण, पालकांनी घातलेली जाचक बंधनं अथवा दिलेली अनाठायी मोकळीक आणि मुबलक स्वातंत्र्य. यासारख्या असंख्य गोष्टी युवा पिढीला स्वतःच्या ध्येयापासून विचलित करत आहेत.

स्वतःचा जोडीदार स्वतः शोधणे परंतु तो आपल्या योग्य वयात, आपला स्वतःचा सर्वांगीण विकास प्रगती करूनच आणि परिपूर्ण नियोजन करूनच हा मूलमंत्र जर आपण अंमलात आणला तर योग्य वयात योग्यच गोष्टी आपल्या हातून घडतील. या लेखामार्फत युवा पिढीला काही महत्वपूर्ण संदेश आपण देतो आहोत. प्रेम या अतिशय प्रांजल संकल्पनेला प्रथम समजावून घ्या, प्रेम होणे, ब्रेकअप होणे, परत प्रेमात पडणे परत ते प्रेम तुटणे, प्रेमभंग होणे, कोणाला प्रपोज करणे, त्याचा नकार पचवणे, परत त्यातून सावरणे, या सर्व भावनांच्या खेळामध्ये आपल्या आयुष्यावर, तारुण्यातील अतिशय महत्वाच्या वर्षांवर, आपल्या अतिशय किमती अशा वेळेवर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत असतो. तासंतास सोशल मीडिया वापरणे, चॅटिंग करणे, धोकादायक ठिकाणी फिरायला जाणे, जीव धोक्यात घालून सेल्फी काढणे, पैसे कमवायला शॉर्टकट शोधणे, मनःस्तिथी बिघडून घेणे यामध्ये स्वतःचे आयुष्य पणाला लावू नका.

ज्या वयात आपल्याला सामाजिक जाणीव, कौटुंबिक जबाबदारी, नीती, मूल्य, संस्कार शिकणे आवश्यक आहे त्या वयात कोणतेही चुकीचे पाऊल चुकीच्या व्यक्तीच्या आहारी जाऊन उचलू नका. आयुष्य खूप सुंदर आहे त्यामुळे कोणत्याही अपयशाने खचून जाऊन नैराश्य येऊ देऊ नका. स्वतःचा जीव धोक्यात येईल, स्वतःच भविष्य धोक्यात येईल, आपल्या कुटुंबाला आपल्यामुळे त्रास, अपमान होईल असे कोणतेही निर्णय घेऊ नका. तरुण वयात वाया घालवलेला वेळ कधीच परत येत नसतो. शालेय महाविद्यालयीन जीवनातील अगदी थोडी वर्ष मेहनत, जिद्द, अभ्यास, एकाग्रता, ध्येय आणि संयम या नियमांना धरून जगलात तर पुढे आयुष्यभर तुम्हाला यश, प्रगती, प्रसिद्धी, पैसा, मनासारखा जोडीदार मिळणे सहज शक्य होईल. याच वयात चांगले आदर्श स्वीकारणे, चांगले जोडीदार, उत्तम अभ्यासू मित्रमैत्रिणी जमवणे, कौटुंबिक, सामाजिक योगदान देणे, सकारात्मक भरीव कार्य करणे, सुदृढ मानसिकता आणि निरोगी आरोग्य जोपासणे यावर लक्ष केंद्रित करा. कोणत्याही तात्कालिक मोहाच्या तात्पुरत्या सुखाच्या मागे न लागता स्वतःचा चिरंतन विकास कसा साधता येईल यासाठी प्रयत्न करा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -