घरफिचर्स‘जोडणे सोपे...तोडणे अवघड’

‘जोडणे सोपे…तोडणे अवघड’

Subscribe

तथागत बुद्ध एकदा एका आरेच्या वनातून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाकडे निघाले होते. त्यावेळी आरेच्या जंगलात दबा धरून बसलेला अंगुलीमाल अचानक समोर आला….आणि म्हणाला. हे माणसा माझ्या भीतीने या मार्गावरून येण्याजाण्याची मोठमोठ्या योद्ध्यांचीही हिंमत होत नाही, त्या मार्गावरून तू कसा इतक्या निवांतपणे येऊ येऊ शकतोस…तुला मरणाची किंवा माझी भीती वाटत नाही का..? बुद्धाने आरेच्या वनातल्या त्या अंगुलीमालाकडे स्मित केले आणि उद्गारले…हे अंगुलीमाला…तुला घाबरण्यासारखे काय आहे? तू तर मला माझ्यासारखा माणूसच दिसतोस, एका माणसाने दुसर्‍या माणसाला घाबरण्याचे काहीही कारण नसते?

अंगुलीमाल- पण मी दरोडेखोर, हिंस्त्र अंगुलीमाल आहे. नगरातले लोक मला पशू म्हणतात…तुला माझी भीती वाटत नाही का ?…त्यावर तथागत उद्गारले नाही रे…उलट तुला पाहिल्यावर माझे मन तुझ्याविषयी आणखीनच करुणेने भरले आहे. मला तुझी भीती नाही तर तुझ्याविषयी खंत वाटते की तू एक माणूस असूनही तुझ्यासारखी इतर माणसे तुला का भ्यावीत? त्यावर अंगुलीमाल म्हणाला…माझी दहशत हीच माझी हत्यारे आहेत? मी लोकांना मारतो त्यामुळे ते मला घाबरतात आणि मला लूट मिळते. त्यावर तथागताने, हे अंगुलीमाल जर तू एवढा भीतीदायक असशील आणि माणसांची बोटे तोडणे हेच जर तुझे काम असेल तर समोरच्या एका झाडाची तीन पाने तोडणे तुझ्यासाठी कठीण नसावे..तेवढे काम करून दाखवशील. यावर त्यात काय एवढे ? असे म्हणत, अंगुलीमालाने झाडाची तीन पाने सहज तोडून तथागताला दाखवली…त्यावर तथागताने अंगुलीमाला आता ही पाने उचलून पुन्हा ज्या ठिकाणीवरून तोडलीस त्याच ठिकाणी पुन्हा जोडून दाखव बरं? असं म्हटलं…. त्यावर अंगुलीमालाने उत्तर दिलं…तथागता मला माहित होतं…तुम्ही मला असंच सांगणार…त्यानंतर तुम्ही मला निसर्गसत्य आणि मानवी हिताविषयी धम्मोपदेश देणार आणि माझ्यातल्या दरोडेखोरापेक्षा माझ्यातला करुणामय मानव किती महत्वाचा आहे? हे तुम्ही मला पटवून देणार आणि मी पुन्हा प्रज्ञावान माणूस होणार…पण मला मुळी प्रज्ञा आणि सत्य सांगूच नका…कारण आज ‘तोडणे सोपे जोडणे अवघड’ या थिअरीपेक्षा ‘जोडणे सोपे तोडणे अवघड’ अशा उलट्या थिअरीला राजमान्यता मिळालेली आहे.

- Advertisement -

माझं वागणं किंबहुना दरोडेखोर असणं हे या उलट्या थिअरीलाच साजेसं आहे. कसं ते तुम्हाला आता मीच सांगतो…मेट्रो ट्रेनमुळे या आरेच्या वनातून अनेक माणसे आणि त्यांची स्टेशन्सची नगरे एकाच वेळेस जोडली जाणार आहेत. या जोडणीमुळे काही ही तीन पानेच काय, इथली काही झाडे जरी तोडली तरीही ते आजच्या काळासाठी आवश्यक आहे. हे तथागता तुम्हीच आता ध्यानात घ्यावे….झाडे तोडल्याने येथील काही वन्यप्राण्यांचा नाश होईल, हे जरी खरे असले तरी बुद्धीच्या बळावर सर्वश्रेष्ठ ठरलेल्या माणसालाच संपूर्ण पृथ्वीवर जीवंत राहाण्याच हक्क आहे. हा हक्क आपल्यासारख्या संबुद्धाने नाकारणे योग्य होईल का? आणि येथील वन्यप्राणी उद्या या ठिकाणी वसलेल्या मानवी वस्तीत घुसले तरी त्यांना नरभक्षक म्हणून मारताही येईल…त्यामुळे…हळूहळू या नगरातील एकेक झाड बुंध्यापासून कापल्यावर या ठिकाणी रखरखीत वाळवंट तयार करता येईल…मुंबईची दुबई करण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल असेल. तथागता, तुम्हाला मुळी विकास दिसतच नाही. दुबईसारखी उंच उंच इमारती आणि तिथल्यासारखा उष्मा मुंबईत हवा असेल तर इथली झाडं नकोत का तोडायला? इथल्या वातावरणाचं टेम्प्रेचर वाढल्यावरच घराघरात एसी लावणं सोपं होईल. मग आपणही दुबईसारखी आपल्या मुंबईची ‘शेखी’ मिरवू शकू….अंगुलीमालाचा युक्तीवाद तथागताने शांतपणे ऐकल्यावर ते उद्गारले… नाही अंगुलीमाला मी तुला वृक्षाची पाने तोडण्यास आता सांगणार नाही…कारण ‘जोडण्यापेक्षा तोडणे’ किती महत्वाचे आहे. याचे जे विस्तृत विवेचन तू केले आहेस. त्यामुळे मला आता कुठलाही धम्मोपदेश करण्याची आवश्यकता वाटत नाही. धम्मोपदेश आणि सत्य त्याला सांगितलं जातं जो असत्याच्या अंधार वनात खरोखरंच हरवलेला असतो, अंधारात हरवल्याचं सोंग घेणार्‍याला सत्य समजणं आणखीनच कठीण होऊन जातं.

तू अंगुलीमाल पूर्णपणे हिंस्त्र दरोडेखोर होतास.. त्यावेळी निदान तू त्या दरोडेखोराच्या भूमिकेशी प्रामाणिक होतास, त्यावेळी तू दरोडेखोरीचं झोपेचे सोंग घेतलेले नव्हतेस. त्यामुळे तुला जागे करून सत्याचा प्रकाश दाखवणे सोपे होते. मात्र आता तू त्याहून अवनत अवस्थेला पोहचलेला आहेस. तू तुझ्या जोडणे आणि तोडण्याच्या व्याख्याच तुझ्या सोईनुसार बदलून घेतलेल्या आहेस. त्यामुळे मी सांगितलेले सत्य तुला आज जागे करणार नाही…मात्र काळ सातत्याने सरतोय…तो कुणासाठीही थांबणार नाही. एक दिवस येईल, ज्या दिवशी तू तुझ्या सत्याच्या सोईनुसार बदललेल्या व्याख्येविषयी पश्चाताप करशील…कारण तुझं असत्य हे तुझ्या पुढच्या पिढ्यांसाठी सत्य बनवलं गेलेलं असेल आणि हे ठार असत्य होतं हे सांगायला त्यावेळी तू नसशील…झाड लावल्यावर ते शीतल छाया आणि गोड फळे देतं हे जसे सत्य आहे तसे ते कापल्यावर त्यातील कटू फळांपासून कुणाचीच सुटका होणार नाही. हे तुझ्या पुढच्या पिढीला जेव्हा समजेल त्यावेळी तू तुझ्या बदलेल्या सत्य-असत्याच्या थिअरीबाबत पश्चाताप करत असशील, असे बोलून तथागत पुढे निघून गेले…अंगुलीमाल मात्र तथागतांच्या मातीत उमटलेल्या पावलांकडे एकटक पाहात राहिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -