घरफिचर्सशास्त्रज्ञ शंकर आबाजी भिसे

शास्त्रज्ञ शंकर आबाजी भिसे

Subscribe

डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा आज स्मृतिदिन. डॉ. भिसे हे भारतीय अनुप्रयुक्त संशोधक. त्यांचा जन्म २९ एप्रिल १८६७ रोजी मुंबई येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण कल्याण, जळगाव, धुळे व पुणे येथे मॅट्रिकपर्यंतच झाले. लहानपणापासून त्यांचा कल शास्त्रीय विषयांकडे होता. १८८८-९७ या काळात त्यांनी महालेखापालांच्या कार्यालयात नोकरी केली. नोकरीत असतानाही ते शास्त्रीय ज्ञानावर आधारित चमत्कृतिजनक व मनोरंजक उपक्रम करीत.

१८९३ मध्ये शास्त्रीय ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी द सायंटिफिक क्लब ही संस्था त्यांनी स्थापन केली व संस्थेतर्फे त्यांनी १८९४ मध्ये विविध कलासंग्रह हे मासिक सुरू केले. तसेच १८९०-९७ या काळात ते आग्रा लेदर वर्क्स या कारखान्याच्या संचालक मंडळावर होते. १८९९ मध्ये ते इंग्लंडला गेले. तेथील वास्तव्यात दादाभाई नवरोजी यांनी यांना सहाय्य केले. भिसे यांनी तेथे जाहिराती दाखविणारे यंत्र, स्वयंचलित मालवाहक, स्वयंचलित वजन वितरण व नोंदणी करणारे यंत्र इ. यंत्रांविषयी संशोधन केले.

- Advertisement -

लंडन येथील सोसायटी ऑफ सायन्स, लेटर्स अँड आर्ट्स या संस्थेने १८९७ मध्ये जाहीर केलेल्या ‘स्वयंमापक यंत्र निर्मिती’ स्पर्धेत त्यांनी भाग घेतला व तीत यशस्वी होऊन बक्षीस मिळविले. यानंतर १९०० मध्ये भिसे यांचे लक्ष मुद्रण व्यवसायातील यंत्रसामुग्रीकडे लागले व त्या काळी प्रचलित असलेल्या लायनो, मोनो इ. यंत्रांच्या रचना व कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून त्यांनी ‘भिसोटाइप’ या यंत्राचा शोध लावला व त्याचे प्रथम इंग्लंडमध्ये व पुढे अमेरिका, जर्मनी, फ्रान्स इ. देशांत एकस्व (पेटंट) घेतले.

या यंत्राच्या उत्पादनासाठी सर रतनजी टाटा यांचे सहकार्य मिळवून द टाटा-भिसे इन्व्हेन्शन सिंडिकेट ही कंपनी लंडन येथे १९१० मध्ये स्थापन केली पण १९१५ मध्ये ती बंद पडली. त्याच सुमारास दर मिनिटास सु. १,२०० विविध प्रकारचे छपाईचे खिळे पाडणारे ‘गुणित मातृका’ हे यंत्र आणि १९१४ मध्ये खिळे पाडणारे आणखी एक असेच नवे यंत्र शोधून काढले व १९१६ मध्ये ते विक्रीस आणले. १९१६ साली ते अमेरिकेस गेले. यंत्राच्या उत्पादनासाठी भिसे यांनी आयडियल टाईप कास्टर कॉर्पोरेशन ही कंपनी स्थापन करून १९२१ मध्ये पहिले यंत्र विक्रीस आणले.

- Advertisement -

१९१७ मध्ये त्यांनी कपडे धुण्यासाठी वापरता येईल असे एक संयुग तयार केले, त्यास ‘शेला’ हे नाव देऊन त्याच्या निर्मितीचे हक्क एका इंग्लिश कंपनीला विकले. १९१० मध्ये ते आजारी असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या औषधी उपचारातील एक भारतीय औषध फार गुणकारी ठरले. त्याचे रासायनिक पृथ्थकरण त्यांनी करवून त्याचा गुणकारीपणा आयोडिनामुळे आहे हे त्यांनी जाणले व १९१४ मध्ये स्वतःच एक नवीन औषध बनवून त्यास ‘बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरले व पहिल्या महायुद्धात त्याचा अमेरिकन लष्कराने मोठ्या प्रमाणावर वापर केला.
अशा या महान शास्त्रज्ञाचे ७ एप्रिल १९३५ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -