घरफिचर्सआधी घटस्फोट, मग लग्न !

आधी घटस्फोट, मग लग्न !

Subscribe

जयवंत राणे

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नुकतीच मातोश्रीवर स्वत: जाऊन भेट घेतली. पण या भेटीतून दोघांनाही काही फायदा झाल्याचे दिसत नाही. दोन्ही पक्षांच्या निवडणूक धोरणाचा विचार केला तर असे दिसून येईल की, निवडणुकीआधी घटस्फोट आणि निवडणूक झाल्यानंतर लग्न करून पुन्हा सत्तेच्या सिंहासनावर ही मंडळी बिलगून बसतात. 2014 सालची विधानसभा निवडणूक, त्यानंतर झालेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक यात तेच दिसले. इतकेच नव्हे तर पुढेही तेच दिसेल.

- Advertisement -

सर्वसाधारणपणे आपल्याला असे दिसून येते की, नवरा नवरी अगोदर लग्न करतात, पण पुढे त्यांचे अगदीच जमेनासे झाले की, घटस्फोट घेतात. पण महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेना यांची तèहा काही वेगळीच आहे. ते निवडणुकीअगोदर घटस्फोट घेतात आणि नंतर लग्न करतात. लग्न करून सत्तेत येतात. ते पाहून घटस्फोट आणि लग्नाचे साक्षीदार असणाèया वèहाडी जनतेला बोटेच नव्हे तर अक्षतांसह अख्खा हात तोंडात घालण्याची पाळी येते. विशेषत: 2014 नंतरच्या सर्व पातळ्यांवरील निवडणुकांचा आढावा घेतला तर आपल्याला असेच दिसून येईल. निवडणुकीआधी भाजप आणि शिवसेना एकमेकांविरोधात भांडभांड भांडतात. एकामेकांची इतकी उन्हीधुनी काढतात की, ऐकणाèयाला आश्चर्याचा एकच नव्हे तर अनेक धक्के बसतात. कारण हेच पक्ष काही वर्षांपूर्वी हिंदुत्त्ववादी पक्ष म्हणून एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आपल्या अभेद्य मैत्रीची जाहीर ग्वाही देत होते.

नुकत्यात विविध राज्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभेसाठी काही ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या. त्यात बèयाच ठिकाणी भाजपला अपयश आले. लोकसभेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे. पोटनिवडणुकीतील भाजपची घसरण पाहिल्यावर देशातील विरोधी पक्षांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. मोदींचा पाडाव करण्यासाठी ते एकत्र येण्याचे एकमेकांना आवाहन करत आहेत. सध्या इंधनाचे दर वाढलेले आहेत. महागाई वाढली. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि आत्महत्यांचा विषय पेटलेला आहे. अशा स्थिती पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आणि त्या पाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसू शकतो. याची जाणीव भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांना होऊ लागली आहे. २०१४ साली मोदींची जादू लोकसभा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत चालली, पण ती पुढे चालेल का, याविषयी भाजपच्या नेत्यांना शंका वाटू लागली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत तर भाजपचे बहुतांश उमेदवार मोदी लाटेतूनच जिंकून आलेले होते. याची त्या उमेदवारांनाही कल्पना आहे. नितीन गडकरी यांच्यासारखा दिग्गज मानला जाणारा नेता याच लाटेतून निवडून आलेला आहे. कारण त्यांना कधी विधानसभेवरही निवडून येता आले नव्हते.

- Advertisement -

मोदी लाट पुन्हा महाराष्ट्रात चालेल का, याविषयी शंका वाटू लागल्यामुळेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी महाराष्ट्रात भाजपची शतप्रतिशतची भाषा सोडून फिप्टी-फिप्टीवर येण्याची भाषा चालवली आहे. त्याच्यासाठीच त्यांनी नुकतीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर स्वत: जाऊन भेट घेतली. दीर्घ चर्चा केली. पण या चर्चेतून दोघांनाही काही साध्य झाल्याचे दिसत नाही. कारण दोन्ही नेत्यांची बैठक झाल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवसेेनेचा स्वबळाचा सूर आळवला.

२०१४ साली नरेंद्र मोदी राष्ट्रीय पातळीवर आले. त्यांना लोकसभेच्या निवडणुकीत भरघोस यश मिळाले. भाजपची बहुमताची सत्ता पहिल्यांदाच केंद्रात आली. त्यानंतर मात्र भाजपचा आत्मविश्वास वाढला. खरे तर बहुमत असल्यामुळे केंद्रीय पातळीवर त्यांना मित्रपक्षांची गरजही उरली नव्हती. तरीही त्यांनी त्यांना सरकारमध्ये काही प्रमाणात समाविष्ट करून घेतले. महाराष्ट्रात जेव्हा २०१४ साली विधानसभा निवडणूक होणार होती तेव्हा मोदींच्या करिष्म्यामुळे भाजपच्या वाढलेला प्रभाव त्या पक्षाच्या नेत्यांच्या लक्षात आलेला होता. त्यामुळे राज्यात कायम दुय्यम स्थान स्वीकारून राहण्यापेक्षा सध्याच्या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन आपला मुख्यमंत्री झालाच पाहिजे असा निर्धार भाजपने केला. त्यातून मग भाजप आणि शिवसेनेची जागावाटप आणि मुख्यमंत्रीपदावरून चर्चा फिसकटली. कारण शिवसेनेला राज्यात मोठा भाऊ बनून राहायचे होते. मुख्यमंत्रीपद त्यांना आपल्याकडे हवे होेते. भाजपला ही परिस्थिती बदलायची होती. त्यांना जास्त जागा हव्या होत्या. मोदी लाटेमुळे आपल्या जास्त जागा निवडून येणार याची भाजपला खात्री होती. ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री या सूत्रानुसार आपला मुख्यमंत्री होणार हे भाजपला माहीत होते. शिवसेनेला हेच नको होते. त्यातूनच भाजप शिवसेनेची निवडणुकीपूर्वी युती तुटली. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. शिवसेनेने भाजपवर टोकाची टीका केली. त्यातून मोदी आणि शहा हेदेखील सुटले नाहीत. पण निवडणूक झाल्यावर शिवसेनेला अपेक्षेप्रमाणे बहुमत मिळाले नाही. त्यामुळे शिवसेनेला गप्प बसावे लागले. भाजपला जास्त जागा जिंकता आल्या, पण बहुमताला काही जागा कमी पडत होत्या. त्यामुळे त्यांची पंचाईत झाली. शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. पण पवार हे काही भाजपचे नैसर्गिक मित्र नाहीत. त्यामुळे त्यांचा पाठिंबा हा काही फार काळ टिकणारा नाही, याची भाजपलाही कल्पना होती. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या नाकदुèया काढून कसेबसे त्यांचे मन वळते केले. शिवसेनेलाही सत्तेची गरज होतीच. कारण बाहेर बसून काहीच साध्य होणार नव्हते. उलट, आपल्याकडील काही मंडळी भाजपमध्ये सामील होतील की काय, अशी शक्यता होती. त्यामुळे शिवेसना सत्तेत सहभागी झाली. पुढे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजप-शिवसेनेने एकमेकांची जाहीरपणे धुलाई केली. पण निवडणूक झाल्यानंतर मात्र भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिला. पुढील काळातील निवडणुकांमध्ये असेच होईल यात शंकाच नाही. हे दोन्ही पक्ष आपल्या भांडणातून राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लोकांच्या नजरेतून बेदखल करण्यात यशस्वी ठरतात. निवडणुका झाल्या की, पुन्हा एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात. तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना, अशी भाजप आणि शिवसेनेची तऱ्हा आहे, असे नितीन गडकरी यांनी नुकतेच सांगितले होते. त्यातूनच या दोन्ही पक्षाचे आगामी धोरण काय असेल, हे स्पष्ट होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -