घरफिचर्सनव्या जमीनदारांचे घोडे अडले कुठे?

नव्या जमीनदारांचे घोडे अडले कुठे?

Subscribe

काँग्रेसची अवस्था ही जुन्या हवेलीतील जमीनदारासारखी झालेली आहे, पण हे वास्तव मान्य करायला काँग्रेस तयार नाही, असे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतेच व्यक्त केले. पवार आणि जमीन याविषयी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत बरेचदा आरोप आणि चर्चा होत आलेली आहे. काँग्रेस हे जसे जुने जमीनदार आहेत, तसेच शरद पवार हे महाराष्ट्रातून उदयाला आलेले नवे जमीनदार आहेत. कारण त्यांच्याकडे कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही, असे असताना या नव्या जमीनदारांचे पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्याचे घोडे कुठे अडले, हे जाणून घ्यायला हवे.

काँग्रेसची अवस्था सध्या जुन्या हवेलीतील जमीनदारासारखी झालेली आहे, आता त्यांची पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही, अशी शेरेबाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील मातब्बर नेते शरद पवार यांनी नुकतीच केली आहे. जमीन आणि शरद पवार यांचे घनिष्ट नाते राहिलेले आहे. त्यांच्या मागील ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्यावर जमीन या प्रकारावरून बरेच उलटसुलट आरोप करण्यात आले. पण ते आरोप कधी सिद्ध झाले नाहीत, त्यामुळे पवारांची कारकीर्द अखंड सुरू राहिली. १९९३-९५ या कालावधीत मुंबई महापालिकेतील तत्कालीन उपायुक्त आणि मुंबईतील अनधिकृत बांधकाम करणार्‍यांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे गो.रा.खैरनार यांनी तर त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांच्यावर भूखंड घोटाळ्याच्या आरोपांची तुफान गोळाबारी केली होती. त्याचे माझ्याकडे ट्रकभर पुरावे आहेत, असे खैरनार म्हणत असत. त्यावेळी खैरनार हे त्यांच्या स्वच्छ चारित्र्याबद्दल लोकप्रिय होते.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे केवळ नाव ऐकूण अनेकांची गाळण उडत होती, त्यावेळी खैरनार त्याची अनधिकृत बांधकामे बिनधास्तपणे पाडत होते. त्यामुळे खैरनार हे लोकांचे हिरो झालेले होते. हातात हातोडा घेतलेली त्यांची छबी अनेक वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर सतत झळकत असे. भ्रष्टाचारावर हातोडा घालणारा निर्भीड माणूस म्हणजे खैरनार अशी त्यांची प्रतिमा झालेली होती. अशी व्यक्ती राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करत असेल तर त्याची दाखल घ्यायलाच हवी, अशी लोकांचीही भावना झाली.

- Advertisement -

खैरनार यांनी भूखंडाच्या श्रीखंडाचे केलेेले आरोप पवारांना महागात पडले. त्याचा फायदा विरोधी पक्षात असलेल्या शिवसेना-भाजपने घेतला. त्यात पुन्हा एन्रॉन वीज प्रकल्प हा कसा कोकणाचा विनाश करणारा आहे, या मुद्याची साथ होतीच. या सगळ्याचा परिणाम असा झाला की, १९९५ साली महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवारांना सत्ता गमवावी लागली आणि शिवसेना-भाजप युती प्रथमच महाराष्ट्रात सत्तेवर आहे. पवारांच्या निरंकुश राजकीय कारकिर्दीला बसलेला तो पहिला प्रचंड धक्का होता. पवारांना जमीन घोटाळ्याच्या आरोपांवर सत्तेतून पायउतार व्हावे लागले होेते. खैरनार यांना पवारांविरोधात ट्रकभर तर सोडाच, पण नखभरही पुरावे देता आले नाहीत. पवार त्यात निर्दोष सिद्ध झाले.

खरे तर १९९३ साली महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे पुन्हा हाती घेण्याअगोदर पवार १९९१ साली खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यावेळी ते देशाचे संरक्षण मंत्री होते. राजीव गांधी यांनी शहाबानो प्रकरणात तलाक दिलेल्या मुस्लीम महिलांना नवर्‍याकडून पोटगी मिळण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय संसदेत रद्द केला. त्यानंतर हिंदूंना खूश करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचे दरवाजे राजीव गांधींनी उघडले. पुढे या राम मंदिराचा विषय घेऊन भाजपचे ज्येष्ठे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देशभर रथयात्रा काढली. ‘मंदिर वही बनायेंगे’चा नारा देशभर घुमवला. यातून मग १९९२ साली अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली. १९९३ साली देशभर हिंदू-मुस्लीम दंगली उसळल्या. त्याचा जास्त जोर मुंबईत होता. मुंबईतील परिस्थिती बिघडली होती, तेव्हा संरक्षणमंत्री असलेल्या शरद पवार यांना त्यावेळचे पंतप्रधान नरसिंह राव यांनी विनंती करून महाराष्ट्रातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाठवले. नरसिंह राव यांनी पवारांना महाराष्ट्रात पाठवण्यामागे दंगल नियंत्रण हे एक कारण होते, पण दुसरेही एक कारण त्यावेळी चर्चेत होते. पवारांना पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा आहे, त्यामुळे ते जर केंद्रीय मंत्रिमंडळात राहिले तर आपल्याला त्रासदायक ठरू शकतील, त्यामुळे नरसिंह रावांनी पवारांना राज्यात पाठवून आपल्या पदाचा संभाव्य धोका दूर केला होता.

- Advertisement -

पवार जरी पूर्वीपासून काँग्रेसमध्ये असले तरी त्यांनी अनेकदा पक्षांतर्गत आणि पक्षासोबत बंडखोरी केलेली आहे. त्यांनी वेगळे पक्ष स्थापन केलेले आहेत. आपल्याकडे जेव्हा सत्ता असते तेव्हाच आपला प्रभाव असतो, आपल्याला लोकांची कामे करता येतात, कार्यकर्ते आपल्यासोबत राहतात, असे पवांरांचे मत असल्यामुळे सत्ता मिळवताना त्यांनी कधी डावे उजवे पाहिले नाही. महाराष्ट्रात तर एकादा त्यांनी जनसंघाच्या आमदारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे सत्तेसाठी ‘काही पण’ असाच पवारांचा आजवरच्या राजकारणाचा रोख राहिलेला आहे.

महाराष्ट्रातील १९९९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपच्या भांडणाचा फायदा घेत पवारांनी काँग्रेसला सोबत घेऊन राज्यातील सत्ता मिळवली. २०१९ साली त्यांनी पुन्हा शिवेसना आणि भाजपच्या भांडणाचा फायदा घेत तीन पक्षांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापना केले. हे खरे तर राजकीय विश्लेषकांच्या कल्पनेच्या पलीकडचे होते, पण त्यालाच तर पवारनीती असे म्हटले जाते. पवारांचा पवित्रा हा नेहमीच कल्पनेच्या पलीकडचा राहिलेला आहे. पवार काय करतील हे सांगता येत नाही. पवारांचा पन्नासावा वाढदिवस होता. तेव्हा त्यांच्यावर विशेषांक काढण्यात आला होता. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी वीस वर्षांची असलेली पवारांची कन्या सुप्रियाताई यांची मुलाखत घेतली होती. त्यांनी तिला एक प्रश्न विचारला होता, तुझ्या वडिलांबद्दल तुला काय वाटते? त्यावर त्या म्हणाल्या, माय डॅड इज मोस्ट अनप्रेडिक्टेबल. म्हणजे माझे बाबा नेमकी कुठली भूमिका घेतील हे काही सांगता येत नाही. त्यांचा अंदाज बांधता येत नाही. सात आठ वर्षांपूर्वी पवार पतीपत्नींची प्रकट मुलाखत सुधीर गाडगीळ यांनी पुण्यात घेतली होती. त्यावेळी त्यांनी पवारांची पत्नी प्रतिभा पवार यांना प्रश्न विचारला की, पवारांच्या चेहर्‍याकडे पाहून तुम्हाला त्यांच्या मनात काय चालले आहे ते कळते का, त्यावर त्यांनी नकारार्थी मान हलवली. एकूणच काय तर पवारांचा स्वभाव हा अनिश्चित स्वरुपाचा राहिलेला आहे. म्हणजे ते काय करतील, याचा त्यांच्यासोबत असलेल्यांना किंवा विरोधात असलेल्यांना अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे पवारांचा एक प्रकारचा धाक वाटत राहतो. पण हा धाक पवारांना राज्य पातळीवर फायद्याचा ठरून त्यांना महाराष्ट्राची सत्ता काबीज करता येते. पण ही त्यांची जी अनिश्चितता किंवा अविश्वासार्हता आहे, ती त्यांना राष्ट्रीय राजकारणात मारक ठरलेली आहे. त्यामुळेच त्यांना पंतप्रधानपदापर्यंत पोहोचण्यात अडथळे येत राहिले.

केंद्रात काँग्रेसमध्ये नेहमीच गांधी घराण्याची मक्तेदारी राहिलेली आहे. त्यामुळे पंतप्रधान हा गांधी घराण्यातीलच होतो. पण काही आकस्मिक वेळी मात्र सूत्रे आपल्या हाती ठेवून गांधी घराण्यातील मंडळींनी दुसर्‍यांना पंतप्रधानपदाची संधी दिली. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांना तशी संधी मिळाली होती. पण त्यासाठी त्यांनी गांधी घराण्याचा विश्वास संपादन केला होता. तसा विश्वास संपादन करण्यात शरद पवार कमी पडले, असे म्हणावे लागेल. कारण जेव्हा पवारांना पंतप्रधानपदाची संधी देण्याची वेळ आली तेव्हा त्यांना काँग्रेस श्रेष्ठींकडून डावलण्यात आले, कारण गांधी घराण्याला पवार आपल्या विश्वासातले वाटत नव्हते. काँग्रेसच्या माध्यमातून आपल्याला पंतप्रधान होण्यात अडथळे आणले गेले, याची टोचणी पवार यांना असल्यामुळेच त्यांच्या मनातील काँग्रेसविरोधी भावना उफाळून येत असते. आताही काँग्रेसची अवस्था जुन्या हवेलीतील जमीनदारासारखी झालेली आहे, ही टीका त्यातूनच आलेली आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जसा काँग्रेस पक्ष हा जुना जमीनदार आहे, तसेच पवार हे महाराष्ट्रातील नवे जमीनदार आहेत.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या साथीने मोठ्या ताकदीने महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार पुढे आले. त्यांच्या गेल्या ५० वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत ते कुठलीही राजकीय निवडणूक हरलेले नाहीत. पवारांचा प्रभाव नाही, असे महाराष्ट्रात एकही क्षेत्र नाही. कुस्ती संघटनेपासून, उद्योगपती ते साहित्यिकांच्या वर्तुळापर्यंत पवार सर्वत्र आहेत. महाराष्ट्राच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रावर पवारांची छाप आहे. त्याचसोबत मालमत्ता आणि सांपत्तिक बाबतीतही पवारांचा लक्षणीय प्रभाव आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पवारांची एक शान आहे, ते सत्तेत असोत किंवा नसोत, पवारांशिवाय महाराष्ट्रातील पान हलत नाही. भाजपला केंद्रात दोन वेळा बहुमत मिळवून देऊन पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी हेसुद्धा जाहीरपणे पवार हे आपले राजकीय गुरू आहेत, असे सांगतात.

राज्यात सध्या असलेले महाविकास आघाडीचे सरकार पवारांमुळेच अस्तित्वात आले आणि त्यांच्यामुळेच अस्तित्वात आहे. राज्याचे खरे मुख्यमंत्री हे पवारच आहेत, असेही बोलले जाते. पण पवारांच्या मनात देशाच्या पंतप्रधानपदी आरुढ होण्याची जी अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे, ती मात्र अजून अपूर्ण आहे, त्याची खंत पवारांना आहे. आजही तिसरी आघाडी स्थापन करून राष्ट्रीय पातळीवर सत्ता आली तरी पवारांनी पंतप्रधान होण्यात काँग्रेसचाच अडथळा असेल. काँग्रेसला टाळून तिसरी आघाडी बनवता येणार नाही. तर काँग्रेस आमचाच पंतप्रधान होईल यावर ठाम आहे. आज काँग्रेसचा प्रभाव कमी झालेला असला तरी तो पक्ष दुय्यम भूमिका घ्यायला तयार नाही. हिच खंत पवारांच्या मनात आहे, तीच त्यांनी बोलून दाखवली आहे. ते काँग्रेसला जुना जमीनदार म्हणत असले तरी नवे जमीनदार असलेले पवार काँग्रेसचा कधीच विश्वास संपादन करू शकते नाहीत, तिथेच त्यांचे पंतप्रधानपदाकडे जाणारे घोडे अडले.

Jaywant Rane
Jaywant Ranehttps://www.mymahanagar.com/author/rjaywant/
25 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. राजकीय, सामाजिक, वैचारिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -