घरफिचर्सशिवसेना-भाजप दुहीचा पवार पॅटर्न !

शिवसेना-भाजप दुहीचा पवार पॅटर्न !

Subscribe

महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये असलेली दरी दिवसेंदिवस अधिकाधिक रुंदावत कशी जाईल याचे पुरेपूर प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे केले जात आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे महाराष्ट्रात भाजप बहुमतात असूनदेखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची मोट बांधून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. शरद पवार यांच्या पुढाकारामुळे हा चमत्कार खरा तर महाराष्ट्रात घडला होता, त्यामुळे शरद पवार हे अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाला पाहिजे असा आग्रह धरू शकले असते, मात्र राजकीय दूरदृष्टी असलेल्या शरद पवारांनी संपूर्ण 5 वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला बहाल केले आहे. मुख्यमंत्रीपद हे सर्वोच्च पद कोणतीही राजकीय किंमत न मोजता शिवसेनेला देण्याइतके शरद पवार हे अपरिपक्व नक्कीच नाहीत. संसदीय कार्यपद्धतीचा कोणताही अनुभव नसलेल्या उद्धव ठाकरे यांनाच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा शरद पवारांचा आग्रह हादेखील शिवसेना आणि भाजपमध्ये अधिकाधिक दुही कशी माजवता येईल या रणनीतीचा एक भाग आहे.

शिवसेना नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांच्या सेनाभवनमधील पत्रकार परिषदेनंतर राज्यातील राजकारणाचे रंग झपाट्याने बदलू लागले आहेत. गेली पंचवीस वर्षं महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक निवडणूक शिवसेनेशी युती करून लढणार्‍या भाजपसमोर ठाकरे सरकार महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे प्रबळ आव्हान उभे ठाकले आहे. महाराष्ट्रातील सरकारमध्ये सहभागी होऊन काँग्रेसला सव्वा दोन वर्षं झाल्यानंतरदेखील महाराष्ट्रात पूर्वीप्रमाणे उभारी घेता आलेली नाही. राज्यातील सत्तेचा जेवढा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादीने गेल्या सव्वा दोन वर्षात करून घेतला आहे तेवढा तो अद्याप मुख्यमंत्रीपद असलेल्या शिवसेनेलाही करून घेता आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे तर दुसरीकडे या सत्तेतील आघाडीतील तिसरा पक्ष काँग्रेस हा अद्यापही राज्यातील सत्तेमधील स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे. राज्यातील सत्ताधारी तीन पक्षांमध्ये हे चित्र असताना दुसरीकडे राज्यात प्रबळ विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे सत्तास्थापनेचे मनसुबे हे लपून राहिलेले नाहीत. राज्यातील आघाडी सरकार दिवसेंदिवस कमजोर कसे होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार कसे स्थापन होईल याकडे भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाचे सतत लक्ष लागलेले आहे. मात्र हे होत असताना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लावून या सरकारबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये अधिकाधिक समज-गैरसमज तसेच आघाडी सरकारची प्रतिमा मलीन कशी होईल असाच प्रयत्न राज्यात ठाकरे सरकार अस्तित्वात आल्यापासून भाजप सातत्याने करत आहे. भाजपच्या या बदनामिया शास्त्रावर शिवसेना आणि राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक संजय राऊत आणि नवाब मलिक अशा दोन नेत्यांची अस्त्रे भाजपची जनमानसातील प्रतिमा डागाळण्यासाठी परजण्यास सुरुवात केली आहे. नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्या बेलगाम आरोपांमुळे एकीकडे भाजप घायाळ झाल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रात आणि देशातही सर्वसामान्य जनतेमध्ये केवळ शिवसेना,राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे नेते भ्रष्टाचार करत नसून भाजपने तेदेखील भ्रष्टाचारापासून दूर नाहीत असा संदेश पोचवण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी हळूहळू का होईना, परंतु यशस्वी ठरत आहे आणि हीच भाजपच्या दृष्टीने येणार्‍या निवडणुकांसाठी प्रमुख डोकेदुखी ठरण्याची शक्यता अधिक आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर आक्रमण करण्यासाठी संजय राऊत यांची अत्यंत नियोजन पद्धतीने निवड केली आहे. राज्यातील भाजप नेते जरी संजय राऊत यांच्या सेना भवनमधील पत्रकार परिषदेत उपस्थित नसलेल्या प्रमुख शिवसेना नेत्यांवरुन संजय राऊत यांना शिवसेनेचे पाठबळ नसल्याचा कांगावा करत असले तरीदेखील संजय राऊत जे बोलत आहेत त्याला शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा पूर्णतः पाठिंबा आहे. त्यामुळे संजय राऊत एकाकी पडले, संजय राऊत एकटेच लढत आहेत असं भाजपने त्याबरोबरच अन्य पक्षांमधील नेत्यांना जे वाटते ते मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहेत असंच म्हणावे लागेल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर संजय राऊत हे शिवसेनेला बुडवणार असं म्हटलं आहे. संजय राऊत शिवसेना बुडवण्यासाठी अथवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी काल परवा शिवसेनेत आलेले नेते नाहीत. ज्या वेळी महाराष्ट्रात आणि देशात प्रखर हिंदुत्वाची गरज होती त्या काळात म्हणजेच अयोध्यामध्ये बाबरी मशीद पाडली गेल्याच्या काळात सामनाच्या कार्यकारी संपादक पदाची जबाबदारी शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी संजय राऊत यांच्याकडे दिली. आक्रमक, तरुण तसेच ठाकरी शैलीत लेखन करणार्‍या एका सामान्य पत्रकाराकडे ‘सामना’सारख्या शिवसेनेच्या मुखपत्राची जबाबदारी त्याकाळी आली होती हे लक्षणीय आहे. गेली तीस एकतीस वर्षं संजय राऊत हे शिवसेनेच्या मुखपत्रातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अर्थात शिवसेनेची भूमिका बाजू सातत्याने लढवत आहेत. त्यामुळे संजय राऊत यांना दुय्यम समजण्याची चूक जी भाजपने 2019 मध्ये केली आणि महाराष्ट्रातील हातातोंडाशी आलेली सत्ता या चुकीमुळे गेली अशी चूक जर पुन्हा पुन्हा भाजपवाले करू लागले तर मात्र महाराष्ट्रामध्ये 2024 नंतर देखील शिवसेना ही राष्ट्रवादी बरोबर असेल हा धोका ओळखण्याची गरज खरी भाजपच्या नेतृत्वाला आहे.

- Advertisement -

2019 मध्ये महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये असलेली दरी दिवसेंदिवस अधिकाधिक रुंदावत कशी जाईल याचे पुरेपूर प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे केले जात आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेतल्यामुळे महाराष्ट्रात भाजप बहुमतात असूनदेखील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची मोट बांधून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. शरद पवार यांच्या पुढाकारामुळे हा चमत्कार खरा तर महाराष्ट्रात घडला होता, त्यामुळे शरद पवार हे अडीच वर्षानंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे असा आग्रह धरू शकले असते, मात्र राजकीय दूरदृष्टी असलेल्या शरद पवारांनी संपूर्ण 5 वर्षे मुख्यमंत्रीपद शिवसेनेला बहाल केले आहे. मुख्यमंत्रीपद हे राज्यातील सत्तेचे सर्वोच्च पद असते, त्यामुळे असे सर्वोच्च पद कोणतीही राजकीय किंमत न मोजता शिवसेनेला देण्याइतके शरद पवार हे अपरिपक्व नक्कीच नाहीत. शिवसेनेला आणि त्यातही संसदीय कार्यपद्धतीचा कोणताही अनुभव नसलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा शरद पवारांचा आग्रह हादेखील शिवसेना आणि भाजपमध्ये अधिकाधिक दुही कशी माजवता येईल या रणनीतीचा एक भाग आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असताना ज्या शिवसेनेशी लढण्यात शरद पवार आणि राष्ट्रवादी या दोन्हींची पूर्ण हयात गेली, मात्र तरीदेखील शिवसेनेचे इतके वर्चस्व महाराष्ट्रात राष्ट्रवादी प्रस्थापित करू शकली नाही. त्यामुळे शरद पवार यांना शिवसेनेशी लढून जे पूर्ण हयातीत मिळवता आले नाही अथवा साध्य करता आले नाही ते त्यांनी शिवसेनेला आणि विशेषत: उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करून साध्य करून घेतले असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती वाटू नये.

हे सर्व एवढे सविस्तरपणे सांगण्याचे प्रयोजन म्हणजे शिवसेना नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांची सेनाभवनमधील बहुचर्चित पत्रकार परिषद होय. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या ते मोहित कंबोज अशा सार्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत फैरी झाडल्या. भाजपच्या भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे केंद्रीय तपास यंत्रणा ससेमिरा मागे लागत असेल आणि त्यामुळे जनमानसामध्ये भाजप नेत्यांनी आरोप केले म्हणजे ते खरेच असल्याचा समज सामान्य जनतेपर्यंत जात असे. या भाजपच्या डावपेचांना सर्वात प्रथम मोडीत काढण्याचे काम राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते व आघाडी सरकारमधील एक मंत्री नवाब मलिक यांनी केले. नार्कोटिक्सचे प्रमुख अधिकारी समीर वानखेडे यांच्या प्रकरणात नवाब मलिक यांनी मोठ्या प्रमाणावर शोधसंशोधन करून माहिती गोळा केली. या प्रकरणांमधील तसेच पडद्यामागील सत्य सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचा पहिला धाडसी प्रयोग नवाब मलिक यांनी त्यावेळी केला. त्यावेळी नवाब मलिक यांनी रोज पत्रकार परिषदा घेऊन भाजप आणि नार्कोटिक्स विभाग तसेच समीर वानखेडे यांचे खरे स्वरूप लोकांसमोर उघडे पाडले. समीर वानखेडे तर अडचणीत आलेच मात्र त्याचबरोबर भाजपच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले. आणि त्यातही सर्वात महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील मुस्लीम समुदायाचा भाजपला अंगावर घेणारा प्रबळ नेता अशी प्रतिमा महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत निर्माण करण्यात नवाब मलिक हे कमालीचे यशस्वी ठरले.

- Advertisement -

ज्याप्रमाणे भाजपमधील काही नेते शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून ते पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहन आणि संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, शिवसेना नेते रवींद्र वायकर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर सातत्याने बेलगाम आणि बेछूट आरोप करत शिवसेनेची आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहेत, त्याच धर्तीवर आता शिवसेनेने देखील अंगावर आलेल्या भाजपला शिंगावर घेण्याची सिद्धता केली आहे. त्यामुळेच संजय राऊत यांची सेना भवनमधील पत्रकार परिषद आणि त्यानंतर त्यांनी राज्यातील भाजप नेत्यांवर सुरू केलेले भ्रष्टाचाराचे बेलगाम आणि बेछूट आरोप हा शिवसेनेच्या रणनीतीचा एक भाग आहे. त्यामध्ये संजय राऊत यांना एकाकी समजणे हा तर भाजपसह विरोधातील नेत्यांचा अपरिपक्वपणा आणि बालिशपणा म्हणावा लागेल. मुळातच संजय राऊत हे सुरुवातीपासून ‘सामना’च्या माध्यमातून एकाकीपणेच शिवसेनेची तोफ जोरदारपणे धडाडत ठेवत होते. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असोत की त्यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख व आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असोत यांच्या अत्यंत निष्ठावान प्रमुख नेत्यांपैकी सर्वात जवळचे म्हणून संजय राऊत ओळखले जातात. त्यामुळे सहाजिकच शिवसेनेत संजय राऊत यांच्या नावाविषयी पोटदुखी असणारे बरेच नेते आहेत. मात्र ज्या प्रकारे संजय राऊत हे शिवसेनेच्या अंगावर आलेल्यांना स्वतःच्या शिंगावर घेऊन परतवून लावतात तेवढे धाडस वा हिंमत अन्य शिवसेना नेत्यांमध्ये नाही, त्यामुळे केवळ राऊत यांच्याबाबत द्वेष मत्सर अथवा आकस किंवा कपट कारस्थाने करण्याव्यतिरिक्त या अन्य नेत्यांच्या हातात फारसे काही राहत नाही.

संजय राऊत यांचे शरद पवार प्रेम हे त्यांनी याआधीदेखील कधी लपवून ठेवले नव्हते आणि आता तर महाराष्ट्रात शरद पवार यांच्यामुळेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आहेत, त्यामुळे शिवसेना अथवा भाजपच्या नेत्यांना पटो न पटो, तरीदेखील संजय राऊत ही राज्यातील ठाकरे सरकारची प्रमुख गरज आहे. आता प्रश्न राहिला तो म्हणजे संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत आणि त्यामुळे भाजपची जनमानसातील प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत आहेत ते रोखण्याचे आव्हान राज्यातील भाजप नेत्यांसमोर आहे. आतापर्यंत राज्याचे भाजपा नेतृत्व शिवसेनेला आणि विशेषत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून ते ठाकरे कुटुंबाला अडचणीत आणण्यासाठी नारायण राणे, किरीट सोमय्या आशिष शेलार या नेत्यांचा प्रामुख्याने वापर करत होते. आता यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याबरोबरच भाजपला खिंडीत गाठण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यासारख्या बिनीच्या शिलेदाराला आक्रमणासाठी पुढे केले आहे. संजय राऊत हे सलग पंधरा ते सोळा वर्षे राज्यसभेचे खासदार आहेत, शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. ‘सामना’सारख्या शिवसेनेच्या धडधडत्या तोफेचे एकहाती शिलेदार आहेत, त्यामुळे त्यांच्या तोफेतून सुटलेला गोळा परतवून लावताना भाजपलादेखील कंबर कसून कामाला लागावे लागणार आहे. याचा अर्थ भाजपला संजय राऊत जेरीस आणतील असे समजण्याचे कारण नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेनेकडे भाजपला खिंडीत गाठू शकतील असे एकटेच संजय राऊत आहेत तर भाजपकडे मात्र असे अनेक नेते आहेत. त्यामुळे कोण कोणास पुरून उरतो हे येणारा काळच सांगू शकेल. पण शिवसेना आणि भाजपला झुंजवून शरद पवार आपला पॅटर्न यशस्वी करत आहेत, एवढे मात्र नक्की.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -