Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स जुनी हवेली, नवी नवेली...

जुनी हवेली, नवी नवेली…

Related Story

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या सद्य:स्थितीचे वर्णन करताना या पक्षाची स्थिती आता जुन्या हवेलीच्या जमीनदारासारखी झालेली आहे, असे म्हटले आहे. या जमीनदाराच्या मोठ्या जमिनी होत्या, त्या कुळ कायद्याने गेल्या, आता त्याच्या आठवणीच राहिल्या आहेत. आता जुनी झालेली हवेली दुरुस्ती करण्याचीही ऐपत राहिलेली नाही, असे पवार म्हणाले. या बोचर्‍या बोलांनंतर काँग्रेसमधून फार मोठी प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित नव्हते, कारण सध्या महाराष्ट्रात जे महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्यात काँग्रेस पक्ष सहभागी आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरील किंवा प्रादेशिक पातळीवरील नेत्यांच्या मनावर वर्मी घाव घालणारी ही टीका आहे. पण तरीही त्यांच्यापैकी कुणीही जास्त आक्रमक पवित्रा घेतला नाही. उलट, विरोधी पक्षातील भाजपच्या नेत्यांना मात्र हे आयते कोलीतच मिळाले आहे, त्यामुळे त्यावर त्यांनी अत्यानंदित होऊन पवार यांनी काँग्रेसचे तंतोतंत वर्णन केले आहे, असे म्हटले आहे.

पवारांच्या बोचर्‍या टीकेचा उपयोग भाजप पुढील काळात करेल त्यात शंकाच नाही. कारण राज्यातील महाविकास आघाडीचे सूत्रधार हे शरद पवार आहेत. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी हातमिळवणी केली, पण सरकार स्थापण्यासाठी काँग्रेसचा सहभाग आवश्यक होता. या आघाडीत शिवसेना असल्यामुळे काँग्रेस सहजासहजी यायला तयार नव्हती. कारण शिवसेनेला ते प्रांतीयवाद पक्ष मानत आलेले असल्यामुळे त्यांच्याशी आघाडी केल्यास त्याचा फटका त्यांना देशभरात बसू शकतो, अशी भीती काँग्रेसला होती. पण पवारांनीच काँग्रेसला विश्वासात घेऊन नरेंद्र मोदींचा आपण राष्ट्रीय पातळीवर सामना करू शकत नाही, पण प्रादेशिक पातळीवरून त्यांना शह देण्याची ही संधी आहे, त्यात तुमचाही फायदा आहे, असे पटवून दिले. त्यामुळेच काँग्रेसने पवारांनी आकारास आणलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी होणे मान्य केले. असे पवारच आज काँग्रेसची अब्रू वेशीवर टांगावी अशा प्रकारची टीका करत असतील, तर काय म्हणावे, असा प्रश्न काँग्रेसजनांना पडला असेल. त्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पवारांवर न रागावता त्यांना काँग्रेसच्या झेंड्याखाली येण्याचे आवाहन केले.

- Advertisement -

पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा उपस्थित करून पुढे तो काँग्रेसला अडचणीचा ठरू शकतो, असे मत व्यक्त केले होते. त्यावरून त्यांना काँग्रेस सोडावी लागली होती. पण पवारांनी काँग्रेस सोडण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. तसे पाहिले तर पवार हे मूळचे काँग्रेसचे. त्याचे आईवडील हे शेतकरी कामगार पक्षाचे, पण पवारांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रभावामुळे काँग्रेसची कास धरली. आपण काँग्रेसमध्ये गेलो हे घरातल्या मंडळींना पटलेले नव्हते, त्यामुळे ते आपल्याला पोरगं वाया गेलं, असे म्हणत असतं, असे पवारांनी आपला जीवनप्रवास उलघडताना आपल्या मुलाखतींमधून बरेचदा सांगितलेले आहे. त्यामुळे पवार हे मुळातच बंडखोर होते. ही बंडखोरी त्यांनी पुढील आयुष्यात वेळोवेळी दाखवून दिली. घरातून बंडखोरी करून ते काँग्रेसमध्ये आले आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेससोबतही बरेचदा बंडखोरी केली. वेगळे पक्ष स्थापन केले, पण ते पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाले. आपला मूळ पिंड हा काँग्रेसी आहे, असे पवार अनेकदा सांगत असतात. पुणे येथे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेण्याचा जाहीर कार्यक्रम काही वर्षांपूर्वी झाला. त्यात शेवटच्या रॅपिड प्रश्नांमध्ये राज ठाकरे यांनी पवारांना तुम्ही पहिली पसंती कुणाला द्याल, काँग्रेस की, भाजप? त्यावर पवार झटकन म्हणाले काँग्रेस. याचा अर्थ पवारांच्या मनातील पहिली पसंती ही काँग्रेसच आहे. असे असताना मग पवार काँग्रेसपासून दूर राहून काँग्रेसवर कशासाठी टीका करत आहेत, असा प्रश्न पडतो.

१९९९ सालच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजप यांच्यात कोंडी फुटेनाशी झाल्यानंतर पवारांनी सत्तेची संधी ओळखली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून निवडणुकीत काँग्रेसच्या विरोधात प्रचार केला होता. सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा लावून धरला होता. पण राज्यातील सत्तेची संधी ओळखून सोनिया गांधींसोबतचा राजकीय विरोध बाजूला ठेवून त्यांनी काँग्रेसशी आघाडी केली आणि पुढील पंधरा वर्षे राज्यातील सत्ता आपल्या ताब्यात ठेवली. ही सत्ता त्यांना काँग्रेसमुळेच मिळाली होती. आता महाविकास आघाडीतील सत्ता ही काँग्रेसमुळेच मिळालेली आहे, फक्त आता या सत्तेत शिवसेना हा आणखी एक सहकारी आहे. सोनिया गांधींच्या विदेशीपणाच्या मुद्यावरून पवारांना काँग्रेस सोडावी लागली होती. कारण सोनिया गांधी राजकारणात सक्रिय झाल्यामुळे पुढे आपल्याला पंतप्रधान होता येणार नाही, कारण काँग्रेसच्या प्रथेप्रमाणे गांधी घराण्यातीलच पंतप्रधान लागतो.

- Advertisement -

त्याचसोबत वाजपेयींचे सरकार एका मताने पडल्यावर पवार लोकसभेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते, त्यावेळी पवारांना बाजूला ठेवून सोनिया गांधी सत्ता स्थापण्यासाठी राष्ट्रपतींना भेटायला गेल्या. त्यावेळी काँग्रेसकडून आपल्याला डावलण्यात येत आहे, हे पवारांच्या लक्षात आले. त्यामुळेच त्यांनी काँग्रेसच्या एक बैठकीत सोनिया गांधी यांचा विदेशीपणाचा मुद्दा पुढे त्या पंतप्रधान होताना अडचणीचा ठरू शकतो, असे सांगून काँग्रेसमध्ये राहून आपला पंतप्रधानपदाचा मार्ग सुकर करण्याचा प्रयत्न केला, पण ते सोनियानिष्ठ मंडळींना आवडले नाही. पुढे पवार हे सोनियांना त्रासदायक ठरू शकतात, हे लक्षात आल्यावर पवार, आणि त्यांना साथ देणारे पी.ए.संगमा आणि तारिख अन्वर यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

शरद पवारांनी सत्तेसाठी काँग्रेसशी वेळोवेळी हातमिळवणी केली आहे, मग मूळचे काँग्रेसी असलेले पवार थेट काँग्रेसमध्ये का सहभागी होत नाहीत, असा प्रश्न अनेकदा उपस्थित करण्यात आला. कारण पवारांनी नंतर सोनियांच्या विदेशीपणाचा मुद्दाही सोडून दिला होता. पण तरीही पवार काँग्रेसपासून वेगळे राहिले. त्यांच्यावर टीका करत राहिले. मागे त्यांनी काँग्रेसला अध्यक्ष नसल्यावरून टीका केली होता. आता जुन्या हवेलीच्या जमीनदारासारखी काँग्रेसची अवस्था झालेली आहे, असे बोलून तर पवारांनी काँग्रेसची काही बाकी शिल्लक ठेवली नाही, पण पवार हे विसरतात की, याच हवेलीच्या आश्रयाने आपण सत्तेची फळे उपभोगली आहेत. पवारांना आता तिसर्‍या आघाडीच्या माध्यमातून पंतप्रधान व्हायचे आहे, तर दुसर्‍या बाजूला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचाच पंतप्रधान होणार असे काँग्रेसवाले कंठरवाने सांगत आहेत. त्यामुळेच पवारांनी काँग्रेसची पोलखोल केली आहे.

सध्या काँग्रेसला अध्यक्षही नाही, अशी अवस्था आहे, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेस नेत्यांची मदार ज्यांच्यावर आहे, त्या राहुल गांधी यांना अध्यक्षपद स्वीकारण्यात फार रुची नाही. कारण त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला वारंवार आलेल्या अपयशामुळे ते नाराज झालेले आहेत. पण काहीही झाले तरी काँग्रेस नेत्यांना राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचे आहे, कारण ती सोनिया गांधी यांची इच्छा आहे. पण सध्या मोदींमुळे भाजपचे अच्छे दिन सुरू आहेत, त्यामुळेच काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षात बसण्याइतक्याही जागा जिंकणे मुश्कील झाले आहे. पण नव्या दमाच्या प्रियांकांना पुढे आणल्यास काँग्रेस पक्ष पुन्हा उसळी घेऊ शकतो हे पवार विसरले आहेत.

- Advertisement -