घरफिचर्सभावनेपेक्षा कर्तव्यात श्रेष्ठ असलेली ‘ती’

भावनेपेक्षा कर्तव्यात श्रेष्ठ असलेली ‘ती’

Subscribe

जगभरात कहर करणार्‍या कोरोनाने जवळची माणसं दूर तर केलीच; पण ना नात्याची ना गोत्याची माणसंही कधी नव्हे ती जवळ आणली. ज्या आजाराच्या नुसत्या नावानेच जीवापाड प्रेम करण्याच्या बाता मारणारे लांब पळून जातात. त्या कोरोनाग्रस्त रुग्णाच्या आणि मृत्यूच्या मध्ये अभेद्य भिंत म्हणून जर कोणी उभे राहत असेल तर ते आहेत जगभरातील आरोग्य कर्मचारी. यात फ्रंट लाईनवर लढणारे डॉक्टर तर आहेच; पण त्यांच्याबरोबरीने खांद्याला खांदा लावून उभे राहणार्‍या नर्सेस आणि घराघरात जाऊन रुग्ण चाचणी करणार्‍या आरोग्य सेविकांचेही मोठे योगदान आहे. जीवाला धोका आहे हे माहीत असूनही आजही या कोरोना यु्द्धात त्या मोठ्या हिंमतीने रुग्णामध्ये कोरोनाशी लढण्याची जिद्द निर्माण करत आहेत. त्यांच्या या सकारात्मक विचारांमुळेच बरेच रुग्ण कोरोनामुक्त होत आहेत. पण कधी रुग्णाची हिंमत वाढवताना तर कधी त्याला मृत्यूच्या समीप जाताना बघून या कणखर मनाचीही घालमेल होतेच.

कोरोनाचा कहर प्रथम सुरू झाला तो चीनमधील वुहान शहरात डिसेंबर २०१९ च्या शेवटाला. पण सुरुवातीला चीनपुरताच मर्यादीत वाटणारा हा व्हायरस हळूहळू जगभरात पसरला. तोपर्यंत त्यांच्या दाहकतेची चीनव्यतिरिक्त कोणत्याही देशाला कल्पना नव्हती. पण स्पेन, इटलीनंतर इराणमधील कोरोना कहराने चीनलाही मागे टाकले आणि जगभरात आरोग्य कर्मचार्‍यांच्या अथक कामाबद्दल सविस्तरपणे लिहिलं गेलं. त्यानंतर कोरोनाशी सामना करणारे डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णांना हुडकून काढणारे इतर आरोग्य सेवक व रुग्णांच्या स्वच्छतेबरोबरच रुग्णालयाच्या स्वच्छतेची काळजी घेणारे सफाई कामगारही प्रकाशझोतात आले. पण यादरम्यान या सर्व आरोग्य कर्मचार्‍यांवर पडणारा अतिरिक्त कामाचा ताण, त्याचे शरीराबरोबरच मनावर होणारे परिणाम दाखवणारे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. यात इटलीतील Elena Pagliarini या नर्सेचा कॉम्प्युटरसमोर डोके टेकवून झोपलेला फोटो व्हायरल झाला. मार्च मध्ये इटलीत कोरोनाचा संसर्ग झाल्यापासून ती एकही दिवस घरी गेलेली नव्हती ना ती एक तासावर झोपली होती. कधीही न पाहिलेले मृत्यूचे तांडव ती व तिच्याबरोबरीचे सर्वच आरोग्य कर्मचारी रोज पाहात होते. एप्रिल महिन्यात सुरुवातीला दररोज १० नंतर २० नंतर थेट शेकड्याने वयस्क व्यक्ती कोरोनाची लागण झाल्याने मृत्युमुखी पडत होत्या. हे बघून एलिना रोज एकांतात रडायची.

घरापासून लांब असल्याने तिला घरच्यांचीही चिंता सतवायची; पण आपण जर घरी गेलो तर येथे एका नर्सेसची कमतरता होईल व इतरांवर अतिरिक्त कामाचा ताण पडेल या विचाराने ती दिवस-रात्र आयसीयूमध्ये रुग्णांची देखभाल करायची. यादरम्यान जवळजवळ इटलीत १५० आरोग्य कर्मचार्‍यांचा कोरोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला होता. यात एलिनाचे डॉक्टरमित्र व नर्सेस मैत्रिणीही होत्या. सतत कोरोना रुग्णांच्या संपर्कात असल्याने एलिनालाही कोरोनाची लागण झाली. ती २३ दिवस रजेवर गेली; पण त्याही वेळी ती सतत तिच्या वार्डातील रुग्णांची इतर नर्सेसकडे विचारणा करायची. बरे झाल्यानंतर ती पुन्हा एकदा पीपीई किट घालून आयसीयूत दाखल झाली. तिला बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. कारण ज्यांना लागण झाली होती त्यांनी बरे झाल्यानंतर पुन्हा काम करण्यास नकार दिला होता. कारण तोपर्यंत इटलीत दररोज हजार रुग्णांचा मृत्यू होत होता. दरम्यान, एलिनाची कामाप्रती असलेली ही समर्पित भावना बघून रुग्णालयाने तिचे स्वागत केले.

- Advertisement -

एलिनाप्रमाणेच अमेरिकेतील Mariya Buxton या नर्सला कोरोना रुग्णांची सेवा करायची होती. पण संसर्गाच्या भीतीने सामान्य नागरिकांनी नियमित तपासणीसाठीही रुग्णालयात येणे बंद केले. त्यामुळे रुग्णालयाचा महसूलच बंद झाला. परिणामी रुग्णच नसल्याने कर्मचार्‍यांना मानधन देता येणे शक्य नाही हे रुग्णालय प्रशासनाने मारियासह अनेक नर्सेसला सांगितले व कामावर येऊ नका अशा सूचना दिल्या. तेव्हापासून ती घरीच होती; पण अमेरिकेत कोरोनाचा कहर असताना केवळ मानधन मिळत नसल्याने घरी बसणे मारियाला योग्य वाटले नाही. यामुळे ती स्वत:हून काही रुग्णालयात रुग्णांची मोफत शुश्रुषा करत आहे. कोरोनामुळे होणारे मृत्यू बघून ती व्यथित झाली असून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणे हे जगातील सर्वाधिक कठीण काम असल्याचे तिचे म्हणणे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतही अनेक खासगी रुग्णालय रुग्णांकडून पैसे उकळत असताना मारिया मात्र तेथे रुग्णांची मोफत सेवा करत असल्याने तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आपल्याकडेही नर्सेसची अवस्था थोड्याफार फरकाने अशीच आहे. गेली दहा वर्षे मुंबईतील नामांकित रुग्णालयात नर्स असलेल्या संध्या कदम सध्या कोविड वार्डात दिवस-रात्र रुग्णसेवा करत आहेत. कोरोना व्हायरस आपल्याकडे येईल असा कधी त्यांनी विचारही केला नव्हता. मात्र या आजाराने त्याही हादरल्या. आपल्याकडे रुग्णसंख्या अधिक असली तरी इतर देशांच्या तुलनेत मृत्यूदर कमी आहे. यामुळे जरा दिलासा मिळत असला तरी कोरोनाने मृत्यू होताना पाहणे व नंतर संसर्गाच्या भीतीने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास दिलेला नकार बघणं हे फारच कष्टप्रद असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आजपर्यंत अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यांना घरी सुखरुप जाताना बघताना कधी कधी अनेकजण आमच्या पाया पडतात. यात काहीजण आमच्याच वयाचे असतात तर काहीजण आजी-आजोबांच्या वयाचे असतात. तेव्हा मन भरून येतं. आपण खरंच काहीतरी वेगळं काम करत असल्याचा अभिमान वाटतो. यातूनच अधिक काम करण्याची ऊर्जा मिळत असल्याचे संध्या यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे जळगाव येथील रुग्णालयात काम करणार्‍या अर्चना वारंग या नर्सने सांगितलेले अनुभव काळजाला भिडणारे आहेत. अर्चनाला ज्यावेळी कोविड वार्डात ड्यूटी मिळाली तेव्हा ती खूप घाबरलेली होती. कोरोना व्हायरससारख्या संसर्गजन्य आजाराचा सामना कसा करायचा. रुग्णांना कसं हाताळायचं याचं प्रशिक्षण त्यांना देण्यात आलं होतं. ड्यूटी असेपर्यंत रुग्णालयातच राहण्याची त्यांची सोय करण्यात आली होती. घरी वडील कर्करोगाने आजारी होते. यामुळे ती रोज व्हिडिओ कॉलवरून त्यांच्याशी बोलायची; पण जूनच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या वाढल्याने ती कामात बिझी होती. यामुळे तिला घरी फोन करण्यास वेळ मिळाला नाही. याचदरम्यान रात्री झोपेत वडिलांचे निधन झाले. जर फोन केला असता तर वडिलांबरोबर शेवटचं बोलता आलं असतं यांची खंत तिला सतावतेय. पण वडिलांचीच इच्छा होती तिला नर्स बनवण्याची आणि कोविड सारख्या महामारीत आपली मुलगी रुग्णांची सेवा करत असल्याचा सार्थ अभिमानही त्यांना वाटायचा यातच ती समाधान मानतेय. पण जेव्हा एखाद्या रुग्णाचा मृत्यू होतो तेव्हा मात्र घरचाच माणूस गेल्यासारखं दु:ख होतं. कारण त्यांची सेवा करताना त्यांच्यात व आपल्यात नकळत काळजीचे नाते तयार होते, असं अर्चनाने सांगितले. तसेच याकाळात बर्‍याचवेळा पगारही वेळेवर मिळत नाहीये. पण या संकटकाळात प्रत्येकाने एकमेकांना साथ द्यायला हवी, असा संदेशही अर्चनाने दिला आहे.

तर गेली अनेक वर्षे आरोग्य सेविका म्हणून काम करणार्‍या वेदिकाने सांगितले की सध्याचा काळ खरंच कठिण आहे. घरोघरी जाऊन रुग्णांची नोंद करण्याचं काम करताना आमच्यातील अनेक जणींना लागण झाली . पण त्या बर्‍याही झाल्या. तर काहीजण दगावले आहेत; पण असं असले तरी न घाबरता आवश्यक ती काळजी घेऊन आम्ही दारोदारी जातो. कोणाला ताप आहे का किंवा इतर आरोग्य तक्रारी आहेत का याची माहिती गोळा करतो. मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटायझरने स्वत:ला सुरक्षित ठेवतो. सुरुवातीला लोक नीट माहिती देण्यास घाबरायचे; पण आता सहकार्य करतात. त्याच माहितीवरून आरोग्य कर्मचारी रुग्णांपर्यंत पोहचतात. त्यामुळे आमचं कामही किती महत्त्वाचं आहे हे आम्हालाही कळायला लागलं आहे. तर आरोग्यसेविका असलेल्या सुनिताताईही मनापासून आपलं काम करत आहेत. सुरुवातीला लोक आम्हालाच विचारायचे की तुम्हीच अनेक ठिकाणी फिरतात. यामुळे तुम्हालाच संसर्गाचा जास्त धोका आहे. पण अशावेळी त्यांची समजूत काढून आम्हाला त्यांना कोरोनाची माहिती द्यावी लागते. पण हे काम समाजजागृतीचे आहे. यामुळे ते करताना संसर्गाची भीती वाटत नाही. कारण आम्ही स्वत:चीही काळजी घेतो. घरी आल्यावर घरची कामं असतातच. यामुळे कुटुंबाला त्रास होणार नाही याचीही काळजी घेणे गरजेचे असते, असेही सुनिताताईंनी म्हटले आहे.

थोडक्यात बोलायचं म्हटलं तर आज कोरोनाच्या फ्रंटवर सगळेच आरोग्य कर्मचारी जीवाची बाजी लावून लढत आहेत. यात उपजतच भावनाप्रधान स्वभाव असलेल्या महिलांचीही मोठी फौज आहे; पण भावनेपेक्षा कर्तव्याला श्रेष्ठ माननार्‍या या महिलांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -