घरफिचर्सविशेष संपादकीय: भाजपच नामी आणि विरोधक बेनामी कसे?

विशेष संपादकीय: भाजपच नामी आणि विरोधक बेनामी कसे?

Subscribe

सगळ्या महाराष्ट्राला नाही तर भारताला एक सवाल आता कायम सतावू लागलाय की या देशात फक्त भाजपच नामी आणि विरोधक बेनामी कसे? भाजपमध्ये असतील तर तेथील लोकप्रतिनिधी, नेते, मंत्री हे धुतल्या तांदळासारखे, मात्र सर्व विरोधक भ्रष्टाचारी असे चित्र ठरवून रंगवले जात आहे. २०१४ पासून या देशात हे चित्र रंगवायला सुरुवात झाली. खरेतर कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्ती असो तिने भ्रष्टाचार केला असेल तर त्याला कायद्याप्रमाणे त्याची चौकशी झाली पाहिजे, त्याला शिक्षाही व्हायला हवी. पण, या देशात भाजपच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांनाच केंद्रीय तपास यंत्रणांकडून लक्ष्य केले जात आहे. मग ती ईडी असो कि सीबीआय. काँग्रेसने त्यांच्या ६० वर्षांच्या काळात असे विरोधकांच्या मागे चौकशा, तुरूंगाच्या धाकाचे ठरवून शस्त्र उगारल्याचे ठळकपणे कधी दिसले नाही. भाजपच्या राजवटीत ते प्रकर्षाने दिसत आहे आणि म्हणूनच लोकांच्या मनात शंका आहे. हे सर्व ठरवून तर केले जात नाही ना… २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी विरोधकांना गलितगात्र करून टाकण्यात आले. भाजपमध्ये येता का जेलमध्ये जाता… असा एक अघोषित संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरला. आणि गंमत म्हणजे बऱ्याच विरोधी पक्षातील बड्या नेत्यांनी भाजपमध्ये उड्या मारून कमळ फुललेल्या स्वच्छ, नितळ, पवित्र तलावात स्वतःला पावन करून घेतले. ते साधू झाले. कसलाच मोह त्यांना उरला नाही. फक्त देशभक्ती हेच त्याच्यापुढचे लक्ष्य राहिले. भाजपची सेवा माणसे देशभक्त आणि विरोधक तसेच त्यांच्या विरोधात बोलणारा हा देशद्रोही ठरवला जाऊ लागला. मग तो फक्त राजकीय पक्षाचा माणूसच असला पाहिजे असे काही नव्हते. पत्रकार असो सामाजिक कार्यकर्ता असो हो भाजपविरोधी बोलला तो या देशात राहण्याच्या पात्रतेचा नाही, असे भाजप आयटी सेलच्या माध्यमातून ठरवण्यात आले आणि मग त्याचा परिणाम होऊन विरोधकांच्या मागे चौकशांचे शुक्लकाष्ठ लावून देण्यात आले. ही एकप्रकारची अघोषित हुकूमशाही आहे. या देशात लोकशाही आहे असे सांगायचे आणि कारभार मात्र हुकूमशहासारखा असेल तर जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या भारतात हे काय चाललंय, असं जर कोणाला वाटत असेल तर त्याची काय चूक?

हा विषय पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे तो शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधातील ईडी कारवाईमुळे. या कारवाईत प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापा टाकत चौकशी तर करण्यात आलीच, पण सरनाईक यांचे सुपुत्र पूर्वेश सरनाईक आणि विहंग सरनाईक यांच्या घरीही जात ईडीच्या पथकांनी चौकशी केली. शिवाय विहंग यांना चौकशीसाठी ईडीने आपल्या कार्यालयात नेले. टॉप सिक्युरिटिज प्रकरणाशी संबंधित छापा टाकत मनी लॉंड्रींगचा हा प्रकार आहे का याची तपासणी केली जात आहे. सरनाईक कुटुंब यात दोषी असेल तर कायद्यानुसार त्यांना काही शिक्षा होईलच, पण प्रश्न हा नाहीच आहे. २०१४ नंतर भाजपचे नेते किंवा लोकप्रतिनिधी यांच्याकडे ईडीची शिडी का लागली नाही? हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. यामुळे ‘भाजपच्या १०० नेत्यांची यादी आम्ही ईडीला देतो. त्यांचे काय उद्योग आहेत? त्यांचा पैसा कोठून येतो? काय नामी आणि काय बेनामी याची सगळी माहिती आम्ही ईडीला देऊ. होणार का कारवाई?,’ असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणत असतील आणि हा ‘ऑपरेशन लोटस’चा एक भाग असू शकतो अशी शंका अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली तर एक विरोधक म्हणून ते आपला आवाज उठवत आहेत, असे म्हणायला हवे. ‘ईडी आणि सीबीआय हे भाजपचे बाहुले असून भाजप या संस्थांचा वापर विरोधकांची तोंड दाबण्यासाठी करत आहेत’. एवढ्या टोकाच्या प्रतिक्रिया विरोधक देत असतील तर सत्ताधारी विरोधकांची कशी ठरवून कोंडी करत आहेत, त्याचे सुद्धा हे उदाहरण देता येईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार विधानसभा निवडणुकीच्या काळात बोलले तर त्यांना नोटीस बजावली होती. आताही प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे टाकत ईडीने शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींच्या मनात धाकधूक सुरु केली आहे. हे कशाचे चिन्ह आहे? भाजप महाराष्ट्रात सत्तेसाठी आसुसलेली असून सत्तातरांसाठी त्यांचा जीव व्याकुळ झाला आहे. बिहार निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सत्ता बदल होईल असे सांगितले जात होते. आता दोन महिन्यांनी महाविकास आघाडी सरकार बदलेल आणि भाजपची सत्ता येईल, असे खासदार रावसाहेब दानवे सांगत आहेत. आणि आपल्या पक्षाच्या बैठकीत तसेच आमदारांबरोबरच्या चर्चेत धीर सोडू नका, आपले लौकरच राज्य येणार आहे, असे देवेंद्र फडणवीस आणि चंदक्रांत पाटील सांगताना दिसत आहेत. तेच आमदार मग पत्रकारांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना सांगत आहेत कि आता महाविकास आघाडी सरकार दोन महिन्यात पडणार. आता मुदतीचे दोन-दोन महिने संपत येऊन हे सरकार काही पडत नाही, असे दिसताच आता ईडीचा खेळ सुरु झाला नाही ना…अशी शंका निर्माण होत आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांमध्ये अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, थयथयाटी अर्णव गोस्वामी आणि नटमोगरी कंगना रानौतबाबत सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. जो भाजप विरोधात आक्रमकता दाखवतो त्याला अनेक मार्गाने त्रास दिला जातो. तेच प्रताप सरनाईक यांच्याबाबत घडत असेल तर ईडी आणि सीबीआय हे भाजपचे बाहुले झाले आहे, असे विरोधक म्हणत असतील तर लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकणारच. या कारवाईचा राजकारणाशी काही संबंध नाही. तसेच बेनामी कारभार, बोगस कंपन्या असतील आणि भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे, असे जरी भाजपचे नेते सरनाईक यांच्यावरील कारवाईवर बोलत असतील तर आता त्यांचा आवाज हा आपल्या तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे, अशा प्रकारचा आहे. या देशातून भ्रष्टाचार समूळ नष्ट झाला पाहिजे, असे जर भाजपला वाटत असेल तर सूर्याचे कोवळी किरणे धरतीवर येताच कोवळ्या उन्हात फुललेले कमळ कसे दिसते, तसा कारभार भाजपने आधी स्वतः करायला हवा. अन्यथा ‘ईडी आणि अन्य एजन्सीने राजकीय पक्षाची शाखा असल्यासारखे काम करू नये. ज्याचे आदेश ते पाळतायत त्या पक्षाच्या लोकांचे काय धंदे आहेत, त्यांची मनी लॉड्रिंग कशाप्रकारे चालू आहे, निवडणूकीत कुठून पैसा येतो, कसा वापरला जातो आणि कुठे ठेवला जातो, कसा वाटला जातो, कोणाच्या माध्यमातून येतो, ही कल्पना ईडीकडे नसली तरी आमच्याकडे आहे. पण गेल्या काही वर्षांपासून केंद्रीय तपास यंत्रणा या अलीकडच्या सत्ताधाऱ्यांचे गुलाम, चाकर, नोकर असल्यासारखे वागत आहेत’, असे विरोधक म्हणत असतील तर एकूणच हा सारा प्रकार दबावाचे राजकारण वाटते. विहंग ग्रुपवर ईडीचे छापे पडत असताना प्रताप सरनाईक त्यांच्या घरी नव्हते. ते परदेशात होते. त्यांची मुले घरी होती. एकूणच सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर पडलेल्या ईडीच्या धाडी ही कारवाई होती का राजकारण हा लाखमोलाचा सवाल उभा राहिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -