घरफिचर्सगर्वहरण!

गर्वहरण!

Subscribe

शिवसेना-भाजप यांची युती खोटेपणा कोणाचा या मुद्यावर तुटली हे फार योग्य झाले. भाजप खोटारडा प्रचार, असत्य माहिती प्रचार, अपसमज व अर्धसत्य कथन आणि कुजबुज करण्यात तरबेज पक्ष आहे. रा.स्व. संघाच्या मुशीतून उगवलेल्या सर्वांनाच ‘ठोकून द्या, बोलत राहा’ अशी शिकवण दिली जाते जणू! नेहरू, गांधींनी, काश्मीर, ३७० कलम, काँग्रेसची ७० वर्षांची कारकीर्द आदी कित्येक विषय या पक्षाच्या तोंडून विपर्यास्त स्वरूपात बाहेर पडत असतात. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी ‘आपणाला खोटारडे ठरवण्याचा भाजपचा प्रयत्न’ धिक्कारत युती तोडली. फॅसिस्ट राजकारण, मूल्यहिन, नीतीहिन असते. त्यात खरेपणाला किरकोळ स्थान असते.

‘फडणवीस सरकार पुन्हा निवडून द्या’ असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या एका तरी जाहीर सभेत म्हणाले होते का? नसतील तर त्यांनी फडणवीसांचे नाव घेणे का टाळले असेल? याचा अर्थ शिवसेनेला पुन्हा युतीचे सरकार यावेसे वाटत होते, मात्र त्यांचे प्रमुख देवेंद्र फडणवीस नसतील असे वाटत होते, नाही का? मग १३ नोव्हेंबर रोजी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी फिफ्टी-फिफ्टीबद्दल काही ठरले नव्हते असे का म्हटले? वर ते असेही म्हणाले की बंद खोलीत चर्चा काय होतात ते सांगण्याची प्रथा आमची नाही. म्हणजे शहा यांनी स्पष्ट उत्तर दिले की नाही हे काही समजत नाही.

शहा यांनी प्रचाराचा दाखला देत म्हटले की आमचा प्रचार फडणवीस यांच्या नावे चालू असताना आम्हाला अडवले का नाही? किंवा त्यावर आक्षेप का घेतला नाही? ठाकरे यांनी जर एकदाही ‘फडणवीस सरकार जिंकवा’ असे म्हटलेले नाही तर युतीतील नेतृत्वाचा मुद्दा वादग्रस्त होता असे महाराष्ट्राला समजत नाही का? शिवाय १५ दिवस शहा यांनी महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणाविषयी ब्र ही काढला नाही यांचे गूढ काही उकलत नाही.

- Advertisement -

याचा अर्थ असा की देवेंद्र फडणवीस यांचे ‘जाऊ बाई जोरात’ हे नाटक प्रचंड वेगात निघाले असताना शिवसेना ‘पाहू रे किती वाट?’चे खेळ करू लागली होती. हे खरे आहे की गेली पाच वर्षे महाराष्ट्र जणू फडणवीस यांना आंदण दिलेला होता. सरकार तेच, प्रशासन तेच, कारभार त्यांचाच, नेतृत्व त्यांचेच, निर्णय त्यांचे एकट्याचेच आणि यशही त्यांचे एकट्याचे ! इतके एकांकी, एकतर्फी आणि एकेरी राज्य महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते. महान पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज कधीही एकट्याकडे श्रेय घेत नसत. त्यांनी नावाजलेले अनेक सहकारी महाराष्ट्र आजही लक्षात ठेवतो.

शिवाजी राजे सर्वांचा त्याग, सेवा आणि कर्तबगारी महाराष्ट्राच्या कानावर घालीत. इथे तर फडणवीस यांनी आस्ते आस्ते आपल्या मार्गातील संभाव्य अडथळे झटपट दूर केले आणि आपण एकटेच समर्थ आहोत असे भासवायला सुरू केले. विनोद तावडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांना गारद करून तर नितीन गडकरी, संभाजी पाटील निलंगेकर, रावसाहेब दानवे यांना महत्त्व न देऊन मुख्यमंत्री महाराष्ट्र एकहाती चालवू लागले.

- Advertisement -

शिवसेनेचे मनोहर जोशी यांच्यानंतर २० वर्षांनी फडणवीस यांच्यासारखा ब्राह्मण जातीचा राजकारणी मुख्यमंत्री झाला. ना त्याच्या मागे आमदारांची बहुसंख्या, ना फडणवीस लोकनेते, ना त्यांचे भरीव कार्य कोणाला ठाऊक! पंतप्रधान मोदी यांनी मराठा जातीला खिजवण्यासाठी असा एक आपल्या ऐकण्यातला आमदार मुख्यमंत्री म्हणून नेमला. एकदा नेमल्यावर सूचक व अनुमोदक मिळतच असतात. त्याप्रमाणे आणि सत्तेच्या आकर्षणामुळे आपोआपच अनुयायी मिळत जातात. त्यामुळे फडणवीस राज्याचे नेते झाले. महापौर, आमदार, प्रदेशाध्यक्ष अशी राजकीय वाटचाल त्यांना एकदम मुख्यमंत्रीपदापर्यंत नेणारी ठरली. नाही म्हटले तरी तरुण माणूस हरखून गेला, स्वतःवर खूश झाला आणि आपल्याला खूप कळते या भ्रमात कारभार करू लागला.

मुंबईत अशा राजकीय व्यक्तीला खुशखबरी देण्यासाठी पत्रकारांची एक टोळी मौजुद असते. त्याप्रमाणे मराठी व इंग्रजी पत्रकारांच्या गराड्यात मुख्यमंत्री सापडले. उरलेल्यांवर मोदी व शाह यांनी प्रत्यक्षाप्रत्यक्ष टाकलेले दडपण काम करू लागले. अनेक पत्रकार गरज नसताना फडणवीस यांचे झेलकरी बनले. आता ही टोळी येणारे आघाडी सरकार अडचणीत आणण्याची कारस्थाने आखू लागली आहे. बहुत करून ब्राह्मणी वृत्तीचे पत्रकार यात होते. फडणवीस यांचे राजकारण ब्राह्मणी वळण घेऊ लागल्याचे फक्त या टोळीला दिसत नव्हते.

बरेच पत्रकार एक धूळफेक करीत राहिले. मोदी सरकारवर टीका करताना हळूच महाराष्ट्र सरकार वेगळे काढून फडणवीसांचा बचाव ती टोळी करू लागली. जलयुक्त शिवार, प्राथमिक आरोग्य केंद्रे, शिक्षक भरती, सरकारी नोकर भरती, दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती, प्राध्यापकांच्या नेमणुका, नगरपालिकांचा कारभार, पाणीटंचाई, शेतकर्‍यांच्या आत्महत्या, महागाई, बेकारी अशा कैक समस्या या पत्रकार मंडळीस दिसेनात. गृहखाते सांभाळणारे मुख्यमंत्री वाढत जाणार्‍या गुन्हेगारीला आळा घालू शकले नाहीत. नागपूर शहर भयंकर गुन्हेगारीने थरकापले.

फडणवीस विरोधकांना निरुत्तर करणारे पुढारी म्हणून नावाजू लागले. राज्याचे कारभारी म्हणून ते स्वतः कोणाला उत्तर देत नसत. पहिल्या पाच वर्षांत प्रयत्न केल्यास दुसर्‍या खेपेच्या सत्ताकालात कामे दिसू लागतात. असा त्यांचा राजकीय विचार विलास! त्यातूनच त्यांनी २२० पासून १८५ पर्यंत आपल्या नेतृत्वाखालील युतीला आमदार मिळतील असा प्रचार सुरू केला. त्यांच्या हातून घास खाणार्‍या पत्रकारांनी हा प्रचार सरकारला मिळालेली लोकांची पावती म्हणून बातम्यांमधून प्रसिद्ध करायला सुरुवात केली. ‘एक्झिट फेल’ याचेच फळ! तिथेही फडणवीस यांच्या कर्तृत्वाचे नगारे वाजू लागले. २४ ऑक्टोबर रोजी फडणवीस नावाचा फुगलेला फुगा फुटला. पत्रकारांनी त्यात भरलेली हवा जोरात निघून गेली. त्यामागे काही परंपरा आहे.

शिवसेना-भाजप यांची युती खोटेपणा कोणाचा या मुद्यावर तुटली हे फार योग्य झाले. भाजप खोटारडा प्रचार, असत्य माहिती प्रचार, अपसमज व अर्धसत्य कथन आणि कुजबुज करण्यात तरबेज पक्ष आहे. रा.स्व. संघाच्या मुशीतून उगवलेल्या सर्वांनाच ‘ठोकून द्या, बोलत राहा’ अशी शिकवण दिली जाते जणू! नेहरू, गांधींनी, काश्मीर, ३७० कलम, काँग्रेसची ७० वर्षांची कारकीर्द आदी कित्येक विषय या पक्षाच्या तोंडून विपर्यास्त स्वरूपात बाहेर पडत असतात. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनी ‘आपणाला खोटारडे ठरवण्याचा भाजपचा प्रयत्न’ धिक्कारत युती तोडली. फॅसिस्ट राजकारण, मूल्यहिन, नीतीहिन असते. त्यात खरेपणाला किरकोळ स्थान असते.

तसे बघितल्यास भाजप विरोधी सेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आणि त्यांचे समविचारी अपक्ष आमदार यांची संख्या कितीतरी जास्त आहे. याचा अर्थ ही विधानसभा निवडणूक भाजप विरुद्ध जनमत प्रकट करण्यास बळ देणारी ठरली. तिकडे हरियाणातही भाजपचा ‘अब की बार, पंचाहत्तर पार’ ही घोषणा सपशेल फसली. तिथे फक्त ४० जागा त्यांना मिळाल्या म्हणजे नरेंद्र मोदी यांचा प्रभाव आणि अमित शहा यांचे पक्षसंघटन ओसरू लागले आहे. भाजपला शेतकरी, कामगार, गरीब आणि दलित समाज घटकांविषयी काही समजत नाही. ना त्यांच्या समस्या तो जाणतो. देशभर एकाच स्वरूपाच्या समस्या उग्र होत जाताना भाजपचे लक्ष काश्मीर, अयोध्या व पाकिस्तान याकडे होते. केवळ भावनिक मुद्दे पेटवत राजकारण करणे यापुढे भाजपला जमणार नाही. ठोस आणि वास्तविक विषयांची हाताळणी केल्याशिवाय त्याला आपल्या सत्तेचा लाभ देता येणार नाही. पण गर्विष्ठ नेत्यांना ते जमणार नाही.

मोदी व शहा यांची घसरण सुुरू झाली असून या दोघांचे नेतृत्व भारतावरून पुसून टाकायला शरद पवार आघाडी घेऊन आहेत. सोनिया गांधी जर त्यांना साथ करत्या झाल्या तर भाजपची हकालपट्टी अटळ आहे. राष्ट्रवाद, महासत्ता, हिंदुत्व, हिंदुराष्ट्र, संस्कृती अशा गोष्टींनी पोट भरता येत नसते. देशाने तोही एक प्रयोग करून बघितला. डोळे गच्च भरलेले अन् पोट मात्र रिकामे असा देश उभा राहू शकत नाही. महाराष्ट्र व हरियाणा या राज्यांनी तसा संदेश भारतीयांना देऊन टाकला आहे. आता वाट पाहायची दिल्ली व झारखंड विधानसभा निवडणुकांची. तिथे बहुधा भाजपचे वस्त्रहरण होईल!

-जयदेव डोळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -