घरफिचर्सबँकांच्या वादळात एसआयपीचा पर्याय !

बँकांच्या वादळात एसआयपीचा पर्याय !

Subscribe

आज बँकांबाबत अस्थिरता किंवा भीतीचे वातावरण आढळते. या पार्श्वभूमीवर एसआयपी हा सोयीस्कर मानला जात आहे. उसळी मारणारा किंवा बुडी मारणारा वादळी शेअरबाजार ज्यांना अतिशय जोखमीचा वाटतो. त्यांच्यासाठी एखादा सशक्त पर्याय असावा. म्हणूनच हा म्युच्युअल फंडाशी निगडित पर्याय पगारदार मंडळींच्या हिताचा असा म्हणून लोकप्रिय ठरलेला आहे.

दसरा -दिवाळी हे आपले सण म्हणजे उत्सवाचे, उत्साहाचे आणि मुख्य म्हणजे खरेदीचे. अहो,म्हणून तर अमेझॉन आणि इतर कंपन्या दोन दिवसांचे बम्पर खरेदीचे फेस्टिव्हल ठेवतात.

पार्श्वभूमी -सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन – एस.आय.पी. हा एक सोप्पा आणि सोयीचा गुंतवणूक पर्याय म्हणून लोकांच्या पसंतीस पात्र ठरलेला आहे. ज्यांना शेअरबाजार किंवा म्युच्युअल फंडात थेट पैसे गुंतवण्यास भीती वाटत असते त्यांच्यासाठी हा एक सुलभ आणि लाभदायी पर्याय उपलब्ध आहे. आजच्या घडीला सुमारे 2. 84 कोट्यवधी इतकी रक्कम या साधनांत गुंतवली गेली आहे. आज बँकांबाबत अस्थिरता किंवा भीतीचे वातावरण आढळते. या पार्श्वभूमीवर एसआयपी हा सोयीस्कर मानला जात आहे. उसळी मारणारा किंवा बुडी मारणारा वादळी शेअरबाजार ज्यांना अतिशय जोखमीचा वाटतो. त्यांच्यासाठी एखादा सशक्त पर्याय असावा. म्हणूनच हा म्युच्युअल फंडाशी निगडित पर्याय पगारदार मंडळींच्या हिताचा असा म्हणून लोकप्रिय ठरलेला आहे.

- Advertisement -

आपली पारंपरिक गुंतवणूक साधने म्हणजे पोस्ट-बँकेत बचत खाती, मुदत-ठेवी ही अनेक पिढ्यांनी उपयोगात आणली. पुढे बँकांचे व्याजदर कमी-कमी होत गेले व अन्य आकर्षक पर्याय दिसू लागले. जोखीम व लाभ ह्यांचा समतोल साधने ही एक अवघड कसरत असते. याबाबतचा निर्णय हा ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो. आर्थिक सल्लागार घेण्याची आपल्याकडे पद्धत नाही विदेशात मात्र रूढ आहे ! विमा एजंट मात्र असतो. अशावेळी आपण कुटुंबातील अनुभवी आणि ऑफिसातील मार्गदर्शकांचे सहाय्य्य घेतले जाते. पूर्वी ज्याला रिकरिंग डिपॉझिट म्हणायचे ते आजही बँकांमध्ये उपलब्ध आहे. पण आज त्यात अधिक प्रमाणात पैसे ठेवले जात नाहीत. कारण रिकरिंगपेक्षा एसआयपी हे अधिक फलदायी आहे. मुळात कोणत्याही व्यक्तीला नियमितपणे ठराविक रक्कम बचतीचा एक भाग म्हणून बाजूला टाकण्याची एक चांगली सोय म्हणून पाहिले जाते. कारण चैनीसाठी खरेदी असो किंवा आकस्मिक खर्चासाठी मोठी रक्कम उभी करायची असली तर महिन्याला किंवा आपण ठरवू त्या मदतीला आपल्या उत्पन्नातील ठराविक रक्कम बाजूला काढून वेगळ्या खात्यात जमा होणे व त्यावर अधिक व्याज मिळणे हे निश्चितच फायद्याचे आहे. हे बहुतांश गुंतवणूकदारांना पटलेले आहे. म्हणूनच आज किंवा जेव्हा शेअरबाजार तेजीत नसेल तेव्हा लोक एसआयपीमध्ये पैसे ठेवणे पसंत करतात.

योजनेची वैशिष्ठ्ये –
ठराविक मुदतीने -बहुधा दर महिन्याच्या हिशेबाने आखली जाते
रक्कम सुरवातीलाच निश्चित केली जाते, मात्र त्यात गुंतवणूकदार फेर-बदल करू शकतो
अमुक योजनेसाठी ही गुंतवणूक असते
व्यक्तिगतरित्या संपती निर्माण करण्यासाठी सोयीस्कर
ही शेअर्स खरेदी करण्याकरिता उपयोगात येते
किरकोळ म्हणजे रिटेल गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय
कधीही सुरु करण्याची आणि बंद करण्याची मुभा
मोठ्या किंवा एकदाच घसघशीत रक्कम गुंतवण्याची गरज नाही
नियमित आणि निश्चित गुंतवणे
बाजारातील चढ-उताराची शंका-धास्ती आणि टेन्शन घेण्याची गरज नाही
भावनात्मक गुंतवणूक नाही,व्यवहारिक निकष आणि मूल्यमापनाचा आधार
छोट्या बचतीतून मोठी बचत

- Advertisement -

एसआयपी करण्याचे फायदे :-
1) आपल्या सोयीने प्रतिमाह निश्चित रक्कम गुंतवण्याची सोय
2) पारंपरिक गुंतवणूक साधनांपेक्षा प्रभावी आणि लाभदायक
3) शेअर्समध्ये थेट पैसे गुंतवणे जर का अधिक जोखमीचे वाटत असेल, तर एसआयपी हा तसा सुलभ आणि आपल्याला थेट शेअरबाजाराचा नित्य नियमित अभ्यास करण्याची जरूर नाही
4) प्रति महिन्याला निश्चित रक्कम गुंतवण्याची एक शिस्तबद्ध सवय लागते
5) प्रत्येक महिन्याच्या रकमेतून निश्चित युनिट्सची -शेअर्सची खरेदी
6) अशी खरेदी करताना युनिट्सचे वाटप
7) एकाचवेळी मोठी रक्कम गुंतवण्याची जरुरी नाही, आपल्या पगारातील-उत्पन्नातील ठराविक टक्के रक्कम आपण बाजूला काढून एसआयपीची दर महिन्याची रक्कम ठरवू शकता, अर्थात ती वाढवण्याची किंवा कमी करण्याची सोय
8) दर महिन्याला म्युच्युअल फंडाच्या एसआयपीत गुंतवण्याची रक्कम स्वतः नेऊन भरण्याची किंवा कोणामार्फत पाठवण्याची गरज नाही. त्याऐवजी आपल्या बँक खात्याला तसे पैसे ट्रान्स्फर करण्याची -अमुक स्कीममध्ये भरण्याची सूचना-निर्देशन दिले, तर खात्यातून अमुक तारखेला ठराविक रक्कम थेट एसआयपीमध्ये जमा करण्याची सोय अर्थात तशी कायमची सूचना बँकेला देणे जरुरीचे असते. जसे बँक रिकरिंग खाते उघडल्यावर ठरलेले पैसे ठरलेल्या तारखेला ट्रान्स्फर केले जातात, तशीच पद्धत येथेही अवलंबली जाते. किंवा ज्याप्रकारे होम लोन किंवा पर्सनल लोनचे हफ्ते दर महिन्याला कसे कापले जातात,तसे होऊ शकते.

एसआयपीमध्ये आपण पैसे कसे गुंतवावे ?
1) एखाद्याला एसआयपीमध्ये पैसे गुंतवून बचत आणि अन्य हेतू साध्य करायचे असतील तर उपलब्ध असलेल्या म्युच्युअल फंड कंपनीच्या अनुरूप अशा एसआयपी योजनेची निवड करता येईल.
त्याकरिता वेब-साईट, जाहिरात आणि अन्य माध्यमातील माहिती तसेच अधिकृत माहितीपत्रक वाचावे. किंवा गुंतवणूक तज्ञ -सल्लागार किंवा कंपनीच्या अधिकृत मार्गदर्शकाचे मार्गदर्शन घ्यावे.
वाटल्यास अन्य म्युच्युअल फंडाची तशाच प्रकारची समांतर योजना असल्यास पडताळून पहावे. सुदैवाने हल्ली वर्तमानपत्र-मासिके ह्यातून सातत्याने ताजी माहिती उपलब्ध होत असते, तिचा जरूर वापर करावा.
2) यात आधी सांगितल्याप्रमाणे एकरकमी पैसे गुंतवावे लागत नाहीत, आपल्याला जी रक्कम बचतीसाठी बाजूला काढायची आहे, तो आकडा निश्चित करून प्रति महिन्याची एसआयपीची रक्कम निश्चित करता येते. एसआयपीचा मासिक आकडा नक्की करताना तुमची मासिक कमाई आणि नित्य खर्च ह्याचे आकडे मांडून बघा. सगळे खर्च बाजूला काढून किती पैसे शिल्लक राहू शकतात आणि तितकेच पैसे प्रत्येक महिन्याला बाजूला राहतील का? याचा पक्का अंदाज घ्या आणि नंतरच एसआयपीची रक्कम ठरवा
3) कोणत्याही गुंतवणुकीच्यावेळी जसा आपण जोखीम, लाभ आणि सुरक्षितता यांचा समग्र विचार करतो, तसा करून योग्य म्युच्युअल फंड कंपनी आणि त्यांची योजना निवडावी.
4) एसआयपी ही शक्यतो दीर्घकाळासाठी असावी. किमान कालावधी 6 महिने असावा. किमान रक्कम -रु 500/ च्यावर
5) तुमची एसआयपी योजना दर महिन्याच्या कोणत्या तारखेला असावी याचा विचार करा. कारण त्यातारखेला तुमच्या खात्यात तितकी रक्कम असली पाहिजे आणि शिवाय बँकेच्या नियमानुसार किमान रक्कम शिवाय तुम्हाला जे नियमित मासिक उत्पन्न पगार /उद्योग उत्पन्न/व्याज किंवा अन्य प्रकारचे उत्पन्न येत असेल, ती तारीख जर निश्चित आणि नेमकी असेल, तर त्यानंतरची एखादी तारीख तुम्ही एसआयपीचा हफ्ता कापून घेण्यासाठी ठरवू शकता. दोन्ही तारखांमध्ये थोडी गॅप -अंतर ठेवले तर कधी पैसे येण्यास उशीर झाला, म्हणून पंचाईत नको व्हायला. अशा काही प्रॅक्टिकल गोष्टीची काळजी आपल्याला घ्यावी लागते.

उदाहरणार्थ :- तुमचा पगार जर दर महिन्याला 5 तारखेला होत असेल तर तुम्ही एसआयपीसाठी 7 किंवा 10 तारीख देणे सोयीचे असेल.
6) के.वाय.सी.ची पूर्तता – हल्ली बँक खाते असो की नवीन गुंतवणूक, त्याकरिता व्यक्ती म्हणून तुमची ओळख,पत्ता ह्याबाबत पुरावा देणारी कायदेशीर कागदपत्र देणे हे अनिवार्य असते.

उदाहरणार्थ – 1) पॅनकार्ड
2) आधारकार्ड
3) फोटोज
4) बँकेत खाते असल्याचा पुरावा
5) घर – राहण्याच्या जागेबाबत पुरावा

के.वाय.सी. ची कागदपत्रे बँक म्युच्युअल फंड किंवा तत्सम अर्थ आणि गुंतवणूक विषयक संस्थांना देणे हे आपण गुंतवणूकदार म्हणून आपल्याच हिताचे असते. कारण पुढे-मागे कोणी बनावट कागदपत्रे देऊन आपल्या खात्याचा -गुंतवणुकीचा गैरफायदा घेऊ शकतो. फसवणूक किंवा काळ्या पैशातील गैरव्यवहार तसेच भ्रष्टाचार होण्यापासून प्रतिबंधक उपाय म्हणून अशी व्यक्तिगत कागदपत्र देणे जरुरीचे असते.

दिवाळीसाठी खरेदी होते, ते उत्सव साजरा करण्यासाठी चांगले आहे. पण पैसे असेल तर सण आणि सर्वकाही, त्याकरिता आपला पगार आणि बाकीचे उत्पन्न हे कधीच पुरेसे वाटत नाही. अतिरिक्त पैसे कमवायचा असेल तर जोड उद्योग, अतिरिक्त काम तरी करायला पाहिजे किंवा डोळसपणे गुंतवणूक केली पाहिजे. दिवाळीतले ‘लक्ष्मी -पूजन ’ हे केवळ व्यापार्‍यांना नव्हे तर सर्वानाच लक्ष्मी कमावण्याचा संदेश देते. काही घरांतून कुबेराची पूजा करतात. लक्ष्मी असावी हे प्रत्येकाने ठरवायला हवे व त्याप्रमाणे वागायला पाहिजे. वैध व योग्य मार्गाने पैसे कमावणे काही गैर नव्हे. तेव्हा आर्थिक साक्षरतेच्या प्रवासात आपण यंदाच्या दिवाळीला प्रारंभ करूया. लक्ष्मी-पूजनाच्या पवित्र दिवशी संकल्प करूया, शुभ लाभ होतील असे सौदे-आर्थिक व्यवहार करूया, म्हणजे येणार प्रत्येक दिवस हा लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुखाचा आणि समृद्धीचा जाईल. एस आय पी सुरु करण्याचा निर्धार करा !! तुमच्याकडे आधीच एसआयपी खाते असेल तर त्याची रक्कम वाढवण्याचा जरूर विचार करा. कारण एक सूत्र लक्षात ठेवा ‘थेंबे थेंबे तळे साचे आणि एस आय पी वाढे !!

-राजीव जोशी -अर्थ व बँकिंग अभ्यासक 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -