शिक्षणतज्ज्ञ सर सय्यद अहमद खान

सर सय्यद अहमद खान यांचा आज स्मृतिदिन. सर सय्यद अहमद खान हे विख्यात मुस्लीम विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ व राजनीतिज्ञ होते. त्यांचा जन्म १७ ऑक्टोबर १८१७ रोजी दिल्लीत झाला. त्यांचे पूर्वज हेरातचे. सम्राट अकबराच्या कारकीर्दीत (१५५६-१६०५) ते भारतात स्थलांतरित झाले आणि मोगलांच्या दरबारात निष्ठेने सेवा करू लागले. त्यांच्या पूर्वजांना मोगल दरबारातून मानाचे किताब मिळाले होते. सर सय्यदांच्या वडिलांचे नाव सय्यद मुतक्की. मोगल दरबारात त्यांचे वजन होते. सय्यद अहमदांचे मातुल आजोबा ख्वाजा फरिदुर्शन अहमद हेही कर्तृत्ववान होते.

मोगल दरबारात त्यांनाही सन्मान दिला जात होता. सर सय्यद यांना औपचारिक शिक्षण मिळालेले नव्हते. त्यांची आई हीच त्यांची पहिली गुरू होती. परोपकारी वृत्तीच्या या स्त्रीचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला होता. पवित्र कुराण, गुलिस्ताँ, बोस्ताँ यांसारखे फार्सी ग्रंथ, काही अरबी ग्रंथ ते निरनिराळ्या व्यक्तींकडून शिकले. गणित आणि भूमिती यांचाही त्यांनी अभ्यास केला. मिर्झा गालिब यांच्यासारख्या थोर उर्दू कवीचा निकट सहवास त्यांना लाभला आणि त्यांच्या काव्याने ते प्रभावित झाले.

बिजनोर येथे सद्र अमीन या पदावर सर सय्यद यांची १८५५ मध्ये नेमणूक झाली. १८५७ चा उठाव झाला, तेव्हा कंपनी सरकारशी एकनिष्ठ राहून त्यांनी अनेक इंग्रजांचे प्राण वाचवले. तथापि या उठावामुळे इंग्रज सरकार मुसलमानांकडे संशयाने पाहू लागले होते. सर सय्यद यांच्या जवळच्या नातेवाईकांना, त्यांच्या आईलाही याची तीव्र झळ लागली. त्यामुळे देश सोडण्याचा विचारही त्यांच्या मनात येऊन गेला. परंतु अखेरीस या परिस्थितीचा विचार त्यांनी मुसलमानांच्या संदर्भात केला आणि इंग्रजी सत्तेशी जुळवून घेण्यातच मुसलमानांचे हित आहे, या निष्कर्षाप्रत ते आले.

सर सय्यद यांनी उत्तर प्रदेशांतील अलीगढ येथे मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल महाविद्यालय स्थापन केले (१८७५). मुसलमान तरुणांना उदार, आधुनिक शिक्षण मिळावे, हा हेतू त्यामागे होता.

नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर १८७६ मध्ये त्यांनी पवित्र कुराणावर भाष्य लिहिण्यास आरंभ केला. १८७८ मध्ये व्हाईसरॉयच्या लेजिस्लेटिव्ह काऊन्सिलवर त्यांची नियुक्ती करण्यात आली. १८८३ मध्ये अलीगढमध्ये त्यांनी मोहमेडन असोसिएशनची स्थापना केली. त्याचप्रमाणे १८८६ मध्ये त्यांनी मोहमेडन एज्यूकेशनल कॉन्फरन्सची स्थापना केली. मुसलमानांची सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टी बदलावी, हे या संघटनेचे उद्दिष्ट होते. १८८७ मध्ये लॉर्ड डफरिन यांनी त्यांना सिव्हिल सर्व्हिस कमिशनचे स्वीकृत सदस्य केले. १८८९ मध्ये एडिंबरो विद्यापीठाने त्यांना एलएलडी. ही सन्माननीय पदवी प्रदान केली. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन’चे ते सन्माननीय सदस्य होते.

सर सय्यद यांना इतिहास, राजकारण, पुरातत्त्वविद्या, पत्रकारी, साहित्य अशा अनेक विषयांमध्ये स्वारस्य होते. बरानीचे तारीख-इ-फिरोझशाही, अबुल फज्लचीआइन-ए-अकबरी, जहांगीरचे तुझुकहे ग्रंथ त्यांनी संपादिले. बायबलवर त्यांनी भाष्य लिहिले (तबियिन-उल-कलाम). १८५७ च्या उठावानंतर त्यांनी लिहिलेले हिस्टरी ऑफ बिजनोर आणि हिस्टरी ऑफ द रिव्होल्ट ऑफ बिजनोर हे ग्रंथही महत्त्वाचे आहेत. अशा या महान अशा शिक्षणतज्ज्ञाचे 27 मार्च 1898 रोजी निधन झाले.