घरफिचर्सपंतप्रधान मोदींनी बाजी मारली, पण...

पंतप्रधान मोदींनी बाजी मारली, पण…

Subscribe

अगोदरच विरोधक राज्यपाल कोश्यारींना परत पाठविण्यासाठी उत्सुक आहेत. मोदी जर राज्यापालांनी केलेल्या विधानांवर काही बोलले असते तर विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले असते. त्यामुळे अशा राज्यपालांना तुम्ही परत बोलवून घ्या, अशी मागणी विरोधकांकडून केली जाण्याची शक्यता होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काल पुण्यात झालेल्या कार्यक्रमाकडे अनेकांचे विशेष लक्ष लागलेले होते, कारण या कार्यकमावर वादाचे आणि वितुष्टाचे सावट होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचा राग या कार्यक्रमाच्या निमित्ताने उफाळून येईल आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल की काय, अशी शंका वाटत होती, पण तसे काही झाले नाही. मोदी त्यांच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आले, त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले, असाच एकूण माहोल दिसून आला. मोदींनी संसदेत केलेल्या भाषणातून देशभरात कोरोना पसरायला महाराष्ट्रातील काँग्रेस जबाबदार आहे, असा आरोप केला होता. त्यानंतर मोदींनी हा केवळ काँग्रेसचाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राचा अपमान केलेला आहे, असा पवित्रा राज्यातील काँग्रेस नेत्यांनी घेतला होता. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर जाऊन आक्रमकपणे निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला.

असाच आक्रमक पवित्रा काँग्रेसचे नेते मोदींच्या पुणे दौर्‍याच्या वेळी घेतील की काय असे वाटत होते, पण तसे काही झाले नाही. मोदींंनी पुणे महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले, तसेच पुणे मेट्रोचे लोकार्पण केले. मुळा-मुठा नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन केले. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी वादग्रस्त विधाने केली होती. राज्यपालांच्या भूमिकेवरून सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांवर अगोदरपासूनच नाराज आहेत.

- Advertisement -

दोन वर्षे होऊन गेली तरीही विधान परिषदेत नियुक्त करावयाच्या १२ सदस्यांच्या नावांवर राज्यपालांनी शिक्कामोर्तब केलेले नाही. विधानसभा अध्यक्षांची निवड, विद्यापीठांचे अधिकार अशा अनेक गोष्टींवर राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संबंध ताणलेले आहेत. त्यामुळे त्या सगळ्याचा उद्रेक मोदींच्या पुणे दौर्‍याच्या वेळी होईल असे वाटत होते. उलट, मोदींनी आपल्या प्रभावाने आणि छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन सगळे वाद झाकोळून टाकले असेच म्हणावे लागेल. त्यातल्या त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणातून मोदींच्या उपस्थितीत राज्यपालांविषयीचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली. मला पंतप्रधानांच्या लक्षात आणून द्यायचं आहे की काही मान्यवर व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्ये केली जात आहेत, ते महाराष्ट्राला परवडणारे नाही, त्यामुळे याकडेही लक्ष द्यावे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ यांच्या संकल्पनेतील स्वराज्याचा पाया रचला. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सत्यशोधक विचारांचा प्रसार केला. या महामानवांच्या कार्यांच्या उत्तुंग विचारांचा आदर्श आपल्या सर्वांना पुढे घेऊन जायचा आहे, असे मी विनम्रपणे सांगत आहे, असे अजित पवार म्हणाले. कोश्यारी यांनी केलेल्या विधानांनंतर राज्यातील सत्ताधारी पक्षांकडून आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसकडून जो आक्रमक पवित्रा घेण्यात आलेला आहे तसेच महाराष्ट्रात आगामी काळात महत्वाच्या पालिकांच्या निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूूमीवर पंतप्रधान मोदी यावर काही बोलतील आणि पंतप्रधान म्हणून आपली भूमिका स्पष्ट करतील, असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही. एखाद्या घटनेचा व्यापक पद्धतीने उपयोग करून घ्यायचा ही मोदींची खासियत आहे, पण यावेळी मोदींनी तसे काही केले नाही. कारण तसे केले असते तर ती राज्यपालांना दिलेली समज ठरू शकली असती.

- Advertisement -

विरोधकांनी त्याचा फायदा उठवला असता. अगोदरच विरोधक राज्यपाल कोश्यारींना परत पाठविण्यासाठी उत्सुक आहेत. मोदी जर राज्यापालांनी केलेल्या विधानांवर काही बोलले असते तर विरोधकांना आयतेच कोलीत मिळाले असते. त्यामुळे अशा राज्यपालांना तुम्ही परत बोलवून घ्या, अशी मागणी विरोधकांकडून केली जाण्याची शक्यता होती. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठीच की काय मोदींनी आपल्या भाषणात राज्यपालांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर काही बोलणे टाळले असावे.
भाजपची महाराष्ट्रात सध्या सगळ्याच बाबतीत कोंडी झालेली आहे.

२०१९ साली हातातोंडाशी आलेली महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील नेत्यांना प्रचंड धक्का बसला आहे. त्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यांना फितवून राजभवनावर भल्या पहाटे केलेला प्रयोग राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हाणून पाडला. हा दुसरा धक्का होता. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रयोग म्हणजे आपण केलेली चूक होती. त्याचा आपल्या प्रतिमेवर परिणाम झाला, असे जाहीरपणे कबूल केले. गेली अडीच वर्षे राज्यातील भाजपच्या नेत्यांनी केंद्रीय नेत्यांच्या मदतीने ठाकरे सरकार पाडण्यासाठी जंग जंग पछाडले आहे. अगदी अटीतटीचा कोरोना काळही सोडला नाही. पण त्याचा काहीच उपयोग होताना दिसत नाही.

उलट दिवसेंदिवस भाजपचे नेते जी कृती आणि वक्तव्ये करत आहेत. त्यातून भाजपची महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील प्रतिमा अजून खालावत जात आहे. त्यात पुन्हा राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याची भर पडली आहे. त्यात त्यांनी चाणक्य, रामदास स्वामी यांना श्रेष्ठत्व देऊन ब्राम्हणांचे उदात्तीकरण करून ब्राम्हणेतरांना कमी लेखल्याचा दर्प आहे. ही त्यांची संघीय मानसिकता आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे याविषयी अधिक काही बोलून महाराष्ट्रातील बहुसंख्य जनतेची नाराजी नको, म्हणून मोदींनी या विषयाला आपल्या भाषणात बगल दिली असली तर विरोधक हा विषय काही सहजासहजी सोडतील असे वाटत नाही.

राज्यपाल कोश्यारी यांनी ज्यांच्याविषयी वक्तव्ये केली त्या छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांचे मराठी माणसांच्या मनातील आत्यंतिक आदराचे स्थान लक्षात घेऊन आपली विधाने मागे घेतली असती तर हा विषय अधिक वाढला नसता. पण राज्यापाल कोश्यारींनी जणू काही विरोध करणार्‍यांची जिरवायची असा चंगच बांधलेला आहे, असे दिसते. त्यातून त्यांच्या हे लक्षात येत नाही की, आपल्या या अट्टाहासातून आपण भाजपचेच नुकसान करत आहोत. पण गेल्या अडीच वर्षांत भाजपच्या मंडळींना जे वैफल्य आलेले आहे, ते पाहता ते यातून काही बोध घेतील, असे वाटत नाही. खरे तर स्वत: पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेऊन राज्यातील नेत्यांना काही मार्गदर्शन करण्याची गरज आहे. कारण पुण्यातील कार्यक्रमामध्ये पंतप्रधान या नात्याने मोदींनी बाजी मारली आहे, पण राज्यातील भाजपची स्थिती बिकट होत चालली आहे, त्यात नवचैतन्य भरण्यात त्यांना यश आले असे दिसत नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -