Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स सामाजिक आरोग्याची लस

सामाजिक आरोग्याची लस

संकटाच्या वेळी आपल्या माणुसकीचा खरा कस लागतो. संकटं माणसांची खरीखुरी ओळख दाखवतात आणि या काळात अज्ञान, भीती आणि द्वेष यांचं कॉकटेल तयार झालं आहे. हे कॉकटेल प्राणघातक आहे. संवेदनशीलता हरवत चालल्याच्या काळात हे कॉकटेल अधिक जहरी आहे. कदाचित मास्क लावून आपण करोनापासून वाचू शकू. स्वतःला शाबूत ठेवू शकू; पण द्वेषाच्या साथीपासून बचाव कसा करु शकू? त्यासाठी सामाजिक आरोग्याच्या लशीची गरज आहे. ....................................

Related Story

- Advertisement -

फर्ग्युसन कॉलेज रोडवर बसची वाट पहात एक मुलगा मास्क घालून उभा होता. करोनाची साथ पसरल्याने प्रत्येकजण सावध होता. बस यायच्या आधीच हा मुलगा चक्कर येऊन कोसळला. आजूबाजूला उभे असलेले अनेकजण त्याच्याकडे पाहू लागले. कोण जाणे, हा करोनाबाधित रुग्ण असावा आणि त्यामुळेच त्याला चक्कर आली असावी, असा बहुतेकांचा समज झाला. कोणी त्या मुलाला मदत करायला तयार होईना. त्याला हातही लावेना. त्यावेळी कुणी शेख नावाचे गृहस्थ बाइकवरुन चालले होते. गर्दी आहे म्हणून ते थांबले. चक्कर येऊन पडलेल्या मुलाला पाहून ते म्हणाले, अरे कशावरुन याला करोना झाला असेल ? त्या मुलाला उचलून त्यांनी एका रिक्षात बसवलं. रिक्षावालाही तयार होईना. जणू या माणसाला आपण रिक्षातून घेऊन गेलो तर आपल्याला करोना होईल, अशी भीती. रिक्षावाला म्हणाला, ‘अहो साहेब मलाही मुलंबाळं आहेत, कशाला जीवाशी खेळता?’ शेख यांनी त्याची समजूत काढली. कसेबसे ते तयार झाले आणि वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यामुळे या मुलावर उपचार झाले आणि तो सुखरूप घरी परतला.

एका पेपरमधली ही बातमी वाचून थक्क झालो. शेजारी माणूस चक्कर येऊन पडलेला असतानाही त्याला मदत करताना आपण कचरत असू तर आपण नक्की माणूस आहोत का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

- Advertisement -

आपल्या मनात ही भीती मीडियाने निर्माण केली आहे, हे अर्धसत्य आहे; आपण ती भीती स्वीकारली आहे, ती आपल्या मनात आहे आणि त्यानुसार वागतो आहोत, हेही इथं लक्षात घेतलं पाहिजे.

ही भीती इतकी टोकाची आहे की दिल्लीमध्ये सफदरजंग हॉस्पिटलमध्ये एका संशयित रुग्णाने आत्महत्या केली. आपल्याला करोना झाला आणि आपण मरणार या भीतीनेच या व्यक्तीने आत्महत्या केली. माध्यमांनी तयार केलेल्या भयंकर अतिरंजित भीतीचा हा बळी आहे. वस्तुतः या आजारातून 97 टक्के लोक बरे होतात. ज्यांना आधीचे काही आजार आहेत किंवा अधिक वय असल्यामुळे प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा लोकांना अधिक धोका आहे. प्रत्येकाने मास्क वापरण्याची आवश्यकता नाही, असे अनेक तपशील वारंवार सांगूनही लोक भयभीत आहेत. ही भीती दोन माणसांमधलं अंतर वाढवते आणि एखादा तर आत्महत्याच करतो, हे भीषण आहे.

- Advertisement -

एका बाजूला ही भीती आहे तर दुसर्‍या बाजूला भयानक द्वेष. एका वाहिनीने ‘अब करोना की मौत मरेगा पाकिस्तान’ अशी स्टोरीच केली. करोनाचा पाकिस्तानात रुग्ण सापडल्याने जणू या वाहिनीला आनंद झाला होता आणि म्हणून मग इथले लोक आता करोनाने मरतील, असा शापच चॅनलवरुन दिला जात होता. ही विकृती आहे. जगावर जेव्हा संकट आलं आहे आणि भारतातही मोठ्या प्रमाणावर करोनाबाधित रुग्ण आहेत, अशी अवस्था असताना हे कसं सुचतं, हे काही केल्या कळत नाही. अलीकडच्या काळात आपल्या वाहिन्यांनी ज्या प्रकारचे वृत्तांकन सुरु केले आहे, हे पाहिलं तर कोणाही सुसंस्कृत, विवेकी माणसाला शरम वाटेल.

हा द्वेष किंवा ही भीती इतकी टोकाची आहे की सोसायट्यांमधून नियंत्रण कक्षांना फोन येत आहेत. आमच्या सोसायटीत अमुकजण परदेशाहून आला आहे, त्याला पकडून घेऊन जा. परदेशातून आलेल्या लोकांना अत्यंत तुच्छतेने वागवणं सर्रास दिसतं आहे. परदेशाहून आलेल्या एका मित्राला तर सोसायटीवाले प्रवेशच देईनात. घरी काम करणार्‍या मोलकरणींना अनेकांनी प्रवेश देणे नाकारले. अखेरीस असंघटित क्षेत्रात काम करणार्‍यांनी त्यात मध्यस्थी करुन गैरसमज दूर केले.

असे अनेक प्रसंग सांगता येतील. करोना कशा प्रकारे पसरतो, याविषयीचं अज्ञानही याला कारणीभूत आहे. चिकन खाऊन करोना पसरतो अशी वावडी उठली आणि ती इतकी सर्वदूर पसरली की चिकन अक्षरशः कवडीमोलात मिळू लागलं. सारा व्यवसायच उध्वस्त झाला. कोणी गोमूत्र पिऊन तो दूर होतो तर काहीजण तपकिरीने बरा होतो असे काय वाट्टेल ते उपाय सांगू लागले. एका नेत्याने तर अशा गोमूत्रासाठीची पार्टी ठेवली. अशा प्रकारे तर्कदुष्ट उपाय करणार्‍यांवर कारवाई करावी लागली. कुण्या संस्थेने, कुण्या व्यक्तीने यावर लस शोधली आहे, असे पोकळ दावेही करण्यात आले. त्यासाठी कोणत्या अफवा पसरतात, त्या कशा प्रकारे पसरतात याचा अभ्यास आणि विश्लेषण आवश्यक आहे. त्यातून या भीतीचे अर्थकारण आणि सामाजिक गुंते ध्यानात येऊ शकतात.

लोकांच्या भीतीवर, अज्ञानावर एक इंडस्ट्रीच उभी राहिली आहे. त्यामुळे त्या इंडस्ट्रीचे अर्थकारण सुरू होते. मास्क अचानक अव्वा की सव्वा किमतीत मिळू लागतात. सॅनिटायझरचीही साठेबाजी होते आणि मग पुन्हा ते महाग विकले जाते. हे सारं ढळढळीत हृदयशून्य नफेखोरीचं उदाहरण आहे. येनकेन प्रकारे तुंबड्या भरणं ही वृत्ती माणुसकीची नाही.

‘गुजरात फाइल्स’च्या लेखिका राणा अय्युब यांनी ट्विट केलं होतं-what is left for a virus to kill in a morally corrupt nation? नैतिक भ्रष्ट झालेल्या देशात विषाणूला मारण्यासाठी काही शिल्लक आहे का, असा सवाल त्यांनी उद्विग्नतेने केला होता. धर्मांध, जात्यंध आणि तुच्छतावादी प्रवृत्तींनी केलेला कहर पाहून त्या असं बोलल्या होत्या.

संकटाच्या वेळी आपल्या माणुसकीचा खरा कस लागतो. संकटं माणसांची खरीखुरी ओळख दाखवतात आणि या काळात अज्ञान, भीती आणि द्वेष यांचं कॉकटेल तयार झालं आहे. हे कॉकटेल प्राणघातक आहे. संवेदनशीलता हरवत चालल्याच्या काळात हे कॉकटेल अधिक जहरी आहे. कदाचित मास्क लावून आपण करोनापासून वाचू शकू. स्वतःला शाबूत ठेवू शकू; पण द्वेषाच्या साथीपासून बचाव कसा करु शकू? या द्वेषाच्या साथीपासून आपण स्वतःला वाचवू शकलोत तर बाकीची उत्तरं आपोआप गवसतील. द्वेषाचा विषाणू आपलं माणूसपण हिरावून नेतो.

कठीण प्रसंगी आपण संवेदनशीलतेने वागूया. रोम जळत असताना कुणी फिडल वाजवत होता, कुणी थाळी, असं म्हणण्याची वेळ येऊ नये. करोना चाचणीसोबत सामाजिक आरोग्याची तपासणी करण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी द्वेषाला आपल्यापासून विलग करुया. आपला सामूहिक विवेकच या साथीवरच उत्तर आहे. आपण हे माणूसपण टिकवलं तर ही लढाईही आपण जिंकू शकू.

-श्रीरंजन आवटे

- Advertisement -