समाजमन कळलेले लोकनेते : शरद पवार

समाजमनाची नाडी कळलेले जाणते नेते म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आज देशात सर्वदूर ओळखले जातात. फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचा वारसा आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श त्यांनी ठेवला. सुसंस्कृतपणे राजकारण, समाजकारण करीत त्यांनी आपली स्वतःची ‘नाममुद्रा’ गेल्या पन्नास वर्षांच्या कालंखडावर कोरली. महाराष्ट्राच्या अर्धशतकाच्या राजकीय इतिहासाचे निर्माते ठरलेले ते एकमेव लोकनेतेे आहेत. अशा या लोकोत्तर नेतृत्वाचा 12 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्यांचे अभीष्टचिंतन.

Sharad Pawar Karjat Jamkhed Speech
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

विधिमंडळ आणि संसदीय कारकिर्दीचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचे भाग्य लाभलेले महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील शरद पवार हे पहिले नेते आहेत. ‘नेतृत्व आणि कर्तृत्व’ या दोन्ही शब्दांना नवा आयाम त्यांनी आपल्या राजकीय वर्तनाने मिळवून दिला. महाराष्ट्राच्या लोकमानसावर प्रभाव टाकणारे यशवंतरावांच्या नंतर शरद पवार हे एकमेवाद्वितीय नेते आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सहेतूक प्रयत्न आणि सर्व प्रदेशाच्या समतोल विकासाची दृष्टी त्यांनी ठेवली. सर्व समाजघटकांना आपलंसं करून सामाजिक न्यायाची भूमिका त्यांनी घेतली. इतर नेत्यांमध्ये ती विरळ दिसली.

आमचा मराठवाडा आणि शरद पवारांचे भावबंध अतूट आहेत. या प्रदेशाविषयी त्यांना कायमच ‘ममत्व’ राहिले आहे. नेहमी उदार अंत:करणाने या प्रदेशाला ते मदतीचा हात देत गेले. सार्वजनिक जीवनाच्या प्रारंभी मराठवाड्यातील नेत्यांनी त्यांना केलेले सहकार्य व दिलेले प्रेम हा धागा त्यांनी कायमच आपल्या मनात जपला. त्यातून या प्रदेशावर, इथल्या माणसांवर भरभरून प्रेमही केले. मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक विकासात अतुलनीय रचनात्मक योगदान दिले. ‘मराठवाडा’ प्रदेशाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘शिक्षण’ ही गोष्ट मूलभूत मानून यशवंतरावांच्या नंतर मराठवाड्यातील अनेक संस्थांना सहेतूकपणे बळ देणारे ते एकमेव द्रष्टे राजकीय नेतृत्व ठरले. मराठवाड्याला सर्वार्थाने ‘विकसित’ करण्यासाठी दूरदृष्टी ठेवून पवारांनी घेतलेले अनेक निर्णय ही ऐतिहासिक भूमी कदापि विसरु शकत नाही. राज्याच्या कृषी-औद्योगिक धोरणांची आखणी करीत असताना मराठवाड्याला त्यांनी कायमच झुकते माप दिले.

मराठवाड्यावरील त्यांच्या निस्सीम प्रेमाचे अनेक दाखले प्रसंगानुरुप आज या भूमीत ऐकायला मिळतात. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करता शरद पवार गेली साडे पाच दशकं राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. त्याचे कारण सामान्यातील सामान्य माणसांशी असणारा त्यांचा अतूट सहसंबंध. राजकारणात ‘मानवी संबंध’ कसे ठेवावेत याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून पवारांचा उल्लेख केला जातो. आजमितीला देशात काश्मीरपासून ते केरळपर्यंत सर्व राजकीय प्रवाहातील माणसांशी उत्तम सुसंवाद फक्त शरद पवार साधू शकतात. म्हणूनच हे ‘सुसंस्कृत नेतृत्व’ राज्यातील सामान्य कष्टकरी, वंचित, कृषक समूहाला कायमच आपले वाटते. ‘सत्ता’ असो नसो त्यांचाभोवतीचा गर्दीचा गहिवर कधी कमी झाला नाही. सत्तास्थानी किती काळ राहिले यापेक्षा सत्तास्थानी राहून लोकाभिमुख राज्य कारभार कसा करावा याचा आदर्श त्यांनी पुढील पिढीसमोर ठेवला. सत्ता येते जाते, परंतु सत्ता गेल्यानंतर ज्यांची लोकप्रियता यत्किंचितही कमी होत नाही असे ‘लोकोत्तर’ नेतृत्व युगप्रवर्तक असते.

अगदी वयाच्या अडतीसव्या वर्षी मुख्यमंत्री पदाचा बहुमान प्राप्त केल्यानंतर त्यांनी आपल्या अफाट कार्यक्षमतेने सर्वांना अचंबित केले. देशातील राजकीय परिस्थिती अनुकूल नसतानाही त्यांनी स्वाभिमानाने संघर्ष करुन महाराष्ट्राच्या जनतेशी ‘आपलेपणा’चा धागा जोडला. स्वतःविषयी जनतेत विश्वास निर्माण केला तीच त्यांची प्रचंड शक्ती ठरली. या शक्तीमुळेच राजकारणात पुढे ‘पवार आणि पावर’ हे दोन शब्द समानार्थी रुढ झाले. फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा वारसा आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या निकोप राजकीय दृष्टीचा समन्वय साधत ‘पुरोगामी विचारप्रवाहाची’ महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत ‘रुजवात’ करण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. कुटुंबातून वारशात मिळालेला सत्यशोधकीय विचार नुसता जपला नाही तर आपल्या राजकीय, सामाजिक कृतीतून त्याला समाजात संस्कारीत केले. 1978 साली मुख्यमंत्री पदाची धुरा स्वीकारल्यानंतर अवघ्या महिनाभरात ‘समतेच्या लढ्याचे प्रतीक’ असलेला नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर करून घेतला. पुढे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’, असा नामविस्तार करून त्यांनी राजकीय किंमत चुकवून समतेच्या, परिवर्तनाच्या बाजूचेच आपण आहोत हे दाखवून दिले.

मंडल आयोगाची प्रभावी व तात्काळ अंमलबजावणी असेल अशा असंख्य गोष्टी नोंदवता येतात. लोकशाही मूल्यांवर अढळ निष्ठा ठेवूनच त्यांनी आपली संसदीय कारकीर्द यशस्वी केली. धर्मनिरपेक्षता, स्रीपुरुष समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याबाबतीत त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका कायमच स्वागतार्ह होत्या. महाराष्ट्रात ‘महिला धोरण’, ‘महिला आयोग’, घटना दुरुस्तीनंतर राज्यात ‘स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना राखीव जागा’ देण्यासाठी अंमलबजावणीला तात्काळ प्राधान्य, केंद्रात संरक्षण मंत्री असताना ‘सैन्यदलात महिलांना संधी’ यासारख्या समतामूलक निर्णयामुळे समाजाच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिला गेला. त्यांची सामाजिक न्यायाची भूमिका ही वादातीत आहेच; पण या निर्णयांमुळे त्यांच्या नेतृत्वाचा अमीट ठसा उमटला. उपरोक्त बाबींमुळे पवारांना प्रतिगामी शक्तींनी कायमच सर्वच पातळ्यांवर बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र पवारांनी कधी या वर्गाच्या टीकेला भीक घातली नाही.

आजच्या घडीला शेती-मातीशी नाळ असणारे देशपातळीवरील एकमेव ‘राजकीय नेतृत्व’ म्हणून समाज आज त्यांच्याकडे पाहतो. शेतकर्‍यांच्या सुख दुःखाची आणि भवितव्याची सतत काळजी वाहणारे शरद पवार या वयातही बांधावर जाऊन शेतकर्‍यांचे दुःख ऐकतात. अन्नधान्याच्या बाबतीत ‘दुसर्‍या देशाकडे मागणी करणारा देश’ ते ‘पुरवठा करणारा देश’ अशी प्रतिमा बदलवून दाखविणारा ‘कृषीमंत्री’ म्हणून त्यांची नोंद इतिहासात झाली. महाराष्ट्रात ‘रोजगार हमी’ अंतर्गत फळबाग लागवड योजना राबवून महाराष्ट्राला फलोत्पादन क्षेत्रात जगात नावलौकिकासह शेतकर्‍यांच्या जीवनाला नवा आशय प्राप्त झाला. तो त्यांच्याच दूरदर्शीपणातून. कृषीसह कला, साहित्य, संस्कृती, क्रीडा क्षेत्रात त्यांनी कायम धुरिणात्वाची भूमिका घेतली आणि निभावली.

राज्यकर्त्यांनी कलेला राजाश्रय दिला पाहिजे, या न्यायाने त्यांनी साहित्य, कला, संस्कृती व क्रीडा क्षेत्रातील मंडळींबरोबर आपला स्नेहभाव कायम जपला. प्रसंगी अनेकांना मदतीचा हात दिला. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व क्रीडा क्षेत्रासाठी त्यांनी घेतलेले मूलभूत निर्णय राज्याच्या विकासासाठी दिशादर्शक ठरले.

शरद पवार ही काय ताकद आहे हे 2019 च्या निवडणुकीच्या निमित्ताने तरुण पिढीने अनुभवले. सगळं संपलं असे जेव्हा वाटते तेव्हा शरद पवारांसारखे लढायला शिका, हे वाक्य देशाच्या तरुणांचे ब्रीदवाक्य ठरले आहे. बलाढ्य शक्तीला हिंमत, स्वाभिमान आणि कौशल्याच्या जोरावर मात देता येते याचा वस्तुपाठ यानिमित्ताने त्यांनी महाराष्ट्रासह देशासमोर ठेवला. अफाट कार्यक्षमता, स्मरणशक्ती, सामाजिक भान, दुर्दम्य इच्छाशक्ती हे शब्द पवारांना समानअर्थी वापरले जातात. महाराष्ट्राचा भूगोल तळहातावर घेऊन राज्याच्या हितासाठी अविरत कष्ट करणारा हा नेता इतिहास निर्माता आहे.

या ‘जाणत्या’ नेतृत्वाने आपल्या संसदीय कारकिर्दीची साडेपाच दशकं पूर्ण करून नवा इतिहास रचावा. ही बाब मराठी माणसांसाठी निश्चितच भूषणावह आहे. म्हणूनच त्यांचे ‘कार्य व कर्तृत्व’ विचारात घेऊन भारत सरकारने ‘पद्मविभूषण’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे. जनतेनेही त्यांच्यावर अवीट प्रेम केले. जनतेचे प्रचंड प्रेम लाभलेल्या या लोकनेत्याला उदंड आयुष्य लाभो, हीच प्रार्थना.