घरफिचर्स‘हनिमून’ संपला आता जरा वास्तव बघूया!

‘हनिमून’ संपला आता जरा वास्तव बघूया!

Subscribe

काही वर्षांपूर्वी लोक एकमेकांना प्रश्न विचारात असत, ‘तुझ्याकडे व्हॉट्सअ‍ॅप आहे? तू फेसबुकवर आहेस?’ तो काळ विस्मरणात जावा इतक्या झपाट्याने आपण सगळे समाजमाध्यमांवर आलो आहोत. काही थोडेफार अपवाद वगळता आपल्यापैकी प्रत्येकाची ‘व्हर्चुअल आयडेंटिटी’ तयार झालीय.

आपण सगळेच समाजमाध्यमांमध्ये दिसतो तसेच असतो असंही नाही आणि दिसतो त्यापेक्षा वेगळे असतो असंही नाही! ही माध्यमं समाजाचा समूह म्हणून चेहरा पुढे आणतात, त्याचबरोबर सामाजिक असली तरीही ही माध्यमं कमालीची वैयक्तिक आहेत, खासगी आहेत…

काही वर्षांपूर्वी लोक एकमेकांना प्रश्न विचारात असत, ‘तुझ्याकडे व्हॉट्सअ‍ॅप आहे? तू फेसबुकवर आहेस?’
तो काळ विस्मरणात जावा इतक्या झपाट्याने आपण सगळे समाजमाध्यमांवर आलो आहोत. काही थोडेफार अपवाद वगळता आपल्यापैकी प्रत्येकाची ‘व्हर्चुअल आयडेंटिटी’ तयार झालीय. ‘डिटॉक्सिकेशन’ चे कितीही झटके आपल्यापैकी कुणालाही कितीहीवेळा येवोत आपण फिरून-फिरून या माध्यमकट्ट्यांवर येत असतो. तिथे न फिरकता आता आपल्याला करमत नाही. आपल्यातले काही फारसे बोलत नाहीत, ’स्ट्रॅटेजी’ म्हणून कुणालाच लाईक करत नाहीत, तर काहीजण अखंड वेळ निरनिराळे विषय मांडत असतात. काही जण फक्त वादापुरते येतात तर काही जण वाद वाचून मनोरंजन करण्यासाठी येता-जाता या कट्ट्यांवर डोकावत असतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती!

- Advertisement -

www.statista.com या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार २०२२ पर्यंत एकट्या भारतात ३७० दशलक्ष लोक समाजमाध्यमांवर असणार आहेत. म्हणजेच ३७० दशलक्ष लोक त्यांच्या वास्तव आयुष्यातला काही वेळ काढून या ‘व्हर्चुअल जगा’त वावरणार आहेत. इथले विविध प्लॅटफॉर्म्स उदा. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, युट्युब, स्नॅपचॅट, टेलिग्राम वापरणार आहेत. त्यावर मतं मांडणार आहेत. वाद घालणार आहेत. या माध्यमांचा उपयोग करून घेणार आहेत आणि या माध्यमांच्या दुष्परिणांचे बळीही (काही टक्के अपवाद वगळता) ठरणार आहेत. हे सगळं आताही चालूच आहे, पण त्यात जवळपास १०० दशलक्षहून अधिक लोकांची भर पडणार आहे. आपण सारे वापरकर्ते या माध्यमांचा कसा वापर करून घेऊ यावर ही माध्यमे आपल्या उपयोगाची ठरतात की आपण त्यांच्या हातातले खेळणे बनतो हे ठरणार आहे. आभासी आणि प्रत्यक्ष जगाच्या सीमारेषा धूसर होत चालल्यात. आभासी जगात घडणार्‍या घटनांचे पडसाद प्रत्यक्ष जगण्यावर पडताना दिसू लागलेत.

समाजमाध्यमातून निर्माण होणार्‍या ‘फोमो’ (फिअर ऑफ मिसिंग आऊट) सारख्या आजाराची मानसिक आजारात गणती झालीय. ‘समाजमाध्यमांचा अतिवापर व्यसन आहे’ हे आता मान्य झालंय, तर दुसरीकडे समाजबांधणीसाठी, आधार व्यवस्थांसाठी समाजमाध्यमांचा अतिशय चांगला उपयोगही सुरु झालाय. आधुनिकीकरणाने माणसांची जी असंख्य बेटं तयार केलीत, ती एकमेकांना जोडण्याचा प्रयत्नही समाजमाध्यमांमुळेच शक्य झालाय. एरवी आपापल्या कामात, आयुष्यात आणि जगात व्यस्त असणार्‍या माणसांना सहजतेनं एकमेकांशी जोडले जाण्याची संधीही याच माध्यमांनी उपलब्ध करून दिलीय. इथे ट्रोलिंग होतं, तसंच ट्रोलिंग करणार्‍या व्यक्तीच्या विरोधात माणसे उभीही राहतात.

- Advertisement -

एक लक्षात घेतलं पाहिजे, की या माध्यमांना स्वतःचा स्वभाव नाही, ओळख नाही. रंग, रूप नाही. वापरणार्‍या व्यक्तीचा स्वभाव ही माध्यमे घेतात. वापरणार्‍या व्यक्तीची वृत्ती या माध्यमांची वृत्ती बनून जाते. त्यामुळे इथे ‘दोन अधिक दोन चार’ हा हिशेब मांडता येऊच शकत नाही. ‘ही माध्यमे वाईटच आहेत’ असं सरसकट म्हणता येत नाही तसंच ‘चांगली आहेत’ अशी पावतीही देता येत नाही. ‘माणसांचा खरा चेहरा दिसतो’ असंही म्हणता येत नाही आणि ‘माणसांचे खरे चेहरे लपून राहतात’ असंही म्हणू शकत नाही. आपण सगळेच समाजमाध्यमांमध्ये दिसतो तसेच असतो असंही नाही आणि दिसतो त्यापेक्षा वेगळे असतो असंही नाही! ही माध्यमं समाजाचा समूह म्हणून चेहरा पुढे आणतात, त्याचबरोबर सामाजिक असली तरीही ही माध्यमं कमालीची वैयक्तिक आहेत, खासगी आहेत.

ही माध्यमं काही प्रमाणात आपल्या समाजाचं, विचार, वृत्ती आणि प्रवृत्तीचं प्रतिबिंब दाखवायला मदत करतात. हे प्रतिबिंब दरवेळी सुंदर असतंच असं नाही, ते विकृत आणि विद्रूपही असतं. ते त्रासदायक असतं, आल्हाददायक असतं. त्यात नकार ठासून भरलेला असतो तसंच सकाराची पालवीही फुटलेली बघायला मिळू शकते. आपला समाज जितक्या वैविध्यांनी नटलेला आहेत तितकंच वैविध्य या समाज माध्यमातून बघायला मिळतं. आपला समाज आणि समाज माध्यमे आता दोन वेगळे घटक उरलेले नाहीत. ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. म्हणूनच त्यांच्या विश्लेषणाची, समाजमाध्यमात नक्की काय चालू आहे, माणसांचे चेहरे कसे दिसत आहेत, हे प्रतिबिंब आपल्याला काय सांगू बघतंय हे लक्षपूर्वक बघणं आणि नोंदवणं आवश्यक आहे.

आर्थिक गट, जातीय व्यवस्था, लिंगभेद, विचारधारा, मतप्रवाह असे कितीतरी पैलू समाजमाध्यमांच्या वापराला आहेत. ते समजून घेण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. आपल्याकडे नेहमीच माध्यमं येतात, आपण ती धडाक्यात वापरायला लागतो; पण त्याच्या साक्षरतेचा विचार करत नाही. समाजमाध्यमांच्या निरक्षरतेचे, अर्ध-साक्षरतेचे दुष्परिणाम आपण भोगायला सुरुवात केलीय. हा परिणाम फक्त मोठ्यांवर होतोय असं नाही तर तो लहान मुलांवरही होतो आहे.

समाजमाध्यमांचा आपल्या आयुष्यातला ‘हनिमून’ काळ संपला आहे. समाज माध्यमांचा खर्‍या अर्थाने ‘स्मार्ट वापर’ करण्याकडे आपण जाण्याची आवश्यकता आहे. हातात फोन आहे, त्यावरचा नेट पॅक जवळपास फुकट असावा इतका स्वस्त आहे म्हणून आपण काहीही वाचावे, ऐकावे बोलावे, फॉरवर्ड करावे असा त्याचा अर्थ होत नाही. सोशल मिडियावर वावरत असताना आपल्या प्रत्येक कृतीची जबाबदारी घेण्याच्या दिशेने हा प्रवास करणं आवश्यक आहे. माध्यम शिक्षण, माध्यम साक्षरता आवश्यक आहे ते याचसाठी!

नेटपॅकचे गुलाम बनून सोशल नेटवर्किंग साईट्सवर पडीक राहण्यापेक्षा या माध्यमांचा सजग आणि समंजस वापर करण्याकडे जाण्याची आज आवश्यकता आहे. आपल्याच वर्तनाकडे त्रयस्थ नजरेतून बघण्याची आवश्यकता आहे. समाजमाध्यमांवर आपण असतो म्हणजे नेमकं काय घडतंय हे समजून घेण्याची गरज आहे. आपल्यात होणार्‍या मनोसामाजिक बदलांना नोंदवण्याची गरज आहे. या लेखमालेतून हाच सारा आढावा घेण्याचा प्रयत्न असेल!


-मुक्ता चैतन्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -