Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स अ‍ॅप्सचे अर्थकारण अन् सामान्यांच्या खिशाला कात्री!

अ‍ॅप्सचे अर्थकारण अन् सामान्यांच्या खिशाला कात्री!

फेसबूक, इन्स्टाग्राम आदी फेसबूक अकाऊंट हॅक करून मदत मागण्याच्या अनेक घटना एका पाठोपाठ एक घडताहेत. शासकीय नोकरीला असलेल्या व्यक्तीच्या नावेच पैसे उकळले जातात. मला करोनाची लागण झाली असून रुग्णालयात भरण्यासाठी माझ्याकडे पैसे शिल्लक राहिले नसल्याचे मेसेज आपल्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर येतात. आपल्याला वाटते, मित्राला अडचणीत मदत केलीच पाहिजे म्हणून आपण चांगल्या भावनेने मदतही करतो, पण प्रत्यक्ष फोन करून विचारणा केल्यास असे लक्षात येते की, आपल्या मित्राने असा मेसेजच पाठवला नव्हता. मग आपली मदत गेली कुठे? असा प्रश्न अनेकांना संभ्रमित करतो. आपले फेसबूक, इन्स्टाग्राम, जी-मेलचा पासवर्ड सातत्याने बदलण्याची गरज आहे. अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात येताच सायबर तज्ज्ञांची मदत घ्या.

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाला पुरेसा वेळ मिळाल्याने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियाचा वापर दुपटीने वाढला. त्यासोबत ऑनलाईन फसवणुकीचे प्रकारही झपाट्याने वाढल्याने आता अनेकांची डोकेदुखी वाढू लागली आहे. आपल्या फेसबूक, इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पैसे मागितले जात असल्याच्या घटना दोन महिन्यांच्या कालावधीत घडल्या. प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाने अगदी दोन ते तीन हजारांपासून पैसे उकळण्याचा हा धंदाच झाला आहे. यापासून सावध राहण्याची हीच योग्य वेळ असून तंत्रज्ञानाच्या युगात आपण सजग राहिलो नाही तर, अकाऊंटवर पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते.

तंत्रज्ञानाच्या युगात जग झपाट्याने बदलत आहे. जगातील कानाकोपर्‍यात असलेल्या व्यक्तीला आपण सहज बघू शकतो, त्याच्याशी संवाद साधू शकतो. मोबाईच्या रूपाने अगदी तळहातावर सामावलेले जग आता वेगळेच वळण घेत आहे. सोशल मीडियाच्या रूपाने अनेक घोटाळे उघडकीस येत आहेत. यात व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूकचे बनावट अकाऊंट तयार केले जाते. त्याद्वारे तुमच्याशी मैत्री करून तुमचा स्वभाव ओळखला जातो. एकाकी पडलेल्या व्यक्तींना ही व्यक्ती आपलेसे करते. त्याच्याशी घट्ट मैत्री झाल्यानंतर हळूहळू व्यावसायिक गोष्टींकडे वळते. मला तुला एक गिफ्ट पाठवायचे आहे. तुझा पत्ता सांग. आपण म्हणतो, फक्त पत्त्याने काय होणार म्हणून तो सहज देऊन टाकतो. विदेशातून पाठवलेले हे गिफ्ट दिल्लीत, बंगळूरू, मुंबईत अडकले असून त्यासाठी काही ‘नॉमिनल’ चार्जेस भरावे लागतील, असा एखादा फोन येतो. त्यामुळे आपली खात्री पटते की, आपल्याला खरंच गिफ्ट आले आहे. गिफ्टची किंमत ५० हजार असेल तर पाच हजार रुपये मागितले जातात. त्यासाठी एखादी लिंक दिली जाते. त्यानंतर मोबाईलवर ओटीपी पाठवून तो मागितला जातो. आपणही अगदी सहज त्यांना ही माहिती देवून टाकतो. त्यानंतर आपल्या लक्षात येते की पाच हजार रुपये मागितलेले असताना आपल्या अकाऊंटवरून १० हजार रुपये गायब झाले. मग ते पुन्हा फोन करून सांगतात की, चुकीने तुमचे जास्त पैसे आले आहेत. तुमच्या अकाऊंटवर परत पाठवतो म्हणून विचारणा करतात आणि अगदी नकळत विचारतात की, किती पैसे होते ते तपासा. आपणही त्यांना प्रतिसाद देतो व पैसे परत मिळवण्याच्या नादात आपली एकूण रक्कम सांगतो. समजा अकाऊंटवर एक लाख रुपये असतील आणि १० हजार रुपये कमी झाले तर आपण बोलण्याच्या ओघात ९० हजार रुपये शिल्लक असल्याचे सांगतो. त्यामुळे हॅकर पुढच्या वेळी दहाऐवजी ५० हजार रुपये काढून घेतो आणि फोन बंद करून टाकतो. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आपण फोन करण्याचा प्रयत्न करतो, पण त्याचा फोनच लागत नाही. अशा स्वरूपाचे अनेक प्रकार आता उघड होऊ लागले आहेत.

- Advertisement -

नाशिक जिल्हा परिषदेतील एका शिक्षिकेचे अशाच प्रकारे साडेचार लाख रुपये हॅकरने लुबाडले. आर्थिक फसवणुकीचे प्रकार नियमित घडत असताना लोक त्याला बळी कसे पडतात, असा प्रश्नही आपल्याला पडतो. विशेष म्हणजे यात सुशिक्षित नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. यामागील कारणे आपण लक्षात घेतली तर असे जाणवते की, फसवणुकीचे प्रकार सातत्याने बदलत आहेत. आपले फेसबूक, इन्स्टाग्राम आदी फेसबूक अकाऊंट हॅक करुन मदत मागण्याच्या अनेक घटना एका पाठोपाठ एक घडताहेत. शासकीय नोकरीला असलेल्या व्यक्तीच्या नावेच पैसे उकळले जातात. मला करोनाची लागण झाली असून रुग्णालयात भरण्यासाठी माझ्याकडे पैसे शिल्लक राहिले नसल्याचे मेसेज आपल्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर येतात. आपल्याला वाटते, मित्राला अडचणीत मदत केलीच पाहिजे म्हणून आपण चांगल्या भावनेने मदतही करतो, पण प्रत्यक्ष फोन करून विचारणा केल्यास असे लक्षात येते की, आपल्या मित्राने असा मेसेजच पाठवला नव्हता. मग आपली मदत गेले कोठे? असा प्रश्न अनेकांना संभ्रमित करतो. आपले फेसबूक, इन्स्टाग्राम, जी-मेलचा पासवर्ड सातत्याने

बदलण्याची गरज आहे. अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात येताच सायबर तज्ज्ञांची मदत घ्या. तुमचा ओटीपी, नाव, पत्ता, फोन नंबर अशी माहिती मिळवून फसवणूक केली जाते. अशी माहिती सहजासहजी कोणालाही देवू नका. ऑनलाईन फसवणुकीसाठी गुगल पे, फोन पेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे जाणवते. त्यावर यूपीआय लिंक पाठवून तुम्हाला पैसे पाठवत असल्याचे भासवले जाते. आपणही पैसे मिळणार म्हटल्यावर अगदी हवेत जातो आणि वाटेल त्या लिंकवर क्लिक करून ओटीपी देवून बसतो. मुळात पैसे घेण्यासाठी कोणत्याही स्वरूपाच्या ओटीपीची गरज नसते, हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षणाचा फार झपाट्याने प्रसार झाला. झूम, गुगल मीट आदी अ‍ॅपद्वारे आता सर्रासपणे मिटिंग्ज घेतल्या जातात. मुलांचे वर्गही भरतात. त्यामुळे पालकांना शिक्षणाची चिंता मिटलेली वाटत असली तरी आता नवीनच टेंशन सुरू झाले आहे. ऑनलाईन लेक्चर घेत असताना येणार्‍या पॉर्न फिल्मच्या लिंक्समुळे ‘ऑनलाईन शिक्षण की पॉर्न फिल्मला निमंत्रण’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. कारण मोबाईलवर येणार्‍या लिंक्सवर क्लिक केल्यानंतर पॉर्न फिल्म सुरू होते. त्यामुळे मुलांना एकटे सोडता येत नाही. एकदा पॉर्न फिल्म बघितली की मुलांचे आकर्षण अधिक वाढते. सातत्याने त्या साईटवर जाणार्‍यांचे प्रमाणही हल्ली खूप वाढले आहे. एकटे राहून नैराश्य आलेली तरुण मुले-मुली अशा वेबसाईटच्या मोहात पडतात. परिणामी, अनैसर्गिक कृत्य घडण्याची भीती आता वाढली आहे. पालकांच्या चिंतेत भर घालणारी ही गोष्ट असल्याने मोबाईलचा वापर अगदी कमी केला पाहिजे. मुलांच्या हातात फक्त एक तास मोबाईल दिला पाहिजे. कमीत कमी वेळ ऑनलाईन कसे राहतील, याची काळजीही घ्यावीच लागेल. फक्त मुलांना आवडते म्हणून त्यांना मोबाईल खेळायला देवू नका. झूम, गुगल मीट या अ‍ॅप्सच्या वापरामागेही फार मोठे अर्थकारण दडले आहे. लाखो व्यक्ती आता हे अ‍ॅप प्ले-स्टोअरवरून डाऊनलोड करतात. अ‍ॅप डाऊनलोड करताना आपण वैयक्तिक माहिती देत असतो. आपल्याला असे वाटते की या माहितीचा कंपनीला काय उपयोग होणार? परंतु, मोबाईल, लॅपटॉप आदी इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स वापरणार्‍या व्यक्तींचे मार्केट काबीज करण्यासाठी या माहितीचा उपयोग करून घेतला जातो. पूर्वी मोबाईलची किंमत हजारो रुपये होती. आता ती अगदी कमी झाल्याचे दिसते. त्यामागे हेच कारण आहे की, सर्वात चांगले फिचर्स असलेला मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप स्वस्तात दिला जातो. त्याची जाहिरात केली जाते. त्यामुळे आपणही मोहात पडतो आणि ती वस्तू खरेदी करतो. मोबाईलमध्ये असे अनेक अ‍ॅप आहेत की ज्यामुळे आपल्या मोबाईलचा डेटा चोरीस जाऊ शकतो. यात प्रामुख्याने टिकटॉक, फेसमेकर, हेलो आदी अ‍ॅपचा समावेश आहे. मोबाईलच्या प्रेमात पडून आत्मघात करून घेण्यापेक्षा सतर्क राहण्याची हीच योग्य वेळ आहे.

या बाबी टाळा

* फिशिंग लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला पैसे मिळतील.
* तुमचे व्हिडिओ आणि फोटो आम्ही सोशल मीडियावर टाकून देऊ असे मेल आणि मेसेज येतात.
* तुमचा फोन हॅक केला आहे, तुमच्या सर्व चॅट्स आमच्याकडे असून तुमच्या मित्रांना पाठवून देऊ.
* ओटीपी मागितला जातो आणि त्यावर गूगल पे फोन पेवरून यूपीआय लिंकवर पैसे क्रेडिट करतोय असा कॉल करतात.
* क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचे व्यवहार बंद होतील म्हणून फसवणूक केली जाते.
* मित्र-मैत्रीण बनून परदेशातून पैसे आणि गिफ्ट पाठवते आहे, असे सांगितले जाते. कस्टम ड्युटीमधून आम्ही बोलतोय.
अपलोड किंवा जीएसटीचे पैसे द्यावे लागतील, म्हणून पैसे उकळतात.
* लोनसाठी, जॉबसाठी नोंदणी करून कॉल करून गूगल पे, फोन पेवरून युपीए लिंकवरून पैसे उकळतात.
* तुमचा पासवर्ड जर जुना असेल तर लवकर बदला कारण आता, सर्वात जास्त फेसबूक हॅक करून पैसे मागण्याचे प्रकार
वाढले आहेत.
* मॅट्रिमोनिअल लिंकवरून रेजिस्ट्रेशन करून गूगल पे, फोन पेवरून यूपीआय लिंकवर पैसे उकळले जातात.
* जुना फोन आहे म्हणून तुम्ही विकून टाकल्यास तो फोन एखाद्या विकृत व्यक्तीच्या हातात सापडल्यास त्यातील
फोटोतून फेसबूक अकाऊंट बनवणे आणि तुम्हाला व तुमच्या फ्रेंड्सला त्रास देणे, फोटो व्हायरल करण्याची धमकी देणे.

सुरक्षित राहण्यासाठी काय काळजी घ्याल?

* जर एखादे अ‍ॅप तुम्ही क्वचितच वापरत असाल, तर लागेल तेव्हाच डाऊनलोड करा आणि काम झाले की डिलीट करा.
* तुमच्या सर्व अकाऊंट्सना सेकंड स्टेप ऑफ व्हेरिफिकेशन, टोकन सिक्युरिटी वापरा आणि अकाऊंटला काही प्रॉब्लेम आल्यास बॅकअप बटण दाबून अकाऊंट पुन्हा सुरू करा.
* तुम्हाला ज्या अ‍ॅपवर मेसेज आला आहे (व्हॉट्सअ‍ॅप किंवा फेसबूक) तिथे तुम्ही ‘रिपोर्ट अब्युज’ करू शकता. म्हणजे संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकेल.
* तुमचा वन टाइम पासवर्ड (ओटीपी), अकाऊंटचा पासवर्ड, तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर अशी माहिती मिळवून फसवणूक केली जाते. अशी माहिती सहजासहजी कोणालाही देऊ नये.
* तुमचा मोबाईल शक्यतो इतरांच्या हाती कधीच देऊ नका. एखादा निष्णात हॅकर काही सेकंदात मोबाईल हॅक करू शकतो.
* मोबाईलमध्ये अँटीव्हायरस आणि फायरवॉल सतत सुरू ठेवा. स्कॅन करा आणि रेग्युलर अपडेट करत राहा.
* प्ले स्टोअरवरून अ‍ॅप डाऊनलोड करताना कोणकोणत्या परमिशन्स दिल्या आहेत, ते तपासा आणि अनावश्यक असलेल्या सर्व परमिशन्स काढून टाका.
* काम झाल्यावर कॉम्प्युटर, वायफाय, ब्लू टूथ, एनएफसी बंद करा.
* तुम्ही जेव्हा सार्वजनिक ठिकाणी असाल तेव्हा सोशल नेटवर्क साईट, ई-मेल तसेच बँकेचे अकाऊंट कधीही ओपन करू नका.
*असे मेसेज येणारे नंबर किंवा ई-मेल्सना तुम्ही तुमच्या सेटिंगमधून ब्लॉक करुन सुरक्षित राहू शकता.
* असे मेसेज पाठवणार्‍या व्यक्तीवर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता. त्याच्यासाठी भारतात सायबर लॉ आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारच्या अडचणीत सापडले असाल तर जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करा.

अमर ठाकरे (लेखक सायबर तज्ज्ञ आणि लुमिवर्स सोल्युशन्सचे एम.डी. तसेच सीईओ आहेत)

 

- Advertisement -