घरफिचर्ससोशल मीडिया प्राथमिक गरज की चैनीची वस्तू ?

सोशल मीडिया प्राथमिक गरज की चैनीची वस्तू ?

Subscribe

समाज माध्यमांचा वापर करत असताना याकडे दोन्ही बाजूंनी पाहणे आवश्यक आहे. फायद्या तोट्यांचा विचार करण्यापूर्वी आपण सुरुवातीला जाणून घेऊयात की या सर्व माध्यमांचा वापर आजच्या युवापिढीत कशाप्रकारे होत आहे. मुळात सोशल मीडियाचं वय हे अगदी दहा ते बारा वर्षाचे आहे. काही सोशल मीडियाचे अ‍ॅप्स तर अलीकडे एक-दोन वर्षापूर्वी तयार केले गेले आहेत. सांगायचा मुद्दा हा की कोणत्याही व्यक्तीच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतर ती व्यक्ती आपल्या चैनीच्या किंवा इतर गरजांकडे वळत असते. युवकांच्या बाबतीत नेमके ते होताना दिसत आहे का...? किंवा सोशल मीडिया ही त्यांची चैनीची गरज झाली आहे का ..?

सरत्या वर्षाला निरोप देऊन आपण 2020 या नवीन वर्षात पदार्पण केले आहे. खरे तर आपल्या आठवणींना आपण नेहमीच उजाळा देत असतो आणि समोर मार्गक्रमण करत असतो. हे सदर लिहीत असताना अनेक गोष्टींची आठवण येत गेली. लिहिलेली पत्र, वहीत लिहिलेल्या चारोळ्या, शेरोशायरी, एखादी कादंबरी किंवा पुस्तक वाचताना त्यातील आवडलेली वाक्य, प्रवासवर्णन, हे सर्व लिहीत असताना वेगळी मजा येत असे. मित्र-मैत्रिणी, कुटुंब एकत्र आल्यानंतर त्यांच्यासोबत मारलेल्या गप्पा, रुसवे-फुगवे सर्वच कसं आनंददायी असायचं. या गोष्टी सांगण्याचे कारण हेच की या सर्वांची जागा आता आपल्या हातात असणार्‍या मोबाईलने घेतली आहे.

भारतात औद्योगिक क्रांती झाल्यानंतर ज्याप्रमाणे विकासाला सुरुवात झाली अगदी त्याचप्रमाणे भारतात मोबाईल आला तेव्हापासून आजचा युवा वर्ग बोलता झाला. व्यक्तिमत्व विकासाला महत्त्व देत व्यक्त होण्याला अग्रक्रम देऊ लागला. खरे तर मोबाईलची क्रांती झाली व आपण जगाशी जोडले गेलो. त्याचे कारण म्हणजे मोबाईल आता फक्त साधा मेसेज किंवा फोन करण्यापुरता मर्यादित राहिला नसून त्याद्वारे आपण इंटरनेटच्या मदतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल, फोटो पाठवणे, व्हिडिओ पाठवणे, लाईव्ह लोकेशन शेअर करणे, एखाद्या ठिकाणी घडणार्‍या गोष्टींचा लाईव्ह व्हिडिओ पाठवणे, आपले विचार, लेख, कविता या सर्व गोष्टींची देवाण-घेवाण सोशल मीडियाद्वारे होताना दिसत आहे.

- Advertisement -

आज घडीला ज्या वयोगटाला आपण तरुण वर्ग म्हणतो त्या सर्वांजवळ अँड्रॉइड फोन आहेत. त्यामध्ये समाज माध्यमांचे विविध अ‍ॅप्स आहेत. जसे की इंस्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक, ट्विटर, जी-मेल, टिक-टॉक, शेअर चॅट, यूट्यूब, मेसेंजर, गुगल प्लस, हँगआऊट, टेलिग्राम इत्यादींचा वापर आजचा युवावर्ग सहजपणे करत आहे. हाच सोशल मीडिया आज तरुणाईच्या जगण्याचा भाग झाला आहे. ज्यामुळे ते आज सर्व गोष्टींची माहिती मिळवून विचारांची देवाण घेवाण करताना दिसून येतात.

समाज माध्यमांचा वापर करत असताना याकडे दोन्ही बाजूंनी पाहणे आवश्यक आहे. फायद्या तोट्यांचा विचार करण्यापूर्वी आपण सुरुवातीला जाणून घेऊयात की या सर्व माध्यमांचा वापर आजच्या युवापिढीत कशाप्रकारे होत आहे. मुळात सोशल मीडियाचं वय हे अगदी दहा ते बारा वर्षाचे आहे. काही सोशल मीडियाचे अ‍ॅप्स तर अलीकडे एक-दोन वर्षापूर्वी तयार केले गेले आहेत. सांगायचा मुद्दा हा की कोणत्याही व्यक्तीच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतर ती व्यक्ती आपल्या चैनीच्या किंवा इतर गरजांकडे वळत असते. युवकांच्या बाबतीत नेमके ते होताना दिसत आहे का…? किंवा सोशल मीडिया ही त्यांची चैनीची गरज झाली आहे का ..? किंवा सोशल मीडिया ही तरुणाईची अन्न ,वस्त्र आणि निवारा यानंतरची आवश्यक गरज झाली आहे का..? याचे उत्तर शोधणे तितकेच गरजेचे आहे. वर्तमान परिस्थितीमध्ये भोवतालच्या जगात युवावर्ग समाज माध्यमांद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण करताना दिसत आहे. 2011-12 च्या काळात ज्यावेळी इजिप्त या देशांमध्ये फेसबूकच्या माध्यमातून त्या देशातील सर्व युवक एकत्र आले व त्यांनी हुकूमशहाच्याविरोधात बंड पुकारले.

- Advertisement -

त्यावेळी त्यांनाही वाटले नव्हते की तिथे हुकूमशाही जाऊन लोकशाही प्रस्थापित होईल. पण त्यांच्या फेसबूकच्या प्रभावी वापराने नवी जाणीव जागृती निर्माण झाली व लोकशाही स्थापन झाली. त्यानंतर खर्‍या अर्थाने वेगवेगळ्या देशांसह भारतातील युवकांनी याची प्रेरणा घेऊन फेसबुकची व्यक्त होण्याचे माध्यम म्हणून निवड केली. आज क्वचित एखादा युवक सापडेल ज्याचे फेसबुकचे खाते नाही. असे म्हणतात की संवाद शास्त्रात प्रतिसाद या क्रियेला जास्तीत जास्त महत्त्व असते. नेमके ते आजच्या समाज माध्यमांच्या युगात होताना दिसत आहे. राजकीय ,सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, विज्ञान, पर्यावरण, बेरोजगारी, महिलांचे प्रश्न त्यांच्या समस्या, तृतीयपंथीयांच्या समस्या, आरोग्य, स्वच्छता समाजातील घडणार्‍या अनेक गोष्टींवर आजची तरुणाई व्यक्त होत आहे. चांगल्या वाईट गोष्टींवर चर्चा करत आहे. सरकार, संबंधित संस्था किंवा व्यक्तीला त्याची दखल घेण्यास भाग पाडत आहे. ताजे उदाहरण घ्यायचे झाले तर एन.आर.सी. व सी.ए.बी.च्या विरोधात जे आंदोलन पेटले. त्या आंदोलनाला ज्या गतीने देशभरातून पाठिंबा मिळाला त्याचे सर्व श्रेय आजच्या समाज माध्यम वापरकर्त्यांना म्हणजे युवावर्गाला जाते. तसेच जे लोक एन.आर.सी.आणि सी.ए.बी. च्या बाजूने उभे होते त्यांची मतेसुद्धा याच सोशल मीडियाद्वारे सगळीकडे एकमेकांनी पोहोचवली. म्हणजे काय तर दोन्ही बाजूने या ठिकाणी मत मांडले जाते ही सोशल मीडियाची लोकशाही या ठिकाणी पाहायला मिळते.

एकूणच काय तर आजचा युवक सोशल मीडियामुळे जागृत होत आहे. व्यक्त होऊ पाहत आहे. ज्याप्रमाणे चांगल्या गोष्टींना युवावर्ग समाजमाध्यमांद्वारे प्रसिद्धी देत आहे. त्याच प्रमाणे वाईट गोष्टींना ट्रोलसुद्धा केले जात आहे. उदाहरण द्यायचे झाले तर राणू मंडल ही रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर गाणी गाऊन उदरनिर्वाह चालवणारी एक अत्यंत साधी महिला …जीचा कोणीतरी गाणे गातानाचा व्हिडिओ चित्रीत केला व समाज माध्यमांवर अपलोड केला. काही तासातच लाखो लाईक्स त्या व्हिडिओला मिळाल्या. अनेकांनी तो व्हिडिओ पाहिला. शेअरसुद्धा केला आणि तिच्या जीवनाचा प्लॅटफॉर्म बदलला. त्यानंतर काही दिवसातच तिच्या मेकअपच्या संदर्भाने तिला सोशल मीडिया वरती ट्रोल केले गेले. ज्या वापरकर्त्यांनी तिला प्रसिद्धी दिली त्याच लोकांनी तिला ट्रोल केले. (त्याची सत्यता नंतर उघड झाली ती बाब वेगळी )एकूणच काय तर येथे चर्चा घडवून आणली जाते त्यावर स्पष्टपणे बोलले जाते.

दुसरे एक उदाहरण आपल्यासमोर आहे. प्रियंका रेड्डीवर बलात्कार झाला आणि भारतभरातून लोकांनी मारेकर्‍यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. काही दिवसांनी मारेकर्‍यांना पकडण्यात आले व त्यांचे एन्काऊंटर करण्यात आले. जे सोशल मीडियाचे वापरकर्ते मारेकर्‍यांना शिक्षा झाली पाहिजे, असे बोलत होते. त्यांनीच पुन्हा आपल्या भावना व्यक्त केल्या की शिक्षा देणे योग्य, पण मानव अधिकाराच्या दृष्टिकोनातून हे अयोग्य आहे. न्यायिक प्रक्रियेतून त्यांना शिक्षा व्हायला हवी होती, असा एक सूर त्यातून दिसत होता. ही दोन्ही उदाहरणे वेगवेगळी आहेत, पण आजच्या युवावर्गाचा या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टीकोण सोशल मीडियामुळे बदलत आहे. हे आपण मान्य केले पाहिजे.

नव्या पिढीचे नवे विषय, नव्या जाणिवा या सर्वांचा आधारस्तंभ हक्काचे खुले व्यासपीठ म्हणजेच आजच्या घडीला सोशल मीडिया आहे. संसदेपासून ते रस्त्यापर्यंत आणि वर उल्लेख केला त्याप्रमाणे सर्वच क्षेत्रातील घडामोडींवर आजपर्यंत जो युवक कधीच बोलला नाही, किंवा बोलू दिले नाही ..त्याने कधी लिहिले नाही किंवा लिहू दिले नाही…तो युवक स्वतःचे मत आणि विचार सोशल मीडियावर मांडत आहे. स्वतःचे युट्युब चॅनेल सुरू करून त्यावर व्यक्त होत आहे. प्रसंगी फेसबूकवर लॉग इन करून लाईव्ह येत आहे . टिक-टॉकवर वेगवेगळ्या गाण्यावर अभिनय सादर करत आहे. व्यंगात्मक व्हिडिओ बनवत आहे. दखल घ्यावयास भाग पाडत आहे. प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया त्यांच्या संपादकांना एक भूमिका घ्यावी लागते. आज सोशल मीडियाने भूमिकेचे मापदंड बदलले आहेत.

प्रत्येक जण वेगवेगळ्या भूमिकेतून आपले लिखाण शेअर करत आहेत. आपले म्हणणे बिनदिक्कतपणे मांडत आहे. एकूणच काय तर या सर्व गोष्टींचा चांगला फायदा घेणारे युवक आहेत. त्यांची ही धडपड पाहून विविध वृत्तवाहिन्या कव्हर स्टोरीसुद्धा बनवताना दिसत आहेत. म्हणजेच यूट्युब, फेसबूक, टिक टॉक, इंस्टाग्राम यावर एखादा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याला किती लोक पाहतात, किती लोक लाईक करतात, सबस्क्राईब करतात …या आधारावर जाहिरातींच्या आणि इतर माध्यमांमधून त्यांना त्या त्या कंपन्या पैसे देऊ करतात. म्हणजेच या ठिकाणी असे बरेच युवक आहेत जे स्वतःचा रोजगार सोशल मीडियावर शोधताना दिसतात. हा अत्यंत महत्त्वाचा फायदा युवक स्वतः करून घेताना दिसत आहेत.

सोशल मीडियाचा वापर करत असताना जसे सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. तशाच काही नकारात्मक गोष्टी इथे होताना दिसतात. पण काही गोष्टी काही अंशी नकारात्मक जरी वाटत असल्या तरी त्या आजच्या पिढीची एक वेगळी भाषा बोलत आहेत. अनेक शब्दांचे शॉर्टफॉर्म तयार केले आहेत. इथे संवादाची भाषा बदलली, आणि ती भाषा त्यांनाच समजते जे सोशल मीडियाचा वापर करतात. एकमेकांना शुभेच्छा देताना किंवा भावना व्यक्त करताना वेगवेगळ्या स्माईलीचा वापर होताना दिसतो. व्हायरल जगात कोणतीच गोष्ट गुपितसुद्धा राहत नाही. या गोष्टींवर बोलताना युवक स्पष्ट म्हणतात की, आम्ही सोशल मीडियाचा वापर खूप चांगला करत आहोत. तेच आमचे व्यक्त होण्याचे माध्यम आहे.

सर्वसाधारण व्यक्ती विचार करू शकणार नाही एवढी कल्पकता सोशल मीडियावर युवावर्ग दाखवत आहे. काही विशेष गोष्टींचा ट्रेंड इथे चालवला जातो. प्रेमाची भाषा बदलली आहे. पत्र लिहिली जातात पण मॅसेंजरवर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर..एखाद्या ग्रुपमध्ये चार ते पाच मित्र-मैत्रिणी किंवा कुटुंबातील व्यक्ती असतात. तिथे कधी कधी समोरासमोर बोलता न येणार्‍या गोष्टींवर बोलले जाते. प्रश्नांची उत्तरं मिळवली जातात. त्यातून मानसिक समाधान मिळते. आपल्या समूहात कोणकोण असावे की ज्यांच्या विचारांचा आपल्याला फायदा होईल. त्या त्या व्यक्तीला सामावून घेतले जाते. तिथे सर्वांना बोलण्याचे स्वतंत्र दिले जाते. सकारात्मक-नकारात्मक दोन्ही अंगाने चर्चा होत असते जी युवकांना नवी दिशा प्राप्त करून देते.

या सर्व सकारात्मक गोष्टींचा ज्यावेळी आपण विचार करतो, त्याच वेळी सोशल मीडियाच्या बाजूने नकारात्मक गोष्टीसुद्धा घडत आहेत. त्याला वापरणारा वर्ग हा युवावर्ग आहे. एखाद्या अ‍ॅप्सला डाऊनलोड करून त्यामध्ये लॉगिन केल्यानंतर शिकण्याची प्रक्रिया सुरू होते. मात्र वापरकर्त्याला एका तासाच्या आतच वाटायला लागते की आपण आता एक्सपर्ट झालो आहोत. नेमके याच ठिकाणी आम्ही चुकतो. ग्रुपवर आलेली एखादी पोस्ट किती हितावह आहे. याचा विचार न करता पोस्ट फॉरवर्ड केली जाते. सोशल मीडियाच्या तासनतास वापरामुळे ऑनलाईन राहण्यामुळे युवावर्ग उदासीन होतोय, व्यसनाधिन होतोय, मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. ते सर्व सोशल मीडियामुळेच …त्यांच्यावर होणारा हा आरोप काही अंशी सत्य आहे. मध्यंतरी आपण बघितले की, वेगवेगळ्या गेमिंगमध्ये लेव्हल पार करण्याचे आदेश देण्यात येत असत. त्यामध्ये चॅटींगचा पर्याय आला व गेमिंगने सोशल मीडियाची जागा घेतली. याचा परिणाम असा झाला की, काही गेममुळे अनेक तरुण मानसिक रुग्ण झाले .(त्यांचे व्हिडीओसुद्धा याच युवावर्गाने शेअर केले )ही समस्या याद्वारे समोर उभी राहत आहे.

सकाळी उठून पेस्ट करण्याऐवजी आम्ही पोस्ट करण्याला महत्त्व देतोय. आमचे अपडेट कळवण्यासाठी, स्टेटस ठेवण्यासाठी ज्या ठिकाणी आहोत तिथूनच सेल्फी काढण्याच्या नादापायी जीव गमवावा लागणारे युवक काही कमी नाहीत. धार्मिक अंगाने चर्चा करताना सामाजिक भावना दुखावल्या जात आहेत. याचा विचार त्या क्षणाला होताना दिसत नाही, पण परिणाम मात्र दीर्घकालीन असतात. काही ठिकाणी असे प्रकार घडू नयेत म्हणून स्वतः शासनाला त्या-त्या भागातील इंटरनेट सेवा बंद करावी लागते. मुळात सोशल मीडियाचा वापर करत असताना गुन्हेगारी वाढणार नाही, त्यातील कायद्यांचे पालन झाले पाहिजे, या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. एखाद्या समूहाच्या भावना दुखावणारी पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओ सरकारला काढून टाकावा लागत असेल तर यातच सर्वकाही आले.

इथे गुन्हेगारी वाढते त्याला सायबर क्राईम असे म्हणतात. हे थांबवण्यासाठी स्वतः युवकांनी प्रयत्न करायला हवेत. एक समस्या नव्याने समोर दिसते ती म्हणजे संवादाची …आम्ही आजपासून दहा-बारा वर्षांपूर्वी कुटुंबातील सदस्य एकत्र जमायचो त्यावेळी गप्पाटप्पा होत असत. एकमेकांची विचारपूस केली जात असे, पण आज एकत्र आल्यावर स्वतःच्या मोबाईलमध्ये सोशल मीडियावरच आम्ही व्यस्त असतो. पण समोरा समोर बोलत नाही. प्रियकर-प्रेयसी प्रेम करायचे, भेटून भावना व्यक्त करायचे, सहवासातून प्रेम फुलायचे त्याची जागा आता छोट्याशा स्माईलीने घेतली आहे. प्रसंगी थोडा जरी वाद झाला तर ब्लॉक आणि अनब्लॉकचे पर्याय निवडले जातात. यातून मानसिक ताणतणाव वाढतो आहे. सुरुवातीला आम्ही सहजपणे वाचनालयात जायचो, पुस्तके वाचायचो त्यावर चर्चा घडवून आणली जायची, पण आज सोशल मीडियाच्या सततच्या वापरामुळे आमची वाचन संस्कृती लयाला जाते की काय ही भीती वर्तवली जात आहे.

अशा अनेक नकारात्मक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येताना दिसत आहेत. मला वाटते 2014 ला राजकीय अंगाने ज्याप्रमाणे सोशल मीडियाचा वापर निवडणुकीत प्रभावीपणे झाला आणि त्यानंतर 2019 ला विविध राजकीय पक्षांनीसुद्धा त्याचा वापर युवकांच्या जोरावर चांगल्या पद्धतीने केला …असा सकारात्मक वापर होणे गरजेचे आहे. एखाद्या ठिकाणी काही समस्या उद्भवली तर मदतीची पोस्ट, मेसेज फॉरवर्ड झाला पाहिजे. युवकांना लॉगिनचा पर्याय आहे, त्याचप्रमाणे लॉग आउटचा पर्याय उपलब्ध आहे. वेळ ठरवून आपल्या व समाजाच्या फायद्यासाठी सोशल मीडियाचा वापर युवकांनी केला तर प्रगतीला कोणीही थांबू शकणार नाही. अन्यथा तो दिवस दूर नाही जो युवकांना स्वतःच्या प्रगतीपासून दूर घेऊन जाईल आणि नैराश्याच्या गर्तेत लोटेल. म्हणूनच सोशल मीडिया किती सोशियल आहे, यावर युवकांनी चर्चा घडवून आणावी. सारासार विचार करावा. फॉरवर्ड, डाउनलोड, लाईक, शेअर, ब्लॉक, अनब्लॉक, चॅटिंग याच्या बाहेरचे जगही आपल्याला दिसावे हाच आशावाद…

-धम्मपाल जाधव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -