घरफिचर्सखाल्ल्या घरचे वासे मोजणारे ट्रोल्स

खाल्ल्या घरचे वासे मोजणारे ट्रोल्स

Subscribe

ट्विट्समध्ये ट्रोल्सनी एका पासपोर्ट विवाद प्रकरणी स्वराज यांच्यावर कमालीची अवमानकारक शेरेबाजी केली. त्यानिमित्त ट्रोलसंस्कृतीचा हा वेध...

परदेश दौऱ्यावरून भारतात परतलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी काही दिवसांपूर्वीच ट्विटरवरून काही ट्विटसना रिट्विट केलं. रिट्विट करत असताना, ’आपण विदेशात असताना नेमकं काय झालं, याची आपल्याला कल्पना नाही, परंतु या ट्विट्समुळे आपल्याला ’सन्मानित’ झाल्यासारखं वाटतंय.’ अशी उपरोधिक कमेंटदेखील त्यांनी ट्विट्ससोबत जोडली. या ट्विट्समध्ये ट्रोल्सनी एका पासपोर्ट विवाद प्रकरणी स्वराज यांच्यावर कमालीची अवमानकारक शेरेबाजी केली. त्यानिमित्त ट्रोलसंस्कृतीचा हा वेध…

आपल्या विरोधी आवाज दाबून टाकण्यासाठी सोशल मीडियावर एखाद्या व्यक्तीला ’ट्रोल’ करण्याची नवसंस्कृती गेल्या ४ वर्षांत आपल्याकडे चांगलीच रुजलीय, फोफावलीय. सरकार, सरकारी धोरणं यांच्याविरोधात मुद्देसूद, तार्किक मांडणी केली की त्याचा तार्किक प्रतिवाद न करता फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडियावरून संबंधित व्यक्तीला ट्रोल करण्यात येतं. संबंधित व्यक्तीला अश्लील शिवीगाळ करण्यात येते आणि जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या जातात.

- Advertisement -

ही ट्रोलिंगची अनाहूत भेट गोष्ट सामान्यतः स्वतःला धर्मनिरपेक्ष, उदारमतवादी म्हणून घेणाऱ्या आणि त्यापद्धतीची मांडणी करणाऱ्या, सरकारची तिखट शब्दांत परंतु मुद्देसूदपणे हजेरी घेणाऱ्या लेखक, कार्यकर्ते, विचारवंत आणि पत्रकारमंडळींच्या वाट्याला आलेली आहे. परंतु, सुषमा स्वराज यांच्या बाबतीतील हा प्रसंग थोडासा वेगळा अशासाठी, की सुषमा स्वराज या भाजपशासित केंद्र सरकारमधील वरिष्ठ मंत्री आहेत. प्रामुख्याने हिंदुत्ववादी आणि भाजपसमर्थक लोकच ट्रोलिंग करण्यात आघाडीवर आहेत. लिबरल, पुरोगामी, चिकित्सक लोकांना ते लक्ष्य करतात. पण यावेळी त्यांच्या निशाण्यावर आलेल्या सुषमा स्वराज मात्र भाजपच्याच ज्येष्ठ नेत्या आहेत. भाजपशासित केंद्र सरकारमधल्या एवढ्या वरिष्ठ मंत्र्याला देखील अशा प्रकारच्या मनस्ताप देणाऱ्या गोष्टीचा सामना करायला लागत असेल, त्यांच्या देशभक्तीवर शंका घेतली जात असेल तर तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसाची काय खैर..?

चारेक वर्षांपूर्वीपर्यंत ही ट्रोल मंडळी साधारणतः पडद्यामागे राहून आपल्या कारवाया करत होती. त्यासाठी फेक अकाउंटची मदत घेत होती. अर्थातच यामागे ’आपण काहीतरी चुकीचं करतोय आणि हे करताना पकडले गेलो तर सजा होऊ शकते’ ही भावना त्यामागे होती. त्यामुळे आपली खरी ओळख लपवण्याचा त्यांचा प्रयत्न असे. परंतु, गेल्या चार वर्षांत मात्र या लोकांच्या आत्मविश्वासात २०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींना मिळालेल्या बहुमतापेक्षाही मोठी भर पडलीय. हे लोक आता आपल्या खऱ्या ओळखीसह-चेहऱ्यासह समाजमाध्यमांवर वावरताना दिसतात. आपल्याच विचारधारेचं सरकार सत्तेत असल्याने आपलं कुणीही, काहीही बिघडवू शकत नाही’ अशाप्रकारचा माज त्यांच्या समाजमाध्यमांवरील वावरात असतो. फेक अकाउंटच्या साहाय्याने या गोष्टी करणारे अजूनही मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु, तेवढ्याच मोठ्या प्रमाणात ही ट्रोल मंडळी खुलेआमपणे देखील आपल्या कारवायांना अंजाम देत फिरत असतात.

- Advertisement -

स्वराज यांना ट्रोल करणाऱ्या लोकांमध्ये बहुतांश लोक हिंदुत्ववादी संघटना-विचारधारेशी संबंधित होते.आपल्याच विचारसरणीच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या इभ्रतीची लक्तरं सोशल मीडियाच्या वेशीवर टांगण्याचा धडका त्यांनी लावला होता. पण एक निरीक्षण असं देखील आहे की या लोकांमधील अनेकांना आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, ऊर्जामंत्री पियुष गोयल, भाजपचे महासचिव राम माधव यांच्यासह अनेक ज्येष्ठ भाजप नेते फॉलो करतात.
काही ऑनलाइन गुंडांची टोळी सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्याला शिवीगाळ करतेय आणि सरकारचे प्रमुख त्यातील बहुतेकांना फॉलो करत असतात, ही गोष्ट बघून सुषमा स्वराज यांच्या मनात तरी काय कालवाकालव निर्माण झाली असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.

ट्विटर किंवा फेसबुकवर एखाद्याला ’फॉलो’ करणं याचा अर्थ ’त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत असणं’ असा होत नसला तरी त्या पदावरील व्यक्तीकडून मात्र अधिक जबाबदार वागणुकीची अपेक्षा नक्कीच असते. या पदाची म्हणून एक मानमर्यादा असते, ती जोपासणं हे त्या पदावरील व्यक्तीचं कर्तव्य आहे. या प्रवृत्तींना पंतप्रधानांचं समर्थन नसेल तर त्यांनी तसं स्पष्टपणे सांगायला हवं पण आजवर तरी पंतप्रधानांनीच याविरोधात चकार शब्दाने प्रतिक्रिया दिल्याचे आठवत नाही. बऱ्याच वेळा अनेक गोष्टींवरच्या तुमच्या मौनाचा अर्थ ’त्या गोष्टीला असलेली तुमची मुकसंमती’ असा घेतला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ’ट्रोल आर्मीच्या’ बाबतीत असंच काहीसं धोरण आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा उपस्थित होतोय.

एखाद्या मोठ्या व्यक्तीला ’ट्रोल’ करणाऱ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी ’फॉलो’ करताहेत अशाप्रकारचं हे काही पहिलं उदाहरण नाही. यापूर्वी सप्टेंबर २०१७ मध्ये ज्यावेळी ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती, त्यावेळी निखिल दधिच, आशिष मिश्रा अशा हिंदुत्ववादी गटाच्या अनेकांनी जहरी गरळ ओकली होती. त्यांच्या हत्येचा ही मंडळी शब्दश: उत्सव करत होती. यातील बहुतेकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवरून ’फॉलो’ करत असल्याची धक्कादायक बाब त्यावेळीदेखील समोर आली होती. नेहमीप्रमाणे या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प होते.

ऑनलाइन गुंडागर्दी करणाऱ्या, विरोधकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या लोकांना ’फॉलो’ करून देशाचे पंतप्रधान नेमका काय संदेश देऊ पाहताहेत? आपल्या राजकीय विचाराशी असहमत असणाऱ्या व्यक्तीला त्रास देण्यासाठी या ऑनलाइन गुंडांना पोसण्याचं काम राजकीय पक्ष करताहेत. हे लोकशाही देशाच्या राजकीय संस्कृतीसाठी अजिबातच निरोगी नाही. तेव्हा या ’ट्रोल आर्मीवर’ काहीतरी कडक कारवाई करत आळा घालण्याची निर्वाणीची वेळ आलीय हे सरकारने समजून घेणं आवश्यक आहे. अन्यथा आज विरोधकांना नामोहरम करण्यासाठी पाळलेले हे ’ट्रोल’ उद्या त्यांच्या कर्त्या-करवित्यावरच उलटणार नाहीत, याची खात्री देता येईल का? ही खरी करणारं एक उदाहरण म्हणून स्वराज यांच्या ट्रोलिंगकडे बघता येईल. ’आम्ही कुणालाही असंच निर्दयीपणे लक्ष्य करू शकतो’, हाच संदेश ते या प्रकरणातून देऊ इच्छितात. हा संदेश वेळीच ओळखणं आणि ट्रोलधाडीची योग्य ती नाकेबंदी करणं हेच लोकशाहीव्यवस्था आणि राजकीय संस्कृतीच्याही भल्याचं आहे.


अजित बायस
(लेखक मुक्तपत्रकार आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -