घरफिचर्ससोशल की अँटीसोशल?

सोशल की अँटीसोशल?

Subscribe

सोशल मीडिया आणि त्यावरील अफवा. हा आज राष्ट्रीय मुद्दा बनलाय. संपूर्ण विश्व करोना विषाणूच्या विरोधात लढतंय. भारत मात्र सोशल मीडियावरील अफवा, धार्मिक द्वेष, राजकीय आरोप-प्रत्यारोप या सर्व अडचणींसहीत करोना विरोधात लढतोय. हा लेख लिहिण्याच्या दोनच दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात मुंबईतील तीन महाराजांचा स्थानिक जमावाने निर्घृण खून केला. करोनामुळे गावं सुमसाम झाली असताना काही चोर चोरी करत असल्याची अफवा या भागात उठली होती. मग काय गावकर्‍यांनी स्वतःहूनच पहारा द्यायला सुरुवात केली. त्यांच्या तावडीत मुंबईहून गुजरातला जाणारी एक गाडी सापडली. या गाडीतील तिघाही जणांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. एका अफवेने तीन निरपराध लोकांचा नाहक बळी घेतला. पालघर हे ताजे आणि तात्कालिक उदाहरण झाले. भारताच्या प्रत्येक राज्यातील कानाकोपर्‍यात सोशल मीडियावरील अफवेचं रोज कुणीना कुणीतरी बळी पडत असतं. काही जण जीवानिशी जातात. काहींची बदनामी होऊन ते आयुष्यातून उठतात. सोशल मीडिया हे अफवांचं आगार झालंय का? माणसांना जोडून ठेवणारं माध्यम आता माणसाच्या जीवावर उठलंय का? मुळात सोशल असलेलं हे माध्यम आता अँटिसोशल झालंय का? याचा मागोवा या लेखातून घेण्याचा छोटासा प्रयत्न...

सोशल मीडियावर अफवा कशी पसरते? या प्रश्नाकडे वळण्याआधी आपल्याला अफवा कशी निर्माण होते? तिचा उगम कुठून होतो? या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील. अफवा मानवनिर्मित आहे, याचा अर्थ ती कुणाच्यातरी डोक्यातून आलेली असेल. अफवा निर्माण करणार्‍या या डोक्यात नेमकं कोणतं रसायन असतं? त्यातून त्यांना विकृत आनंद मिळतो का? किंवा मुर्खांच्या अज्ञानातून अफवा क्रिएट होते? अशा प्रश्नांचा बारकाईने अभ्यास करावा लागेल. असा अभ्यास करणं एकट्या दुकट्याचं काम नाही. मुळात आपल्याकडं सोशल मीडियावर पसरणार्‍या अफवेचा उगम आतापर्यंत कळत नव्हता. हल्ली हल्ली कुठं आपलं सायबर सेल अफवेच्या मुळाशी पोहचू लागलंय. त्यानंतर पुढं त्या व्यक्तीला शिक्षा किती होते? एखाद्या मानसशास्त्रज्ञासमोर बसवून अशा व्यक्तीचे समुपदेशन किंवा अफवा उत्पन्न करण्यामागे त्याची मानसिकता काय होती. याचा अभ्यास होतो का? या विषयाचे संशोधन करावे लागेल. तरच अफवा आणि त्यातून होणारे अपाय टाळता येतील. आपण फक्त सोशल मीडियावर अफवांचे खापर फोडत राहिलो तर हे म्हणजे साप साप म्हणून भुई थोपटल्यासारखे होईल, बाकी काही नाही.

सोशल मीडिया आणि अफवा यांचा ब्लेम गेम खेळण्याआधी आपण थोडसं मागे जाऊया. सोशल मीडियाच्याही मागे. नव्वदच्या आधी जन्मलेल्या लोकांना ‘गणपती दूध पितो’ हा प्रकार चांगला ठाऊक असेल. त्याकाळात मोबाईल, इंटरनेट, एवढंच काय तर घरोघरी फोनही नव्हते, अशा काळात ही बातमी व्हायरल झाली होती. लोकांनी काही तासांत ठिकठिकाणी मंदिराबाहेर रांगा लावून गणपतीच्या मूर्तीला बळं बळं दूध पाजलं. लाखो लिटर दुधाची नासाडी झाली. सोशल मीडिया भानगड तर जन्मालाही आली नव्हती. अनेकांकडे त्याकाळी केअर ऑफ फोन होता. (हल्लीच्या पिढीसाठी सांगतो चाळीत किंवा इमारतीत एकाकडेच फोन असायचा. तोच नंबर इतर लोक आपल्या नातेवाईकांना द्यायचे. त्याकाळी इनकमिंगचे पैसे शेजार्‍यांना द्यावे लागायचे.) तरीही ही अफवा पसरली. ‘अफवा वार्‍यासारखी पसरली’, असा आपल्याकडे वाकप्रचार आहे, पण यापुढे जाऊन एक गमतीशीर गोष्ट सांगतो, प्रकाश आणि ध्वनीच्या वेगासोबतच आता अफवांचा वेग गणला गेला पाहिजे. सोशल मीडियामुळं ते शक्य झालंय. अंगठ्याच्या एका क्लिकवर काश्मीरची अफवा क्षणात कन्याकुमारीच्या कुठल्यातरी गावात पोहचू शकते. मुळात अफवा ही आदीम प्रेरणा आहे, असं मलातरी वैयक्तिक वाटतं. तुम्ही पुराणात पाहा ना, इतिहासात वाचा, अफवा आणि त्याच्यामुळे झालेल्या र्‍हासाची अनेक उदाहरणं सापडतील. नारदमुनींना कळीचा नारद का म्हटलं गेलं असेल? दिग्वविजय श्रीराम लंकानरेश रावणाचा सत्यासाठी पराभव करतात. तेच श्रीराम सीतामातेला पुन्हा वनवासात पाठविण्यामागे काय कारण होते? असत्य की अफवा? चिकित्सक वृत्तीनं विचार कराल तर अशी अनेक उदाहरणे सापडतील. कदाचित याच्यापेक्षाही मजेशीर, भयानक उदाहरणं समोर येतील. युद्धात तर अनेकदा अफवांचा आधार घेतला गेला.

- Advertisement -

भारतात लोकशाही प्रस्थापित झाल्यानंतर निवडणुकीच्या काळात मतदानाच्या काही वेळ आधी अफवा गल्लोगल्ली आपोआप पसरतात. सोशल मीडियाच्या आधीपासून पद्धतशीर नियोजन करून कानोकानी अफवा पसरविण्याचे तंत्र आपल्याकडं अवगत होतंच. सोशल मीडियामुळं या तंत्राचा वापर वाढला, त्याचा वेग वाढला. एवढंच. वर सांगितल्याप्रमाणे भारत करोना विषाणू सोबत अफवांच्या विरोधात देखील लढतोय. विषाणू आणि अफवा दोन्हीही मानवी डोळ्यांना दिसत नाहीत. विषाणू आहे की नाही, हे प्रयोगशाळेतच सिद्ध होऊ शकतं. तसंच एखादी बातमी, समोर आलेली माहिती अफवा आहे का? हे ओळखण्यासाठी चिकित्सक वृत्ती आणि तार्किक विचार बुद्धिची आवश्यकता असते. सारासार सदसदबुद्धिने विचार करण्याची गरज असते, पण दुर्दैवाने प्रत्येक वेळी व्यक्ती विवेक बुद्धिने विचार करतोच असे नाही. सोशल मीडिया अस्तित्त्वात येण्याआधीही उपलब्ध असलेल्या माध्यमातून अफवांचा प्रवास सुरू होता. पत्र पाठविण्याच्या काळात तुम्हालाही एक पत्र आलं असेल. ज्यात एक भयकथा असायची.‘अमुकतमुक देवाची विटंबना केल्यामुळे ‘अबक’ कुटुंबाची दुर्दशा झाली. मग त्यांनी देवाची माफी मागून कसंतरी ते संकट टाळलं. तुम्हीही हे पत्र याच आशयासहीत पुढे ११ जणांना पाठवा, नाहीतर अनर्थ अटळ….’ आपल्यापैकी अनेकांनी हे खोटंय हे माहीत असूनही ११ पत्र लिहिलेली असतील. त्यानंतर ईमेल आणि मोबाईल आला. मोबाईलमध्ये एसएमएस नावाचा प्रकार आला.

अफवांनी या माध्यमालाही वाहक बनवलं होतं.‘एड्स झालेला व्यक्ती पेप्सी कंपनीत कामाला आहे. त्याने स्वतःचे बोट कापून पेप्सीत एचआयव्हीचे विषाणू मिसळले आहेत. पेप्सी पिऊ नका’ या संदेशापासून ते आज रात्री ‘कॉस्मिक किरणे येणार आहेत, घरात अंधार करा. बाहेर पडू नका’ अशा अनेक अफवा पसरलेल्या आपण पाहील्या आहेत. त्यामुळे फक्त सोशल मीडियामुळे अफवा पसरतात, असे चुकीचे आणि अर्धसत्य ठरू शकते. सोशल मीडिया तर फक्त अफवेचा वाहक आहे. निर्माता नाही. सोशल मीडियाच्या फायदे-तोट्याचा विषय निघाल्यानंतर मी नेहमी एक मुद्दा रेटून मांडतो. तो म्हणजे हे माध्यम दुधारी तलवार आहे. २०११ ची गोष्ट. इजिप्तमध्ये होस्नी मुबारक या हुकुमशहा विरोधात नाराजी टोकाला पोहोचली होती. खासकरून तरुणांच्या मनात रोष उचंबळून वाहत होता. या रोषाला त्यांनी फेसबुकवर वाट मोकळी करून दिली. इजिप्तमधील कैरो येथे तहरीर चौक नावाचे प्रसिद्ध ठिकाण आहे. आपल्याकडं दिल्लीला इंडिया गेट आणि मुंबईत गेट वे ऑफ इंडिया आहे तसं. एका तरुणीनं, ‘मी तहरीर चौकात जाऊन विरोध दर्शविणार’, अशी पोस्ट टाकली. क्षणात अनेक तरुणांनीही अशीच पोस्ट टाकून समर्थन दिलं. तहरीर चौकाने अख्ख्या जगाला सोशल मीडियातून प्रसवलेल्या क्रांतीचे दर्शन घडवलं. होस्नी मुबारकला सत्तेवरून पायउतार व्हायला हे आंदोलन कारणीभूत ठरल्यांचं सांगितलं जातं. याचाच कित्ता २०१३ साली भारतात अण्णा आंदोलनाने गिरवला. सोशल मीडियाचे एक वेगळे रूप या निमित्ताने आपल्याला दिसते…

- Advertisement -

आता दुधारी म्हटलं की फायदे – तोटे आलेच. आजकालच्या तरुणांच्या भाषेत सांगायचं झालं तर Pros and Cons आहेतच. या माध्यमावर लोक ज्याप्रमाणे प्रेम, स्नेह, बंधुता व्यक्त करतात. तसेच काही लोक द्वेष, मत्सर, ईर्षा व्यक्त करतात. व्यक्त झालेल्या दोन्ही प्रकारच्या भावनांशी समरस झालेले लोक त्या पसरवतात. जी गोष्ट जास्त पसरते, त्याचा विजय होतो. ते म्हणतात ना, सत्य घराबाहेर पडेपर्यंत असत्य गावभर फिरून आलेलं असतं. तसंच आहे. सत्य आणि असत्याच्या वेगामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. हा वेग आपल्याच मेंदूच्या क्षमतेवर आधारित असतो. आपल्याला मिळालेले संस्कार, शालेय जीवनात डेव्हलप झालेल्या जाणीवा, महाविद्यालयीन काळात झालेलं वाचन, संगत यातून माणूस आणि देशाचा नागरिक घडत असतो. आपली जडणघडण आपल्यासमोर आलेल्या अफवेशी डिल करत असते. आपली बैठक पक्की असेल तर अफवेला आपण फाट्यावर मारतो. प्रसंगी ती पसरविणार्‍याला दोन शब्द ऐकवतो देखील, पण आपल्या बेसिकमध्येच लोचा असेल तर मग अफवांचे खापर वाहकांवर थोपवून चालणार नाही. फिल्टर (चाळण) स्वतःच्या मेंदूत हवी, सोशल मीडियाला कितीही फिल्टर लावा. अफवा थांबत नसतात. शेवटी आपण सोशल की अँटीसोशल हे आपले विचार ठरवत असतात.

Kishor Gaikwadhttps://www.mymahanagar.com/author/kishor/
एकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -