समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर

महाविद्यालयीन जीवनातच जॉन स्ट्यूअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांनी त्यांचे मन संस्कारित झाल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बुद्धिप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी झालेला होता. याच दृष्टिकोनातून तत्कालीन समाजाची पुनर्घटना करण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती.

गोपाळ गणेश आगरकर यांचा आज स्मृतिदिन. ते बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत आणि थोर समाजसुधारक होते. त्यांचा जन्म १४ जुलै १८५६ रोजी सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला. हालअपेष्टांना गोपाळ गणेश आगरकर तोंड देत कराड, रत्नागिरी, अकोला आणि पुणे येथे राहून ते एम. ए. झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी पुण्यात निर्माण केलेल्या जहाल विचारांच्या राष्ट्रवादी पंथास ते लोकमान्य टिळकांसह जाऊन मिळाले.

लोकशिक्षण आणि लोकजागृती करण्यासाठी या तिघांनी पुण्यात ‘न्यू इंग्लिश स्कूल’ स्थापन केले (१८८०), तसेच केसरी आणि मराठा (इंग्रजी) ही पत्रे चालू केली (१८८१). न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आगरकरांनी अध्यापनाचे काम केले. त्याचप्रमाणे केसरीच्या संपादनाची जबाबदारी स्वीकारून परिणामकारक लेखन आणि कुशल संपादन यांच्या जोरावर अल्पावधीतच केसरीला लोकप्रियता प्राप्त करून दिली. न्यू इंग्लिश स्कूलच्या चालकांनी स्थापन केलेल्या ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ च्या ‘फर्ग्युसन महाविद्यालया’चे प्राचार्य (१८९२) म्हणूनही त्यांनी काम केले.

महाविद्यालयीन जीवनातच जॉन स्ट्यूअर्ट मिल आणि हर्बर्ट स्पेन्सर यांच्या विचारांनी त्यांचे मन संस्कारित झाल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन बुद्धिप्रामाण्यवादी आणि अज्ञेयवादी झालेला होता. याच दृष्टिकोनातून तत्कालीन समाजाची पुनर्घटना करण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती. केसरीतील त्यांच्या सामाजिक लेखांतून हीच भूमिका व्यक्त होऊ लागली. सामाजिक प्रश्नांच्या जाणिवेपेक्षा राजकीय प्रश्नांची जाणीव अधिक तीव्र असली पाहिजे, असे केसरी व मराठाच्या चालकमंडळींना वाटत असल्यामुळे, आगरकरांचा वैचारिक कोंडमारा होऊ लागला.

परिणामत: ते केसरीतून बाहेर पडले (१८८७) आणि आपल्या क्रांतिकारक सामाजिक विचारांच्या प्रतिपादन-प्रसारासाठी ‘सुधारक’ हे पत्र त्यांनी काढले. बुद्धिवादी दृष्टिकोनातून समाजजीवनाचे विश्लेषण करून अन्याय्य रुढी आणि परंपरा यांच्यावर त्यांनी कडाडून हल्ले चढविले. बुद्धीच्या निकषांखेरीज अन्य कोणताही निकष ते मानीत नसल्यामुळे समाजसुधारणांचे समर्थन करण्यासाठी स्मृतिवचनांचा आधार घेणे त्यांना मान्य नव्हते. अशा या थोर समाजसुधारकाचे १७ जून १८९५ रोजी निधन झाले.