घरफिचर्ससमाजसुधारक नारायण चंदावरकर

समाजसुधारक नारायण चंदावरकर

Subscribe

नारायण गणेश चंदावरकर हे अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक निष्ठावान सभासद, कायदेपंडित आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म 2 डिसेंबर 1855 रोजी होनावर (उत्तर कॅनरा) या ठिकाणी झाला. त्यांचे बहुतेक शिक्षण मुंबईला एल्फिन्स्टनमध्ये झाले. बॅ. दादासाहेब खापर्डे हे त्यांचे सहाध्यायी व वसतिगृहातील खोलीबंधू होते. इंग्रजी विषय चंदावरकरांच्या आवडीचा होता. प्रोफेसर वर्ड्सवर्थ यांच्या इंग्रजी अध्यापनाचा त्यांना लाभ झाला. इतिहास, तत्त्वज्ञान व अर्थशास्त्र हे विषय अभ्यासून ते बी.ए.ला प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले (१८७६). त्यांना महाविद्यालयात ‘फेलो’ म्हणून नेमण्यात आले.

दोन वर्षांनी न्या. तेलंग यांच्या शिफारशीवरून ‘इंदुप्रकाश’ या द्वैभाषिक साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे ते संपादक झाले. त्यांनी अत्यंत आत्मीयतेने काम करत दहा वर्षांत त्या साप्ताहिकाची लोकप्रियता, तसेच त्याचा खप वाढविला. या काळात मथुरा सिरूर या युवतीशी त्यांचा विवाह झाला. ‘इंदुप्रकाश’ साप्ताहिकातून ते स्त्रियांना उच्च शिक्षण देण्याचा पुरस्कार करीत होते. स्त्रिया व मागासवर्गाला राजकीय हक्क पाहिजेत असे मत ते मांडीत. सार्वजनिक जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींशी न्या. रानडे यांच्याप्रमाणेच न्या.चंदावरकरांचा संबंध होता. शासकीय बंधने पाळूनही लोकहित साधता येते, याचा एक आदर्श त्यांनी निर्माण केला. अस्पृश्यता निवारण कार्यात त्यांना रस होता. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशनचे चंदावरकर अनेक वर्षे अध्यक्ष होते.

- Advertisement -

‘नीच मानलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्याने आम्ही स्वत:ला वर आणीत आहोत. हे पवित्र कार्य करीत असताना या लोकांचा आम्ही उद्धार करणार हा घमेंडीचा विचार आमच्या अंत:करणात न शिरो आणि आम्हा सर्वांना या घोर अन्यायामुळे जी अधोगती मिळाली आहे, ती टळून सर्वांचा सारखाच उद्धार होणार आहे, असा साधा आणि सात्त्विक भाव आम्हांमध्ये निरंतर जागृत राहो,’ अशी चंदावरकर यांची दलितोद्धाराबाबतची भूमिका होती. सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक चळवळी व प्रश्नांमध्ये न्या. चंदावरकर, न्या. रानडे, न्या. तेलंग यांचा सहभाग असे.

न्या. रानडे व चंदावरकरांनी प्रार्थना समाजाच्या उपासनाही चालवल्या व धर्मपर व्याख्याने दिली. न्या. तेलंग मुंबई विद्यापीठाचे एक वर्ष कुलगुरू, तर न्या. चंदावरकर तीन वर्षे कुलगुरू होते. १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना करण्यात न्यायमूर्ती रानडे यांचा वाटा होता. चंदावरकर काँग्रेसचे आजीव सभासद होते. १८९६ पासूनच चंदावरकर प्रार्थना समाजाचे अध्यक्ष होते. मुंबईस जी विधान परिषद स्थापन झाली, तिचे ते बिनसरकारी अध्यक्ष झाले. त्यांनी रॉयल एशियाटिक सोसायटीचे (मुंबई शाखा) अध्यक्षपद भूषविले. कायदेपंडित म्हणून ते नावाजलेले होते. तरी, सामाजिक जागृती, पत्रकारिता, अस्पृश्यता निवारण वगैरे क्षेत्रांतील त्यांचा सक्रिय सहभाग अत्यंत मोलाचा होता. अशा या महान समाजसेवकाचे १४ मे १९२३ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -