घरताज्या घडामोडीमहिला शिक्षणप्रसारक सावित्रीबाई फुले

महिला शिक्षणप्रसारक सावित्रीबाई फुले

Subscribe

सावित्रीबाई जोतीराव फुले या भारतीय शिक्षिका, कवयित्री व समाजसुधारक होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव याठिकाणी झाला. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्‍या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. १८४० मध्ये जोतीराव फुले यांच्याशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीबाईंचे पती जोतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस आत्या सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्‍याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले.

सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सार्‍या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत १८ शाळा उघडल्या आणि चालवल्या. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी अ‍ॅन्ड सायंटिफिक सोसायटीने ‘कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली.

- Advertisement -

सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी ‘धर्म बुडाला,जग बुडणार, असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. पण संघर्ष करत हा सावित्रीबाईंचा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. त्यासाठी त्यांना घर सोडावे लागले. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत. सावित्रीबाईंनी काही क्रूर रूढींनाही आळा घातला. बाल-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला. स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. अनाथांना आश्रय मिळावा हेही त्यांचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६-७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. अशा या कर्तृत्ववान शिक्षिकेचे १० मार्च १८९७ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -