Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर फिचर्स समाजवादी नेत्या मृणालताई गोरे

समाजवादी नेत्या मृणालताई गोरे

Related Story

- Advertisement -

मृणालताई गोरे या समाजवादी नेत्या होत्या. सामान्यजनांच्या आणि महिलांच्या समस्यांबद्दलच्या विविध चळवळींचे यांनी नेतृत्व केले. त्या महाराष्ट्र विधानसभेत आमदार होत्या. तसेच सहाव्या लोकसभेत खासदार होत्या. त्यांचा जन्म २४ जून १९२८ रोजी खेड याठिकाणी झाला. मृणालताई गोरे यांनी राष्ट्रसेवा दल संघटनेच्या माध्यमातून तरुणपणीच सामाजिक कार्याला सुरुवात केली. सामान्य माणसांच्या प्रश्नांची तड लावणे, त्यांना न्याय मिळवून देणे हेच ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांचे जीवनसूत्र होते. मृणालताईंचे वडील शासकीय महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्यांच्या दोन बहिणी व एक भाऊ डॉक्टर होते. सारे कुटुंब, उच्चशिक्षित व सुसंस्कृत. मृणालताईही एक दिवस डॉक्टर होणार हे निश्चित होते.

मात्र, समाजवादी विचारांवरील अढळ निष्ठेमुळे मृणालताईंनी वैद्यकीय शिक्षण बाजूला ठेवत स्वत:ला जनआंदोलनात झोकून दिले व त्यांच्या जीवनाची दिशा बदलून गेली. समाजवादी नेते केशव गोरे यांच्याशी मृणालताई यांचा विवाह झाल्यानंतर 1948 साली त्या मुंबईतील गोरेगाव या उपनगरामध्ये राहावयास आल्या. 1958 साली केशव गोरे यांचे निधन झाले. मात्र, इतकी मोठी शोकात्म घटना घडूनही मृणालताई खचल्या नाहीत. त्यानंतर त्या सामाजिक कार्यात गढून गेल्या. त्यांच्या समाजकार्याचा हळूहळू विस्तार होत गेला.

- Advertisement -

गोरेगाव ग्रामपंचायत, मुंबई महानगरपालिका, राज्य विधानसभा, लोकसभा या लोकशाही संस्थांत मृणालताईंनी पुढे 25-26 वर्षे प्रतिनिधित्व केले. इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीविरोधात ताईंनी जोरदार आवाज उठविला. या लढ्यात त्या प्रारंभी भूमिगत राहून कार्य करीत होत्या. नंतर त्यांना अटक झाली. तुरुंगवास भोगावा लागला. मृणालताई राष्ट्र सेवा दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. कालांतराने त्या संस्थेच्या मार्गदर्शक नेत्यांपैकी एक बनल्या. पाणीटंचाई, महागाईपासून सामान्य माणसाला भेडसावणार्‍या अनेक प्रश्नांसाठी रणरागिणी होऊन त्यांनी रस्त्यावर उतरून लढा पुकारला. महागाईविरोधात त्यांनी काढलेला लाटणे मोर्चा खूप गाजला. पाणीटंचाईच्या परिस्थितीचे गांभीर्य सरकारला लक्षात आणून देण्यासाठी ताईंनी अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले. त्यामुळे ‘पाणीवाली बाई’, ‘लाटणेवाली बाई’ अशा सार्थ शब्दांत त्यांचा गौरव झाला. 1972 मध्ये मालाड मतदारसंघातून त्या प्रथम विधानसभेवर निवडून गेल्या.

समाजवादी विचार केवळ बोलून दाखविण्यापुरता नाही तर प्रत्यक्षात यावा यासाठी त्यांचे सारे प्रयत्न असत. कमाल जमीन धारणा कायद्याच्या अन्वये गोरेगाव परिसरात नागरी निवारा परिषदेमार्फत जमीन मिळवून त्यावर गरीब, गरजू लोकांच्या खिशाला परवडतील अशी घरे बांधण्याचा अभिनव प्रकल्प मृणालताई गोरे व समाजवादी नेते प. बा. सामंत यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे राबविण्यात आला. या प्रकल्पातून आजवर 6 हजार गरजू कुटुंबांना स्वत:ची हक्काची घरे मिळाली आहेत. 1980 च्या लोकसभा निवडणुकीत मृणालताईंचा पराभव झाला. 1985 ते 1990 या कालावधीत मृणालताई विधानसभेत विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यावेळी त्यांनी अत्यंत तडफेने सामान्य माणसांचे प्रश्न मांडले. केशव गोरे स्मारक ट्रस्टतर्फेही अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी राबविले. अशा या महान सामाजिक कार्यकर्त्या मृणालताईंचे १७ जुलै २०१२ रोजी निधन झाले.

- Advertisement -