याचि देही याचि डोळा – असे अनुभवा सूर्यग्रहण!

21 जून 2020 रोजी म्हणजे आज एक विस्मयकारक खगोलीय घटना होणार आहे ती म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहण! ग्रहणांबद्दल मानवाला आधीपासूनच आकर्षण होते. रोज दिसणारा सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांची ओळख झालेली होती. पण एखाद्या दिवशी अचानक सूर्य झाकला जातो, किंवा चंद्र नेहमीपेक्षा अधिक लाल दिसतो अशा घटनांचे कुतूहल वाटते. शिवाय भीतीदेखील वाटतेे. अर्थातच जिज्ञासा आणि भीती या दोन्ही भावनांच्या पोटी संशोधकवृत्ती जागी झाली आणि ग्रहणांचा अभ्यास सुरू झाला. आज मात्र अत्यंत प्रगत आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीने ग्रहणांची भाकिते करणे अगदी सोपे झाले आहे.

सगळीकडे करोना विषाणूने हाहा:कार उडवलेला आहे. अजूनही आपण घरात कुलुपबंद अवस्थेत आहोत. निसर्ग मात्र नित्यनेमाने चालत आहे. करोनामुळे सगळे घरातच असल्याने एकूणच प्रदूषण कमी झाले आहे. त्या निमित्ताने निरभ्र आकाश पहायला मिळाले. अनेकांनी या टाळेबंदीच्या काळात आकाश पाहण्याची संधी सोडली नाही. कोणी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पाहिले, गुरु, चंद्र, मंगळ, शनी, शुक्र आणि इतर वेळी शोधायला आणि दिसायला अवघड असा बुध असे ग्रह पाहिले, त्यांचे फोटो पाठविले. शुक्र-बुध युती, छायाकल्प चंद्रग्रहण, शून्य सावली दिवस अनुभवले. अशीच अजून एक संधी आपल्याला मिळणार आहे.

21 जून 2020 रोजी एक विस्मयकारक खगोलीय घटना होणार आहे ती म्हणजे कंकणाकृती सूर्यग्रहण!

ग्रहणांबद्दल मानवाला आधीपासूनच आकर्षण होते. रोज दिसणारा सूर्य, चंद्र, तारे, ग्रह यांची ओळख झालेली होती. पण एखाद्या दिवशी अचानक सूर्य झाकला जातो, किंवा चंद्र नेहमीपेक्षा अधिक लाल दिसतो अशा घटनांचे कुतूहल वाटते. शिवाय भीतीदेखील वाटतेे. अर्थातच जिज्ञासा आणि भीती या दोन्ही भावनांच्या पोटी संशोधकवृत्ती जागी झाली आणि ग्रहणांचा अभ्यास सुरु झाला. आज मात्र अत्यंत प्रगत आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीने ग्रहणांची भाकिते करणे अगदी सोपे झाले आहे.

ग्रहण एक खगोलीय घटना आहे. एखादी खगोलीय वस्तू किंवा अंतराळ यान तात्पुरते दिसेनासे होते किंवा धूसर होते. हे दोन प्रकारे घडते. एक तर एखादी खगोलीय वस्तू किंवा अंतराळयान दुसर्‍या खगोलीय वस्तूच्या सावलीत येते तेव्हा आणि एखादी खगोलीय वस्तू आणि निरीक्षकाच्या दरम्यान दुसरी खगोलीय वस्तू येते किंवा मधून जाते तेव्हा! तीन खगोलीय वस्तूंचे हे संरेखन syzygy म्हणून ओळखले जाते. या व्यतिरिक्त लोकप्रिय शब्द आहे तो म्हणजे ग्रहण. आपण ग्रहण हा शब्द बहुतांश सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांच्या बाबतीत जास्त वापरतो. परंतु दोन तारे, सूर्य आणि ग्रह, ग्रह आणि त्यांचे उपग्रह अशा वस्तूंमध्येदेखील ग्रहण होते. या घटना निरीक्षक सापेक्ष आहेत हे महत्त्वाचे! सूर्यमालेमध्ये सूर्य, पृथ्वी, चंद्र व इतर ग्रह यांच्या विशिष्ट स्थानांमुळे आपल्याला अवकाशात अनेक प्रकारच्या खगोलीय घटना दिसतात. जसे ग्रहण, पिधान आणि अधिक्रमण!

दर अमावास्येला ग्रहण का दिसत नाही?
सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांच्या विशिष्ट स्थानामुळे आपल्याला अमावस्या, पौर्णिमा, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण अनुभवास येतात. ग्रहण हा केवळ सावल्यांचा खेळ आहे. ग्रहण म्हणजे ग्रासणे, खाणे किंवा झाकणे. जेव्हा चंद्रबिंब सूर्यबिंबाला झाकते तेव्हा आपण सूर्यग्रहण झाले असे म्हणतो. म्हणजेच चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये असायला हवा. ही वेळ केव्हा येते तर, अमावास्येला. मग प्रत्येक अमावास्येला ग्रहण होते का? नाही! सूर्य, चंद्र आणि पृथ्वी केवळ एका रेषेत असून चालत नाही तर त्यांचे प्रतलदेखील समान हवे. चंद्राची भ्रमणकक्षा व पृथ्वीची भ्रमणकक्षा यांच्या पातळ्यांमधील कोन साधारण सव्वा पाच अंशाचा आहे.

त्यामुळे चंद्र, सूर्य आणि पृथ्वी जरी एका रेषेत असले तरी प्रत्येक वेळेस एका पातळीत येऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येक अमावस्येला चंद्रबिंब सूर्याला झाकू शकत नाही. ते जेव्हा एका रेषेत आणि एका प्रतलात येतात त्याच दिवशी सूर्यग्रहण दिसते.

सूर्यग्रहणांचे प्रकार
सूर्यग्रहणांचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. सूर्याचे पूर्ण बिंब जेव्हा झाकले जाते तेव्हा त्याला खग्रास सूर्यग्रहण असे म्हणतात. जर सूर्याचा काही भागच झाकला गेला म्हणजे 1 ते 99 टक्के भाग झाकला गेला तर त्याला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र यातील अंतर व आकार यामध्ये एक विलक्षण आश्चर्य दडलेले आहे. पृथ्वीपासून चंद्र जितक्या अंतरावर आहे त्याच्या 400 पट अंतरावर सूर्य आहे आणि चंद्राच्या आकारापेक्षा सूर्याचा आकारदेखील 400 पट आहे. यामुळे पृथ्वीवरून आपल्याला सूर्यबिंब आणि चंद्रबिंब साधारण सारख्याच आकाराचे दिसतात आणि म्हणूनच ते एकमेकांना पूर्णपणे झाकू शकतात. अशा स्थितीतदेखील नेहमी खग्रास स्थिती असते असे नाही. याचे कारण म्हणजे चंद्र हा पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असतो आणि त्यामुळे तो कधी पृथ्वीच्या जवळ असतो तर कधी लांब असतो. त्यामुळे चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर नेहमी बदलत असते. तो कधी पृथ्वीच्या सर्वात जवळ म्हणजे उपभू स्थानी असतो (3,63,300 ते 3,56,400 किमी अंतरावर) तर कधी तो सर्वात दूर म्हणजे अपभू स्थानी (4,06,104 ते 4,06,700 किमी अंतरावर) असतो. जेव्हा चंद्र उपभू स्थानी असतो तेव्हा चंद्रबिंब हे सर्वात मोठे दिसते. या विरुद्ध अपभूस्थानी असतांना चंद्रबिंब लहान असते. चंद्र जेव्हा पृथ्वीपासून लांब असतो तेव्हा तो सूर्यबिंबाला पूर्ण झाकत नाही आणि त्यामुळे आपल्याला ग्रहण स्थितीमध्ये सूर्यबिंबाची बांगडीसारखी तेजस्वी कड दिसते. सूर्याच्या या कड्याला अग्निकंकण (Ring of fire) म्हणून संबोधले जाते आणि या ग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.

खग्रास किंवा कंकणाकृती ग्रहण केवळ काही भागातूनच दिसू शकते. चंद्राच्या दोन प्रकारच्या सावल्या पहायला मिळतात. एक म्हणजे गडद छाया किंवा प्रछाया आणि दुसरी उपछाया किंवा विरळ छाया. ग्रहणाच्या वेळेस चंद्राची गडद छाया पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते त्या ठिकाणी आपण सूर्य पूर्ण झाकलेला म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण पाहू शकतो तर ज्या ठिकाणी उपछाया पडते त्या ठिकाणी खंडग्रास सूर्यग्रहण पाहू शकतो. 21 जून 2020 रोजी महाराष्ट्रातील बरचसा भाग उपछायेत असल्याने आपल्याला खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल.

एकदा झालेले ग्रहण विशिष्ट कालावधीनंतर पुन्हा होते हे समजत होते. या चक्राचा अभ्यास एडमंड हॅले या शास्त्रज्ञाने मांडला आणि त्याला सेरॉस ग्रहणचक्र असे म्हटले. 21 जून 2020 रोजी दिसणारे कंकणाकृती सूर्यग्रहण सॅरोस 137 चक्रामधले आहे.

डोळ्यांची काळजी
सूर्यग्रहणामध्ये कधीही नुसत्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहू नका. सूर्यग्रहणामध्ये सूर्याचा प्रखर प्रकाश झाकला जातो आणि त्यामुळे डोळ्यांना हा फरक प्रकर्षाने जाणवतो. सूर्यप्रकाश आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. आपले डोळे पृथ्वीवर पोहोचणार्‍या सामान्य सूर्यप्रकाशाला सरावलेले असतात. सूर्यग्रहणाच्या वेळी प्रकाशाच्या तीव्रतेमध्ये अचानक होणार्‍या बदलांमुळे डोळ्यांना त्रास होतो. त्यामुळे सूर्याकडे थेट पाहणे डोळ्यांना इजा निर्माण करते. याने अंधत्त्व येण्याची शक्यता असते. या काळामध्ये डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते. परंतु यामुळे ग्रहण पहायचे नाही असे नाही. ते तर पाहिले पाहिजे. कारण सूर्यग्रहण ही अद्भुत निसर्ग घटना आहे. पूर्ण सुरक्षितता बाळगली तर कुठलाही त्रास होणार नाही. सूर्यग्रहणाचा आनंद घेता येईल. सूर्यग्रहण पाहण्यासाठी विशिष्ट प्रकारचे गॉगल्स मिळतात. यामध्ये मायलर फिल्टर्स वापरलेले असतात. सूर्यग्रहण पाहण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे पिन होल प्रोजेक्शन किंवा दुर्बिणीद्वारे कागदावर घेतलेले प्रतिबिंब.

21 जून 2020 रोजी सूर्य सर्वाधिक उत्तरेला कर्क वृत्तावर 23.5 उत्तर येथे आलेला असेल. या स्थानाला विष्ठंभ (summer solstice) असे म्हणतात. यानंतर दक्षिणायनाला सुरुवात होते. हा दिवस उत्तर गोलार्धासाठी सर्वात मोठा दिवस असतो. या वर्षी याच दिवशी अमावस्या असून कंकणाकृती सूर्यग्रहणदेखील आहे. राजस्थान-पंजाब-हरियाणा-उत्तरांचल या राज्यातून बांगडीसारखा सूर्य दिसणार आहे. ग्रहणाचा सर्वोच्च बिंदू जोशीमठ या ठिकाणी आहे. या ग्रहणाचे महत्त्वाचे वैशिष्ठ्य असे की परमोच्च स्थितीमध्ये सूर्य 98 टक्के झाकला जाणार आहे. त्यामुळे अत्यंत बारीक सौरकडे दिसणार आहे. त्यामुळेच, ही स्थिति जास्तीत जास्त 30 सेकंद असेल.

महाराष्ट्रामधून खंडग्रास स्थितीचे दर्शन
महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी खंडग्रास ग्रहण अनुभवता येईल. मुंबई येथे 21 जून 2020 रोजी सकाळी 10 वाजून 49 सेकंदाला सुरुवात होईल, म्हणजे पहिला स्पर्श होईल तर सर्वोच्च स्थिती 11 वाजून 37 मिनिटे व 41 सेकंद यावेळेस असेल. तसेच दुपारी 1 वाजून 27 मिनिटे व 50 सेकंदानी खंडग्रास ग्रहण सुटेल. नाशिक येथे सकाळी 10 वाजून 3 मिनिटे व 41 सेकंदाला सुरुवात होईल, म्हणजे पहिला स्पर्श होईल तर सर्वोच्च स्थिती 11 वाजून 42 मिनिटे व 07 सेकंद यावेळेस असेल. तसेच दुपारी 1 वाजून 32 मिनटे व 33 सेकंदानी खंडग्रास ग्रहण सुटेल. खंडग्रास पट्ट्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या गावी कधी व कसे ग्रहण दिसेल हे पाहण्यासाठी https://www.timeanddate.com/ या संकेतस्थळावर तपशील मिळतील.

आशा करुया निसर्ग आपल्यावर उदार मनाने प्रसन्न होईल व ग्रहण दर्शन देईल! ज्यांना 26 डिसेंबर 2019 चे ग्रहण पाहण्याची संधी मिळाली नाही त्यांच्यासाठी खरे तर ही पर्वणी होती, परंतु करोनाच्या परिस्थितीमध्ये ग्रहण पाहण्यास जाणे अवघड आहे. आपण आहोत तेथूनच हे ग्रहण पाहूया! सुरक्षित राहा आणी सुरक्षितपणे ग्रहण पाहा!

– सुजाता बाबर ,खगोल मंडळ, नाशिक