घरफिचर्सकाही प्रश्न अजूनही अनुत्तरीत

काही प्रश्न अजूनही अनुत्तरीत

Subscribe

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे यांची निवड झाली. त्यांच्यासह सहा मंत्र्यांचा शपथविधीही पार पडला. मुख्यमंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला असून राज्य कारभाराला प्रारंभही केला आहे. मात्र, काही प्रश्नांची उत्तरे मिळणे अद्यापही बाकी आहे. आपल्याकडे बहुमत नाही तरीही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथा का घेतल्या, अजितदादा व देवेंद्र यांनी हे सरकार स्थापन केले. ते बनले कसे आणि मोडले कशाला, त्याचा खुलासा झालेला नाही. या दोघांची कृती त्यांच्या पक्षाची प्रतिष्ठा पणाला लावून गेलेली आहे, पण दोन्ही नेत्यांच्या त्या बालीश भासलेल्या कृतीला त्यांच्याही नेत्यांनी जाब विचारलेला नाही. पत्रकारांच्या त्याबाबत विचारलेल्या प्रश्नांना दोघेही टोलवित आहेत. ‘योग्य वेळी उत्तर देऊ’ हे उत्तर कसे असू शकते? पण त्यांचे हे उत्तर त्यांच्या पक्ष नेतृत्वांना समाधानी करणारे आहे. देवेंद्र आणि अजितदादा यांच्या अल्पजिवी सरकारविषयी बोलण्याची ‘योग्य वेळ’ कधी येणार आहे? ही वेळ इतक्यासाठीच महत्त्वाची आहे की, शिवसेना वा आदित्यच्या ‘हीच वेळ’ शब्दांनी चमत्कार घडवला आहे. मग देवेंद्र अजितदादा यांच्या तशाच पद्धतीच्या ‘योग्य वेळ’ शब्दात कुठल्या चमत्काराची शक्यता दडलेली आहे? त्या ‘योग्य वेळेला’ असे काय घडायचे आहे? तेव्हा पुन्हा कसली उलथापालथ व्हायची आहे? कुठली घटना घडली, मग हे दोन नेते आपण असे अल्पजिवी सरकार कोसळण्याची हमी असताना का स्थापन केले, त्याचा खुलासा देणार आहेत काय? म्हणजेच त्या एकूण नाट्याचे सूत्रधार हे दोघे दुय्यम नेते असण्यापेक्षाही त्यांचेच पक्षश्रेष्ठी त्यात खर्‍या अर्थाने गुंतलेले आहेत. उद्धव ठाकरे वा शिवसेना यांच्या असहकारामुळे युतीचे सरकार बनू शकलेले नाही. त्यामुळे असे सरकार बनून माघार घेतल्याने कोसळण्याची नामुष्की भाजपाच्या वाट्याला आलेली नाही. ती नामुष्की अजितदादांनी तीन दिवसांच्या सहवासात दिलेली आहे, पण त्याविषयी भाजपाचे व फडणवीस यांचे पूर्णपणे मौन आहे. मग त्याला दगाफटका म्हणायचे की विचित्र सहकार्य म्हणायचे? दादांच्या बाबतीत फडणवीस व भाजपाची प्रतिक्रिया ही उपकृत झालो, अशीच नाही काय? मग असा प्रश्न पडतो की, अजितदादांनी दोनतीन दिवसांसाठी भाजपाच्या सोबत येऊन कोसळणारे सरकार स्थापण्यामध्ये केलेली मदत, हे उपकार कशासाठी असू शकतात? याला जोडून आणखी एक प्रश्न आहे. शपथविधी झाल्यानंतर अजितदादा यांनी उपमुख्यमंत्री म्हणून नेमके काय सरकारी काम केले? ते आपल्या भावाच्या वा नंतर दोन दिवस आपल्याच घरी बसून होते. मधल्या काळात एक दिवस त्यांनी विधानभवनाच्या परिसराला भेट देऊन यशवंतरावांच्या स्मृतीदिनाच्या सरकारी सोहळ्यात भाग घेतला, पण रस्ता ओलांडल्यावर असलेले मंत्रालय वा सरकारी कार्यालयात जाण्याची तसदी त्यांनी अजिबात घेतली नाही. शपथविधी उरकल्यानंतर फडणवीस मात्र अखंड कार्यरत होते. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आणि अनेक विषय निकालातही काढले, पण अजितदादा पदभार स्वीकारायलाही मंत्रालयाकडे फिरकले नाहीत. मग त्यांनी शपथविधी कशाला उरकला होता? निव्वळ देखावा पार पाडण्यासाठी ते औपचारिकरित्या तिथे हजेरी लावायला गेले होते काय? आता दोघेही म्हणतात, योग्य वेळ आल्यावर त्याविषयी बोलू. ती योग्य वेळ कुठली असेल? विधानसभा निवडणुका लागल्या असताना आपला अर्ज दाखल करताना बाळासाहेबांचे नातू आदित्य ठाकरे यांनी ‘हीच ती वेळ’ अशी घोषणा केली होती, पण ती वेळ यायला दोन महिने लागले आणि आता उद्धव ठाकरे यांचा शपथविधी झालेला आहे. दुसरीकडे भाजपाची सर्व प्रतिष्ठा पणाला लावून अल्पजिवी सरकार स्थापन केलेल्या देवेंद्र फडणवीसांनाही त्यांचा पक्ष कुठला जाब विचारत नाही. उलट पुन्हा झालेल्या आमदारांच्या बैठकीत त्यांचीच पक्षाचे सर्वोच्च नेता म्हणून निवड केली जाते आणि त्यांच्यावरच विश्वास व्यक्त केला जातो. किती अजब गोष्ट आहे ना? रस्त्यावरचा सामान्य पाठीराखा, कार्यकर्ता वा सहानुभूतीदार त्या घटनाक्रमाने विचलीत होऊन गेला आहे, पण त्याच पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांना आपल्या पक्षाची इज्जत धुळीला मिळाल्याचे जराही वैषम्य वाटलेले नाही. दादांचे पक्षात जोरदार स्वागत झाले आणि देवेंद्र यांच्यावर पक्षाने पुन्हा विश्वास प्रकट केला. त्या ८० तासांत अजितदादांनी त्यापेक्षा कोणती वेगळी भूमिका स्वीकारली? निरर्थक मंत्रिपद वा अधिकारपद घेऊन त्यांनी मिळवले काय? काहीकाळ गद्दारीचा शिक्का व पाठीराखे वा अनभिज्ञ कार्यकर्त्यांचे शिव्याशाप? राजीनाम्यानंतर वा सरकार कोसळल्याचे वृत्त आल्यानंतर काही तासांतच अजितदादा काकांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर निवांत पोहोचले. जणु मधल्या तीन दिवसांत काही घडलेलेच नाही अशा थाटात काकांनी पुतण्याचे स्वागत केले. बुधवारी भगिनी सुप्रियानेही विधानभवनात थोरल्या दादाला अशी गळाभेट दिली की, मधल्या दोनचार दिवसांचा सूर्यही उगवलेला नसावा. अर्थात सूर्य उगवला होता आणि मावळलाही होता, पण हे आधुनिक महानाट्य लिहिणार्‍या वा त्याचे सादरीकरण करणार्‍यांना सूर्य उगवलेला दाखवायचा नव्हता. दिसला तरी बघू द्यायचा नव्हता. मंचावर वा पडद्यावर घडणारे नाटक आपण बघत होतो, पण पडद्यामागून सूत्रे हलवणार्‍यांचा चेहराही आपल्याला दिसलेला नाही. आपली गोष्ट सोडा. आपण घरात बसून वर्तमानपत्र वाचतो किंवा टिव्हीवरच्या बातम्या बघतो. त्यासाठी कॅमेरा घेऊन धावणार्‍यांनाही मधल्या चार दिवसांत उगवलेला सूर्य बघता आला नाही. कारण त्यांना रात्रीस खेळ चाले मालिकेतली भुताटकी भयभीत करीत असते. त्यातले विरोधाभास बघायची भीती वाटते. घटनाक्रमातले वळसे आडोसे दिसत नाहीत.शपथ घेतल्यावर त्यांनी एकमेकांशी हस्तांदोलनही केले आणि विषय संपला. त्यानंतर ते दोघेही पुन्हा एकत्र दिसले, ते विधान भवनातील यशवंतराव चव्हाणांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहताना. त्यानंतर दोघांचा एकत्रित असा कुठलाही कार्यक्रम नव्हता किंवा झाला नाही. मध्येच बातमी यायची अजितदादा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगल्यावर पोहोचले किंवा त्यांना भेटायला राष्ट्रवादीचे कोण कोण दिग्गज नेते आले. अखेरीस ऐंशी तासांच्या या नाट्यावर पडदा टाकत अजितदादांनी आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला आणि रात्री उशिरा ते माघारी काकांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले. दरम्यान, फडणवीसांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. कुठल्या तरी हॉटेलात तीन पक्षांच्या आघाडीचे आमदार एकत्र आणून त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नेतेपदी निवडही झालेली होती. आमदारांना घटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ देण्यात आली होती. इतके उरकून काका घरी परतले, तेव्हा पुतण्या हजर झालेला होता. तिकडे राजीनामा देण्यापूर्वी घटनाक्रम सांगताना फडणवीसांनी बहूमत नसल्याचे मान्य करून राजीनामा देणार, अशी बातमी पत्रकारांना दिलेली होती, पण तेव्हा किंवा त्यानंतर हे सरकार बनले कशाला व कशाच्या आधारावर; याचा एका शब्दानेही खुलासा देवेंद्र यांनी केला नाही. दुसर्‍या दिवशी तसा प्रश्न विचारण्यात आल्यावर योग्यवेळी अजितदादांबद्दल बोलेन, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले. दुसरीकडे गुरुवारी नव्या सरकारचा शपथविधी होण्यापूर्वी तोच प्रश्न अजितदादांना विचारण्यात आला. त्यांनीही तशीच टोलवाटोलवी केली. मुद्दा इतकाच की, यांनी नाही तर जनतेला सतावणार्‍या त्या रहस्याचा भेद कोणी करायचा?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -