गाणं जुळून येण्याचे योग!

‘मुड मुड के ना देख मुड मुड के, जिंदगानी के सफर में तू अकेला ही नही हैं, हम भी तेरे हमसफर हैं. ‘जगातलं असं इतकं कुठलं देखणेपण आहे की ज्यामुळे आपल्या प्रवासात तुला आपल्याबरोबरच्या सहप्रवाशाचाही विसर पडावा, असा थेट प्रश्न शैलेंद्रंमधल्या या कवीने जयकिशनना केला. शैलेंद्रंच्या तोंडून आलेल्या याच शब्दांचं पुढे ‘श्री 420’ साठी गाणं झालं, जे मन्ना डे, आशा भोसलेंनी कोरससह गायलं.

लग्न जुळून यायला तसाच योग जुळून यावा लागतो, असं वडीलधारे लोक म्हणतात. गीतकार शांताराम नांदगावकर म्हणायचे, गाणं जुळून यायलाही तसाच योग जुळून यावा लागतो. खुद्द शांताराम नांदगांवकरांनी आपल्या आयुष्यात जुळून आलेल्या एका गाण्याचा योग सांगितला होता. ते म्हणाले, मी गाणी लिहू लागलो तो काळ गीतरामायणाने भारलेला होता. कवी ग.दि. माडगुळकर आणि गायक-संगीतकार सुधीर फडके यांनी अजरामर करून ठेवलेल्या त्या गीतरामायणाची मोहिनी त्या काळातल्या लोकांवर होती. साहजिकच, बर्‍याचदा ती गाणी त्या काळात रेडिओवर लागायची…आणि लागायची ती भल्या पहाटे म्हणजे रामप्रहरी लागायची. एके दिवशी मी असाच पहाटे उठताना रेडिओ लावला तर रेडिओवर गाणं सुरू झालं तेच मुळी सुधीर फडकेंच्या ‘श्रीराम श्रीराम श्रीराम’ या प्रभुरामचंद्रांच्या नामस्मरणाने. अर्थातच, त्यापुढचे शब्द होते ‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती.’ हे गाणं ऐकता ऐकताच माझ्या मनात शब्द आले-रामप्रहरी रामगाथा रंगते ओठांवरी. यथावकाश त्याचं गाणं झालं आणि तेही पुढे रामप्रहरी रेडिओवर वाजू लागलं.

कवी शैलेंद्रंंच्या आयुष्यात तर गाण्याचे असे अनेक योग आले. त्यातला ‘श्री 420’ या सिनेमाच्या वेळचा योग तर खास सांगण्यासारखा आहे. या सिनेमाची जुळवाजुळव सुरू असताना एके दिवशी गीतकार शैलेंद्र आणि संगीतकार शंकर-जयकिशन जोडीतले जयकिशन असेच एका रस्त्याने चालले होते. चालता चालता दोघं गप्पा मारत होते आणि आपल्याच नादात होते. अशाच वेळी त्या रस्त्यात समोरून अचानक एक इतका अतिशय देखणा मुखचंद्रमा समोर आला की दोघांची नजर तिकडे वळल्याशिवाय राहिली नाही. शैलेंद्रंनी तो मुखचंद्रमा न्याहाळला, पण तेवढ्यापुरतंच त्यांनी त्याची दखल घेतली. पण जयकिशन मात्र तो मुखचंद्रमा मागे निघून गेला तरी मागे वळून वळून पुन्हा पुन्हा न्याहाळू लागले. दोघांच्या गप्पांपेक्षा ते पाठमोर्‍या मुखचंद्रमाला जास्त न्याय देऊ लागले. या अशाच वेळी शैलेंद्रंमधला कवी जागा झाला आणि तो जयकिशनना म्हणाला, ‘मुड मुड के ना देख मुड मुड के, जिंदगानी के सफर में तू अकेला ही नही हैं, हम भी तेरे हमसफर हैं. ‘जगातलं असं इतकं कुठलं देखणेपण आहे की ज्यामुळे आपल्या प्रवासात तुला आपल्याबरोबरच्या सहप्रवाशाचाही विसर पडावा, असा थेट प्रश्न शैलेंद्रंमधल्या या कवीने जयकिशनना केला. शैलेंद्रंच्या तोंडून आलेल्या याच शब्दांचं पुढे ‘श्री 420’ साठी गाणं झालं, जे मन्ना डे, आशा भोसलेंनी कोरससह गायलं.

‘ही चाल तुरूतुरू, उडती केस भुरूभुरू’ आणि ‘मनाच्या धुंदीत, लहरीत ये ना’ ही गाणी करणार्‍या संगीतकार देवदत्त साबळेंच्या बाबतीतला असाच एक किस्सा. ‘मनाच्या धुंदीत, लहरीत ये ना, सखे गं साजणे’ या गाण्याच्या मुखड्याची चाल देवदत्त साबळेंकडून लावून झाली होती. अंतर्‍याची चाल त्यांना सुचत होती; पण ती त्यांच्या मनासारखी होत नव्हती. अशाच एका काळात त्यांनी एका घरातल्या गणपतीची मिरवणूक पाहिली. त्यातल्या काही गणेशभक्तांनी ‘पायी हळूहळू चाला, मुखाने मोरया बोला’ असं म्हणत झांजांवर एक विशिष्ट ठेका पकडला होता. देवदत्त साबळेंचं लक्ष त्या ठेक्याकडे गेलं आणि त्यांना ‘मनाच्या धुंदीत, लहरीत ये ना’ या आपल्या गाण्यातल्या ‘चांदनं रूपाचं आलंय भरा, मुखडा तुझा गं अतिसाजरा’ या अंतर्‍याची चाल सुचली. पुढे शांता शेळकेंनी लिहिलेलं हे गाणं जयवंत कुळकर्णींच्या आवाजात रेकॉर्ड झालं आणि अवघ्या महाराष्ट्राने त्या एका काळात डोक्यावर घेतलं.

कवी सौमित्र म्हणजे किशोर कदमनाही असंच एकदा एक गाणं लिहून द्यायचं होतं. गाणं लिहिण्यासाठी त्यांना तेव्हा वेळ मिळत नव्हता म्हणा किंवा तसेच मनाजोगते शब्द सापडत नव्हते म्हणा, पण गाणं काही जुळून येत नव्हतं. एके दिवशी एका कार्यक्रमाहून ते घरी परतत असताना मध्यरात्र उलटून गेली. खारदांड्याला त्यांच्या घराशेजारी असलेल्या समुद्रकिनारी रात्र सरून आकाशात पहाटेचे रंग भरले जात होते. कवी सौमित्र जागत्या डोळ्यांनी ते पहाटेचं आकाश न्याहाळत होते…आणि असंच आकाश न्याहाळत असताना त्यांच्या मनात शब्द तरळले – पहाटेस तांबडे फुटावे, तसे कुणाला शब्द सुचावे!…हेच शब्द संगीतकार अशोक पत्कींकडे पोहोचवण्यात आले. त्याला त्यांनी छान मुग्धमुलायम चाल लावली. सुरेश वाडकरांनी ते गायलं आणि ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्यांना एका मिठ्ठास गाण्याची अनुभूती मिळाली.

‘घन घन माला नभी दाटल्या, कोसळती धारा’ या गाण्याची कहाणी थोडी निराळी आहे. ती शब्द वगैरे जुळून येण्याची नाही. पण तरीही मनोरंजक आहे. झालं होतं असं की ‘वरदक्षिणा’ नावाच्या सिनेमाची पटकथा जमवण्यात ग.दि. माडगुळकर दंग झाले होते. आपले लेखनिक बाळ चितळेंबरोबर त्या कामात चांगलेच रंगात आले होते. माडगुळकरांना छान छान सुचत होतं तसं माडगुळकर लिहित जात होते. लिहिणं संपलं तेव्हा सृजनाचा एक अनोखा आनंद दोघांच्याही चेहर्‍यावर विलसला होता. लिखाणाचं ते काम संपल्यावर त्या पटकथेचं बाड घेऊन चितळे नारायण पेठेतल्या आपल्या घरी आले. पटकथेचं ते बाड त्यांनी घरातल्या एका मोठ्या टेबलावर ठेवलं आणि कसला तरी संदर्भ आपल्याकडून लिहायचा राहिला याची आठवण येऊन ते लगबगीने पुन्हा माडगुळकरांकडे निघाले. 12 जुलै 1961 चा तो दुर्दैवी दिवस. याच दिवशी पुण्यातल्या पानशेतचं धरण फुटलं. सगळीकडे पाणीच पाणी झालं. घरादारात पाणी शिरलं.

काही संसार वाहून गेले. काही तरंगत राहिले. काय दुर्बुध्दी झाली आणि आपण ‘वरदक्षिणा’च्या कथेचं ते बाड टेबलावर ठेवून बाहेर पडलो असं चितळेंना झालं. त्यांनी समोर पाहिलं तर लकडी पुलावर पाणी आलं होतं. पाण्याचा हा प्रपात ओसरल्यानंतर आपल्याला त्या पटकथेचा कपटाही हाती लागणार नाही याची एव्हाना चितळेंना खात्री पटली होती. चितळे निराश झाले होते. पाणी ओसरण्याच्या प्रतिक्षेत बसले होते. दोन दिवसांनंतर घरादारात शिरलेल्या पाण्याची पातळी कमी कमी होत गेली. काही कालावधीतच पाणी साफ ओसरलं. ओलेत्या घराच्या दुर्दशेला सामोरं जाण्यासाठी मन घट्ट करून चितळे आत शिरले. बघतात तर काय, ‘वरदक्षिणा’च्या कथेचं ते बाड त्या टेबलावर जसंच्या तसं निपचित पडलं होतं. ते बघून चितळेंना अगदी भरून आलं. त्यांनी अनावर आवेगाने ‘वरदक्षिणा’च्या त्या पटकथेवर झेप घेतली. पटकथेच्या त्या बाडावर चितळेंची सहज नजर गेली. नजर जाताच त्यांना सर्वप्रथम कोणते शब्द दिसले असतील तर ते ‘घनघनमाला नभी दाटल्या कोसळती धारा’ हे!

हा चमत्कार कसा काय झाला याचा उलगडा नंतर चितळेंच्या समोरच्या घरातल्या गृहस्थांनी केला. झालं होतं असं की चितळेंच्या घरातलं ते विशिष्ट आकाराचं टेबल पाण्यावर तरंगत राहिलं होतं. अगदी छतापर्यंत आलं होतं. पण जसजसं पाणी ओसरत गेलं तसं ते टेबल अलगद जमिनीला लागलं होतं. दंतकथा वाटावी अशी ही सत्यकथा होती. या कथेत पाण्याचं गाणं पाण्याने तारलं होतं, म्हणून तर पुढे वसंत पवारांच्या दिग्दर्शनाखाली मन्ना डे आणि कोरसच्या आवाजात हे गाणं ऐकण्याची संधी सर्वांना लाभली. हासुध्दा जुळलेलं गाणं तसंच्या तसं मिळण्याचा योगायोगच!

…तर योगायोगाच्या कथेतल्या काही गाण्यांचे हे गंमतीदार किस्से…अशाच आणखीही काही गाण्यांचे किस्से यापुढेही इथे सांगता येतील!

– सुशील सुर्वे