घरफिचर्सनातं - मैत्रीच्या पलीकडचं आणि प्रेमाच्या अलीकडचं

नातं – मैत्रीच्या पलीकडचं आणि प्रेमाच्या अलीकडचं

Subscribe

प्रत्येक माणसांचं दुसर्‍या माणसाबरोबरचं नातं हे वेगळं असतं. मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री या समजायला गेलं तर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हा फरक समजून घेण्यासाठी हा विशेष लेख नक्की वाचा...

प्रत्येक माणसांचं दुसर्‍या माणसाबरोबरचं नातं हे वेगळं असतं. आपण नेहमीच म्हणतो की, रक्ताचं नातं आपण बनवू शकत नाही. पण मैत्री आणि प्रेम हे नातं आपण निवडतो. मैत्रीतील प्रेम आणि प्रेमातील मैत्री या समजायला गेलं तर दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हे समजण्यात गफलत झाली की, नाती फसायला लागतात. वेगवेगळ्या गोष्टी असल्या तरीही त्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. मैत्रीची वीण प्रेम घट्ट करते तर प्रेमातील मैत्री नातं घट्ट करते. पण एक नातं असंही असतं जे मैत्रीच्या पलीकडचं आणि प्रेमाच्या अलीकडचं असतं.

हे नातं बर्‍याच लोकांच्या बाबतीत दिसून येतं. पण ते समजून घेण्याची प्रत्येक मनाची तयारी असतेच असं नाही. आपण समाजात राहतो त्यामुळं त्यांच्या दृष्टीकोनाला आणि आपल्या नात्याकडे बघण्याला आपण रोख लावू शकत नाही. पण हे नातं समजून घ्यायला आपण स्वतःच स्वतःला मदत नक्कीच करू शकतो. आता तुम्ही म्हणाल हे कुठलं नवं नातं? पण हे नातं प्रत्येकजण कधी ना कधीतरी निभावत असतोच.

- Advertisement -

आयुष्यात एक तरी व्यक्ती अशी असते जिच्याशी आपली जास्त जवळीक असते. इतर कोणाच्या असण्या-नसण्यानं फरक पडत नाही. पण त्या व्यक्तीमुळं आयुष्यात खूप मोठा फरक पडतो. आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रत्येक क्षणी केवळ तीच व्यक्ती आपल्याला समजून घेऊ शकते हा आपल्या मनाचा ठाम समज असतो. त्या व्यक्तीची एक सवय होऊन जाते. हेच ते नातं असतं मैत्रीच्या पलीकडचं आणि प्रेमाच्या अलीकडचं. कारण , मैत्रीपेक्षा जास्त हक्क या व्यक्तीवर गाजवला जातो. पण प्रेमापेक्षा कमी लक्ष देण्यात येतं.

दुसर्‍यांना बघताना कदाचित तुम्ही एकमेकांवर प्रेम करत आहात अशी जाणीव होऊ शकते. पण तुम्हालाही याची जाणीव नसते. आपण जोपर्यंत त्या व्यक्तीकडे व्यक्त होत नाही किंवा भेटत नाही, तोपर्यंत जीव कासावीस होत राहतो. खरे तर आपल्या आयुष्यातील इतर व्यक्तींनीही तोच सल्ला दिलेला असतो पण तो पटत नाही. पण या व्यक्तीनं सांगितल्यावर आपण सहज मान्य करतो. हे सर्व होतं ते केवळ त्या मैत्री आणि प्रेमाच्या बाँडिंगमुळं. त्याचं/तिचं असणं यावेळी खूप महत्त्वाचं असतं. या नात्यात गुंता होत नाहीत असं म्हणतात. पण खरं तर जास्त गुंता याच नात्यात होतो. कारण आपल्याच मनात समोरच्या व्यक्तीच्या बाबतीतील भावना स्पष्ट नसतात.

- Advertisement -

या नात्यात अपेक्षा ठेवायच्या की नाही ठेवायच्या हा सर्वात मोठा गुंता. अपेक्षा ठेवल्या तर भंग होण्याचा धोका. नाही ठेवल्या तर जास्त जवळीक नसल्याचा आरोप. हे नातं कधीही एकमेकांकडून सुटू नये हा अट्टहास असूनही कधीतरी ते तुटण्याचा धोका मात्र नक्की असतो. हा धोका निर्माण होतो तो दोघांमध्ये आलेल्या तिसर्‍या व्यक्तीमुळं. काही लोकांना हे नातं समजून नीट जपता येतं. तर काहींचं हे नातं शाळा – कॉलेजपुरतंच मर्यादित राहतं. पण शेवटपर्यंत हे नातं जे निभावू शकतात, त्यांच्यासाठी नक्कीच आयुष्य सुखकर होऊन जातं. इतर नात्यांप्रमाणं हे नातंदेखील सांभाळता यायला हवं. मुळात हे नातं ओळखता यायला हवं. तेव्हा हे नातं ओळखायला नक्की शिकता यायला हवं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -