घरफिचर्सपैशांचा जीवघेणा खेळ स्क्विड गेम

पैशांचा जीवघेणा खेळ स्क्विड गेम

Subscribe

खेळ खेळा आणि पैसे मिळवा असा साधा आणि सोपा ‘स्क्विड गेम’ या सिरीजचा कन्सेप्ट आहे. पण उत्तम कथा, उत्कृष्ट पटकथेसह निखळ मनोरंजन आणि सामाजिक परिस्थितीवर यथोचित भाष्य करणारी सिरीज म्हणून याला इतका उदंड प्रतिसाद मिळतो आहे. सबसे बडा रुपैया ही सत्य परिस्थिती कोण्या एका गावाची, शहराची किंवा देशाची राहिलेली नाहीये, बदलत्या काळानुरूप पैशाला जितके महत्व प्राप्त झालंय, तितकं माणसाच्या जीवालादेखील राहील नाही. माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लागणार्‍या पैशाने कधी माणसाच्या जीवापेक्षा स्वतःला अधिक महत्व मिळवून घेतलं हे कळलं नाही. स्क्विड गेम सिरीज ही त्याच पैशावर आणि पैशासाठी प्राणाची बाजी लावणार्‍या काही लोकांची कथा आहे.

2009 साली हिंदीत ‘लक’ नावाचा एक हिंदी सिनेमा आला होता, ज्यात संजय दत्त आणि इम्रान खान यांनी मुख्य भूमिका साकारली होती. खेळ खेळायचे आणि पैसा मिळवायचा अशा आशयाच्या कथा वेगवेगळ्या स्वरूपात मांडून प्रेक्षकांसमोर आणायचा हा पॅटर्न नवीन नाहीये, मुळात जो लक सिनेमा आपल्याकडे बनला तोही एका स्पॅनिश सिनेमापासून प्रेरित आहे. जगातील विविध भाषेत अशा कथा असलेले शेकडो सिनेमे आणि काही सिरीज प्रदर्शित झाल्या, पण जितका प्रतिसाद नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘स्क्विड गेम’ या कोरियन ड्रामा सिरिजला मिळाला, तितका इतर कुठल्याही सिनेमा अथवा सिरीजला मिळाला नाही. मला आधीपासूनच कोरियन सिनेमाबद्दल आणि सिनेसृष्टीबद्दल आकर्षण आहे, ओल्ड बॉय, ट्रेन टू बुसान असो किंवा ऑस्कर विजेता पॅरासाईट, प्रत्येक कोरियन सिनेमाची एक खासियत असते, जी त्याला इतर भाषेतील सिनेमांपेक्षा वेगळं बनवते. नुकतीच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेली स्क्विड गेम ही सिरीजदेखील याला अपवाद नाही, 10 वर्षांचा संघर्ष केल्यानंतर नेटफ्लिक्ससारख्या प्लॅटफॉर्मने या सीरिजमध्ये गुंतवणूक करण्यात रस दाखवला आणि आपल्याला ही सिरीज उपलब्ध झाली. खेळ खेळा आणि पैसे मिळवा अशी साधी आणि सोपी सिरीजची कन्सेप्ट आहे. पण उत्तम कथा, उत्कृष्ट पटकथेसह निखळ मनोरंजन आणि सामाजिक परिस्थितीवर यथोचित भाष्य करणारी सिरीज म्हणून याला इतका उदंड प्रतिसाद मिळतो आहे. सबसे बडा रुपैया ही सत्य परिस्थिती कोण्या एका गावाची, शहराची किंवा देशाची राहिलेली नाहीये, बदलत्या काळानुरूप पैशाला जितके महत्व प्राप्त झालंय, तितकं माणसाच्या जीवालादेखील राहील नाही. माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी लागणार्‍या पैशाने कधी माणसाच्या जिवापेक्षा स्वतःला अधिक महत्व मिळवून घेतलं हे कळलं नाही. स्क्विड गेम सिरीज ही त्याच पैशावर आणि पैशासाठी प्राणाची बाजी लावणार्‍या काही लोकांची कथा आहे.

स्क्विडगेम हे कोरियात लहानपणी खेळल्या जाणार्‍या एका लोकप्रिय खेळाचं नाव आहे आणि नावाप्रमाणेच या सिरीजमध्ये असेच लहानपणी खेळले जाणारे खेळ दाखविले आहेत, ज्यात जिंकणार्‍या व्यक्तीला भरमसाठ पैसा मिळेल. ते खेळ आपल्याकडे खेळल्या जाणार्‍या काही खेळांसारखेच आहे. स्टॅच्यू खेळाप्रमाणे तिकडे ग्रीन लाईट रेड लाईट आहे, रस्सीखेच प्रमाणे टग ऑफ वॉर, गोट्याला गानबु असे वेगळे नाव दिलेत, याशिवाय अजूनही 3 खेळ आहेत ज्याला ग्लास स्टेपिंग स्टोन, मॅन विथ अम्ब्रेला आणि स्क्विड गेम असं म्हटलंय. लहानपणीचे खेळ मोठ्या माणसांना खेळायचे आहे आणि ज्यात 456 लोकांची निवड झालीये, ज्यात जिंकणार्‍या व्यक्तीला 45.6 बिलियन वोन बक्षीस मिळेल. फक्त कथेत ट्विस्ट इतकाच आहे की, यात हरणार्‍या व्यक्तीला जगातूनच एलिमिनेट केलं जाईल. आता ही स्पर्धा कोण घेतं आणि कोण बक्षीस जिंकत? यासाठी सिरीज पाहावी लागेल. लहानपणीचे खेळ खेळून अब्ज रुपये जिंकण्याचा चान्स असं कोणी म्हटलं तर बरेच जण तयार होतील, पण जेव्हा या खेळात हरणार्‍या व्यक्तीला मृत्यूदंड होईल हे कळेल तेव्हा यात कोण खेळणार असा प्रश्न आपसूकच समोर येईल. या सिरीजची एक खासियत हीच आहे की, खेळाडूंची निवड करताना त्यांनी त्यातील काही खेळाडूंची बॅकस्टोरी दाखवून त्यांची खेळ खेळण्याची इच्छा किंवा अपरिहार्यता दोन्ही दाखवून दिली आहे. ज्यावेळी व्यक्तीची आर्थिक परिस्थिती चांगली नसते आणि त्याची जाणीव त्याला वेळोवेळी होत असते, तेव्हा तो पैसा मिळविण्यासाठी काहीही करायला तयार असतो, जेव्हा पैशामुळे त्याच्यापासून नाती दुरावतात, जेव्हा पैशामुळे त्याला पदोपदी अपमान स्वीकारावा लागतो, जेव्हा त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण होत नाही, तेव्हा तो व्यक्ती पैसा मिळविण्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावायलादेखील मागेपुढे पाहत नाही. सिरीजमध्ये ज्या सीओंग जी हुनची बॅकस्टोरी आपल्याला दाखवली आहे, त्याच्या जीवनात हे सर्व प्रसंग घडून गेलेत, बायकोने घटस्फोट घेतला, मुलगी दूर जाणार आहे आणि आईला डायबेटिक असतानाही काम करावं लागतंय… म्हणून तो या खेळात सहभागी होतो आणि कदाचित तीच परिस्थिती इतर कुठल्या व्यक्तीवर सध्याच्या काळात आली तर तोही असाच मार्ग स्वीकारेल.

- Advertisement -

आर्थिक विषमता केवळ एका देशाचा विषय नाहीये, महासत्तेपासून ते अविकसित राष्ट्रांपर्यंत प्रत्येक ठिकाणी ही आर्थिक विषमता आहे. काहींसाठी खेळ खेळणे मनोरंजनाचा भाग आहे तर काही लोकांसाठी लोकांना खेळ खेळवताना मरताना पाहणे हे मनोरंजन… स्क्विड गेममध्ये हीच दरी दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय, व्हीआयपी गेस्टच्या रूपात त्यांनी अतिश्रीमंत आणि गरीब यांच्यातील नातं अप्रत्यक्षरीत्या पडद्यावर आणलं आहे, खेळाडूंबद्दल व्हीआयपीजचे डायलॉग्स त्यांची मानसिकता स्पष्ट करतात. समोरचा माणूस जीवानिशी जाणं त्यांच्यासाठी फार क्षुल्लक गोष्ट आहे. ज्याप्रमाणे सिरीजमध्ये अतिश्रीमंत व्यक्तींची मानसिकता आणि बदलणारा स्वभाव दिसतो अगदी तसंच, यात सहभागी होणार्‍या खेळाडूंचा स्वभाव आणि त्यांची मानसिकतादेखील दिसून येते. 456 खेळाडू या खेळात सहभागी आहेत, प्रत्येकाला इथे जिंकायचं आहे पण तो विजय मिळविण्यासाठी प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा आहे. काहीजण हॉलमध्ये अंधार होताच इतर प्रतिस्पर्ध्यांना ठार मारत आपली स्पर्धा सोपी करू पाहतात, तर काहीजण त्यांचा बचाव करत स्पर्धेला प्रामाणिकतेने जिंकू पाहतात. पण या प्रामाणिकपणालादेखील काही मर्यादा आहेत, ज्या स्पर्धा कठीण होताच तुटायला लागतात. टीम म्हणून एकत्र खेळणारे नंतर एकमेकांच्या जीवावर उठतात, आधी प्रामाणिक शांत वाटणारा चो सांग हू असो किंवा 80 वर्षाचा म्हातारा स्पर्धक, प्रत्येकाचे स्वभाव आणि बदललेली भूमिका आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळी माणसाला पैसा सर्वात महत्वाचा असतो तेव्हा त्याच्यासाठी तत्वं किती महत्वाची ठरतील? या प्रश्नाचं उत्तर वारंवार आपल्याला मिळते, नवरा बायकोच्या नात्यांपासून एका आईपर्यंत, समाजातील विविध स्तरातील लोक आणि त्यांचे आपसातील नाते आपल्याला यात पाहायला मिळते. जेव्हा प्रश्न जीव देण्याचा येतो तेव्हा कोण तयार होतं आणि कोण जीव घ्यायला पुढे येतं, हे देखील या सीरिजमध्ये दाखविले आहे.

21 व्या शतकातील पैशापुढे हतबल झालेल्या सामान्य माणसांची कथा म्हणजे स्क्विड गेम, यात माणसाचा स्वभाव जितक्या ताकदीने दाखविला आहे, त्याच्या प्रतिक्रिया आणि एकूण वागणूक ज्या पद्धतीने दाखविली आहे, त्यामुळे ही सिरीज लगेच रीलेट होते. साधी गोष्ट, जेव्हा लहान मुलांचा हा खेळ जीवघेणा आहे, ही गोष्ट खेळाडूंना कळते तेव्हा सर्वजण जीवाच्या भीतीने मतदान करत खेळ खेळणे टाळतात. पण जेव्हा पुन्हा आपल्या सामान्य जीवनात त्यांना त्याच त्याच प्रसंगाना सामोरं जावं लागतं, तेव्हा त्यांच्यासाठी जीवापेक्षा पैसा मोठा वाटायला लागतो आणि ते पुन्हा खेळण्यासाठी परततात. सिरीजबद्दल आवडलेली दुसरी गोष्ट म्हणजे यात खेळाडूंना जे नियम सांगितले होते त्यात आयोजकांकडून कोठेही हेराफेरी करण्यात आली नाही, ज्यांनी तो प्रयत्न केला त्यांना शिक्षा मिळाली, म्हणून आयोजक फार नकारात्मक वाटत नाहीत. तिसरी गोष्ट म्हणजे यात प्रतिकं म्हणून ज्या गोष्टी वापरल्या आहेत त्यादेखील उत्तम जमून आल्यात, म्हणजे हिंसा युवा पिढीत वाढते म्हणून त्यांनाच मास्क घालून आयोजक बनविण्यात आलं आहे. आयोजकांचा युनिफॉर्म आणि मास्क कुठेतरी मनी हाईस्टकडून चोरल्यासारखा वाटतो, बाकी सेट अतिउत्तम या प्रकारातील आहे. प्रत्येक खेळ वेगळ्या ठिकाणी होतो आणि ते ठिकाणदेखील दिसायला चांगले वाटते. पैसा आणि संकटात असलेल्या माणसाचा त्यासाठी बदलणारा स्वभाव केवळ याचंच चित्रण स्क्विड गेममध्ये केलं असतं, तर ते एकांगी वाटलं असतं. जगात आजही पैशापेक्षा माणुसकीला महत्व देणार्‍या व्यक्ती शिल्लक आहेत, भले त्यांची संख्या कमी असली तरीसुद्धा ते आहेतच आणि सीरिजमध्ये अशी व्यक्ती पाहायला मिळते, बर्फवृष्टी सुरू असताना दारू पिऊन रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका व्यक्तीकडे कोणी वळून पाहील का? त्याची मदत कोणी करेल का? असा एक प्रश्न विचारून त्यांनी त्या एका सीनमधून जगात शिल्लक असलेली माणुसकीदेखील दाखवून दिली आहे. म्हणून स्क्विड गेम पैशांसाठी असलेल्या खेळापासून ते त्यात दडलेल्या सद्य:स्थितीतील मानवी भावनांच उत्तम रेखाटन करतो, त्यासाठी का होईना एकदा पहावी अशी ही सिरीज आहे.

- Advertisement -

अनिकेत म्हस्के

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -