घरफिचर्सजेव्हा निकालाची परीक्षा होते

जेव्हा निकालाची परीक्षा होते

Subscribe

राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी म्हणजेच एसएससी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाकडे लागले होते. अखेर शनिवारी हा निकाल जाहीर झाला खरा, पण या निकालाने पालक आणि विद्यार्थ्यांबरोबरच संपूर्ण शिक्षण विभागाची झोप उडवून दिली आहे. मोठ्या प्रमाणात या निकालाचे स्वागत करण्यात आले असले तरी या निकालाच्या विरोधात आता शिक्षणतज्ज्ञांची एक फळी विद्यार्थी पालकांबरोबर उभी राहिली आहे. त्यामुळे राज्य शिक्षण विभागाचा हा निकाल आता परीक्षेच्या कचाट्यात सापडला असून, त्यावरच आता विचार करण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच राज्य शिक्षण विभागाचा दहावी बोर्डाचा निकाल कधी लागतो याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. यंदा किती विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळतात याकडे पालक आणि शिक्षक आस लावून बसले होते. अनेकांनी तर या निकालाच्या प्रतीक्षेत देवदेखील पाण्यात ठेवले, पण शनिवारी जाहीर झालेल्या या निकालाने अनेकांची भाकिते खोटी ठरवली, तर अनेकांचे निकाल शंभरीचीच हवाच काढून टाकली. यंदा राज्य शिक्षण मंडळाच्या निकालाला नव्वदीदेखील पार करता आलेली नाही. राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार यंदा राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी बोर्डाच्या निकाल तब्बल १२.३१ टक्क्यांनी कमी लागला असून, राज्याचा निकाल केवळ ७७.१० टक्के लागला आहे. या खालावलेला निकालाने यंदा अनेक विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची गणिते बिघडवून टाकली असून, निकालाच्या गुणवत्तेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, पण खरंच हा निकाल इतका वाईट लागला आहे का? याचा शोध घेणे ही तितकंच गरजेचे आहे. त्याचाच केलेला हा प्रयत्न.

राज्याचा गेल्या काही वर्षांच्या एसएससी बोर्डाच्या निकालावर नजर टाकली असता 100 टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असल्याचे दिसून येत होते. १०० टक्के गुण मिळवणे किंवा ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही सगळ्यांना आश्चर्यचकीत करत होती. दर पाच विद्यार्थ्यांमागे एका विद्यार्थ्याचा निकाल ९० टक्के पाहिल्यानंतर ९० टक्के गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. विद्यार्थ्यांवर होत असलेली गुणांची खैरात लक्षात घेता अनेकांना हा प्रकार आपल्यावेळी का नव्हता असा प्रश्नदेखील पडला. अनेकांनी तर बेस्ट ऑफ फाईव्ह आम्हाला असते तर आम्ही बोर्ड फाडून आलो असतो, अशी गमतीदार प्रतिक्रिया देतानादेखील आपण सगळ्यांनी अनेकदा ऐकले असेल, पण राज्य शिक्षण मंडळाने शनिवारी जाहीर केलेल्या निकालाने अनेकांची झोपच उडवली आहे हे म्हणणेदेखील वावगे ठरणार नाही, पण खरंच हा निकाल चांगला लागला आहे का? शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या म्हणण्यानुसार या निकालात गुणांची सूज कमी झालेली आहे, तर हा निकाल उत्तम लागला असून, विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन झालेले आहे. शिक्षणमंत्र्यांनी उगारलेल्या या शेर्‍यावर अनेकांनी विरोधी फुल्ली मारत याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे, पण या सगळ्या नाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे आहेत, हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

- Advertisement -

मुळात यंदा राज्याचा निकाल कमी का लागला याची कारणे लक्षात घेतली तर यात प्रमुख कारण म्हणजे अभ्यासक्रमात झालेला बदल हे मानले जात आहे. मुळात कोणत्याही इयत्तांचा अभ्यासक्रम बदलला तर त्याचा थेट परिणाम हा निकालावर होत असतो, पण यंदा तो इतका खालावलेला असेल याचा विचार कोणाच्याही मनात आला नसेल, पण या अभ्यासक्रमात बदलाबरोबरच राज्य शिक्षण मंडळाने सुरू केलेली कृतिपत्रिका ही पद्धत, कॉपीमुक्ती अभियान यांमुळे निकाल कमी लागला आहे, असे म्हटले जात आहे. शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनीदेखील या निकालाविरोधात भूमिका स्पष्ट केली असून, त्यांनी याची कारणे अधोरेखित केली आहेत. या निकालावर भाष्य करताना शिक्षणतज्ज्ञ सांगतात की, अभ्यासक्रमात आतापर्यंत अनेकदा बदल झाले आहेत, पण त्यामुळे निकाल इतके कमी कधीच लागले नाहीत. कृतिपत्रिका आणि कॉपीमुक्ती अभियान या गोष्टीसुद्धा नवीन नाहीत. निकालात घसरण झाली ती अंतर्गत गुण रद्द केल्यामुळेच. त्यामुळे आता शिक्षकांकडूनदेखील आरडाओरड केली जात आहे, पण हेच शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांवर होत असलेली गुणांची खैरात दिली जात होती तेव्हा मात्र मूग गिळून गप्प बसले होते. अनेक शाळांमध्ये तर मुलांचा आणि शाळेच्या निकालाचा गुणांचा टक्का नव्वदी पार व्हावा म्हणून विद्यार्थ्यांना विविध खेळात तर काहींनी इतर कला स्पर्धेत भाग घ्यायला भाग पाडले. इतकेच कशाला काही शाळांनी दहावी बोर्डाचा निकाल 100 टक्के लागावा म्हणून नववीत कमी गुण मिळणार्‍या विद्यार्थ्यांना थेट घरचा रस्ता दाखवला. शिक्षण विभागातील हा प्रकार उभ्या महाराष्ट्राने पाहिला त्यावेळी इतकी ओरड का करण्यात आली नाही, हे न सुटलेलं कोडं आहे. ही झाली नाण्याची एक बाजू, पण दुसर्‍या गोष्टीचा विचार करणंदेखील तितकंच गजरेचं झालं आहे.

आज शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी निकाल कमी लागल्यामुळे सूज कमी झाली आहे, खरी गुणवत्ता समजली आहे, अशा शब्दात आनंद व्यक्त केला. शिक्षणमंत्र्यांच्या या प्रतिक्रियेचे स्वागतही करण्यात आले, पण तीन तासांच्या लेखी परीक्षेत खरी गुणवत्ता कळते असे मानणे खूपच भाबडेपणाचे आहे, असे वाटत नाही काय? असा प्रश्न आता थेट वसंत काळपांडे सरांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisement -

काळपांडे सर सांगतात की , अंतर्गत गुणांची ‘खिरापत’ बंद झाली याचाही अनेकांना आनंद झाला. अंतर्गत गुण योग्य प्रकारे दिले जात नसतील तर त्याचा दोष कोणाचा? सर्वांगीण गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल म्हणून टाकणार्‍या या पद्धतीचा की ती तिची अप्रामाणिकपणे अंमलबजावणी करणार्‍या यंत्रणेचा? सीबीएसई, आयसीएसई यांनी अंतर्गत गुणांची पद्धत बंद केली नाही. मग आपल्यालाच आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायची काय गरज होती? याच राज्यातले राज्य मंडळाच्या शाळा चालवणारे संस्थाचालक, शिक्षक, पालक सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळा चालवायला लागले की अचानक प्रामाणिकपणे वागायला लागतात काय? यांच्यात हे सद्गुण येण्यासाठी असा कोणता चमत्कार घडतो? अंतर्गत गुण नसल्यामुळे घसरलेल्या निकालाचा सर्वात जास्त आनंद प्रामुख्याने राज्य मंडळाच्या शाळांच्या शिक्षकांना झालेला दिसतो. आपण अप्रामाणिक आहोत याचा आनंद वाटणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळसच. खरे म्हणजे अंतर्गत गुण रद्द झाल्यामुळे आपल्याच विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, हे कोणाच्या कसे लक्षात येत नाही? असा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी आपल्या विचारात व्यक्त केले जो आज सगळ्यात चर्चेचा ठरतो.

कारण कमी झालेल्या निकालाचा थेट फटका हा राज्य शिक्षण मंडळातील मुलांना बसणार यात तिळमात्रही शंका नाही. इतकेच नव्हे तर मुंबई आणि पुणे या शहरांतील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी प्रवेशाच्या वेळी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडीच्या संस्था मिळणार नाहीत. आज आपल्या आवडत्या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळेल अशा भ्रमात असणार्‍या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत त्यांचे आवडते कॉलेज मिळेल अशी कोणतीही चिन्हे नाहीत. या सगळ्या जागा सीबीएसई, आयसीएसई विद्यार्थी पटकवतील हे सत्य नाकारता येत नाही. त्यामुळेच राज्य मंडळाची नकारात्मक प्रतिमा निर्माण होऊन सीबीएसई आणि आयसीएसई मंडळांच्या शाळांतील प्रवेश वाढतील. या शाळांची संख्या वाढेल. ज्याचा सरळ फटका येत्या काळात राज्यातील शिक्षण संस्थांवर विशेषकरून मराठी शाळेवर होणार आहे. यामुळे का होईना पालकांच्या मनात सीबीएसई आणि इतर मंडळाच्या शाळांवर विश्वास अधिक वाढणार आहे. परिणामी राज्य मंडळाच्या शाळांना कुलूप लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर कोचिंग संस्कृतीला आणखी उत्तेजन मिळेल. त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय संपूर्ण शिक्षण व्यवस्थेला विचार करायला लावत आहे. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या या निर्णयामुळे घसरलेला हा निकाल आहे. याचे दुष्परिणाम दूर व्हायला भरपूर कालावधी लागेल आणि ते दूर होण्यासाठी यापुढे बराच कालावधी जाणार आहे. त्यामुळे आता खरी शिक्षणाची आणि शिक्षणमंत्र्यांची खरी कसोटी असणार आहे. राज्यातील मुलांना प्रवेशाचा आणि त्यानंतर फटका बसणार नाही, याची खात्री विद्यार्थी पालकांना पटवून द्यावी लागणार आहे. त्यामुळेच का होइना पण यंदा फुगवटा नसलेला हा निकाल सर्वोत्तम निकाल असला तरी त्याची खर्‍या अर्थाने परीक्षा सुरू झाली असून, त्याचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -