वस्तीची गाडी

वस्तीची एसटी गाडी कोकणी जीवनातील एक आमूलाग्र क्रांतीचा घटक होता आणि आहे. ह्या वस्तीच्या गाडीने अनेक कोकणाबाहेरच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरांना कोकणी पाहुणचार आणि कोकणी माणसाच्या दैनंदिन जीवनाच्या जवळ आणले. रात्री मुक्काम करून सकाळी हे ड्रायव्हर-कंडक्टर निघाले की, निघालेल्या पाहुण्याला सोडायला कसे आपण गाडीपर्यंत जातो तसा घराचा माणूस बाहेर पडे. ह्या गाड्येक जेवा असशा तेवा मुक्कामाक हडे येवा, हे असं आग्रहाचं निमंत्रण द्यायला हा विसरत नसे. गावागावात एसटी चालू रहाव्या, ह्या वस्तीच्या गाड्या चालू रहाव्या म्हणून स्थानिक लोकांनी काय काय उपद्व्याप केले हे सांगता सोय नाही.

story of Residential ST vehicle driver Hospitality in Konkan rural village
वस्तीची गाडी

तिन्हीसांजेची वेळ. गावातली बहुतेक शेतकरी मंडळी शेतातील आपली कामं धामं आटोपून वडाच्या झाडाखाली आली आहेत. गावातली काही रिकामटेकडी पोरंदेखील वडाच्या झाडाखाली पत्त्याचा डाव मांडून बसली आहेत. कोणी गावकरी सहज वडाच्या झाडाखाली येऊन उभे राहिले आहेत. हळूहळू माणस जमली की, दररोजच्या बोलण्याच्या विषयाला कोणीतरी हात घालतो. आजून वस्तीची गाडी येवक नाय भवतेक, आमचो बाबी सकाळच्या गाड्येन कनकवलेक गेलो हा, ह्या वस्तीच्या गाडयेन बाजार हाडतलो हा. त्यातला कोणी आज आमचा बायग्या येवचा हुता. इला तर ह्या वस्तीच्या गाडयेन येयत आणि सकाळी ह्याच गाडीन जायत, त्या वडाच्या पारावर तिन्हीसांजेला अशा विषयांवर नेहमी चर्चा रंगत असे. सगळेजण ह्या वस्तीच्या गाडीची आतुरतेने वाट बघत.

मुळात गावात एसटी सुरू झाल्या त्यादेखील ऐंशीच्या दशकात. त्यात माझं गाव हे तालुक्याच्या एका टोकाला, त्यामुळे सकाळी एक एसटी बस यायची आणि संध्याकाळी एक बस यायची. दळणवळणाचे एकच तेवढे साधन गावात उपलब्ध असे. संध्याकाळी एकदा ही एसटी गावात आली की, पुन्हा कणकवली डेपोत जातच नसे. ती वस्तीला रहायची. त्या एसटीचे ड्रायव्हर आणि कंडक्टर गावात कोणाच्यातरी घरात वस्तीला असायचे. सदर गाडी आणि गाडीचे चालक-वाहक वस्तीला राहतात म्हणून ही वस्तीची गाडी. ह्या वस्तीच्या गाडीशी निगडित अनेक आठवणी मनात घर करून आहेत.

मी अनेकवेळा ह्या वस्तीच्या गाडीने कणकवली डेपोतून माझ्या आयनलच्या गावच्या घरी आलो आहे. वस्तीची गाडी डेपोतून निघताना तशी खाली असायची. पण एकदा कणकवली बाजारात आली की, गाडी भरायला सुरुवात व्हायची. बाजारातून घेतलेल्या बाजाराच्या पिशव्या सावरत एकेकजण गाडीत शिरकाव करून घ्यायचा आणि जानवलीच्या पुलापर्यंत गाडीत मुंगी शिरायला जागा नसायची. हळूहळू नांदगाव जवळ आलं की, गाडी पुन्हा खाली व्हायची आणि कोळोशीच्या हायस्कूलजवळ गाडी आली की, गावात जाणार्‍या पन्नास-साठ मुलांनी गाडीत पुन्हा चिवचिवाट होत असे. ह्या वस्तीच्या गाडीच्या चालक-वाहकांचे मात्र एक विशेष असे. एखादा प्रवासीदेखील मागे राहणार नाही याची काळजी ते घेत असत. बहुतेक वेळा कोळोशीच्या बाजारात गाडी आली की, कोणाला तरी आठवण व्हायची की, कणकवलीच्या बाजारात अमुक एक वस्तू विसरलो आहोत, मग वाहकाला विचारून कोळोशीला खाड्ये किंवा शिंदेच्या दुकानात जाऊन ती वस्तू घ्यायला तो प्रवासी उतरे, तोपर्यंत गाडी पुढे जाऊन हायस्कूलच्या मुलांना घेऊन येत असे.

गाडी पुन्हा कोळोशीच्या बाजारात येईपर्यंत मोठा घोळ झालेला असे. जो प्रवासी उतरलेला असे त्याची जागा हायस्कूलच्या कुठल्यातरी इब्लीस पोराने पटकावलेली असे. प्रवासी गाडीत येऊन ये पोरा, उठ थयलो ही माझी जागा आसा, ऐकून पोरगा जागेवरच बसून राहायचा. रे तुका आयकाक नाय येयत तरी तो पोरगा जागेवरून उठत नाही. शेवटी त्या पोरग्याची बकोटी पकडून तो प्रवासी त्या पोरग्याला उठवू बघतो तर पोरगा मी बसलय ता तुमका दिसत नाय, माका कशाक उठवतास ? त्याच्या त्या उद्धट उत्तराने वैतागलेला तो माणूस ह्या बग, ह्या जागेर मी बसलं हुतय. मास्तराक सांगान मी उतारलय, आता उट नायतर याक झापड देयन. गाडीत त्या पोराच्या वर्गातली अनेक मुलं, त्यात तो पोरगा नववी दहावीत गेलेला असणार म्हणजे त्याच्या वर्गातल्या त्याच्या मैत्रिणी तर असणार. झालेला अपमान तो पोरगा कसा सहन करणार? त्या माणसाच्या ह्या वक्तव्यावर ह्या बगा ही सीट काय तुमी ईकत नाय घीतलास, नाय तर एक काम करुचा हुतास. खाली उतरताना तुमच्या बरोबर ही सीट पण नेवचा हुतास, पोराच्या ह्या बोलण्यावर सगळी गाडी हसायला लागते. चांगला मध्यमवयीन गृहस्थ शेवटी त्या पोराला हुसकावून आपल्याला जागा करून घेतो आणि त्या पोराच्या बाजूला मुटकून बसतो.

वस्तीच्या गाडीत हे प्रकार नेहमी घडतात. कंडक्टर असल्या क्षुल्लक गोष्टीत आपला वेळ काढत नाही. हळूहळू प्रवासी आपल्या स्थानापर्यंत पोचतात तसतसा गावात अंधार व्हायला सुरुवात होते. अंधाराचे सामर्थ्य जसजसे वाढते तशी गाडी वडाच्या झाडाकडे येते. ह्या वडाच्या झाडाकडे गाडी आली की, समजायचे शेवटचा थांबा आला. ह्या वडाच्या झाडाकडे कोणी एकजण उभा असायचा. त्यातले बहुतेकवेळा पोरवयातला कोणी एसटी थांबली की, ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या पिशव्या हातात घेऊन त्यांना आज आमच्या घराकडे येवा असं म्हणत त्या दोघांना घरी घेऊन जात असे. ग्रामीण भागातील आदरतिथ्याचा तो एक भाग होता. कोकणात त्याकाळी फक्त भातच पिकवला जाई. त्या भाताचा आणि कढीचा आस्वाद घेण्यासाठी हा घरवाला त्या सरकारी माणसाला बोलवायचा. अगदी साधी डाळी घातलेली असायची. दिवसभर कोकणातल्या दुर्गम भागात एसटी बस चालवून वळलेले हात-पाय ह्या डाळीच्या चटईवर मोकळे व्हायचे. एकेकाळी ह्या एसटी बसेस ह्या ग्रामीण जीवनाच्या जीवनवाहिनी होत्या. कोकणातील सगळ्या ग्रामीणभागात ह्या एसटी बसेस पोचल्या होत्या. ज्या ज्या गावात ह्या एसटी जायच्या त्या त्या गावात वस्तीला असणार्‍या चालक-वाहकांची सोय हा कोकणीमाणूस करायचा. हे चालक-मालक ह्या ग्रामसंस्कृतीचा एक भाग होते.

गावात कुठलाही कार्यक्रम असो. अगदी लग्न, साखरपुडा असो हे चालक, वाहक ह्या समारंभाचा भाग बनतात. चालक-वाहक म्हणजे त्या कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग बनून जायचे. गावातल्या आमंत्रणाला सुरुवात झाली की, गावातल्या मुख्य घरांना आणि मानकर्‍यांना निमंत्रण दिल्यावर ह्यावेळी आलेल्या ह्या पाहुण्याला आमंत्रणाच्या अक्षता घेण्याचा मान मिळे. देवक ठेवल्याबरोबर वडीलधार्‍या मंडळीच्या पाया पडताना ह्या चालक वाहकांना कोणच विसरत नसे. मांडवात उपस्थित असणार्‍या कोणा जाणत्या माणसाचे लक्ष जाई आणि अरे, ते एसटीचे ड्रायव्हरनी सोबतचे खय आसत. त्यांका बोलवा. कोणा पावण्याच्या निमतान ते इले हत. आदी त्यांच्या पाया पडा, असे उद्गार मांडवात नेहमी ऐकायला यायचे.

वस्तीची गाडी हा ह्या जीवनातील एक आमूलाग्र क्रांतीचा घटक होता आणि आहे. ह्या वस्तीच्या गाडीने अनेक कोकणाबाहेरच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरांना कोकणी पाहुणचार आणि कोकणी माणसाच्या दैनंदिन जीवनाच्या जवळ आणले. रात्री मुक्काम करून सकाळी हे ड्रायव्हर-कंडक्टर निघाले की, निघालेल्या पाहुण्याला सोडायला कसे आपण गाडीपर्यंत जातो तसा घराचा माणूस बाहेर पडे. ह्या गाड्येक जेवा असशा तेवा मुक्कामाक हडे येवा, हे असं आग्रहाचं निमंत्रण द्यायला हा विसरत नसे. गावागावात एसटी चालू रहाव्या, ह्या वस्तीच्या गाड्या चालू रहाव्या म्हणून स्थानिक लोकांनी काय काय उपद्व्याप केले हे सांगता सोय नाही. कधीकाळी प्रवासाच्या कमी भरामुळे ह्या गाड्या बंद कराव्या लागतील म्हणून ग्रामस्थांना कुणकुण जरी लागली तरी ह्या गावातल्या माणसांनी उगाचच दुसर्‍या वाडीत जाण्याचे तिकीट काढून एसटीने एक वाडी ते दुसरी वाडी असा प्रवास केला आहे. जेणेकरून इथल्या गावात एसटीच्या गाडीची गरज आहे हे एसटीच्या अधिकार्‍यांना पटेल. वाडीवस्तीवर ह्या वस्तीच्या गाडीची चर्चा आजही केली जाते. मे महिन्याच्या सुट्टीत आजही गाडीत चढायला मिळत नाही. त्यात लालमातीवर डांबर टाकून केलेल्या रस्त्याची अवस्था बघवत नाही पण तरीही एसटी अखंड चालू आहे.

कोरोनाच्या काळात ह्या एसटी गाड्या बंद होत्या तेव्हा कदाचित गावागावात माणसं चिडीचूप झाली होती. शहरीसंस्कृतीत जे महत्व रेल्वेला आहे तेच महत्व एसटीचे गावखेड्यात आहे. आज एसटीच्या अनेक बसेस धावताना दिसतात, पण वस्तीच्या गाडीचे महत्व लोकांच्या मनात आजही अबाधित आहे.

-वैभव साटम