घरफिचर्सइंदूर संस्थानचे संस्थापक मल्हारराव होळकर

इंदूर संस्थानचे संस्थापक मल्हारराव होळकर

Subscribe

मल्हारराव होळकर हे मराठ्यांच्या इतिहासातील एक कर्तबगार सेनानी व इंदूर संस्थानचे संस्थापक. त्यांचा जन्म होळ (जेजुरीजवळ) येथे धनगर घराण्यात झाला. (जन्म 16 मार्च 1693- मृत्यू 20 मे 1766). वडील खंडूजी हे शेतकरी असून चौगुला-वतनदार होते. मल्हारराव तीन वर्षांचे असतानाच वडील वारल्यामुळे आई त्यांना घेऊन खानदेशात तळोदे येथे भोजराज बार्गल या भावाकडे गेली. भोजराजाने आपला पारंपरिक मेंढपाळ व्यवसाय बाजूला ठेवून एक पथक उभे केले होते. तो कंठाजी कदमबांडे यांच्या सेवेत होता. त्यामुळे मामाकडेच मल्हाररावांना लष्करात नोकरी मिळाली. 1720 मधील पेशवे-निजाम संघर्षात मल्हाररावांची कामगिरी पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या लक्षात आली. बाजीरावांनी मल्हाररावांचे धाडस पाहून त्यांना स्वतःच्या घोडदळात घेतले (1721). त्यामुळे मल्हाररावांच्या जीवनास कलाटणी मिळाली. मल्हाररावांस खानदेशच्या भूमीची चांगली जाण होती. बाजीरावांनी 1725 मध्ये मल्हाररावांना पाचशे घोडेस्वारांचे मुख्य नेमून त्यांच्याकडे उत्तर खानदेशची कामगिरी दिली.

तसेच माळवा प्रांतातील चौथ आणि सरदेशमुखी जमा करण्याची जबाबदारीही सोपविली मात्र कंठाजी कदमबांडे यांच्या आश्रयाखाली आपला भाग्योदय झाला, ही गोष्ट ते कधीच विसरले नाहीत. त्यांनी आपला स्वतःचा झेंडासुद्धा कदमबांड्यांच्या झेंड्यासारखाच केला. नर्मदेच्या उत्तरेकडील मराठ्यांनी जिंकलेल्या प्रदेशाचे सर्व अधिकार पेशव्यांनी त्यांना दिले (1735). बाजीराव पेशव्यांच्या हाताखाली शिंदे व धारचे पवार यांसारखेच मल्हारराव हे पेशव्यांतर्फे इंदूर संस्थानचे अधिपती झाले. 1745 साली म्हणजे अवघ्या वीस वर्षांतच मल्हाररावांकडे साडेचौर्‍याहत्तर लक्षांचा मुलूख देण्यात आला. उत्तर भारतात मराठी सत्तेचा विस्तार होऊन मराठी राज्याचे साम्राज्य निर्माण झाले. मल्हाररावांनी धनगर जातीचे अनेक लोक इंदूरमध्ये आणले. यांपैकी बुळे, लांबहाते वगैरे दहा-बारा लोकांनी तेथेच वास्तव्य केले. याशिवाय होळकरांच्या सरदारवर्गात काही ब्राह्मण घराणीही होती. गंगाधर तात्या चंद्रचूड अनेक दिवस मल्हाररावांकडे निष्ठेने राहिला. बाजीरावाने त्याला मल्हाररावांची फडणीशी दिली होती. मल्हाररावांस गुजरात, माळवा व खानदेश प्रांतांत सरंजाम खर्चास 11 परगणे पेशव्यांनी दिले होते. पुढे माळवा प्रांताची वाटणी 2 होळकर, 2 शिंदे आणि 1 पवार या प्रमाणात झाली. बाजीराव पेशव्यांनी मल्हाररावांच्या विनंतीप्रमाणे त्यांची पत्नी गौतमीबाईंच्या नावाने तीन लक्ष उत्पन्नाचा मुलूख खासगीकडे नेमून दिला.

- Advertisement -

मल्हाररावांनी त्यांच्या आयुष्यात लहानमोठ्या एकंदर बावन्न लढायांमध्ये भाग घेतला. त्यापैकी 1729 आणि 1731 मध्ये गिरीधर बहादूर व दया बहादूर यांच्याशी झालेली लढाई व त्या दोघांचा केलेला पराभव ही महत्त्वाची मानली जाते. मल्हाररावांनी 1735-38 दरम्यान नानासाहेब पेशव्यांबरोबर भोपाळ, गुजरात, अंतर्वेदी, दिल्ली, कोकण, वसई व आग्रा या ठिकाणी झालेल्या युद्धांत पराक्रम केला. तत्पूर्वीच बाजीरावाने मल्हाररावांना 82 परगणे जहागीर देऊन माळव्याची राज्यव्यवस्थाही त्यांच्याकडे सोपविली होती. वरील दोन लढायांशिवाय 1735 मध्ये आग्रा आणि गुजरात, 1736-37 मध्ये अंतर्वेद व दिल्ली, 1737 मध्ये वसई इ. ठिकाणी पेशव्यांनी केलेल्या मोहिमांमध्ये मल्हाररावांनी सहभाग घेऊन शौर्य दाखविले. याच सुमारास रेवाकाठचा बराच मुलूख मल्हाररावांनी जिंकला आणि महेश्वर येथे आपले मुख्य ठाणे केले. 1743 मध्ये सवाई जयसिंगांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांत वारसा हक्काचे भांडण सुरू झाले, तेव्हा मल्हाररावांनी माधोसिंगांस मदत करून गादीवर बसविले. 20 मे 1766 रोजी मल्हाररावांनी जगाचा निरोप घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -