घरफिचर्सपोलीसपटांतून घडले सुपरस्टार

पोलीसपटांतून घडले सुपरस्टार

Subscribe

कोविड 19 मुळे लॉकडाऊनच्या काळात डॉक्टर्स आणि पोलिसांचे काम वाढलेले आहे. हिंदी पडद्याला कायमच पोलिसांचे आकर्षण राहिलेले आहे. पडद्यावर गाजलेल्या एकूण चित्रपटांपैकी मोठा भाग या पोलीसपटांनीच व्यापलेला आहे. अमिताभ, चिरंजीवी, रजनीकांत यासारख्या कलाकारांना सुपरस्टार करण्यात पोलीसपटांचा वाटा मोठा आहे. तर नागरिकांवर आलेली आपत्ती, संकट स्वतःवर घेणार्‍या पोलिसांमुळेच रस्त्यावरचा करोना व्हायरस सामान्यांच्या घरापर्यंत पोहचलेला नाही. पडद्यावरत्या गाजलेल्या पोलीसपटांचा या निमित्ताने घेतलेला आढावा.

आपल्या हिंदी पडद्यावरचे बहुतांशी सिनेमे पोलीसपटांनी व्यापलेले आहेत. साऊथमध्ये तर प्रत्येक चार चित्रपटातील एक सिनेमा पोलीसपट असल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या खाकीने अनेकांना स्टार, सुपरस्टार बनवले. इफ्तीकार, ओम पुरी ही मंडळी खास त्यांच्या पोलिसी भूमिकांमुळेच ओळखली गेली. 1956 मध्ये राज खोसला यांनी देव आनंद, वहिदा रेहमान यांंना घेऊन सीआयडी बनवला. त्यावेळी गुन्हेगारी किंवा पोलीसपटांचा हक्काचा प्रेक्षक नव्हता. समाजातील नैतिक मूल्यांची शिकवणी असलेले सिनेमे किंवा राजेशाही इतिहासकालीन चित्रपटांचे गारुड तत्कालीन प्रेक्षकांवर होते. प्यासा, आर-पार, सारख्या प्रवाहाबाहेरच्या चित्रपटांना पडदा देणार्‍या गुरुदत्तच्या फिल्म कंपनीने सीआयडीची निर्मिती केली होती. देव आनंदने आपल्या हेलकावे घेणार्‍या स्टाईमध्ये करारी इन्सपेक्टर शेखर साकारला. एक थ्रीलर म्युझिकल हिट म्हणून सीआयडीची नोंद झाली. परंतु, व्यवस्थेच्या विरोधात बंड करणारा पोलीस अजून पडद्यावर यायचा होता. राजेश खन्नांना ही संधी मिळाली होती. मात्र, गळ्यात मफलर अडकवलेला राजेश खन्ना चॉकलेट हिरोच्या चाकोरीतून बाहेर पडला नाहीच.

कटी पतंग, आराधना, अमर प्रेमची चौकट मोडणं त्याला धोक्याचं वाटत असावं, तसंही 70 च्या दशकाआधी निव्वळ पोलीसपट असलेली कथानकं पडद्यावर आलेली नव्हती. त्यामुळेच राजेश खन्नाने जंजिर नाकारल्यानंतर या चित्रपटाची स्क्रीप्ट संवादफेकीचा बादशहा मानल्या जाणार्‍या राजकुमारला ऐकवण्यात आली होती. मुंबई पोलीस खात्यात एकेकाळी खराखुरा सब इन्स्पेक्टर असलेल्या राजकुमारनेही या स्क्रीप्टला नकार दिला. असं म्हटलं जातं की जंजिरची कथा देव आनंद यांनाही ऐकवण्यात आली होती. मात्र, देवसाहेबांनीही तारखांचे कारण देत त्याला नकार दिला. व्यवस्थेच्या विरोधात पेटलेला खाकी वर्दीतला नायक त्याकाळी प्रेक्षकांना कितपत पचेल किंवा रुचेल याची शंका वरील कलाकार मंडळींना असावी, अशा परिस्थितीत जंजिरचे कथा पटकथा लेखक सलीम-जावेद यांनी अमिताभ या नवख्या तरुणाचे नाव प्रकाश मेहरांना ऐकवले. अमिताभने त्याआधी मनोज कुमारचा रोटी कपडा और मकानमध्ये सहकलाकार म्हणून काम केले होते.

- Advertisement -

एक संपूर्ण चित्रपटाचा संपूर्ण नायक साकारण्याची संधी अमिताभला जंजिरने मिळवून दिली. जब तक बैठने के लिए कहा न जाए, शराफत से खडे रहो, ये पुलीस स्टेशन है…तुम्हारे बाप का घर नही…खुर्चीला लाथ मारून साक्षात तत्कालीन संवादफेकीचा राजा आणि व्हीलन मंडळींचा बादशहा असलेल्या प्राणला हे असं ऐकवणारा इन्स्पेक्टर विजयचं नवं पर्व सुरू झालं. शेरखान नावाच्या पठाणाच्या इलाख्यात घुसून त्याची धुलाई करणारा अमिताभ प्रेक्षकांसाठी नवा होता. यानंतर पोलीसपटांची हिंदी पडद्यावर लाट आली. राम बलराम, परवरीश असे काही पोलीसपट गाजले. एव्हाना इतर नायकांनाही पडद्यावरचा पोलीस साकारण्याची गरज वाटू लागली. अँथोनी अमिताभला दोन ठोसे जास्त लगावणारा अमर अकबर अन्थोनीमधला अमर विनोद खन्ना प्रेक्षकांना आवडून गेला. पुढे इन्कारमध्ये विनोद खन्नाने देखणा पोलीस अधिकारी साकारला. ये वही इलाका है जहाँ लोग तुझे जानते है यहाँ का दादा है तू…असं तत्कालीन सुपरस्टार अमिताभला जरबवजा विचारणारा विनोद खन्नाच होता. यश चोप्रांच्या दिवारमध्ये पोलिसांच्या कर्तव्याला सामाजिक नैतिक मूल्यांचे अधिष्ठान होते. यात भावनिक गुंतागुंत असतानाच तत्व, कर्तव्य आणि नातेसंंबंध यातील संघर्षही होता. हिंदी पडद्यावरील हा उत्तम पोलीसपट आहे.

दुसरीकडे अमिताभला महानायक बनवण्यात पडद्यावरच्या खाकीचं मोठं योगदान होतं. अमिताभला जंजिर मिळावा, यासाठी महानायकाचा जुना मित्र टिनू आनंदनेही प्रकाश मेहरांकडे शब्द टाकला होता. यशवंताला यश शोधत येतं, यानुसार अमिताभला जंजिर मिळाला. अमिताभमधल्या अँग्री यंग मॅन पोलिसाची कॉपी पुढे अक्षय कुमार, अजय देवगन, रजनिकांत अशा अनेकांनी केली…ते असो, शोलेचे संपूर्ण कथानकच पोलीसपटावर आधारलेलं होतं.

- Advertisement -

संजीव कुमारने साकारलेला ठाकूर पोलीस अधिकारी असावा किंवा लष्करी अधिकारी…याबाबत लेखक सलीम जावेद आणि रमेश सिप्पींच एकमत होत नव्हतं. अखेरीस कथानकाची गरज ओळखून संजीव कुमारचा ठाकूर पोलीस अधिकारी बनवण्यात आला. शोलेचा शेवट खिळे असलेल्या बुटांच्या पायाने हाणामारी करणार्‍या ठाकूरकडून गब्बरच्या मृत्यूने झाला होता. मात्र, कायद्यावरील लोकांचा विश्वास कायम राहावा म्हणून शेवट बदलण्यात आला आणि ठाकूरकडून गब्बरला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं.

ऐंशीच्या दशकात दिलीप कुमार आणि अमिताभमध्ये कानून आणि क्राईममध्ये जुगलबंदी रंगली. त्यानंतर निव्वळ आक्रस्ताळी पोलीसपटांची लाट हिंदी पडद्यावर आली. मिथुन, चंकी, गोविंदा, सन्नी देओल यांनी त्यांच्या क्षमतेनुसार पोलीस रंगवले. याच दशकात दक्षिणेतील सुपरस्टार रजनिकांत आणि हिंदी पडद्याचा महानायक या दोघांनी एकाच सिनेमात पोलीस भूमिका साकारल्या. पोलीसपट होता दक्षिणेकडील दिग्दर्शक प्रयाग राज यांचा गिरफ्तार….वास्तववादी पोलीसपटांचा काळ इथूनच सुरू झाला होता. समांतर चित्रपटांमधले पोलीस हे पडद्यावरील रोमँटीक- हिरोस्टाईल कल्पनाविलासात रमणारे नव्हते.

गोविंद निहलानी यांनी अर्धसत्य बनवताना इन्स्पेक्टर वेलणकरच्या मध्यवर्ती भूमिकासाठी ओम पुरींची निवड केली. या चित्रपटाने पोलीस खात्यातील तणाव आणि पोलिसांची खात्यांतर्गत यंत्रणांकडून होणारी गळचेपी पडद्यावर आणली. विजय तेंडुलकरांची कथा आणि गोविंद निहलांनीच्या अर्धसत्यने पोलीसपटांना नवा आयाम दिला. अर्धसत्य साकारताना निहलानींना असिस्ट करणारा राजकुमार संतोषी होता. ज्यांनी पुढे घायल, खाकी, दामिनी असे सामाजिक आशयपट बनवले. संतोषींच्याच घायलनंतर सन्नी देओलचे त्रिदेव, पाप की दुनिया असे प्रयत्न सुसह्य होते. मात्र, इंडियन, चॅम्पियन अशा आक्रस्ताळी पोलीसपटांनी सन्नी देओलच्या संयमी इमेजला धक्का दिला. सुभाष घईने राम लखनसारखे तद्दन व्यावसायिक पोलीसपट बनवून जॅकी श्रॉफ, अनिल कपूर यांना खाकीतून समोर आणले. तर विधू विनोद चोप्राच्या परिंदा आणि महेश भट्टच्या ठिकानामध्ये अनुपम खेरने साकारलेला प्रकाश नावाचा पोलीस वास्तववादी कथानकामुळे लक्षात राहिला. सुरेश आबेरॉयने जवाब, तेजाबमध्ये वास्तववादी अँग्री यंग पोलीस अधिकारी साकारला. दाक्षिणात्य चिरंजीवीने प्रतिबंधमध्ये व्यवस्थेकडून संपवण्यात आलेला पोलीस अधिकारी पडद्यावर आणला. व्यवस्थेने संपवलेल्या पोलिसांची ही परंपरा मनोज वाजपेयीनं शूलपर्यंत सुरू ठेवली.

नाना पाटेकरने वास्तववादी पोलिसाला त्याआधीच अंधयुद्धमधून पडद्यावर आणलेले होते. पुढे यशवंतसारखे व्यावसासिक पोलीसपट त्याने साकारले. मात्र, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नानाने साकारलेली राकेश मारीया या पोलीस अधिकार्‍याची भूमिका लक्षात राहिली. राकेश मारीया यांच्यावर आधारीत पोलीस अधिकार्‍याची भूमिका के.के. मेनननेही ब्लॅक फ्रायडेमध्ये साकारली होती. नसिरुद्दीन शहांनी जलवामध्ये इन्स्पेक्टर कपिल साकारला तर अजय फणसेकरच्या एन्काउंटरमध्ये वास्तववादी इन्स्पेक्टर भरुचा तेवढ्याच ताकदीने साकारला. गुन्हेगारी मार्गावर गेलेल्या तरुणाईसोबत होणार्‍या संघर्षाच्या कथानकात भावनिक कंगोरे शहांनी अचूक टिपले.

नव्वदच्या दशकात अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अजय देवगन, सलमान खान असे नव्या दमाचे पोलीस पडद्यावर आले. यातले बरेचसे पोलीस रोमँटीसिझममध्येच अडकून पडले होते. जॉन मॅथ्यूने सरफरोश बनवून आमिरखानला घेऊन चाकोरीबाहेरचा यशस्वी पोलीसपट बनवला. यातल्या एसीपी राठौडला आजही पोलीसपटातील मैलाचा दगड मानले जाते. सुनील शेट्टी, (बलवान, दिलवाले), अक्षय कुमार ( मोहरा, मै खिलाडी..), सलमान खान (पत्थर के फूल) अशा तद्दन व्यावसायिक पोलीसपटांची लाट आली ती नव्वदच्या दशकातच. गोविंदाचे खुद्दार, मुकाबला असे पोलीसपट एका बाजूने पडद्यावर येत होते तर दुसर्‍या बाजूने पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराची जबाबदारी घेतलेले शक्ती कपूर, गुलशन ग्रोव्हर असे खलनायक पोलीसही पडद्यावर दाखल झाले होते.

गोविंद निहलानीनंतर प्रकाश झा यांनी पोलिसांना पुन्हा वास्तववादी कथानकांशी जोडले. बिहारमधील गुंडांवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याचा धागा घेऊन त्यांनी गंगाजल बनवला. या सिनेमाने व्यवस्थेसमोर नव्याने प्रश्न उभे केले. अलिकडच्या काळात दक्षिणेकडील चित्रपटांचा प्रभाव हिंदी पोलीस पटांवरही पडला आहे. त्यामुळेच आजचा पोलीस हतबल नाही. तो हुशार आहे. रोहीत शेट्टींचे सिंघमपट ही त्याचीच उदाहरणे आहेत. हा पोलीस व्यवस्थेला शरण जाणारा नाही. तो कायद्याच्या रक्षणासाठी प्रसंगी कायद्याची चौकटही कायदेशीररित्या मोडणारा आहे. शूट आऊट एट लोखंडवाला, पोलीस फोर्स, डिपार्टमेंट, अब तक छप्पन, वॉन्टेड यातले आजचे पोलीस कमालीचे हुशार आहेत. येणार्‍या काळात पोलीस आणखी हायटेक होतीलच, सोबतच पडद्यावरच्या पोलीस नायकाची परंपरात्मक खाकीची जरब कायम असेल…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -