घरफिचर्सभक्तिभावाचं गाणं!

भक्तिभावाचं गाणं!

Subscribe

सुरेश वाडकर एका कार्यक्रमात म्हणाले, ‘सगळीच गाणी गायक-गायिका आपला प्राण त्यात ओतून गात असतात. पण भक्तिगीत म्हणजे सर्वसमर्थ परमेश्वराचं गाणं गातानाचा माझा अनुभव वेगळा आहे. हे देवाचं गाणं गाताना मी रंगून जातो, त्यावेळी एखादा सूर असा काही वेगळाच लागतो की त्याक्षणी आपल्या देवावरची आपली भक्ती देवाच्या पायाशी जाऊन पोहोचली असा आपल्याला भास होतो.

शब्दात भक्ती भरली की तिची ओवी होते, नाहीतर तिची शिवीही होते. शब्दांची ओवी की शिवी करायची हे शब्द वापरणार्‍यांच्या हातात असतं. पण शिवराळ शब्दांपेक्षा जे शब्द जपमाळ हातात घ्यायला लावतात त्या शब्दांमध्ये जीवन जगायला लावण्याचा हुरूप असतो असं संतमहंत म्हणून गेले आहेत.

संतमहंतांच्या अशा वचनांची आठवण होण्याचं कारण म्हणजे भक्ती भरलेल्या शब्दांनी फुलून आलेलं गाणं, भक्तिगीत. हे भक्तिगीतही जीवन जगण्याचा नुसता हूरूप देऊन जात नाही तर जगण्यावर प्रसन्नतेचा शिडकावा करुन जातं.

- Advertisement -

आजही आपल्या घरी आपण एखादा छोटामोठा रेडिओ आणून ठेवला आणि भल्या पहाटे तो लावला तर आजच्या काळातही भक्तिगीतांचा शिडकावा होत असतो. भल्या पहाटे भक्तिने ओथंबलेल्या आवाजातलं माणिक वर्मांचं गाणं कानी पडत असतं. ‘भाग्य उजळले तुजे चरण पाहिले’ असे त्या गाण्याचे शब्द असतात. भल्या पहाटेच्या त्या अतिशय नीरव वातावरणात माणिक वर्मांचा तो मधाळ आवाज आणि देवापुढच्या जास्वंदीसारखे ते पवित्रपावन शब्द खरोखरच आपल्याला अंतर्मुख करून जातात.

धकाधकीने भरलेल्या आपल्या आयुष्यातल्या एका दिवसाची सुरूवातच त्या गाण्याने मंतरलेली होऊन जाते. ते गाणं संपतं न संपतं तोच गाभार्‍यात घुमावा तसा पंडित भीमसेन जोशींच्या गाण्याचा सूर ऐकू येतो, ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’…माणिक वर्मांनी लावलेलं ते भक्तीचं निरांजन पंडित भीमसेन जोशी आपल्या स्वरांतून अधिक प्रकाशमान करतात. त्यामुळे ती पहाट भक्तीने दुतर्फा होते. गाभार्‍यात धुपदीपाचा धूर भरून राहावा तसा मनात भक्तीभावाचा सूर भरून राहतो…आणि नंतर पुढची सगळी दिनचर्या सुरू होताना माणिक वर्मांचे, भीमसेन जोशींचे ते सूर मनात तसेच रेंगाळत राहतात, रेंगाळता रेंगाळता एक वेगळंच चैतन्य देऊन जातात.

- Advertisement -

तसं पाहिलं तर भक्तिगीतांसाठी पहाटेसारखा दुसरा प्रहर नाही. पहाटेची शांती आणि त्या वातावरणात कानावर पडणारी भक्ती हा अनोखा मिलाफ याच प्रहरात मनुष्यप्राण्याने अनुभवावा. नुकतीच दिवाळी संपली आहे त्या निमित्ताने याच संदर्भात महाराष्ट्रात ठिकठिकाणच्या थिएटरांमध्ये होणार्‍या पहाट मैफलींचं उदाहरण देता येईल! अशाच एका पहाट मैफलीला एका तरूण गायिकेने संत ज्ञानेश्वरांचं ‘मोगरा फुलला’ असं काही गायलं की तिला दोन वेळा तिच्यासमोरच्या रसिक प्रेक्षकांकडून वन्समोअर आला आणि तिनेही त्याचा सन्मानाने स्वीकार करत ती पहाट छान फुलवली. ती संपूर्ण पहाट मैफल ऐकताना लक्षात आलं की दिवाळीच्या त्या एका विशिष्ट काळाचं निमित्त साधून सादर केलेल्या त्या दिवाळी पहाटेच्या त्या मैफलीत गायलेली बहुतांश गाणी ही भक्तिगीतंच होती…आणि समोर प्रेक्षकही त्या भक्तिगीतातच रंगून गेले होते.

आपल्या सर्वांंचे लाडके गायक सुरेश वाडकरांच्या आवाजावर तर त्यांच्या एका काळात अनेक जण भक्तिगीताचा शिक्का मारून मोकळे झाले होते. खरंतर ते पूर्णपणे अयोग्य होतं आणि तो त्यांच्यासारख्या कसबी कलाकारावर अन्याय होता. वास्तविक सुरेश वाडकरांनी अभंग ते गझल व्हाया कव्वाली, संगीताच्या सगळ्या प्रदेशांत लीलया संचार केला होता आणि त्याला लोकांची मान्यताही मिळाली होती. पण तरीही त्यांच्या आवाजावर बहुतेकांनी भक्तिसंगीताचा शिक्का मारला होता. ‘ओंकार स्वरूपा’ या 1990 च्या सुमारास आलेल्या त्यांच्या कॅसेटमुळे तर त्यांचा भक्तवत्सल आवाज सातासमुद्रापार पोहोचला. ‘ओंकार स्वरूपा’तलं त्यांचं प्रत्येक गाणं म्हणजे त्यांच्या सुरांची नक्षी लाभलेला एक अजोड दागिना होता. संगीतकार श्रीधर फडकेंनी त्यासाठी सकलसंतगाथेची खास पारायणं केली आणि त्यातल्या संतरचनांची निवड करून त्याला एकाहून एक सरस चाली लावल्या. देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी; विठ्ठल आवडी प्रेमभावो; गुरू परमात्मा परेशू, रूपे सुंदर सावळा गे माये अशा त्यातल्या संतरचना श्रीधर फडकेंच्या संगीतात अशा काही सजल्या की त्या आज सुमारे तीस वर्षांनंतरही अजरामर राहिल्या.

सुरेश वाडकरांची ही गाणी ऐकणं आणि त्याचसोबत ते त्या गाण्यात दंग होऊन ती गाताना त्यांना पहाणं हा अनुभव तर काही औरच आहे. भक्तिगीत गाण्याबद्दलचा त्यांचा अनुभव सांगताना ते एकदा सहज म्हणून गेले तो अनुभवही फार मोलाचा होता. सुरेश वाडकर त्या एका कार्यक्रमात म्हणाले, ‘सगळीच गाणी गायक-गायिका आपला प्राण त्यात ओतून गात असतात. पण भक्तिगीत म्हणजे सर्वसमर्थ परमेश्वराचं गाणं गातानाचा माझा अनुभव वेगळा आहे. हे देवाचं गाणं गाताना मी रंगून जातो, त्यावेळी एखादा सूर असा काही वेगळाच लागतो की त्याक्षणी आपल्या देवावरची आपली भक्ती देवाच्या पायाशी जाऊन पोहोचली असा आपल्याला भास होतो. देवाचं गाणं गाताना त्याचे सूर देवापर्यंत पोहोचण्याचा हा अनुभव एखाद्या गायकाला मिळणं हे गायकाचं एक भाग्य आहे असं मला वाटतं.’

सुरेश वाडकरांसारख्या गायकाला भक्तिसंगीत गाण्याच्या खूप संधी चालून आल्या, पण अरूण दातेंसारख्या भावगीत गायकाच्या वाट्याला मात्र तशी संधी चालून आली नाही. या बाबतीतली त्यांनीच त्यांच्या ‘शुक्रतारा’ कार्यक्रमात एक आठवण सांगितली, ते म्हणाले, ‘माझ्या बहराच्या काळात मी भावगीतं, गझलाच गात होतो. पण भावगीत गाण्याची संधी मिळत नव्हती. अखेर मीच एक भक्तिगीत माझ्यासाठी आग्रहाने मागून घेतलं, ज्याचे शब्द होते, ‘अविरत ओठी यावे नाम, श्रीराम जयराम, जय जय राम.’

असो, भक्तिगीतांचं एक वैशिष्ठ्य असतं की भक्तिगीत म्हटलं की बासरी, सतार या वाद्यांचा भक्तिगीतात अपरिहार्यपणे सहभाग असतो. बासरीवादक जितक्या गाण्यात सहभागी होतात त्यातली बहुतांश गाणी ही भक्तिगीतं असतात. रवींद्र जैन म्हणायचे, ‘बासरीचा आर्त सूर हा भक्तिगीतं करताना जास्त उपयोगी पडतो आणि तो भक्तिगीतांना जास्त साजेसा असतो.’

आज काळ बदलला आहे तसं भक्तिगीतांचं कोष्टकही बदललं आहे. हृदयनाथ मंगेशकरांनी ‘गणराज रंगी नाचतो’सारखी गाणी करताना फक्त निवडक भारतीय वाद्यं वापरली. पण आता ‘देवा श्रीगणेशा’सारखं गाणं करताना धडामधुडूम वाद्यांच्या कल्लोळाचा कालवा त्यात केला जातो. त्यात भक्ती किती आणि गोंगाट किती हा मामला असला तरी त्यात देवाचं कौतुक असल्यामुळे त्याला भक्तीगीत म्हणावं लागतं. शेवटी असतं एखाद्या भक्तिगीताचं नशीब तसं!…त्याला देव तरी काय करणार, नाही का!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -