घरफिचर्सटी. व्ही. वाहिन्यांचे खरे रूप नेटवर्क

टी. व्ही. वाहिन्यांचे खरे रूप नेटवर्क

Subscribe

नैराश्य आणि एकाकीपणा यांनी ग्रासलेल्या अँकरवूमन क्र्र्र्रिस्तिन च्युब्बुक हिने कॅमेर्‍यासमोरच स्वतःवर गोळी झाडून घेऊन मरण पत्करले होते. ही घटना होती 15 जुलै 1974 ची. या घटनेवरच पॅडी च्येफेस्की याने पडद्यावरील मृत्यू ही मध्यवर्ती कल्पना वापरून कथानक रचले. एका मुलाखतीत त्याने रेटिंगसाठी टेलिव्हिजन (चॅनेल) काहीही, अगदी काहीही करील, असे म्हटले होेते.

निवडणुका म्हणजे टी. व्ही. वाहिन्यांचा सुगीचा हंगाम असतो. त्यांचा प्रचारातही मोठाच सहभाग असतो. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या! अर्थात त्यामागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण ज्याला निष्ठा असेही नाव दिले जाते; पण त्यामुळे त्यांच्या निष्ठेविरुद्ध काही भाष्य वा टीका-टिप्पणी करणारे जे कुणी असतात, ते त्यांना नकोसे वाटू लागतात. ज्यांच्यामुळे त्या वाहिन्यांना लोकाधार मिळालेला असतो, त्यांनाच ते बाहेरचा रस्ता दाखवतात. कारण एकच त्यांनी वाहिन्यांच्या बॉसपुढे मान झुकवायला नकार दिलेला असतो. त्यांना बाहेर काढण्यात येते. दुर्दैवाने जी साब म्हणणार्‍यांचीच आज सद्दी दिसते. असे का? आणि या वाहिन्या आपल्याला हवे ते करायला कुणी नकार दिला,तर कोणत्या थराला जाऊ शकतात हे दाखविणारा चित्रपट बर्‍याच काळापूर्वी म्हणजे 43 वर्षांपूर्वीच आला होता. त्यावेळी आपल्या देशात केवळ दूरदर्शन हेच अस्तित्वात होते. त्यामुळे कदाचित या चित्रपटाकडे दुर्लक्ष झाले असेल, पण आता वाहिन्यांची रेलचेल झालेली असताना मात्र या चित्रपटाचे मोल जाणवेल हे नक्की.

हा चित्रपट म्हणजे नेटवर्क. सिडनी लुमेट यांनी निर्मिलेला हा चित्रपट यूबीएस या अगदी कमी प्रेक्षक असलेल्या, म्हणजे कमी रेटिंग असलेल्या काल्पनिक वाहिनीबद्दलचा आहे. या वाहिनीच्या सायंकालीन वार्तापत्राचा न्यूज अँकर हॉवर्ड बिएल हा आहे. रेटिंग घसरत असल्याने आता तुला फक्त दोन आठवड्यांची मुदत आहे, असा इशारा त्याला त्याचा मित्र आणि वाहिनीचा अध्यक्ष मॅक्स शुमाकरकडून दिला जातो. दुसर्‍या दिवशी त्याच्या कार्यक्रमात बिएल हा आपण थेट प्रक्षेपणाचे वेळीच आत्महत्या करणार असल्याचे जाहीर करतो. त्यामुळे यूबीएस वाहिनीवरून त्याला काढून टाकतात. शुमाकरमधे पडून बिएलला सन्मानाने निरोप द्यायला हवा असे सांगतो. बिएलही आपण आपल्या कृत्याबद्दल माफी मागू असे आश्वासन देतो; पण कार्यक्रम सुरू झाल्यावर पुन्हा तो मूळपदावर येतो. आपले आयुष्य म्हणजे बुलशिट आहे असे म्हणतो. त्याच्या या कार्यक्रमानंतर रेटिंगमध्ये वाढ होत जाते आणि वाहिनी बिएलला काढून टाकण्याऐवजी त्याचा फायदा उठवण्याचे ठरवते. त्याच्या कार्यक्रमाला रेटिंगमध्ये अग्रक्रम मिळतो तेव्हा डायना क्रिस्तनसन ही वृत्त विभागप्रमुख शुमाकरला भेटून त्याला हा न्यूज शो वाढवण्याची विनंती करते. तो या मागणीला नकार देतो; पण तिच्या प्रेमाला मात्र प्रतिसाद देतो.

- Advertisement -

केवळ एक चांगला कार्यक्रम मिळावा म्हणून डायना एका दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाशी करार करते. शुमाकर बिएलचा अँग्री मॅन धाटणीचा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा डायना बॉसला-फ्रँक हॅकेटला- पटवून देते, की वार्ता कार्यक्रम करमणूक कार्यक्रमांतच अंतर्भूत करावा म्हणजे तिला कार्यक्रम चांगल्या प्रकारे खुलवता येईल. हॅकेट ते मान्य करतो आणि शुमाकरला हटवतो. एका कार्यक्रमात बिएल लोकांना आवाहन करतो की, त्यांनी खिडकीत येऊन मी भयंकर वेडा आहे, आता मला हे सहन होत नाहीय!(आय अ‍ॅम मॅड अ‍ॅज हेल, आय कान्ट टेक इट एनी मोअर) असे ओरडावे. त्यानंतर तो एका नव्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक बनतो, त्याचे नावच हॉवर्ड बिएल शो असे असते आणि त्याचे वर्णन वाहिन्यांवरील वेडा प्रेषित ः मॅड प्रॉफेट ऑन द एअरवेज, असे केले जाते. त्याचा हा कार्यक्रम वाहिन्यांवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ठरतो. त्यामुळे बिएल हा एक सेलिब्रिटी बनतो आणि स्टुडिओतील प्रेक्षकांना पुन्हा मी भयंकर वेडा आहे, आता मला हे सहन होत नाहीय! हा संदेश देतो. सुरुवातीला दुरावलेले मॅक्स आणि डायना आता पुन्हा जवळ येतात. शुमाकर त्याच्या दीर्घकाळच्या पत्नीला सोडून डायनाकडे येतो.

बिएलला यूबीएसची मालकी असलेली संस्था एका सौदी अरेबियन कंपनीकडे जाणार असल्याचे कळते आणि तो आपल्या कार्यक्रमातून त्यावर टीकेची झोड उठवतो. तो आपल्या कार्यक्रमातच प्रेक्षकांना त्यांनी या कराराविरोधात व्हाइट हाऊसवर दबाव आणावा असे आवाहन करतो. त्यामुळे वाहिनीच्या मालकांची घबराट होते. कारण आर्थिक तणावामुळे हे विलीनीकरण आवश्यक बनलेले असते. ते बिएलला सारे समजावून सांगायचा प्रयत्न करतात आणि राष्ट्रीयत्व वगैरे कल्पना भ्रामक असून, हे जागतिकीकरणाचे युग आहे, असे सांगतात. केवळ करिअरच्या मागे लागलेली डायना शुमाकरलाही दूर करते, तेव्हा तो तिला तिच्या या हव्यासाने तू उद्ध्वस्त होशील असे म्हणतो. बिएलला जेन्सन त्याच्या लोकप्रिय संदेशापासून दूर जायला सांगतो, पण रेटिंग पुन्हा घसरू लागते, तरीही हेन्सन यूबीएसला बिएलला काढून टाकायला नकार देतो.

- Advertisement -

डायना आणि हॅकेट हे हंगामाच्या सुरुवातीला चांगले रेटिंग मिळवण्यासाठी बिएलचा प्रश्न निकालात काढण्यासाठी त्या दहशतवादी संघटनेची मदत घेतात. कारण त्यामुळे त्यांना त्यांचा नवा कार्यक्रम -द माओ त्से तुंग अवर हा सुरू करता येणार असतो. त्यामुळे बिएलला त्याचा कार्यक्रम सुरू असताना कॅमेर्‍यासामोरच गोळ्या घालण्यात येतात. तो रक्ताच्या थारोळ्यात पडतो. त्यावेळी अन्य चार पडद्यांवर बिएलच्या मरणाची बातमी देण्यात येत असते. त्यानंतर जाहिराती आणि प्रत्यक्ष प्रसंग यांची सरमिसळ होत राहते आणि शेवटी एक आवाज सांगतो, हॉवर्ड बिएलची कहाणी म्हणजे प्रथमच केवळ रेटिंगसाठी प्रत्यक्ष पडद्यावर झालेल्या मृत्यूची कहाणी आहे. मग सर्व काही अंधूक होत जाते आणि केवळ बिएलच्या खुनाचा प्रसंगच पडद्यावर दिसतो. चित्रपट संपतो.

प्रत्यक्ष चित्रवाणी वाहिनीवर झालेल्या पहिल्या मृत्यूनंतर केवळ दोनच वर्षांनी हा चित्रपट आला होता. नैराश्य आणि एकाकीपणा यांनी ग्रासलेल्या अँकर वूमन क्र्र्र्रिस्तिन च्युब्बुक हिने कॅमेर्‍यासमोरच स्वतःवर गोळी झाडून घेऊन मरण पत्करले होते. ही घटना होती 15 जुलै 1974 ची. या घटनेवरच पॅडी च्येफेस्की याने पडद्यावरील मृत्यू ही मध्यवर्ती कल्पना वापरून कथानक रचले. एका मुलाखतीत त्याने रेटिंगसाठी टेलिव्हिजन (चॅनेल) काहीही, अगदी काहीही करील,असे म्हटले होेते. मात्र, डेव्ह इट्झकॉफ त्याच्या मॅड अ‍ॅज हेल या पुस्तकात ते अमान्य करताना म्हणतो की च्येफेस्कीने त्या घटनेपूर्वीच काही महिने बिएलचे कथानक रचले होते. च्युब्बुकची आत्महत्या हा केवळ योगायोग होता. बिएल कोणत्याही जिवंत व्यक्तीवर बेतलेला नव्हता. पटकथा लिहिण्यापूर्वी च्येफेस्कीने टीव्ही आफसेसना भेट दिली होती आणि तेथील प्रत्यक्ष अनुभव घेतला होता. डायना ही व्यक्तिरेखा एडबीसी चॅनेलच्या लिन बोलेनवर आधारलेली होती, पण बोलेनला हे मान्य नाही. युनाटेड आर्टिस्टने नकार दिल्यावर पैशासाठी च्येफेस्की आणि गॉटफ्राइड यांनी इतरत्र प्रयत्न सुरू केले आणि शेवटी मेट्रो गोल्डविन मेयर -एमजीएमने त्यांना आधार दिला.

च्येफेस्कीच्या मनात बिएल साकारण्यासाठी हेन्री फोंडा, कॅरी ग्रँट जेम्स स्ट्युअर्ट आणि पॉल न्यूमन ही नावे होती, पण त्यांनी नकार दिला. शेवटी पीटर फिंचची निवड करण्यात आली. निर्मात्यांना त्याच्याबाबत तो अमेरिकन वाटणार नाही, असे वाटत होते. कारण त्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला होता, तर तो ऑस्ट्रेलियात वाढला होता, पण मेहनती फिंचने त्यांना त्यांचे मत बदलायला लावले. डायनाची भूमिका फे दुनावेला, मॅक्स शुमाकरची विल्यम होल्डनला, त्याच्या पत्नीची-लुइस शुमाकरची बिअ‍ॅट्रिस स्ट्रेट, फ्रँक हॅकेटची रॉबर्ट डुआल, नेल्सनची वेसली अ‍ॅडीला, जेन्सनची नेड बेट्टीला देण्यात आली.

फे दुनावेला शुमाकरची भूमिका रॉबर्ट मिचमला द्यावी असे वाटत होते; पण तिची मागणी अमान्य झाली. खुद्द डायनाच्या भूमिकेसाठीही कँडिस नटाली वूड, जेन फोंडा, डायना कीटन इ.चा विचार झाला होता, पण अखेर दुनावेची निवड झाली होती. प्रत्यक्ष चित्रीकरणाला 1976 च्या जानेवारीत सुरुवात झाली. चेफेस्की तेथे कायम उपस्थित असे. टॉवरिंग एन्फर्नो या चित्रपटाच्या वेळी होल्डन आणि दुनावे यांच्यात वाद झाल्याने ते एकत्र काम करून भूमिकांना कितपत न्याय देतील, अशी शंका काहींना वाटत होती. तशा त्यांच्यात कुरबुरीही झाल्या. इतरही काही अडचणी आल्या; पण शेवटी च्येफेस्कीच्या मनाप्रमाणे चित्रपट तयार झाला.

नेटवर्क अ‍ॅकॅडमी अ‍ॅवॉर्ड्ससाठी सहा नामांकने मिळाली आणि त्याने एकूण चार जिंकली. अभिनयाची तीन ऑस्कर त्याने जिंकली. ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायरने 1951 मध्ये अशी कामगिरी केली होती. सर्वोत्तम अभिनेता, अभिनेत्री आणि सहाय्यक अभिनेत्री ऑस्कर अनुक्रमे फिंच, फे दुनावे आणि बिअ‍ॅट्रिस स्ट्रेट यांना मिळाली. पटकथेचे ऑस्कर चेफिस्कीला मिळाले. मरणोत्तर ऑस्कर मिळवणारा फिंच हा पहिलाच अभिनेता होता. त्याचे निधन 1977 पूर्वीच झाले होते. त्याचे ऑस्कर त्याच्या पत्नीने एलेथा फिंचने स्वीकरले. बिअ‍ॅट्रिस स्ट्रेटची भूमिका केवळ पाच मिनिटे आणि दोन सेकंदाची होती. आजवरचे एवढ्या मोजक्या वेळात पडद्यावर असूनही ऑस्कर मिळवणारी ती एकमेव अभिनेत्री आहे.

या ऑस्करवर पडलेल्या प्रभावामुळे या कलाकारांबाबत विशेष काही लिहिण्याची आवश्यकताच नाही. त्यांची कामे प्रत्यक्षच पाहायला हवीत. त्यासाठी आणि दिवसेंदिवस जगण्याचाच भाग बनत चाललेल्या दूरचित्रवाणी मालिका, त्या सादर करणार्‍या वाहिन्या आणि त्यांचे सर्वेसर्वा यांची खरीखुरी ओळख पटवून घ्यायची असेल तर नेटवर्क अवश्य पहा. त्यामुळे आपली वाहिन्यांच्या चालकांबाबतची जी समजूत असते ती तपासायला हवी असे वाटेल आणि सत्य आपल्यापासून वाटते तितके दूर नसते याची जाणीव होईल. त्यासाठी तरी नेटवर्क बघाच.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -