घरफिचर्ससंघ विचार आणि आचार!

संघ विचार आणि आचार!

Subscribe

संघ आणि कट्टर हिंदुत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने संघाचे हे काय नवीन चालले आहे, असा प्रश्न उभा राहतो. या निमित्ताने संघाचा खरा चेहरा बदलणार असेल तर या देशात एक नवीन क्रांतीची पहाट होत आहे, असे म्हणायला हवे.

‘सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कोणत्याही धर्माचा असो. आपण गेल्या ४० हजार वर्षांपासून एकाच पूर्वजांचे वंशज आहोत, हे सिद्ध झाले आहे. भारतीय लोकांचा डीएनए एकसारखा असून हिंदू आणि मुसलमान दोन गट नाहीत. एकजूट होण्यासाठी नव्याने सांगण्याची काही गरज नाही. ते पहिल्यापासून एकसाथ आहेत. आपण लोकशाहीमध्ये राहत असून येथे हिंदू आणि मुसलमानांचे वर्चस्व असू शकत नाही. फक्त भारतीयांचे वर्चस्व असू शकते. देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. राष्ट्रवाद हा एकतेचा आधार असावा’, असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गेल्या आठवड्यात देशाला एक नवे चिंतन दिले. याचसोबत भागवत यांनी देशभरातील मुस्लीम वस्त्यांमध्ये संघाच्या शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संघ आणि कट्टर हिंदुत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने संघाचे हे काय नवीन चालले आहे, असा प्रश्न उभा राहतो. या निमित्ताने संघाचा खरा चेहरा बदलणार असेल तर या देशात एक नवीन क्रांतीची पहाट होत आहे, असे म्हणायला हवे. पण खरंच तसं आहे का? २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपच जिंकून यावा, यासाठी केलेली ही पेरणी आहे, अशी साधी सोपी शंका येते. २०२४ ला अजून तीन वर्षे बाकी आहेत, मात्र या निवडणुकीचा पाया ज्या राज्यांवर उभा आहे त्यांच्या निवडणुका मात्र पुढच्या वर्षी आहेत. यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश असून हे निकाल भाजपच्या बाजूने लागावेत, यासाठी हा सारा आटापीटा आतापासून सुरू झालाय की काय, अशी शंका येते आणि या शंकेचे निरसन करण्यासाठी खूप शोधाशोध केल्यानंतर एकच उत्तर येते की संघ म्हणजेच भाजपच्या मातृसंस्थेसाठी या निवडणुका खूप महत्वाच्या आहेत. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य असून या राज्यात लोकसभेच्या ८० जागा असून उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि हिमाचल प्रदेश या सर्व मिळून २३ जागा होतात. यापैकी पंजाब हे राज्य वगळता सर्व ठिकाणी भाजपची सत्ता आहे आणि ती त्यांना कोणत्याही परिस्थितीत टिकवायची आहे. एनडीएमधील घटक पक्ष अकाली दलाने साथ सोडल्याने पंजाबमध्ये भाजपला अस्तित्वाची मोठी लढाई लढावी लागेल.

संघ कुठलीही गोष्ट उद्या पाहिजे म्हणून आज ठरवत नाही. मुख्य म्हणजे आपण जे काही बोलत आहोत त्याचे काय परिणाम होतील आणि त्यामधून संघ, भाजपला काय मिळणार आहे, या सर्वाचा तो दीर्घकालीन विचार असतो. पहिल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारून टाकणार्‍या प्रतिमेची चमक आता कमी कमी होत चालली आहे. पश्चिम बंगालमध्ये ते प्रकर्षाने दिसले. स्वतः मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आपली सारी ताकद पणाला लावूनदेखील त्यांना ममता बॅनर्जी यांचा पराभव करता आला नाही. मोदी लाटेपुढे निस्तेज झालेल्या विरोधी पक्षांसाठी हा मोठा आशेचा किरण ठरला असून उत्तर प्रदेशमध्येसुद्धा त्याचे पडसाद उमटतील काय? अशी शंका असल्यानेच संघ जागा झाला असून या हिंदी प्रदेशात आपली ताकद कुठल्याही परिस्थितीत कमी होता कामा नये, यासाठी आपण जागे असल्याचे संकेत डीएनए आणि मुस्लीम वस्त्यांमध्ये संघ शाखा या घोषणांमधून दिसून येतात. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासुद्धा प्रतिमेचा प्रभाव ओसरताना दिसत आहे. यामुळे समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाजवादी पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या आशा उंचावल्या आहेत. बिहारमध्ये काँग्रेसच्या कचखाऊ भूमिकेमुळे राष्ट्रीय जनता दलाच्या तेजस्वी यादव यांची सत्ता थोडक्यात हुकली. तसे यावेळी उत्तर प्रदेशमध्ये होऊ द्यायचे नाही, असा निर्धार करून विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात उभे राहणार असल्याने संघाला त्याची चाहूल लागली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असणार्‍या चित्रकूटमध्ये मागील पाच दिवसांपासून सुरू असणार्‍या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचार बैठकीचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. या बैठकीत संघटनेला मजबूत करण्यासाठी काही कठोर निर्णय घेण्यात आले. यात पश्चिम बंगालमध्ये संघटनेची पाळंमुळं मजबूत करण्यासाठी राज्याची तीन भागांमध्ये विभागणी करण्यात आली. विशेष म्हणजे संघाने आता देशभरातील मुस्लीम बहुल भागामध्ये शाखा सुरू करण्याचा निर्णयही घेतला आहे. केवळ हिंदूच नाही तर मुस्लिमांनाही संघाशी जोडण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रांत प्रचारकांना पुढील वर्षभरामध्ये काय काय कार्यक्रम आखण्यात आले आहेत याची कल्पना देण्यात आली. तसेच संघाने काही महत्वाच्या पदांमध्ये बदल केला आहे. दक्षिण बंगालमधील प्रांत प्रचारक जलधर महतो यांना सह क्षेत्र प्रचारक ही जबाबदारीही देण्यात आलीय. तर प्रांत प्रचारक प्रशांत भट्ट यांना दक्षिण बंगालमधील प्रांत प्रचारक करण्यात आलंय. त्याचप्रमाणे पूर्वेकडील ओडिसा आणि बंगालच्या प्रांतामधील सह क्षेत्र प्रचारक रामापदो पाल यांच्यावरही नवीन जबाबदारी सोपवण्यात आलीय. क्षेत्र प्रचारक प्रदीप जोशींना अखिल भारतीय सह संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचं मुख्य कार्यालय चंढीगडमध्ये असेल. त्याचप्रमाणे आता भैय्याजी जोशी संघ आणि विश्व हिंदू परिषद यांच्यातील संयोजक असतील. तसेच डॉक्टर कृष्ण गोपाल यांना विद्या भारतीचे प्रमुख संपर्क अधिकारी बनवण्यात आलं आहे. सर कार्यवाह अरुण कुमार यांना संघ आणि भाजपामध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

मुस्लीम समाजाचे दारिद्य्र, बेरोजगारी, अंधश्रद्धा, धर्मपरंपरांचा पगडा, जमातवाद, स्त्री-प्रश्न यावर देशभर खूप काम करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात १९७० रोजी स्थापन झालेल्या मुस्लीम सत्यशोधक मंडळाने यादृष्टीने मोठ्या कामाला सुरुवात केली होती. समाज प्रबोधनाच्या संतुलित विकासात मुस्लीम समाजानेसुद्धा योगदान दिले पाहिजे हा मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेचा उद्देश होता. हमीद दलवाईंनी समान नागरी कायद्याची आवश्यकता लक्षात घेऊन ही मागणी लावून धरली. समान नागरी कायदा हा समान नागरिकत्व, समानता, धर्मनिरपेक्षतेच्या आधुनिक मूल्यांची बांधिलकी असणारा आणि धर्मपुरस्कृत विषमतेला प्रभावहीन करणारा होता. तसेच धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्मितीच्या प्रक्रियेला चालना देणारा होता. अनेक उदारमतवादी मुस्लिमांनी मंडळाच्या भूमिकेचे स्वागत केले, तर धर्मवादी मुल्ला-मौलवींसह राजकीय पुढार्‍यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून ‘सत्यशोधक’ विरोधात १९७३ मध्ये परिषद घेतली. त्यातूनच ‘ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड’ अस्तित्वात आले. मुस्लीम सत्यशोधकला बदनाम करून धर्मविरोधी प्रतिमा निर्माण केली आणि मुस्लीम समाजाच्या प्रबोधनकार्यात अडसर आणला. आरंभी समान नागरी कायद्याला विरोध करणार्‍या हिंदुत्ववाद्यांनी नंतर हा विषय मुस्लीमविरोधी राजकारणासाठी वापरला. संघ परिवाराने हा विषय हत्यार म्हणून वापरण्याचे ठरवले, तेव्हा समाजवादी मंडळींनी यातून अंग काढून घेतले. आता सर्व भारतीयांचा डीएनए एक असल्याचे सांगत मुस्लीम वस्त्यांमध्ये संघ शाखा सुरू करत असेल तर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पुरोगामी मातीमधून उगवलेला सत्यशोधक विचार सर्व देशात पेरायला काहीच हरकत नाही. मात्र तो फक्त निवडणुकीसाठी आहे की मुस्लीम समाजाच्या जीवनात नवीन पहाट आणण्यासाठी हे येणारा काळच ठरवेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -