घरफिचर्सतेंडुलकरांच्या ‘गिधाडां’चे अविरत थैमान !

तेंडुलकरांच्या ‘गिधाडां’चे अविरत थैमान !

Subscribe

आपल्या भवतालात हिंसा आणि क्रौर्याने आज जे थैमान घातले आहे, ते पाहून खरं तर मन विषण्ण व्हायला हवे. पण हे थैमान आजचे आहे असं अजिबात नाही. याआधीही माणसांकडून ते घातले जात होते. तेंडुलकरांसारखे नाटककार त्याचा शोध आपल्या नाटकांतून सातत्याने घेत होते. त्या थैमानाचे प्रतिबिंब नाटकात दिसले म्हणून त्याला एक प्रातिनिधिक म्हणून सोडून देता यावे, तर तसेही ते नाहीय. इतक्या वारंवारपणे ते थैमान आपल्याभोवती घातले जात आहे. त्यामुळे विषण्ण होण्याइतकीही संवेदनशीलता आपल्यात उरलीय की नाही असा प्रश्न पडावा. इतक्या सातत्याने एकापाठोपाठ एक हिंसक आणि क्रौर्याच्या घटना समोर येत आहेत आणि या घटनांनी जणू आपल्या जाणिवा उरलेल्या सबंध आयुष्याकरता बोथट करून टाकल्या आहेत.

एक मच्छर कानाशेजारी गुणगुणत आणि डोक्यावरती घोंघावत राहतो. त्याचा कानाशी चाललेला भुंगा आणि डोक्यावरती सदोदीत घोंघावणं मला माझ्या अस्तित्वावर मोठं संकट आल्यासारखं वाटत राहतं. मग मी काय करतो?… मी त्या मच्छराच्या नरडीचा घोट घ्यायचा निश्चय करतो. हिंदी सिनेमात धर्मेन्द्र जसा ‘मसल के रख दूंगा’ म्हणतो, तसा मी त्या मच्छराला अक्षरश: कुस्करून टाकतो. त्याचा अंशही उरला नाही पाहिजे, या सूडभावनेने पेटून उठतो. अखिल मच्छरजातीचा निर्वंश आणि तिचा उच्छेद करायचं माझ्या मनाने घेतलेलं असतं. एक मच्छर उरायला नकोय या आसमंतात, असा विचार करत असताना अचानक माझ्या मेंदूत चॅप्लिनसारखी मिशी राखणार्‍या हिटलरचा फोटो फ्लॅश होतो…हिटलर…क्रूरकर्मा हिटलर. माझ्यातसुद्धा हिटलर दडलाय ?… ज्याला निर्वंश करायचा असतो अखिल मच्छरजमातीचा ?… हो…एवढी क्रूर इच्छा बाळगून, ती अंमलात आणूनही उपयोग काय होतो ?

मच्छर वाढत आहेतच दिसामासाने…थव्याथव्याने. हिटलर मात्र खंगत गेला दिसादिसाने. पुढे तो मेला. त्याला मरून जावेसे वाटले. मच्छर मात्र शाबूत आहेत. शेकड्यांनी, हजारोंनी, लाखोंनी…मला कशाचाही उच्छेद करता येत नसतो. कुणालाही निर्वंश करता येत नसतं. मात्र, माझा उच्छेद होणार असतो…नक्कीच…अटळ….!

- Advertisement -

उपरोक्त स्वगत जरी कुठल्याशा स्वत:शीच तंद्री लागल्याच्या एका क्षणात लिहिलेले असले, तरी त्यात अनुस्यूत असलेल्या वर्चस्वाच्या भावनेचा अंमल माणसाच्या उत्पत्तीपासून ते आज अगदी या क्षणापर्यंत त्याच्या मनाला व्यापून राहिलेला आहे. सबळाने दुर्बळांना, समर्थाने कमजोरांना चिरडण्याच्या या आदिम प्रवृत्तीचा शोध घेण्याचा, तिच्या अपरिहार्यतेचा, ती समजून घेण्याचा प्रयत्न जसा वेगवेगळ्या ज्ञानशाखांमधून होत राहिला आहे, तसाच प्रयत्न आपल्या नाटक-साहित्यादी माध्यमांतूनही केला गेलेला आहे. प्राचीन ग्रीको-रोमन लेखकांपासून ते भारतीय साहित्यातील अनेक नामवंत साहित्यिकापर्यंतची ही रेंज फार मोठी आहे. नावेच सांगायची झाली तर या साहित्यिकांमध्ये खुशवंत सिंगांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. मराठी साहित्यापुरते बोलायचे झाले तर भाऊ पाध्ये, विलास सारंग, चंद्रकांत खोतांपासून ते विख्यात नाटककार विजय तेंडुलकर ही काही ठळक उदाहरणे होत. माझे स्वत:चे आवडीचे क्षेत्र ‘नाटक’ असल्याने मग नाटकांतून माणसाच्या ठायी असणार्‍या हिंसा आणि क्रौर्य या दोन आदिम गुणांचा विचक्षण मागोवा घेणारे साहित्य लिहिणार्‍या तेंडुलकरांची आठवण इथे येणे क्रमप्राप्तच आहे. सदर लेखप्रपंचातून विजय तेंडुलकरांनी आपल्या नाटकांतून रेखाटलेले मानवी क्रौर्य आणि हिंसा आणि आजचा आपला भवताल कसे हातात हात घालून चालत राहणारे वास्तव आहे, याचा उहापोह करण्याचा माझा अल्प प्रयत्न असणार आहे.

तेंडुलकरांच्या या विषयाच्या अनुषंगाने प्रातिनिधिक असलेल्या नाटकांचा उल्लेख करण्याआधी मूळात माणसांमध्ये हे क्रौर्य, ही हिंसा येते कुठून, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावासा वाटतो. माणसामाणसांमध्ये सुप्तपणे वास करीत असलेल्या आदिम ठिणगीचा धांडोळा घ्यावासा वाटतो. हिंसा आणि क्रौर्याच्या घटनांच्या मुळाशी जाता एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्यावीशी वाटते, ती म्हणजे या घटनांचे मूळ हे व्यक्तीच्या निकोप नसलेल्या मानसिक, सामाजिक, लैंगिक आणि अर्थातच पर्यायाने त्याच्या सांस्कृतिक जगण्यात आहे. कसे ते समजून घेण्यासाठी माणूस नावाच्या प्राण्याचा अगदी आदिमकाळापासून ते आजच्या अत्याधुनिक तंत्रयुगापर्यंत झालेला प्रवास पाहायला हवा. मधल्या अनेक टप्प्यांमध्ये त्याच्या माणूस म्हणून दुसर्‍या माणसांवर वर्चस्व राखण्याच्या प्रवृत्तीला आपल्याकडील कौटुंबिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाने जे पाठबळ दिलेले आहे, त्याचा हिंसा आणि क्रौर्याशी खूप जवळचा आणि अन्योन्य संबंध आहे.

- Advertisement -

माणसाची आदिमकाळापासूनची वाटचाल पाहा. दोन पायांवर चालू शकणारा होमो सेपियन हा जरी इतर प्रजातींच्या तुलनेत अधिक प्रगत असला तरी त्याची गुणसुत्रे मात्र तेव्हाही श्वापदांचीच होती आणि आज इतक्या प्रदीर्घ प्रवासानंतरही त्या गुणसूत्रांमध्ये तसुभरही फरक झालेला नाही. काही फरक असलाच तर तो इतकाच की त्या गुणसूत्रांवर तकलादू आणि फोलकट सांस्कृतिकपणाची पुटं चढलेली आहेत. आपल्यासारख्याच दुसर्‍या माणसावर वर्चस्व गाजवण्याची संधी मिळताच ती श्वापदी गुणसुत्रे केव्हाही उफाळून येत आपला मूळ खाक्या दाखवू शकतात. किंबहुना दाखवतात. मानववंशशास्त्राच्या दाखल्यानुसार सुरूवातीला जंगलात राहणारा माणूस हळुहळू टोळ्या करून इतर माणसांसोबत समूहासमूहाने राहू लागला.

या अशा राहण्यामागे माणसाचे ‘सोशल अ‍ॅनिमल’ असणं हे एक महत्वाचं कारण होतं. इथेही त्याचं अ‍ॅनिमल म्हणजेच प्राणी असणं ही बाब आवर्जून लक्षात घ्यावीशी वाटते. प्राणी म्हटला की आपल्यापेक्षा वेगळ्या प्रजातीतल्या आणि पुढे जाऊन आपल्याच प्रजातीतल्या इतर प्राण्यांशी संघर्ष हा ओघाने आलाच. या संघर्षामागची प्रमुख प्रेरणा होती आणि आहे ती म्हणजे डार्विनचा जगप्रसिद्ध सिद्धांत-सर्व्हायवल ऑफ दी फीटेस्ट. आपल्या भवतालच्या नैसर्गिक साधनसंपत्तीवर आणि पुढे जाऊन आपल्यासारखेच टोळीने राहणार्‍या इतर माणसांवर जास्तीत जास्त अधिकार असण्याच्या, वर्चस्व असण्याच्या लालसेतून माणूस अधिकाधिक क्रूर होत गेला. आज आपण क्रौर्याची परिसीमा दाखवणार्‍या आणि मानसिक तसेच शारीरिक हिंसेचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे साक्षीदार आहोत, त्याचे धागेदोरे आपल्याला माणसाच्या या प्रवृतीत सापडतात. निदान मला तरी माणसाच्या ठायी असलेला हा क्रूरपणाच या घटनांच्या मूळाशी जाणवतो.

काळ जसजसा पुढे जात राहिला तसतसा माणूस भौतिक प्रगतीच्या वाटेवर चालू लागला. अनेक वैज्ञानिक शोधांच्या आधारावर माणूस आधुनिक युगाची वाट चालत राहिला. या वैज्ञानिक प्रगतीला समांतर अशा सामाजिक सुधारणांच्या वाटेवरही माणूस चालत राहिला. पण या सामाजिक सुधारणांचा वेग मात्र वैज्ञानिक प्रगतीच्या तुलनेत खूपच कमी होता. विज्ञान तंत्रज्ञान आणि त्याद्वारे साधलेल्या प्रगतीने माणसांना, ज्यात स्त्रियाही आल्या, मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य दिले. परंतु, ते स्वांतत्र्य उपभोगण्यासाठी म्हणून लागणारे जे जगण्यावागण्यातले ताळतंत्र हवे, ते मात्र आजही माणसांच्या पुरेसे अंगवळणी पडलेलं दिसत नाही.

खरंतर माणसाने आता इतकी भौतिक प्रगती साधली आहे की त्याच्या बळावर तो सबंध विश्व काबीज करू पाहतो आहे. तो चंद्रावर पाय ठेवून आला. तो मंगळावर राहण्यासाठी पर्यायी जागेचा शोध घेण्यापर्यंत येऊन ठेपलाय. पण आपल्या आत असलेल्या आदिम क्रौर्याच्या, आदिम हिंसेच्या भावनांवर विजय प्राप्त करणे काही माणसाला अजून शक्य झालेलं दिसत नाही. आणि त्याचं कारण कुठले असेल तर ते या लेखाच्या सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे त्याच्या अ‍ॅनिमल असण्यात आहे. या प्राण्याला माणसाळविण्याचे अधिकाधिक प्रयत्न वेगवेगळ्या मानवी संस्कृतींनी केले. पण आजही त्या प्रयत्नांत त्यांना पुरते यश आल्याचे दिसत नाही. माणसांची श्वापदी गुणसूत्रे ही मानवी चांगुलपणापेक्षा अधिक प्रभावी असल्याचे आणि ती आणखीनच घट्ट होत गेल्याचे दिसते आहे.

मराठीतील आधुनिक रंगभूमीवर नाटककार म्हणून मानवी मनातल्या या हिंसेचे आणि क्रौर्याचे प्रखर नाट्यरूप मांडणारे लेखक विजय तेंडुलकर याअर्थाने आजही तितकेच प्रस्तुत आहेत जितके ते पन्नास वर्षांपूर्वी होते. किंबहुना, आज त्यांच्या नाटकांचा रेलेव्हन्स हा पन्नास वर्षांपूर्वीपेक्षाही जास्त जाणवतो. काही फरक असलाच तर तेंडुलकरांनी त्यांच्या नाटकांतून मानवी क्रौर्याचे आणि हिंसेचे जे दर्शन घडवले, तिच्या शंभर पाऊले पुढे जात मानवी हिंसा आणि क्रौर्याने अधिकाधिक विकृत आणि बीभत्स रूप धारण केलेले आहे. यानिमित्ताने, तेंडुलकरांच्या काही प्रातिनिधिक नाटकांचा संक्षिप्त आढावा घेऊया.

‘शांतता ! कोर्ट चालू आहे…’
अभिरूप न्यायालयाचा घाट वापरून तेंडुलकरांनी हे अजरामर नाटक लिहिले. या नाटकातील प्रमुख पात्र बेणारे बाईच्या शेवटच्या प्रसिद्ध स्वगतावर येऊन ते संपते. त्या स्वगताची चर्चा करण्यात इथे मतलब नाही. पण सुरूवातीपासून ते त्या शेवटच्या स्वगतापर्यंत नाटकातल्या सगळ्या पात्रांच्या स्वभावदर्शनातून आणि संवादांच्या माध्यमातून तेंडुलकरांनी माणसांच्या क्रौर्याचे जे दर्शन घडवले आहे ते माणसांच्या ठायी असलेल्या soft cruelty चा उत्तम नमुना आहे. नाटकात त्यातील पात्रे हाताशी वेळ असल्याने तो काढण्यासाठी म्हणून ‘अभिरूप न्यायालया’चा एक खेळ खेळायचे ठरवतात. प्रत्येकजण आपापल्या भूमिका वाटून घेतात.

आरोपीच्या भूमिकेत बेणारे बाईंना उभे केले जाते.(बेणारे बाईंची ही भूमिका दिवंगत सुलभाताई देशपांड्यांच्या आयुष्यातील माईलस्टोन भूमिका होती) वरवर जरी एक साधा वेळ घालवण्यासाठी खेळावयाचा खेळ असला तरी उत्तरोत्तर तो खेळताना मात्र त्यातले गांभीर्य अजिबात न गमावता नाटकातील प्रत्येक पात्र आपापल्या वाट्याची भूमिका जगू लागतो. त्यातून आरोप, प्रत्यारोप आणि त्याच्या खंडनमंडणाचा जीवघेणा खेळ सुरू होतो. बेणारे बाईंच्या वैयक्तिक आयुष्याचा पंचनामाच जणू केला जातो. हे करत असताना एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात पराकोटीचा रस असणार्‍या, समाजातील तथाकथित नैतिकतेचा टेंभा मिरवणार्‍या माणसांचे प्रतिनिधी म्हणून सुखात्मेसारखी पात्रे उभी करून (आडनाव किती समर्पक आहे पाहा) माणसाच्या आत दडलेल्या सुप्त मानसिक हिंसेचे आणि क्रौर्याचे दर्शनच तेंडुलकर वाचकांना आणि प्रेक्षकांना घडवून आणतात. एखाद्याला आरोपीच्या पिंजर्‍यात उभं करत त्याला नागडं करताना आणि पाहताना आसुरी आनंद होणारी आणि सरतेशेवटी आम्ही त्या गावचे नाहीच, असे वागणारी माणसे हिंसक नाहीत, क्रूर नाहीत असं कोण म्हणू शकेल ?

घाशीराम कोतवाल
मराठी रंगभूमीवर सादर केल्या गेलेल्या सर्वोत्तम राजकीय नाटकांपैकी हे एक नाटक आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे. पेशवाईच्या कालखंडाच्या पार्श्वभूमीवर तेंडुलकर या नाटकात, मानवी मनातील इतरांवर वर्चस्व गाजविण्याच्या भावनेचा आविष्कार खूप प्रभावीपणे करतात. सोबत या मानवी व्यवहाराला त्यांनी राजकीय चालींची जी जोड दिली आहे, त्यातून मानवी मन राजकारणाने कसे ओतप्रोत असते आणि आपले ईप्सित साध्य करण्यासाठी एखादा माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे दर्शन घडवले आहे. पेशवेकालीन पुण्यात घाशीराम नावाचा माणूस येतो. शहराची कोतवाली मिळवणे हे त्याच्या आयुष्याचे ध्येय आहे. कोतवालीतून मिळणार्‍या अधिकारांच्या धाकात शहरातील बेशिस्तीला आवर घालण्याचा त्याचा इरादा आहे. कोतवाली मिळण्यासाठी आपल्या पोटच्या पोरीलाही पटावर ठेवायला घाशीराम मागेपुढे पाहत नाही. आपल्या मुलीचे लग्न लंपट नाना फडणवीसाशी लावून घाशीराम कोतवाली प्राप्त करून घेतो. ती मिळताच आता सबंध शहरावर आपला धाक तो हुकुमशहाप्रमाणे प्रस्थापित करू पाहतो. जोपर्यंत आपल्या सत्तास्थानापर्यंत घाशीरामाने शहरभर लावलेली आग पोहचत नाही, तोपर्यंत लंपट नाना तिकडे दुर्लक्ष (?) करत नववधुसोबत, घाशीरामाच्या मुलीसोबत मजेत वेळ घालवतो आहे. घाशीरामाला कोतवाली देऊन त्याने एकाच दगडात दोन पक्षी मारलेले असतात.

एक म्हणजे त्याच्या तरण्या पोरीशी पाट लावून मोकळा होतो. दुसरं म्हणजे, घाशीरामाच्या माध्यमातून परस्पर शहरावर आपला वचकही राखतो. दरम्यान, घाशीराम म्हणजे शहरावर आलेले महासंकट आहे आणि नाना फडणवीसांनी या संकटाचा ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे, अशी शहरवासीयांची अर्जी आहे. नाना फडणवीसाला आता घाशीराम आपल्याला डोईजड होऊ लागल्याची जाणीव झालेली आहे. काही करावे आणि घाशीरामाचा काटा आता काढणे आता नानाच्या बाजूने अगत्याचे होते. जनतेची हाकाटी शिरसावंद्य मानून नाना फडणवीस घाशीरामाच्या हातून कोतवाली काढून घेण्याचा निर्णय घेतात. घाशीरामाची कोतवाली काढून घेतली जाते. आलेल्या संकटाचे निर्दालन म्हणून घाशीरामाची हत्या केली जाते. सरतेशेवटी आता सगळे आलबेल दाखवून नाना फडणवीस आपली सत्ता मागून पुढे सुरू ठेवतात. ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकातील हे घटनाप्रसंग मानवी जगण्यातील सूक्ष्म तसेच उघड हिंसा आणि क्रौर्याने भारलेले नाहीत आणि याची प्रचिती आज येत नाही, असं आपण म्हणू शकतो काय ?

सखाराम बाईंडर
सध्याचा सांस्कृतिक भवताल पाहता ‘सखाराम बाईंडर’ या नाटकातील सखारामचे पात्र एखाद्याला एका आधुनिक आणि परोपकारी पुरूषाचे वाटू शकेल. समाजातील टाकून दिलेल्या निराधार बायांना आपल्या घरी आसरा देत, त्यांचा आधार होत सखाराम त्यांची शेवटपर्यंत आपल्या घरी साथसोबत करतो. वरवर पाहता त्याचे हे वागणे मोठेपणाचे वाटू शकेल. पण या पल्याड सखाराम हाही एक हाडामांसाचा माणूस आहे आणि कुठल्याही सामान्य माणसांत असलेले विकारदोष त्याच्यातही आहेत. कुठल्याही निराधार परित्यक्ता बाईचा आधार होण्याच्या मोबदल्यात सखाराम तिच्याकडून लग्नाच्या बायकोसारख्या अपेक्षा करत राहतो. सांसारिक सुखाच्या मागण्या करतो. शरीरसुखही मागतो. पण लग्नगाठ मात्र बांधत नाही. या उपर आपल्या इच्छा पूर्ण न झाल्यास, आपल्या मनासारखे काही न घडल्यास एका फटक्यात सगळे काही उध्वस्त करून टाकण्याची विध्वंसक वृत्तीही सखारामच्या ठायी आहे. सांप्रतकाळी सामान्य वाटू लागलेल्या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची संकल्पना आपल्या नाटकात चाळीस वर्षांपूर्वीच मांडणारे तेंडुलकर त्याअर्थाने द्रष्टे नाटककार होते, यात शंका नाही. पण त्याचवेळेस, त्या संकल्पनेचे दूरगामी परिणामही ढळढळीत बेधडकपणे दाखवून देणारे ते एक दिशादर्शक लेखकही होते.

गिधाडे
एकेकाळी मराठी रंगभूमीचं पावित्र्य जपणार्‍यांना अब्रम्हण्यम वाटणारे, तेंडुलकरांचे हे नाटक आजही रंगकर्मींना करावेसे वाटते, यातच त्यांचे नाटककार म्हणून असलेलं द्रष्टेपण सिद्ध होते. ते लिहिलं गेल्यानंतर अनेक वर्षांनी रंगभूमीवर आलं, तेव्हा त्यातली हिंसक प्रवृत्तीची, एकमेकांच्या जीवावर उठलेली शिवराळ भाषा बोलणारी पात्रे ही तेंडुलकरांच्या कल्पनेतली विकृत पात्रे आहेत, त्यांचा प्रत्यक्षातील जगण्याशी संबंध नाही, असं म्हटलं गेलं. पण काही जाणकारांच्या मते मात्र ते एक भविष्यवेधी नाटक होतं आणि शेवटी तेच खरं ठरलं. यातली पात्रे ही परस्परांची लचके तोडणारी अर्थलोलूप आणि मदांध अशी आजच्या चंगळवादी जगणार्‍या माणसांची प्रतीके बनून गेली आहेत. अनैतिकतेच्या निसरड्या मार्गावरून धावत सुटणारी, आजचा क्षण साजरा करण्याच्या ध्यासाने पछाडलेली आणि जगण्यातील सगळी कोवळीक बेर्मुवतपणे खुडून काढणारी अतोनात स्वार्थी जमात हीच माणसाची ओळख बनत चालली आहे. तेंडुलकरांचे ‘गिधाडे’ हे नाटक याच माणसांचा सूक्ष्मदर्शकाखाली धरलेला एक पापुद्रा आहे.

वर तेंडुलकरांच्या ज्या नाटकांचा आपण थोडक्यात परिचय करून घेतला आहे, ती सर्व नाटके या लेखाच्या अनुषंगाने साधर्म्य सांगणारी, माणसाच्या अंगभूत अशा हिंसा आणि क्रौर्याच्या प्रवृत्तीचे निर्देशन करणारी आहेत. पण गोष्ट इथे थांबत नाही. आपल्या नाट्यलेखनाच्या उत्तरकाळात तेंडुलकरांनी केलेले मानवी प्रवृत्तींविषयीचे जे चिंतन मी वाचले आहे, त्यात तेंडुलकर स्पष्टपणे म्हणतात की, हिंसा आणि क्रौर्य ही केवळ माणसाची आदिम प्रवृत्तीच नाहीय तर, ती माणसाची गरजसुद्धा आहे. त्यांच्या या विधानाचा अन्वयार्थ लावताना मला जे दिसते ते असे की, माणूस अमुक एक इच्छा-आकांक्षा आणि ध्येयाने पछाडलेला प्राणी आहे. त्याच्या या इच्छा, आकांक्षा आणि ध्येयाला मूर्तरूपात पाहण्यासाठी तो जीवाचे रान करतो. या प्रयत्नात तो हमेशा यशस्वी होतोच असे नाही. किंबहुना ग्रीक साहित्यात म्हटल्याप्रमाणे, माणसाचा शोकांत ही एक अटळ अशीच बाब आहे. आता या शोकांताची चाहुल लागल्यानंतर माणूस अधिकाधिक नम्र होत कोषात जायला हवा.

पण तसे सहसा होताना दिसत नाही. उलट या शोकांताच्या चाहुलीने एक प्रकारची मानसिक पोकळी त्याच्या अंतरात तयार होत जाते. ती पोकळी भरून काढण्याच्या नादात माणूस जास्तीत जास्त उद्वेगी होत जातो आणि एकदा का उद्वेग अनावर झाला की त्याचे रूपांतर हिंसेत आणि क्रौर्यात व्हायला क्षणाचाही अवधी लागत नाही. दुसर्‍या शब्दांत सांगायचे झाले तर हिंसा आणि क्रौर्य हे माणसाच्या उद्वेगाचा निचरा करू शकणारे आणि जिनेटिकली सहज उपलब्ध असलेले ‘आऊटव्हॉल्व’ आहेत. आपल्या मनासारखे घडत नसताना त्यातून होणारा जळफळाट, वैषम्य आणि त्यातून येणारे वैफल्य आतल्याआत पचवू न शकता येणारा मनुष्य साहजिकच आपल्यातील हिंसक प्रवृत्तीकडे वळतो. कारण त्यातून मुक्त होण्याचा तोच एक सोपा मार्ग असतो आणि या हिंसेचा मार्ग क्रौर्याच्या ‘डेड एन्ड’ला येऊन थांबतो.

आपल्या भवतालात हिंसा आणि क्रौर्याने आज जे थैमान घातले आहे, ते पाहून खरं तर मन विषण्ण व्हायला हवे. पण हे थैमान आजचे आहे असं अजिबात नाही. याआधीही माणसांकडून ते घातले जात होते. तेंडुलकरांसारखे नाटककार त्याचा शोध आपल्या नाटकांतून सातत्याने घेत होते. त्या थैमानाचे प्रतिबिंब नाटकात दिसले म्हणून त्याला एक प्रातिनिधिक म्हणून सोडून देता यावे, तर तसेही ते नाहीय. इतक्या वारंवारपणे ते थैमान आपल्याभोवती घातले जात आहे. त्यामुळे विषण्ण होण्याइतकीही संवेदनशीलता आपल्यात उरलीय की नाही असा प्रश्न पडावा. इतक्या सातत्याने एकापाठोपाठ एक हिंसक आणि क्रौर्याच्या घटना समोर येत आहेत आणि या घटनांनी जणू आपल्या जाणिवा उरलेल्या सबंध आयुष्याकरता बोथट करून टाकल्या आहेत. या घटनांच्या आधी, अधेमध्ये आणि नंतरही घडलेल्या पण उजेडात न आलेल्या आणखी कितीतरी घटना….मी रोजचीच बातमी असल्यासारखं वृत्तपत्राचं पान निर्विकारपणे उलटत राहतो. समाजमाध्यमांवर प्रतिक्रिया देत आपला आभासी राग व्यक्त करत राहतो. मेणबत्त्या पेटवून यात्रेत सहभागी होत राहतो आणि काहीच न घडल्यासारखं विस्मरणाच्या नशेत पुढे पुढे जगत राहतो.

माणसातील हिंसा आणि क्रौर्याचा सर्जक मागोवा घेणारे विजय तेंडुलकर यादृष्टीने काळाची पाऊले आधीच ओळखणारे या देशातील मोठे नाटककार होते.

-समीर दळवी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -