खाकी वर्दीलाही समजून घ्या हो जरा!!

काही कारण नसताना घराबाहेर पडू नका, या सूचना वारंवार देताना या खाकी वर्दीतील माणसाच्या गळ्याला कोरड पडत असेल, त्याची कुणालाही तमा नाही. मात्र पोलिसांनी दोन दंडुके काय मारले की, पोलीस अत्याचार करतात अशी ओरड समाजातील काही लोकांकडून करून पोलिसांना शिव्याशाप दिल्या जातात. अरे पण लहानपणी आई बाबादेखील काळजीपोटी आपल्याला मारत होते हे आपण विसरलो का ! देशावर ओढवलेले करोनाचे संकट आपल्या दारात येऊ नये या काळजीपोटी दंडुके मारण्याची वेळ पोलिसावर आली आहे हे पण विसरू नये.

देशासाठी पोलिसांचे बलिदान पाहिले मी।
म्हणून देशासाठी जीवन वाहिले मी॥
सपूत खरा मातृभूमीचा थोर असतो॥
विनाकारण पोलीस कठोर नसतो॥4॥
आई-बहिणींची अब्रू राखणारे पोलीस।
सुखासाठी जनतेच्या राबणारे पोलीस॥
शिवकवी म्हणे पोलीस न्यायाची डोर असतो।
समाजाच्या भल्यासाठी त्यांचा जोर असतो॥

खाकीच्या धाकाची, अथवा ती ओसरल्याची बाब नेहमीच चर्चेत येते किंवा टीका-टिप्पणीची ठरते; परंतु या ‘खाकी’त असलेल्या माणुसकीचे जेव्हा दर्शन होते, तेव्हा त्याला सलाम केल्याखेरीज राहता येत नाही. करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन स्थितीत आहे. अत्यावश्यक सेवतील कर्मचारी मात्र कार्यरत आहेत. कायदा-सुव्यस्था राखण्यासाठी नेहमीच दिवस-रात्र झटणारे पोलीस आजही देशाला करोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी अविरत काम करताहेत.

संपूर्ण जग महाभयंकर अशा करोना विषाणूशी सामना करीत आहे. हजारो भारतीयांमध्ये करोनाचा संसर्ग पसरला असून करोनाच्या विषाणूने शेकडो बळी घेतले आहेत. या महाभयंकर आजाराशी सामना करण्यासाठी देशात पूर्णपणे लॉकडाऊन पुकारण्यात आलेला आहे, नागरिकांनी घरात बसूनच ही लढाई लढावी, विनाकारण घरातून बाहेर पडू नये या प्रकारच्या सूचना सरकारकडून देण्यात येत आहेत. संपूर्ण देश करोनाच्या भीतीने घरात बसलेला आहे. मात्र, तुमच्या आमच्या सुरक्षिततेची काळजी घेणारा तो खाकी वर्दीतील माणूस या लढाईत ताठ मानेने रस्त्यावर उतरला आहे. या जैविक युद्धाशी लढाई करण्यासाठी जीवाची बाजी लावून काम करणारे सरकारी यंत्रणेतील डॉक्टर, संबंधित कर्मचारी, शासकीय अधिकारी यांच्या खांद्याला खांदा लावून तेवढ्याच ताकदीने या जैविक लढाईचा सामना करणार्‍या या सरकारी यंत्रणेतील खाकी वर्दीतल्या माणसाला विसरून कसे चालेले ! जैविक युद्धाशी सामना करणार्‍या वैद्यकीय यंत्रणा ज्या प्रकारे जैविक युद्ध लढत आहे तसाच हा खाकीतला माणूस आपले कुटुंब, घरदार विसरून रस्त्यावर उतरला आहे तो तुम्ही आम्ही सुरक्षित राहावे यासाठी !

देशावर ओढवलेल्या करोनाच्या संकटाच्या काळात या खाकी वर्दीतल्या पोलिसांची अनेक रूपे देशवासीयांना बघायला मिळत आहेत. देशात लॉकडाऊन सुरू असताना लोकांनी घरातच बसावे, उगाच काही कारण नसताना घराबाहेर पडू नका, या सूचना वारंवार देताना या खाकी वर्दीतील माणसाच्या गळ्याला कोरड पडत असेल, त्याची कुणालाही तमा नाही. मात्र, पोलिसांनी दोन दंडुके काय मारले की, पोलीस अत्याचार करतात अशी ओरड समाजातील काही लोकांकडून करून पोलिसांना शिव्याशाप दिले जातात.

अरे पण लहानपणी आई बाबादेखील काळजीपोटी आपल्याला मारत होते हे आपण विसरलो का! देशावर ओढवलेले करोनाचे संकट आपल्या दारात येऊ नये या काळजीपोटी दंडुके मारण्याची वेळ पोलिसांवर आली आहे हे पण विसरू नये. पोलिसांनादेखील कुटुंब आहे, बायको मुले आहेत, हे सर्व विसरून पोलीस आपले कर्तव्य बजावत आहेत, त्यांचाही थोडा विचार करून त्यांना सहकार्य करणे आपले कर्तव्य नाही का! आज पोलीस रस्त्यावर आहे म्हणून त्यांच्या भीतीपोटी म्हणा आज आपण घरात सुखरूप आहोत. जर पोलिसांनी थोडी कठोरता दाखवली नसती तर आपला देशदेखील इतर देशांतील करोना बाधितांच्या तुलनेत आला असता. या प्रसंगात पोलिसांनी थोडी कठोरता दाखवली म्हणून आपल्या देशाला करोनावर नियंत्रण ठेवता येत आहे.

गुंडांशी दोन हात करणारा, समाजातील गुन्हेगारी मोडून काढणार्‍या पोलिसांनीदेखील ही कल्पना कधीच केली नव्हती की, करोना या आजाराला समाजापासून दूर ठेवण्याच्या लढाईत त्यांना उतरावे लागेल. परंतु, आज सर्व काही विसरून खाकी वर्दीतील तो पोलीसदेखील तेवढ्याच तयारीने करोनाशी दोन हात करण्यासाठी रस्त्यावर उतरून सामना करीत आहे. ही जैविक लढाई लढत असताना पोलिसांवरदेखील करोनाचे हल्ले झाले आहेत. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांना करोनाची बाधा झाली आहे. परंतु, या युद्धातून पळ न काढता पोलीस नावाच्या या सैनिकांनी आपले युद्ध सुरूच ठेवले आहे. या युद्धातून माघार घेण्यासाठी अनेक पोलिसांचे कुटुंब त्यांना विनवणी करीत आहे, मात्र, हे युद्ध माझ्या एकट्याचे नाही, माझ्या देशाचे, समाजाचे आहे, मी माझे कर्तव्य सोडून पळ काढणार नाही, आज माझी देशातील देशवासीयांना गरज आहे. मी हे युद्ध अर्धवट सोडून पळ काढणार नाही. असे आपल्या कुटुंबियांना सांगून त्यांची समजूत काढत असल्याच्या अनेक पोस्ट समाज माध्यमावर व्हायरल होत आहेत.

पोलिसातील माणुसकी
वेळ प्रसंगी कठोर भूमिका घेणारा पोलीस, हा स्वत: उपाशी राहून भुकेल्यांला अन्न देणारे अनेक व्हिडिओ मागील काही दिवसांपासून समाज माध्यमावर बघायला मिळत आहेत. लॉकडाऊनमुळे मजुरांना अन्नधान्याचे वाटप करणार्‍या पोलिसांवरदेखील समाज माध्यमांवर त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. देशावर, राज्यावर कुठलेही संकट येऊ द्या, या संकटाशी सामना करताना सर्वात पुढे पोलीसच असतो, मग ते संकट अतिवृष्टीचे असो अथवा महामारीचे असो पोलीस कधीही मागे सरकत नाही. या संकटांशी सामना करण्यासाठी सर्वात पुढे तो पोलीस, प्रत्येकाला संकटाच्या वेळी आठवतो तो पोलीस, मदतीसाठी सर्वात अगोदर धावून येतो तोदेखील पोलीसच असतो. देशावर ओढवलेल्या करोनाच्या संकटामुळे देशात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलेला आहे, अत्यावश्यक सेवेतील वाहतूक वगळता इतर वाहतूक संपूर्णपणे बंद करण्यात आली आहे. या लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्यामुळे मजूरवर्ग बेरोजगार झालेला आहे, जवळ पैसा नाही, अन्न नाही, राहण्यासाठी छत नाही अशा कठीण परिस्थितीत सापडलेल्या मजुरांना दोन वेळचे अन्न मिळावे म्हणून पोलिसांकडून अनेक ठिकाणी मजुरांना तसेच भुकेल्यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात येत आहे.

डोक्यावर छत नसलेल्या मजुरांना लॉकडाऊन उठेपर्यंत पोलिसांकडून काही संस्थेच्या मदतीने राहण्याची सोय केली जात आहे. करोना व्हायरसमुळे राजकीय पक्षाच्या अनेक नेत्यांनी स्वतःला घरात कोंडून घेतले असताना गरिबांच्या मदतीला केवळ पोलीसच धावून येतानाचे चित्र सर्वत्र दिसत आहे. एखाद्या विभागात अथवा शहरात करोनाचा रुग्ण आढळून आल्यास त्याला ताब्यात घेऊन रुग्णालयापर्यंत पोहचवण्यासाठी महानगरपालिकेच्या करोना संबंधित पथकाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना पोलीसच सर्वात पुढे असतो. त्याला स्वतःच्या आरोग्याच्या काळजीपेक्षा तुमची आमची काळजी अधिक असते. कर्तव्य पार पाडत असताना मागील आठवड्यात ठाणे पोलीस दलातील अनेक पोलिसांना करोनाची बाधा झाली, अनेक पोलीस अधिकारी स्वतःला पोलीस ठाण्यातच क्वारंटाईन करून घेऊन आपले कर्त्यव्य पार पाडत आहेत.
हिच परिस्थिती मुंबई, नवी मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आहे. एवढे असूनही पोलिसांची काहीच तक्रार नाही, तक्रार करणार तरी कुणाकडे अशी अवस्था पोलीस दलाची आहे.

देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे, शत्रू अदृश्य आहे. या अदृश्य शत्रूचा सामना करण्यासाठी आम्ही सकाळी लवकर बाहेर पडतो. मात्र, ड्युटी संपल्यावर घरी जाण्यासाठी मनात घालमेल सुरू असते, दिवसभर अदृश्य शत्रूशी सामना करीत होतो, हा शत्रू माझ्यासोबत माझ्या घरापर्यंत आला तर… घरात वृद्ध आईवडील, लहान मुले, पत्नी असतात. त्यामुळे घरात प्रवेश करायचीसुद्धा भीती वाटते, पण काय करणार, शक्य होईल तेवढे स्वतःला सॅनिटाईझ करूनच घरात प्रवेश करतो, असे एका अधिकार्‍याने सांगितले. अशीच अवस्था देशभरातील पोलिसांची आहे. अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी तर या भीतीपोटी घरी जाणेच टाळतात.

वांद्य्रातील गर्दीमुळे झाले धस्स
करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) तेवढेच महत्त्वाचे. मात्र, हा नियम सर्वांना लागू असताना पोलिसांना मात्र आपले कर्तव्य करताना सामाजिक अंतर ठेवणे काहीसे कठीणच जाते. गुन्हे दाखल करणे, तक्रारदाराची तक्रार एकूण घेणे, नाकाबंदी, गस्त या सर्वातून सामाजिक अंतर ठेवण्याचा पोलिसांनी कितीही प्रयत्न केला तरी काही तक्रारदार, गुन्हेगार थेट अंगावर येऊन बोलतात, त्यातूनही पोलिसांकडून काळजी घेण्यात येते. मात्र, सोमवारी दुपारी वांद्रे पश्चिम येथील जामा मस्जिद या ठिकाणी अचानक हजारोंच्या संख्येने जमलेल्या मजुरांना बघून बंदोबस्तावरील पोलिसांच्या काळजात काही वेळाकरिता धस्स झाले होते. एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र जमलेल्या या जमावाला नियंत्रित कसे करायचे, या जमावात करोनाचा रुग्ण असेल तर असा विचार यावेळी अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या मनात येऊन गेला. परंतु, काय करणार मैदान सोडून पळून जाता येत नाही म्हणून जमेल तेवढी स्वतःची काळजी घेत एकत्र जमलेल्या या जमावाची समजूत काढत त्यांची पांगवापांगव करण्यात आली. या जमावाला तेथून दूर केल्याचे समाधान तर पोलिसांमध्ये दिसून येत होते. मात्र, या घटनेनंतर ड्युटी संपवून घरी जाताना प्रत्येक पोलिसाच्या चेहर्‍यावर चिंतेची लकेर दिसून येत होती, प्रत्येक पोलीस स्वतःला जेवढे सॅनिटाईज करता येईल तेवढे करीत होता.

देशावर आलेल्या करोनारूपी संकटात स्वतःची, कुटुंबीयांची तमा न बाळगता केवळ कर्तव्यापोटी समाजाचे रक्षण करणार्‍या खाकी वर्दीतील या माणसाला त्रिवार सलाम !

संतोष वाघ (लेखक आपलं महानगरचे प्रतिनिधी आहेत )