घरताज्या घडामोडीकाँग्रेसला खरी गरज, कार्यकर्त्यांच्या चिंतेची!

काँग्रेसला खरी गरज, कार्यकर्त्यांच्या चिंतेची!

Subscribe

– श्रीरंग बरगे

भारताच्या स्वातंत्र्यासाठी एक दिशा देणारी संघटना म्हणून स्थापन झालेली “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस”ही मूळ संघटना स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करीत महत्त्वपूर्ण नेत्यांच्या दिशादिग्दर्शनाने आणि लोकांच्या विचारातून पुढे जाणारी संघटना, राजकीय पक्ष म्हणूनही प्रभावीपणे काम करू लागली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा त्या काँग्रेस विचारांचाच वसा स्वातंत्र्याच्या लढ्यापासून पुढे घेऊन वाटचाल करीत आहे. आज मात्र त्याग आणि बलिदानाच्या पायावर उभा राहिलेल्या काँग्रेसपक्षातील काही नेते दुर्दैवाने पक्षाला सोडून जाऊ लागले आहेत. ज्या नेत्यांना काँग्रेसने त्यांच्या राजकीय क्षितिजाच्या उच्चस्थानी जाण्यास मदत केली त्याच काँग्रेसला सोडण्याचे काम करीत आहेत, मात्र तरीही काँग्रेस शाबूत आहे व राहणार, मात्र या दलबदलू नेत्यांच्या कृतीमुळे निर्माण झालेल्या स्थितीचा विचार करता परिमाम नक्की झाला आहे, सत्ता गमवावी लागली असली तरी काँग्रेसला मानणारा वर्गही कमी नाही तर मोठा आहे, कारण मूळ विचारांचा पाया या काँग्रेसने घातला आहे, हे विसरून चालणार नाही, म्हणूनच काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग ठामपणे काँग्रेसबरोबर आहे, हा वर्ग आहे तो म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांचा….. त्यामुळेच काही लहान-मोठे नेते जरी काँग्रेसमधून बाहेर जात असले तरी पक्षाच्या ताकदीमध्ये कमतरता येण्याऐवजी कार्यकर्त्यांना मात्र त्याची चिंता वाटू लागली आहे. ज्यांना काँग्रेसने अगदी सरपंचापासून मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद दिले ते काँग्रेसच हात का सोडतात? हे कार्यकर्त्याना समजू शकलेले नाही. पण इतके होऊनही काँग्रेस अद्याप ठामपणे उभी आहे ती त्या कार्यकर्त्यांच्या बळावर, ताकदीवर. अलीकडच्या अनेक निवडणुकांमधून ते नेहमी सिद्धही होत आहे आणि अगदी गेल्या ७-८ वर्षांमध्येही जरी काँग्रेसला जो काही राजकीय फटका बसला आहे, त्या काळातही हे अनुभवास आले आहे, ते कार्यकर्त्यांचे सामान्यपण राखून असलेले असामान्य बळ. अशा या असामान्य बळ असलेल्या सामान्यांना काँग्रेसच्या अस्तित्वाला राखण्यासाठी स्वत:च्या खिशालाही कात्री लावून काम करावेसे वाटत आहे, हेच आज काँग्रेस नेतृत्त्वाला अनुभवाला येत आहे.

- Advertisement -

अगदी महाराष्ट्रातील मोजकी गेल्या दोन निवडणुकी पूर्वीची उदाहरणे द्यायची झाली तर पनवेल, पेण, दहिवडी, इंदापूर, शिर्डी, येथील काँग्रेसचे आमदार विधानसभेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सोडून गेले. जाताना पक्ष संघटना व नगर पंचायत, पालिका, तालुका पंचायत, जिल्हा परिषद अशा महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये काम करणारे नेते व काही कार्यकर्ते घेऊन गेले. पक्षाचे जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष सुद्धा घेऊन गेले . काही ठिकाणी वर्षानुवर्षे सुरू असलेली कर्यालयेसुद्धा बंद करून त्या ठिकाणी स्वतःच्या नावाचे बोर्ड लावले. काही तर ज्या पक्षात गेले त्या पक्षांचे बोर्ड तेथे त्यांनी लावले. अशा वाईट प्रसंगी अनेक सामान्य कार्यकर्ते मात्र काँग्रेस सोबत दटून उभे राहिले व प्रसंगी निवडणुका लढले. पैसा, कार्यकर्ता व लागणारी साधन सामुग्री नसताना सुद्धा काँग्रेस साठी जीवाची बाजी लावत लढले. ऐपत नसताना काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी पक्षासाठी भाड्याने कार्यालये घेतली. नोकरी करून आपण मिळविलेल्या पैशातून किंवा छोट्या मोठ्या व्यवसायातून मिळालेल्या पैशातून त्याचे भाडे भरले. आजही भरीत आहेत हे नाकारता येणार नाही.

आजही असे अनेक कार्यकर्ते आहेत. जे अडचणीच्या काळात पक्षाच्या सोबत राहिले. त्यांना विश्वासात न घेता अजूनही मूठभर पुढारी निर्णय घेत आहेत.व तेच आजही पुन्हा पुन्हा जाणवते आहे.त्या मुळे सामान्य कार्यकर्ते यांना जो पर्यंत विश्वासात घेतले जात नाही. त्याला काय अडचणी आहेत विचारले जात नाही. त्यांना काय चिंता आहेत विचारले जात नाही तो पर्यंत नवं संकल्प चिंतन शिबिरांना व बैठकांना अर्थ नाही. असे माझे स्पष्ट मत आहे.

- Advertisement -

१९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशासमोर अनेक आव्हाने उभी होती. पण काँग्रेसने ती लीलया पेलली. पुरेसे अन्नधान्य, उद्योग, कारखाने, आरोग्याच्या सुविधा, शैक्षणिक संस्था, सिंचन सुविधा, वीजनिर्मिती, वाहतूक व दळणवळण साधने, या महत्वाच्या साधनांचा पाया कोणी काही दावे केले तरी काँग्रेसनेच घातला आहे हे अमान्य करता येणार नाही. देशाबरोबर काँग्रेस पक्ष सुद्धा मजबूत होत गेला आणि साहजिकच काँग्रेसचे सामान्य कार्यकर्ते मंत्री, आमदार, खासदार अशा पदावर विराजमान झाले. हे करीत असताना त्यांच्याबरोबर स्वातंत्र्यामधील त्यागाची व बलिदानाची परंपरा सुद्धा होती. पण सत्ता आल्यानंतर त्यातील काहींनी त्यागाचा व बलिदानाचा विसर पडला व व्यक्तिगत विकास करून व्यक्तिगत फायद्यासाठी जास्त व काँग्रेससाठी किंबहुना देशासाठी कमी काम करू लागले. हे वास्तव स्वीकारले पाहिजे.त्यातच आपल्यानंतर आपल्या वारसांना महत्वाची पदे देऊ लागले. त्यामुळेच तळागाळातील महत्वाकांक्षी कार्यकर्ता काँग्रेसपासून दूर जाऊ लागला. प्रादेशिक पक्षांच्या वाढीला काँग्रेस मधील फुटिरच जबाबदार आहेत. हे सुद्धा नाकारता येणार नाही.हे असले तरी देशभर सर्वत्र भाजपा वगळता दुसरा कुठलाही पक्ष नसून बहुतांशी पक्ष एक दोन राज्यापुरते सिमित आहेत. हे सत्य सुद्धा नाकारता येणार नाही.

हल्लीच उदयपूर, राज्यस्थान येथे काँग्रेसचे नवसंकल्प चिंतन शिबिर झाले. त्यामध्ये ब्लॉक, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी नवीन तीन विभागही स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. सार्वजनिक अंतदृष्टी विभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था व निवडणूक व्यवस्थापन विभाग हे तीन नवीन विभाग निर्माण करण्यात आले. त्याच बरोबर बऱ्याच वर्षानंतर काही कठोर निर्णय सुद्धा घेण्यात आले. त्या मध्ये एक व्यक्ती एक पद, एक कुटुंब एक तिकीट, पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये ५० वर्षाखालील युवकांना ५०%जागा, मंडळ व संघटनेमध्ये दलीत, आदिवासी, मागास, अल्पसंख्याक व महिलांना समान प्रतिनिधीत्व असे महत्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आले. हे निर्णय दूरगामी चांगले परिणाम करणारे असले तरी पण त्याचा परिणाम फारसा होताना दिसत नाही.बडे नेते अजूनही कार्यकर्त्यांना विश्वासात घेताना दिसत नाहीत.त्यांना अजूनही चांगली वागणूक मिळत नाही.व आजही काही नेते पक्ष सोडून जाण्याचे प्रकार चिंतेचे आहेत,व हेच प्रामाणिक कार्यकर्त्यांना सतावणारे आहे.म्हणून सध्या जी स्थानिक पातळीवर चिंतन शिबिरे सुरू आहेत.त्या मध्ये तोच खरा नवं संकल्प व चिंतनाचा विषय व्हायला हवा. अन्यथा या शिबिराना काही अर्थ राहणार नाही

(लेखक हे महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -