जागते रहो !

करोना विषाणूचा जगातील विविध देशांमध्ये प्रसार होत आहे. सुरुवातीला भारतात काही राज्यांमध्ये सीमित असलेला हा विषाणू आता अन्य राज्यांमध्ये पसरत आहे. देशात करोनाला आळा घालण्यासाठी पंतप्रधानांपासून ते थेट बॉलीवूड सेलिब्रिटींचा एकीकडे प्रयत्न असतानाच दुसरीकडे समाजातील विविध घटदेखील याला अटकाव करण्यासाठी आपआपल्या परीने प्रयत्न करत आहेत. जगातील बिघडत जाणारी परिस्थिती पाहता करोनाविषयी भारतीय लोकांनी अधिक जागरुक होण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर भारतात आतापर्यंत घडलेल्या काही निवडक घटनांचा आढावा या कोलाजच्या निमित्ताने...

टॅक्सी चालकाचा एअरपोर्ट ते कल्याण व्हाया सोलापूर प्रवास

गेल्या आठवड्यात 6 मार्चला मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर कल्याणच्या या व्यक्तीने टॅक्सी घेऊन थेट कल्याण गाठले. पण त्याहून कहर म्हणजे या करोना पॉझिटीव्ह रूग्णाने सिद्धेश्वर एक्सप्रेसने कल्याण ते सोलापूर असा प्रवास केला. आणखी गंभीर म्हणजे या रूग्णाने सोलापूरातील मोहळ तालुक्यातील श्रीराम मंगल कार्यालयात 7 मार्चला लग्न सभारंभासाठीही हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा एकदा प्रवास करत सिद्धेश्वर एक्सप्रेसने पुन्हा एकदा कल्याण गाठले. आता आरोग्य विभागासमोर या सगळ्या प्रवास क्रमामुळे मोठा पेच प्रसंग उभा राहिला.

व्हीआयपी ट्रिटमेट अपेक्षित करू नका – ममता बॅनर्जी
मी येणार्‍याचे स्वागतच करते, पण मी करोना घेऊन येणार्‍याच स्वागत करणार नाही, मला माफ करा अशा शब्दातच ममता बॅनर्जी यांनी सनदी अधिकार्‍याला बोल सुनावले आहेत. तुम्ही परदेशातून भारतात येऊन लगेचच शॉपिंग मॉल्स यासारख्या ठिकाणी जाऊ शकत नाही. त्यानंतर तुम्ही चाचणीही करणार नाही, मग 500 जण तुमच्यामुळे करोनाबाधित होणार. तुमच्या कुटुंबाचे स्टेटस वजनदार आहे म्हणून, मी हे खपवून घेणार नाही, अशा शब्दातच ममता बॅनर्जी यांनी सनदी अधिकार्‍याची कानउघडणी केली आहे.

उन्हात 15 मिनिटे उभे रहा
करोनावर अद्याप कोणत्याही पद्धतीचे औषध निर्माण झालेले नाही. मात्र, भारताच्या केंद्रीय मंत्र्याने मात्र करोनाच्या उपचारावर अजब दावा केला आहे. 15 मिनिटे उन्हात उभे राहिलात तर करोना नष्ट होईल, असा दावा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी केला आहे.

आई हॉस्पिटलमध्ये, तर मुलगा राज्याच्या सेवेत
महाराष्ट्रात शिरकाव झाला, त्याच दरम्यान राजेश टोपे यांच्या मातोश्री बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत. सध्या त्या आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत. मात्र त्यांचा मुलगा राज्यावरील आलेल्या संकटाशी मोठ्या जबाबदारीने लढा देत आहेत.

अमेरिकन सुपर मॉम
जेनिफर हॅलर या 43 वर्षीय अमेरिकेतील महिलेवर करोना लसीची चाचणी करण्यात आली आहे. जेनिफर हॅलर ही दोन मुलांची आई असून जगातील पहिली व्यक्ती आहे, जिच्यावर करोनाच्या लसीची चाचणी करण्यात आली आहे. दरम्यान, कोणत्याही लसीच्या चाचणीसाठी तंदुरुस्त व्यक्तीची गरज असते. कारण, त्या व्यक्तीवर त्या रोगाचा प्रयोग करण्यात येत असतो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या जीवाला धोका असतो. असे असतानादेखील जेनिफर हॅलर हिने करोनाच्या विळख्यातून जगाची सुटका व्हावी म्हणून पुढे आली आहे. जेनिफर हॅलरच्या या धाडसाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

करोनाग्रस्तांची नावे उघड करायला काय हरकत ?
संशयितांची नावे फोडल्याच्या कारणावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष संजीव पाखरे (रा. पुणे) यांच्याविरुध्द जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपचारासाठी या तीन संशयितांना नगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. तेथून ते पळून गेल्याची तक्रार रुग्णालय प्रशासनाने तोफखाना पोलिसांकडे संशयितांच्या नावासह केली होती.

महापालिका आयुक्तांच्या दालनात प्रवेश करताना
करोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना जाहीर करत जनतेला स्वयंशिस्त बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार हात स्वच्छ धुण्याचे आवाहन केले जात असतानाच खुद्द महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या कार्यालयामध्ये विशेष काळजी घेतली जात आहे. यामध्ये प्रत्येक वेळी आतबाहेर करणार्‍या शिपायांप्रमाणेच अधिकारी आणि अभ्यांगतांच्या हाती सॅनिटायझर लावूनच प्रवेश दिला जात आहे.

50 लाख डॉलर्सची मदत
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी गेट्स फाउंडेशन पुढे आले आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सहसंस्थापक बिल गेट्स यांच्या गेट्स फाउंडेशन करोनाचा सामना करण्यासाठी 10 कोटी डॉलर देणार असल्याचे जाहीर केले आहे. यासह वॉशिंग्टनला मदतीसाठी 50 लाख डॉलर देणार असल्याचे बिल गेट्स यांनी सांगितले.

खिडकीतून संवाद
सोनम कपूर लंडनहून परत आली आहे. त्यामुळे तिने करोनापासून बचावासाठी स्वत:ला तिच्या घरी एका बंद खोलीत बंदिस्त करून घेतले आहे. त्यामुळे सध्या ती कोणाच्याच संपर्कात नाही. नुकताच सोनमच्या घरातील एक व्हीडिओ समोर आला आहे. सोनम तिच्या सासूशी खिडकीमधून बोलताना या व्हीडिओत दिसत आहे. पहिल्या मजल्यावर सोनमची रूम आहे. तर समोर तळमजल्याला सोनमच्या सासूची रूम आहे. त्यामुळे या दोघी खिडकीमधून एकमेकांशी संवाद साधताना दिसत आहेत.

सलमान घरातच
चित्रपटांचे रिलीज, शुटिंग, प्रमोशन असे काहीच काम नसल्यामुळे अनेक सेलिब्रिटी आपले छंद जोपासताना दिसत आहेत. बॉलिवूडचा भाई सलमान खानसुद्धा घरीच थांबला असून त्याने एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो उत्तम स्केच बनवताना आपल्याला दिसतोय.

देवाच्या चरणी जा
काही दिवसांपूर्वी राखीने आपण करोना विषाणू नष्ट करायला चीनला निघालो आहोत असा एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आता करोनाविषयी राखीने आणखी एक व्हीडीओ शेअर केला आहे. यात माणसाने खूप पापे केली आहेत. म्हणून करोना होत आहे. सगळ्यांनी देवाच्या चरणी जा..आणि करोनाला पळवा, असे आवाहन राखीने या व्हीडिओत केले आहे.

गावठी कोंबडीला आला भाव
अंडी आणि कोंबडीचे मटण खाल्यामुळे करोना विषाणूची लागण होते, अशा अफवा पसरल्यामुळे पोल्ट्री फार्म व्यावसायिक आणि कोंबडी व्रिकेत्यांचा व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक ठिकानी ब्रॉयरल कोंबड्या चार रुपये इतक्या कमी किमतीत देण्यात आल्या तर काही ठिकाणी या कोंबड्या फुकट वाटण्यात आल्या. ब्रॉयलर कोंबड्यांच्या मटणाचे दर बाजारात पार कोसळले असताना गावठी कोंबड्यांच्या भाव वधारला आहे. ब्रायलरच्या मटणाविषयी लोकांना शंका वाटत असल्यामुळे गावठी कोंबड्यांना पसंती देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे भाव वाढले असून 440 रुपयांवरुन आता 480 रुपये प्रतिकिलो अशी किंमत झाली आहे.

मूर्खपणाचा कळस
‘करोना विषाणूचा फैलाव आणि रुग्णांना क्वॉरंटाईन करणे हा मूर्खपणा आहे. हा विषाणू आहे हे मला माहिती आहे. पण त्याच वेळी जर प्रत्येकाला त्याची लागण झाली, तर लोक मरणारच आहेत. ते भयानक आहे, पण अपरिहार्य आहे.’ वनेसाच्या या व्हिडिओवरून नेटिझन्सनी तिला प्रचंड ट्रोल केल्यानंतर तिने माफी मागितली.

करोना हेअरस्टाईल
सध्या जगभरात करोना विषाणूने अक्षरश: धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे या करोना विषाणूच्या हेअर स्टाईलचा ट्रेंड दिसून येत आहे. सध्या सोशल मीडियावर या हेअर स्टाईलचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

बाप्पालाही घातला मास्क
नाशिकमधील रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाच्या ‘चांदीच्या गणपती’ला कापडी मास्क घालण्यात आला आहे. सध्या या बाप्पाचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. जनजागृती करण्यासाठी बाप्पाला प्रतिकात्मक मास्क लावल्याचा दावा विश्वस्तांनी केला आहे.

चीनमध्ये नवा आकडा शून्य
चीनमध्ये करोनाचा केंद्रबिंदू असलेल्या वुहानमध्ये आता कोणताही नवीन रूग्ण नाही, असे चीन सरकारमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. चीनमध्ये डिसेंबरपासून करोनाग्रस्तांचे आकडे समोर येऊ लागले होते. पण आता देशाअंतर्गत नवा आकडा शून्य झाला असल्याचे चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने जाहीर केले आहे.

सेकंड वेव्हचा धोका
चीनमध्ये देशांतर्गत धोका कमी झालेला असला तरीही चीनला देशाबाहेरून येणार्‍या प्रवाशांचा मोठा धोका आहे. चीनमध्ये दररोज 20 हजार लोक प्रवास करत आहेत. बिजिंगमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आता 14 दिवसांसाठी हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनच्या आकडेवारीनुसार 34 केसेसमध्ये परदेशातून आलेल्या रूग्णांची संख्या वाढून 189 पर्यंत झाली.

लग्न करताच झाली अटक
करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, माजलगाव येथे हा आदेश डावलत नातेवाईकांना जमवून लग्न लावण्याचा घाट घातला. मात्र, पोलिसांना माहिती मिळताच वधू-वराच्या कुटुंबासह लग्न लावणार्‍या भटजी आणि फोटोग्राफरला पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना बीड जिल्ह्यातील ब्रम्हगाव येथे घडली आहे.

येथे अँटी करोना ज्यूस मिळेल
कोविड-19 च्या उद्रेकानंतर काही ठिकाणी बनावट सॅनिटायझर आणि मास्क तयार करण्याच्या घटना घडल्या आहेत. यात आता भरीस भर म्हणून केरळमध्ये एका परदेशी नागरिकाने आपल्या कॅफेमध्ये करोना व्हायरसवर ‘अँटी-करोना व्हायरस ज्यूस’ मिळेल असा बोर्ड लावला. हा ज्यूस 150 रूपयांना विकत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना तिरूअनंतपुरम येथील वर्कला या पर्यटनस्थळी घडली आहे.

या रक्तगटाच्या लोकांना धोका
चीनच्या वुहान शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांवर अभ्यास सुरू आहे. याशिवाय करोनापासून मृत्यू झालेल्या मृतांवरही संशोधन सुरू आहे. संशोधनादरम्यान रक्तगटासंबंधित एक संशोधन समोर आले आहे. यात सांगण्यात आले आहे की, कोणत्या रक्तगटातील नागरिकांना करोना विषाणूपासून धोका आहे. तसेच कोणत्या रक्तगटातील नागरिकांना करोनापासून कमी धोका आहे.

भिवंडीत गादीच्या जाहिरातदारावर कारवाई
करोना विषाणूसंदर्भात अफवा पसरविल्याप्रकरणी तसेच जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाणे येथे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरिहंत मॅट्रेसेसने 13 मार्च रोजी एका गुजराती दैनिक वृत्तपत्रात ‘अरिहंत अ‍ॅन्टी करोना व्हायरस मॅट्रेस’, या मॅट्रेसमुळे करोना विषाणूला प्रतिबंध होईल, अशी जाहिरात प्रसिद्ध केली. तसेच त्याद्वारे त्यांनी करोना विषाणूला प्रतिबंध होईल, असा खोटा दावा करुन जनतेमध्ये त्याबाबत अफवा पसरवली. या मालकाविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 505(2) सह आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 52 सह औषधीद्रव्य आणि जादुटोणा (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम 1954 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्टॅम्प दिसला रेल्वेतून खाली उतरवले
परदेशातून आलेले नागरिक किंवा राज्यात आढळलेले संशयित करोना रुग्णांच्या हातावर स्टॅम्प मारले जातात. या स्टॅम्प मारलेल्या नागरिकांनी होम क्वॉरंटाइनमध्ये राहणे गरजेचे असते. परंतु पालघर रेल्वे स्थानकावर चार संशयित करोना रुग्णांना रेल्वेतून उतविण्यात आले. हे चौघेही जर्मनीतून आले होते. मुंबई विमानतळावर उतरून ते गरीब रथ या ट्रेनने मुंबई ते सूरत असा प्रवास करत होते.

इराणमध्ये सहभागी पाकिस्तानी
पंजाबमध्ये पहिला करोनाचा रूग्ण आढळला होता. दुबईतून लाहोरमार्गे पाकिस्तानात आलेल्या रूग्णाची करोनासाठीची म्हणून पहिल्या रूग्णांची नोंद झाली आहे. एका खाजगी लॅबमध्ये त्याने उपचाराची सुरूवात केली. पण तो अधिकच आजारी पडल्याने आता त्याला पाकिस्तानातील सरकारी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पाकिस्तानातील एकाचवेळी 134 जणांनी इराणमध्ये तफ्तान बॉर्डर क्रॉसिंग कॅम्पमध्ये भाग घेतला होता. या कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या या सगळ्यांना करोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे.

करोना रोखण्याचा उपाय सुचवणार्‍याला 1 लाख
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीयांना करोनावर उपाय सुचवण्यास आवाहन केले आहे. करोनाला रोखण्यासाठी उपाय सुचवा आणि 1 लाख रुपये जिंका, असे मोदींनी ट्विट केले आहे. पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटला आतापर्यंत शेकडो रिट्विट्स आणि हजारो लाईक्स मिळाले आहेत. याशिवाय मोदी सरकारमधल्या अनेक मंत्र्यांनीदेखील पंतप्रधानांचे ट्वीट रिट्वीट केले आहे.

कुटुंबाला टाकले वाळीत
करोनाचे रुग्ण आढळून आल्याने सगळीकडे भीती पसरली आहे. करोनाग्रस्त रुग्णांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांना दुजाभावाची वागणूक देत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. रुग्णासोबत त्याचे नातेवाईक आणि कुटुंबीयांशी कुणी दुजाभाव, भेदभाव किंवा त्यांच्यावर बहिष्कार टाकला तर, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

पत्नीने काढला पळ
सध्या विविध देशांमध्ये करोनाने शिरकाव केल्यामुळे लोकांची पळताभुई थोडी झालेली असताना बंगळुरूहून एक नवविवाहित महिला पतीला करोनाची लागण झाल्याचे कळताच त्याला सोडून आपला जीव वाचवण्यासाठी तिच्या माहेरी पळाली, पण तिच्या या कृत्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात आल्याची शक्यता आहे. ही महिला आपल्या पतीसोबत इटलीला हनिमूनला गेली होती. तिथून परतल्यानंतर पती करोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या महिलेला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. मात्र ती तिथून पळाली.

रेल्वेत ब्लँकेट बंद
चीनमध्ये हाहा:कार माजविणारा करोना विषाणू आता भारतासह महाराष्ट्रात शिरला आहे. या करोना विषाणूचा मोठा धोका रेल्वेला असून रेल्वे प्रशासनाने करोना पसरू नये यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने आता लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील प्रवाशांना देण्यात येणार्‍या चादरी आणि ब्लँकेट बंद करण्याची घोषणा केली आहे. प्रवाशांना स्वत: ब्लँकेट आणि चादरी आणाव्या लागणार आहेत.

बॉलीवूडचा पुढाकार
करोनाबाबत जनजागृतीसाठी बॉलीवूड कलाकारांनीही पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन आज एक व्हिडीओ अपलोड करण्यात आला. या व्हिडिओत बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार करोनावर मात करण्यासाठी आवाहन करत आहेत. सोबतच काय काय काळजी द्यावी, काय करावे, काय करू नये याबद्दल हे कलाकार सांगत आहे. जवळपास पावणेदोन मिनिटांच्या या व्हिडिओत बॉलिवूडचे तब्बल 11 कलाकार आहेत.

डॉक्टरलाच उपचार नाकारले
एका जळगावच्या डॉक्टरलाच उपचार देण्यासाठी जवळपास 4 रूग्णालयांनी नकार दिल्याचे समोर आले आहे. अनेक ठिकाणी उपचारासाठी शोध घेतल्यानंतर अखेर डॉक्टरला जळगावच्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संपूर्ण शोधात या रूग्णाची प्रकृती आता गंभीर झाली असून आता डॉक्टरला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.

करोनातून रूग्ण बरी झाली पण…
जयपूरमध्ये आलेली एक 69 वर्षीय परदेशी महिला पर्यटकाचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. जयपूरमध्ये आलेली ही इटालियन पर्यटक करोना चाचणीत पॉझिटीव्ह आली होती. पण करोनावर उपचार घेऊन ती बरी झाली होती. पण आज जयपूरच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये तिने अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्यानंतर बरी होऊन मृत्यूमुखी पडणारी ही देशातील पहिली रुग्ण आहे. जेष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर या विषाणूचा परिणाम जास्त प्रमाणात होत असल्याचे या मृत्यूच्या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

करोनाचा फटका खेळाला
करोनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान प्रीमियर लीग (पीएसएल) स्पर्धेचे अखेरचे काही सामने पुढे ढकलण्यात आले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन या स्पर्धेमध्ये इस्लामाबाद युनायटेड संघाचे प्रतिनिधित्व करत होता. पाकिस्तानमधील परिस्थिती बिघडल्यानंतर परदेशी खेळाडूंनी आपापल्या देशांमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. मायदेशी परतल्यानंतर त्यांना विलगीकरणात राहावे लागत आहे. करोनाचा फटका खेळांनाही बसल्याचे मला दुःख आहे, असे मत डेल स्टेनने व्यक्त केले.

ढिंच्याक पूजाचे ‘होगा ना करोना’
‘सेल्फी मैंने ले ली आज’ या गाण्यामुळे रात्रोरात्र ढिंच्याक पूजा स्टार झाली. आता पुन्हा एकदा ती नवे गाणे घेऊन आली आहे. तिने हे नवे गाणे करोनावर तयार केले आहे. ढिंच्याक पूजाच्या या गाण्याचे नाव ‘होगा ना करोना’ असे आहे. सोशल मीडियावर ढिंच्याक पूजाचं गाणं तुफान चर्चेत आलं आहे. ढिंच्याक पूजाच्या या गाण्याला 4 लाखाहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. तिचे चाहते तिच्या नव्या गाण्यावर भरभरून प्रतिसाद देत आहेत. ढिंच्याक पूजाचा अनोखा अंदाज हा लोकांना फारच आवडलेला दिसत आहे.

बेदम मारहाण
जगभरात थैमान घालणार्‍या करोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. करोना चीनमधून पसरल्याने चिनी लोकांबद्दल जगभरात भीती व संताप व्यक्त होत आहे. याच पार्श्वभूमीवर इस्त्रायलमध्ये एका भारतीय तरुणाला चिनी समजून काहीजणांनी करोना करोना ओरडत बेदम मारहाण केली. हा तरुण मणिपूरचा आहे. दरम्यान, याप्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. अ‍ॅम शालेम सिंगशन (28) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लष्करातही करोना
देशभरात करोना विषाणूने थैमान घातले आहे. देशात करोना जलद गतीने पसरत असताना करोना आता देशाच्या सीमेचे रक्षण करणार्‍या भारतीय जवानांपर्यंत पोहचला आहे. लडाखमध्ये लष्करातील एका जवानाची करोनाची चाचणी करण्यात आली. त्यानंतर या चाचणीत तो करोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. लष्करातील जवानाला करोनाची लागण झाल्याचे हे पहिले प्रकरण आहे.

असं आटोपलं लग्न
जगभरात करोनाचा उद्रेक झाल्यानंतर देशातील विविध राज्यात यामुळे बिकट परिस्थिती उद्भवली आहे. दिवसेंदिवस बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना ठिकठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने पावले टाकली आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्या इच्छा-आकांक्षेला मुरड घालत अकोले तालुक्यातील दोन कुटूंबीयांनी घरातील विवाह समारंभ मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत एक दिवस अगोदरच साजरा करत प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

तणावामुळे कुत्र्याचा मृत्यू
करोनाची लागण झाल्याच्या संशयावरून क्वारंनटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या हाँगकाँगमधील 17 वर्षीय कुत्र्याचा मृत्यू झाला. त्याला करोनाची लागण झाली नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर शनिवारी घरी सोडण्यात आले. पण घरी आल्यानंतर काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. आठवडाभर कुटुंबापासून व मालकापासून दूर राहिल्याने तो तणावाखाली होता. त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे हाँगकाँगच्या अ‍ॅग्रीकल्चर फिशरीज अँड कन्झर्वेशन प्राणीतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

बॉलीवूड सेलिब्रिटींची लग्नं लांबणीवर
करोनामुळे भारतीय नागरिक आता दक्ष राहू लागले आहेत. तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे अशा शासनाने केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद नागरिक देत आहेत. अनेकांनी आपले घरगुती समारंभ पुढे ढकलले आहेत. पुण्यातही दोन जोडप्यांनी करोनाची रिस्क न घेणंच पसंत केलं आहे. त्यांनी आपले लग्न पुढे ढकलले आहे. लग्न जमलेल्या बॉलिवूडकरांनाही करोनाचा फटका बसला आहे. अभिनेता वरूण धवन व अली फझल या दोघांचीही लग्नं करोनामुळे लांबणीवर पडली आहेत.