घरफिचर्सशांतीवन पोरके झाले!

शांतीवन पोरके झाले!

Subscribe

साव्यसाची विचारवंत, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, समाजवादी विचारांचा मेरूमणी आणि कुष्ठरोग्यांचे श्रध्दास्थान असलेल्या ‘शांतीवन’चे आधारवड ऋषीतुल्य चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या आकस्मिक जाण्याने तमाम कुष्ठरोगींचे तपोवन असलेले पनवेलचे शांतीवन अक्षरश: शांत झाले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात होणारा शांतीवनातील आनंद मेळा धर्माधिकार्‍यांच्या जाण्याने परंपरा मोडीत काढणारा ठरेल, हे सांगायला नको. गांधी विचाराने भारलेले व्यक्तीमत्व म्हणून धर्माधिकार्‍यांचा विशेष उल्लेख होतो. जगन फडणीस यांच्या ‘महात्म्याची अखेर’ या पुस्तिकेच्या निर्मितीनंतर गोडसे भक्तांनी केलेल्या उच्छादाला आणि त्यानिमित्ताने निर्माण केलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे देणार्‍या दोन व्यक्तींनी सारा महाराष्ट्र ढवळून काढला. त्यात एक होते न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी आणि दुसरे ज्येष्ठ साहित्यिक आणि अ.भा.साहित्य संमेलनाचे तत्कालीन अध्यक्ष य.दि.फडके. महात्माजींवरील बेछूट आरोप लीलया मोडून काढणारी सडेतोड उत्तरे देऊन या दोन महान व्यक्तींनी महात्माजींचे महत्त्व २१व्या शतकात वावरणार्‍या तरुणांपुढे ठेवले. मुद्देसूद विवेचन आणि विषयाच्या आकर्षक अशा मांडणीमुळे महात्माजींवर चिखलफेक करणार्‍यांची तोंडं या दोन महान व्यक्तींनी बंद केली.

धर्माधिकार्‍यांचं घराणं मुळातच मूल्यांची जपणूक करणारं. वडील दादा धर्माधिकारी यांनी महात्मा गांधीजींचं अनुयायित्व स्वीकारल्यानंतर साध्या राहणीच्या संस्कारांनी धर्माधिकार्‍यांच्या आजवरच्या पिढीला कायम जोडून ठेवलं. यामुळेच धर्माधिकार्‍यांचं जीवन त्यागी आणि कष्टाळू बनलं. मातोश्रींचं माहेर हे धनवंताच्या घरचं असूनही अगदी साधेपण धर्माधिकार्‍यांच्या घरात कायम टिकून राहिलं. वर्ध्यातील वस्तीत दादांच्या घरी महात्माजींबरोबरच विनोबा भावे यांच्यासारख्या तपस्वींचा सहवास लाभलेल्या चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यावर त्या विचारांचं गारूड निर्माण झालं. १९४२ च्या ‘चलेजाव’च्या स्वातंत्र्य संग्रामात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सहभागाचं नेतृत्व तेव्हा चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केलं. ते दादांनाही मानवलं. या स्वातंत्र्य संग्रामातल्या लढ्यातील सहभाग चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या भावी जीवनाच्या वाटचालीतील मैलाचा दगड ठरला. पुढे ट्रेड युनियनच्या लढ्यात स्वत: धर्माधिकार्‍यांनी स्वत:ला झोकून दिलं.

- Advertisement -

नागपूरमध्ये स्वत:चा वकिली व्यवसाय सुरू केला आणि कुटुंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली. अतिशय कुशाग्र आणि तल्लख बुध्दीमत्तेच्या धर्माधिकार्‍यांकडे निवाडा दानाची जबाबदारी म्हणजे न्यायमूर्तीपद देणं तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींना सोयीचं वाटलं. वकिली पेशातील तडजोडीतल्या दानापेक्षा खर्‍या न्यायापासून कोसभर दूर राहिलेल्या रंजल्या गांजल्यांना न्याय देण्यासाठी त्यांनी न्यायमूर्तीपद घेण्याचं मान्य केलं. न्यायाचं दान करणार्‍यांनी सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेऊ नयेत, असे साधारण संकेत आहेत. पण न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकार्‍यांची वाणीच त्यांना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करायला भाग पाडायची. मनाचा वेध घेणार्‍या या न्यायमूर्तींची भाषणं म्हणजे विचारवंतांसाठी वैचारिक खाद्यच होतं. न्यायमूर्तींच्या या अचाट वाणीची चर्चा सर्वदूर पसरली, ती अखेरपर्यंत तशीच राहिली. न्या. धर्माधिकारी यांचं कर्तृत्व खर्‍या अर्थाने बहरलं ते त्यांच्या न्यायदानातील निवृत्तीनंतर. महात्माजींचं उदात्त जीवनमूल्य युवा पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी देशभर शिबिरं घेतली. व्याख्यानांतून त्यांनी महात्म्यांच्या विषयाची उत्तम मांडणी विषयरुपाने पुढे केली. ती या पिढीने स्वीकारलीही. अनेक भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. यामुळे हिंदी भाषिक राज्यांमध्ये त्यांच्या व्याख्यानांना विशेष प्रतिसाद मिळे आणि त्यांच्या भाषेचा प्रभावही पडे.

महात्माजींच्या कार्याचा न्या. धर्माधिकारी यांच्या जीवनात इतका पगडा होता की त्यांनी महात्माजींचं कार्य कुष्ठरोग निर्मूलनाद्वारे पुढे नेण्यासाठी शांतीवनचा आधार घेतला. चंद्रशेखर धर्माधिकार्‍यांच्या शांतीवनातील निस्पृह कार्याची दखल घेत पदाधिकार्‍यांनी त्यांच्या खांद्यावर या संस्थेचे अध्यक्षपद दिलं. गोविंदराव शिंदे आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या कार्याला हातभार लावण्यासाठी धर्माधिकार्‍यांनीही ती जबाबदारी स्वीकारली. आणि शांतीवनसाठी सारी शक्ती पणाला लावली. इथे होणार्‍या सानेगुरुजी कथामालेतही त्यांचा आवर्जून सहभाग असायचा. दरवर्षी शांतीवनात भरणार्‍या आनंद मेळ्याचे धर्माधिकारी हेच आकर्षण असायचं. पाहुणे कोणीही असोत धर्माधिकार्‍यांच्या अध्यक्षीय भाषणाचं आकर्षण काही औरच असे. उजव्या हाताच्या तर्जनीकडे पाहत ते एकेका विषयाला हात घालत तेव्हा सरस्वतीच त्यांच्या तोंडून वदते की काय असं वाटे. विविध विषयांची आखणी आणि त्याची सूत्रबध्द मांडणी करत त्यांच्या तोंडून दुष्टांवर ओढले जाणारे आसूड आणि सज्जनांवर पडणारी कौतुकाची थाप याचा मिलाप काही औरच असे. राजस्थानच्या डोंगरात भुकेल्या मुलासह गायींची राखण करणार्‍या मातेच्या व्यथा धर्माधिकारी यांनी आपल्या शब्दात मांडली. त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. त्यातून धर्माधिकार्‍यांचे आचाट वक्तृत्व दिसून आले.

- Advertisement -

राज्यातल्या कुष्ठरोगींचा आधारवड बनलेल्या शांतीवनने मानवाला दुसरा जन्म दिला आहे, असं धर्माधिकारी नेहमीच सांगायचे. शांतीवनातील कुष्ठरोग्यांच्या जीवनाचे शिल्पकार कोणीही असोत, पण आधारवड मात्र न्या. धर्माधिकारीच होते. हे तिथे गेल्यावर मान्यच करावं लागतं. शेकडोंच्या संख्येने मेळ्यात येणार्‍यांचे हात तिथे उदार होतात. एका दिवसाच्या सोहळ्यात आर्थिक सहाय्य करणारे अनेक हात धर्माधिकार्‍यांमुळे तिथे ओढले जात. येत्या फेब्रुवारी महिन्यात होणारा शांतीवनचा हा आनंद मेळा धर्माधिकार्‍यांशिवाय होणार हे न स्वीकारता येणारं सत्य आहे.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -