घरफिचर्सभारतीय हरित क्रांतीचे जनक

भारतीय हरित क्रांतीचे जनक

Subscribe

भारतीय गरीब शेतकर्‍यांच्या शेतात गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला.

भारतीय अनुवंशशास्त्रज्ञ, आंतरराष्ट्रीय प्रशासक आणि कृषी शास्त्रज्ञ डॉ.एम.एस.स्वामीनाथन यांचा आज जन्मदिवस. भारतातील हरितक्रांतीमध्ये स्वामीनाथन यांचा मोलाचा वाटा होता. भारतासारख्या कृषिप्रधान देशात कृषी क्षेत्रातील संशोधनासाठी त्यांनी ‘एम.एस.स्वामीनाथन रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केली आहे. ७ ऑगस्ट १९२५ रोजी तामिळनाडूमधील कुंभकोणम येथे सांबशिवम स्वामीनाथन यांचा जन्म झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. ते गांधीवादी व स्वदेशीचे पुरस्कर्ते होते. वडिलांच्या विचारांचा स्वामीनाथांवर पगडा होता. स्वामीनाथन अवघ्या दहा वर्षांचे असताना वडिलांचे निधन झाले. मात्र, पितृविरहाचे दुःख बाजूला ठेवत स्वामीनाथन यांनी आपला अभ्यास सुरू ठेवला. सुरुवातीला वडिलांप्रमाणे स्वामीनाथनसुद्धा डॉक्टरी शिक्षणाकडे वळले, पण त्यावेळी बंगालमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळामुळे स्वामीनाथन यांना दुःख झाले. सुरुवातीपासूनच शेती क्षेत्राची आवड असलेल्या सांबशिवम स्वामीनाथन यांनी डॉक्टरी शिक्षण अर्धवट सोडले. त्यानंतर ते शेतकी विषयाकडे वळले. १९४४ मध्ये त्रावणकोर विद्यापीठातून ते बी.एससी पदवीधारक झाले. त्यानंतर १९४७ मध्ये कोईंबतूर कृषी महाविद्यालयातून त्यांनी कृषी विषयात बी.एससीची पदवी मिळवली. १९४९ मध्ये स्वामीनाथन यांनी दिल्लीच्या इंडियन ग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटमधून विशेष प्रावीण्यासह पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर स्वामीनाथन केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले. ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले. मात्र, त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करण्याचा निर्णय घेतला. १९५२ मध्ये स्वामीनाथन यांनी केंब्रिजच्या अ‍ॅग्रीकल्चर स्कूलमधून पीएचडी मिळवली. यावेळी त्यांचा संशोधनाचा विषय बटाटा होता. पदवी मिळवल्यानंतर स्वामीनाथन यांनी शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी मद्रासच्या कृषी महाविद्यालयात (आताच्या तामिळनाडू कृषी विद्यापीठात) प्रवेश घेतला. येथे त्यांनी कृषी विषयातील पदवी संपादित केली. कृषी क्षेत्रातील अभ्यासाकडे वळण्याविषयी स्वामीनाथन यांनी एक आठवण सांगितली आहे. १९४३ मध्ये केरळ विद्यापीठाचा विद्यार्थी असताना बंगालमध्ये दुष्काळ पडला होता. त्यावेळी प्रत्येकजण देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान देत होता. बंगालमधील दुष्काळातून प्रेरणा घेत देशातील शेतकर्‍यांसाठी कार्य करण्याचा विचार करत त्यांनी कृषी क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. अभ्यासात हुशार असलेल्या स्वामीनाथन यांनी अभ्यासासोबतच खूप कष्ट उपसले. १९४९ ते ५० या कालावधीत त्यांनी नेदरलँड्स विद्यापीठात अनुवंशशास्त्र विभागाचे युनेस्कोचे फेलो म्हणून काम केले. त्यानंतर १९५२ ते ५३ या कालावधीत त्यांनी अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या अनुवंशशास्त्र विभागात संशोधन सहकारी म्हणून काम केले, पण स्वामीनाथन यांना त्यांच्या संशोधन कार्यात मदत होईल, अशा कामाची गरज होती. अशातच आंतरराष्ट्रीय संस्थेत तांदळावर संशोधन करण्याची संधी त्यांना मिळाली. या ठिकाणी त्यांनी तांदळाच्या जपानी आणि भारतीय जातींवर संशोधन केले. त्यानंतर १९६५ मध्ये कोशा येथील एका संस्थेत त्यांना नोकरी मिळाली. येथे त्यांना गव्हाच्या संशोधन कार्याची जबाबदारी देण्यात आली. त्याचबरोबर तांदळावरही त्यांचे संशोधन चालूच होते. दरम्यानच्या काळात स्वामीनाथन आणि त्यांच्या सहकार्‍यांना त्यावेळी भारतात आलेल्या डॉ. व्होरलॉग यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. व्होरलॉग यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करत डॉ. स्वामीनाथन यांनी गव्हावर संशोधन करत गव्हाचे उत्पन्न वाढविणार्‍या बियाणांचा शोध लावला. त्यांच्या यशाची माहिती मिळताच १९७१ मध्ये डॉ. व्होरलॉग पुन्हा भारतात आले. १९६५ ते ७१ या काळात डॉ. स्वामीनाथन पुसा संस्थेचे संचालक होते. या काळात गव्हावर उत्कृष्ट संशोधन करण्यात आले. या कालावधीत त्यांनी अनेक लेख लिहिले. ज्यामुळे डॉ. स्वामीनाथन आणि पुसा संस्थेची जगाला ओळख झाली. स्वामीनाथन यांनी संशोधन करून निर्माण केलेली गव्हाचे बियाणे उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि दिल्ली येथील शेतकर्‍यांना वाटण्यात आली. परिणामी त्या वर्षी भारतात गव्हाचे भरघोस उत्पादन निघाले. भारतीय गरीब शेतकर्‍यांच्या शेतात गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला. देशातील शेतकर्‍यांची दुरवस्था घालवण्यासाठी १८ नोव्हेंबर २००४ मध्ये आयोगाची स्थापना करण्यात आली. डॉ. एम.एस. स्वामीनाथन हे या आयोगाचे अध्यक्ष होते. २००६ पर्यंत या आयोगाद्वारे एकूण ६ अहवाल सादर करण्यात आले आहेत. या अहवालात आयोगाने शेतकर्‍यांच्या हालाखीची कारणे व त्यावर उपाय सुचविण्यात आले आहेत. डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या कार्याची दखल घेत त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यामध्ये १९७१ मध्ये सामुदायिक नेतृत्वासाठी रेमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला. तसेच १९६७ मध्ये पद्मश्री, १९७२ मध्ये पद्मभूषण आणि १९८९ मध्ये पद्मविभूषण हे पुरस्कार देऊन डॉ. स्वामीनाथन यांना सन्मानित करण्यात आले आहे. देशभरातल्या विद्यापीठांच्या २२ डॉक्टरेट मिळणारे डॉ. स्वामीनाथन बहुधा एकमेव संशोधक असावेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -