घरफिचर्सश्रेष्ठ कवी, कथाकार सदानंद रेगे

श्रेष्ठ कवी, कथाकार सदानंद रेगे

Subscribe

कौटुंबिक अडचणींमुळे १९४२ पासूनच त्यांनी नोकरीस प्रारंभ केला. पश्चिम रेल्वेत त्यांनी दीर्घकाळ नोकरी केली. पुढे काही काळ ते मुंबईच्या रामनारायण रूईया कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक होते. कवी आणि कथाकार या दोन्ही नात्यांनी रेग्यांनी मराठी साहित्यात वैशिष्ठ्यपूर्ण स्थान मिळविले.

सदानंद रेगे हे श्रेष्ठ कवी, कथाकार आणि अनुवादक. सदानंद रेगे यांचा जन्म २१ जून १९२३ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचा. शिक्षण एम.ए.पर्यंत. जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्येही ते एक वर्ष होते. कौटुंबिक अडचणींमुळे १९४२ पासूनच त्यांनी नोकरीस प्रारंभ केला. पश्चिम रेल्वेत त्यांनी दीर्घकाळ नोकरी केली. पुढे काही काळ ते मुंबईच्या रामनारायण रूईया कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक होते. कवी आणि कथाकार या दोन्ही नात्यांनी रेग्यांनी मराठी साहित्यात वैशिष्ठ्यपूर्ण स्थान मिळविले. त्यांच्या अनुवादित ललितकृतींनीही मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. अक्षरवेल (१९५७), गंधर्व (१९६०), देवापुढचा दिवा(१९६५), वेड्या कविता (१९८०), ब्रांकुशीचा पक्षी(१९८०). हे त्यांचे महत्वाचे कवितासंग्रह. व्हल्द्यीम्यिर मायकोव्हस्की या रशियन कवीच्या कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद १९८१ मध्ये ‘पँट घातलेला ढग’ या नावाने प्रसिद्ध झाला. तसेच अमेरिकन कवी वॉल्ट व्हिटमन याच्या कवितांचा त्यांनी केलेला अनुवाद ‘तृणपर्णे’ या नावाने १९८२ मध्ये प्रसिद्ध झाला. जीवनाची वस्त्रे (१९५१), काळोखाची पिसे (१९५४), चांदणे (१९५९), चंद्र सावली कोरतो (१९६३) आणि मासा व इतर विलक्षण कथा (१९६५) हे त्यांचे कथासंग्रह होत.

अद्भुताकडे झुकणारी विमुक्त, स्वैर चमकदार कल्पनाशक्ती, सर्वस्पर्शी वृत्ती आणि उपहास-उपरोधाची छटा असलेला विनोद ही त्यांच्या काव्याची महत्वाची वैशिष्ठ्ये होत. जीवनातील वैफल्य. नैराश्य आणि एकाकी पणाचे तीव्र दुःख त्यांच्या काव्यातून विलक्षण उत्कटतेने व्यक्त झालेले दिसते. याखेरीज तरल संवेदनशीलता, निसर्गप्रेम आणि नवनवीन शब्दसंहतींचा वापर ही वैशिष्ठ्येही त्यांच्या काव्यात दिसतात. ‘चंद्र सावली कोरतो’ सारख्या त्यांच्या कथांमधून जीवनातील विकृतीचे चमत्कृतीचे आणि अनेक विलक्षण अनुभवांचे चित्रण अतीव वेधकतेने आणि समरसतेने केलेले दिसते. त्यांचे विशेष उल्लेखनीय असे काही अनुवादित साहित्य असे : नाटके : जयकेतू (१९५९, सॉफोल्कीझचे ईडीपस रेक्स), ब्रांद (१९६३, इब्सेनचे ब्रांद), बादशहा (१९६६, यूजीन ओनीलचे द एम्परर जोन्स), गोची (१९७४, टाडेउश रूजेविचचे गॉन आउट-मूळ पोलिश), ज्यांचे होते प्राक्तन शापित (१९६५, यूजीन ओनीलचे मोर्निंग बिकम्स इलेक्ट्रा). कादंबर्‍या : चंद्र ढळला (स्टाइनबेकची मून इज डाउन), बंड (१९५८, जॉर्ज ऑर्वेलची निमल फार्म), तांबडे तट्टू (९१६२, जॉन स्टाइनबेकची रेड पोनी), इत्यादी. त्यांनी काही बालवाङ्मयही लिहिले. अक्षरवेल, गंधर्व आणि देवापुढचा दिवा या त्यांच्या काव्यसंग्रहांना महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला होता. मायकोव्हस्की या रशियन कवीच्या कवितांच्या त्यांनी केलेल्या रूपांतरास सोव्हिएट रशियाने ठेवलेले नेहरू पारितोषिक लाभले होते. मुंबई येथे १९८१ मध्ये भरलेल्या समांतर मराठी साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. साहित्याखेरीज चित्रकला, संगीत या कलांचेही उदंड प्रेम व जाण त्यांना होती. सदानंद रेगे हे मराठी साहित्यातील एक अत्यंत मनस्वी, कल्पक आणि विलक्षण व्यक्तिमत्व होते. अशा या महान कवीचे २१ सप्टेंबर १९८२ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -